आयुर्वेद महारसातील महत्त्वपूर्ण खनिज. कौटिल्य अर्थशास्त्रात याचा उल्लेख ‘वैकृन्तक’ नावाने दिसून येतो. रसहृदयतन्त्र ग्रंथापासून अनुक्रमे सर्व रसशास्त्राच्या ग्रंथात महारस तसेच उपरत्न म्हणून याचा उल्लेख आढळतो. विकृन्तयति लोहानि तेन वैक्रान्तकः स्मृतः अशी वैक्रान्त शब्दाची व्युत्पती आहे. कृन्त म्हणजे तुकडे करणे. जो धातुचे तुकडे करतो तो ‘वैक्रान्त’. येथे धातुचे तुकडे याचा संदर्भ धातूखनिजापासून धातु अलग करणे म्हणजे तीव्र उष्णतेमध्ये स्वतः वितळून आपल्याबरोबर असलेल्या खनिजांमधील अशुद्धता व अनावश्यक द्रव्यांना स्वतःमध्ये विलिन करून घेतो व त्या खनिजामधील धातु द्रव स्वरूपामध्ये वेगळा होतो. ‘विक्रामयति लोहानि’ म्हणजे धातुखनिजापासून धातु विलग करणे. ‘विकृन्तयति रोगाणि इति वैक्रान्तः’ अर्थात जो संपूर्ण व्याधी नाहीशी करतो अशास संस्कृत, मराठी आणि हिंदी मध्ये वैक्रान्त म्हणतात.

आयुर्वेदामध्ये वैक्रान्तास विक्रान्त, जीर्णवज्रक, कुवज्रक, क्षुद्रकुलीश, चूर्णवज्र, दग्धहिराका, निचवज्र, ताम्रकाम, पुलका, ताम्ररत्न आणि ताम्राश्म ही पर्याय नावे आहेत. आयुर्वेदानुसार टुर्मलीन (Tourmaline) या खनिजास वैक्रान्त संबोधले जाते. टुर्मलीनला शोभामणि असेही म्हटले जाते. आयुर्वेदात वैक्रान्तचे वर्णन आठ फलक, आठ कोन किंवा सहा फलक, सहा कोन आणि गुळगुळीत, जड, पारदर्शक एकरंगी किंवा भिन्न रंगाचे मिश्रण असलेले खनिज असे दिसून येते. रसार्णव व रसमंजरीमध्ये श्वेत, रक्त, पीत, नील, पारावत, श्याम व कृष्ण हे सात प्रकार सांगितले आहेत. रसेन्द्रचूणामणि व रसरत्नससमुच्चयमध्ये आठवा प्रकार कर्बुर रंगाचा सांगितला आहे.

रसरत्नससमुच्चयकाराने पुन्हा वैक्रान्तचे सात प्रकार रंगावरून केले आहेत. उदा., श्वेत, पीत, रक्त, नील, पारावत प्रभ (पारव्याच्या रंगाचा), मयूरकण्ठ सदृश्य व मरकत प्रभ (हिरवा) कृष्ण वर्णाचा वैक्रान्त औषधीकरणासाठी ग्राह्य समजला जातो.

वैक्रान्त भस्म करण्यापूर्वी वैक्रान्तवर शोधन, मारण इत्यादी संस्कार केले जातात. वैक्रान्त भस्म त्रिदोषघ्न, शीतवीर्यात्मक असते. यामध्ये बल्यवर्धक, कांतिवर्धक, प्रज्ञावर्धक गुणधर्म आढळतात. वैक्रान्त भस्माचा उपयोग प्रामुख्याने ज्वर (Fever), कुष्ठ (Leprosy) राजक्ष्मा / क्षय (Tuberculosis), प्रमेह (Diabetes), जरा (Senile diseases), उदररोग (Ascites), अर्श (Piles), गुल्म (Tumour), पांडु (Anaemia) इत्यादी रोगांमध्ये केला जातो. रत्नप्रभावटी, वसन्तकुसुमाकर रस, सूचिकाभरण रस, कांचनाभ्र रस, अपूर्व मालिनीवसन्त रस, वैक्रान्त रसायन, त्रिलोक्य चिंतामणी रस, रत्नाकर रस, विजय पर्पटी, वडवनल रसनिर्मितीमध्ये वैक्रान्त भस्माचा वापर केला जातो.

संदर्भ :

  • Dole, Vilas; Paranjpe, Prakash A Text Book of Rasashastra, Chaukhamba Sanskrit, Pratishthan, Delhi, 2006.
  • Murthy, S. R. N. Minerals of the Indian Systems of Medicine, Prasad Narasimha, Bangalore, 2003.
  • झा, चन्द्रभूषण आयुर्वेदीय रसशास्त्र, चौखम्बा सुरभारती प्रकाशन, वाराणसी, २०२०.

समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर