डचांची विजयदुर्ग मोहीम : (१७३९). डचांनी विजयदुर्ग ताब्यात घेण्यासाठी आंग्र्यांविरुद्ध काढलेली एक मोहीम. सरखेल संभाजी आंग्र्यांच्या नेतृत्वाखाली मराठी आरमाराची डच ईस्ट इंडिया कंपनीच्या नॉर्डवुल्फ्सबर्गेन (Noordwolfsbergen), झीलँड्स वेल्व्हारेन (Zeelands Welvaren) आणि मॅग्डालेना (Magdalena) या तीन जहाजांशी झटापट झाली (१७३८). झीलँड्स वेल्व्हारेन व मॅग्डालेना ही जहाजे व त्यांवरील सुमारे एक तृतीयांश लोकांना मराठ्यांनी ताब्यात घेतले. ती जहाजे व त्यांवरील लोकांना सोडविण्यासाठी कंपनीने विजयदुर्ग उर्फ घेरियावर स्वारी करण्याचा बेत आखला. डच आरमाराने तेथे नांगर टाकून राहावे व संभाजी आंग्र्यांना आपल्या मागण्या कळवाव्यात व त्यांच्याकडून उत्तर न आल्यास किंवा प्रतिकूल उत्तर आल्यास हल्ला करून आंग्र्यांना नमवावे, असे याचे ढोबळ स्वरूप होते. १७३९ च्या मार्च महिन्या अखेरीपर्यंत ही मोहीम संपावी, अशी डचांची प्राथमिक अटकळ होती. ही मोहीम विशेष लांबवण्याचा हेतू नव्हता, कारण आंग्र्यांनी पोर्तुगीज व इंग्रजांवरती बसवलेली जरब डचांच्या पथ्यावरच पडत असे.
यानुसार डचांच्या आशिया खंडातील साम्राज्याचे केंद्र असलेले बटाव्हिया (आताच्या इंडोनेशियामधील जाकार्ता) येथून अकरा जहाजांचा ताफा निघाला (९ फेब्रुवारी १७३९). यात कार्सेनहॉफ हे मुख्य जहाज अर्थात फ्लॅगशिप असून त्यासह केटेल, पोलानेन, हार्टेनलुस्ट, रिडरकर्क अशी मोठी जहाजे होती. हा ताफा बटाव्हियाहून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील बसरूर बंदरात आला. एकूण तेरा जहाजांच्या या ताफ्यात सर्व जहाजांवर मिळून ३२२ तोफा व १४३९ खलाशी आणि सैनिकांचा समावेश होता.
डचांनी लादलेल्या अटींमध्ये आंग्र्यांनी डच जहाजांवर केलेल्या हल्ल्यांबद्दल माफी मागावी, १७३८ मधील हल्ल्यांबद्दल ८०,००० रुपये भरपाई म्हणून द्यावेत, जहाजांवरील सर्व माल परत करावा, आंग्र्यांच्या कैदेत असलेल्या प्रत्येक डच कैद्याला नुकसानभरपाई द्यावी, आंग्र्यांच्या ताब्यातील डच जहाजांच्या दुरुस्तीसाठी १०,००० रुपये देऊन जहाजे परत करावीत, शिवाय विजयदुर्ग मोहिमेचा १,००,००० रुपये इतका खर्च आणि त्याशिवाय वार्षिक नुकसानभरपाई १०,००० रुपये द्यावी, आंग्र्यांच्या आधिपत्याखालील सर्व बंदरांत डच जहाजांना मुक्त संचाराची मुभा असावी, शिवाय समुद्रात डच कंपनीच्या जहाजांसमोर आंग्र्यांच्या जहाजांनी आपला परिचय देऊन मगच मार्गस्थ व्हावे, आंग्र्यांच्या ताब्यातील बंदरांत डच जहाजे मोडकळीस येऊन आश्रय घेऊ पाहत असल्यास आंग्र्यांचे सैनिक त्यांमधील माल ताब्यात न घेता तो डचांना परत करतील, दर वर्षी कोचीनला आंग्र्यांचे एक शिष्टमंडळ आपली मैत्री व निष्ठा दर्शविण्याकरिता येईल इत्यादींचा समावेश होता. यांचे उल्लंघन झाल्यास कंपनीकडून बळाचा वापर करण्यात येईल, अशी धमकीही त्यात स्पष्ट नमूद केली होती.
विजयदुर्गापाशी पोहोचल्यावर मुख्य जहाज कार्सेनहॉफ व संभाजी आंग्र्यांदरम्यान झालेल्या पत्रव्यवहारातून आंग्र्यांची तहाची इच्छा दिसून आली. तहाच्या वाटाघाटी विजयदुर्ग किल्ल्यात व्हाव्यात, अशी आंग्र्यांची इच्छा होती; मात्र डचांनी याला नकार देत, कार्सेनहॉफ जहाजावर आंग्र्यांनी आपले दोन प्रतिनिधी पाठवावेत, अशी मागणी केली. यावर आंग्रे उत्तरले की, त्यांच्या पुरोहितांच्या मते तो दिवस अशुभ असल्यामुळे तेव्हा वाटाघाटी करता येणार नाहीत. हे स्पष्टीकरण म्हणजे वेळकाढूपणा वाटूनही डचांनी ते मान्य केले. दुसऱ्या दिवशी आंग्र्यांनी ओलीस ठेवलेल्या दोघांच्या सहीचे एक पत्र डचांना देण्यात आले. डच कंपनीने आपले दोन प्रतिनिधी विजयदुर्ग किल्ल्यात पाठवावेत, तरच सर्व कैद्यांची-ओलिसांची मुक्तता करण्यात येईल, असे त्यात नमूद केले होते. हा प्रस्ताव धुडकावून देऊन डचांनी किल्ल्यावर तोफांचा मारा सुरू केला. याचा किल्ल्यावर काहीही परिणाम न होता, मराठ्यांना मात्र डचांचे नुकसान करण्यात यश मिळाले.
डचांनी विचारविनिमय करून विजयदुर्ग किल्ल्यात प्रवेश करण्याचे ठरवले; परंतु वायव्येच्या दिशेने वाहणाऱ्या जोराच्या वाऱ्यांमुळे तसेच मोठ्या लाटा व समुद्रप्रवाहामुळे त्यांचा पहिला प्रयत्न वाया गेला. एका दिवसानंतरचा दुसरा प्रयत्नही अयशस्वी झाला. तीस छोट्या बोटींमधून सैनिकांना जमिनीवर उतरवायचा बेत होता, त्यांपैकी फक्त चार बोटी चांगल्या स्थितीत होत्या. बाकी बोटींसाठी वल्ही नव्हती व त्या गळतही होत्या. अखेरीस १९ मार्च १७३९ रोजी डचांनी तिसरा प्रयत्न केला व लगतच्या गावातील अंदाजे शंभर घरे, आसपासची काही गावे व दोन गायीही जाळण्यात आल्या. तरीही मराठे किल्ल्यातून बाहेर आले नाहीत व डचांनीही किल्ल्यावर हल्ला केला नाही. त्यामुळे दोन्ही सैन्यांत लढाई अशी झालीच नाही. या कृत्यामुळे ओलिसांच्या संचारस्वातंत्र्यावर मात्र गदा आली.
यानंतर डचांचे दक्षिणेला जाण्याचे ठरले. कारण विजयदुर्गच्या दक्षिणेला असलेला सिंधुदुर्ग किल्ला तेव्हा १७३६ पासून डचांशी मैत्रीपूर्ण संबंध असलेले कोल्हापूरकर छत्रपती संभाजीराजे दुसरे यांच्या ताब्यात होता. या पार्श्वभूमीवर आंग्र्यांची सात गुराबे व आठ गलबते डचांना दिसली, तेव्हा कोल्हापूरकरांच्या मदतीने ती ताब्यात घेऊ शकू असे वाटले; परंतु सिंधुदुर्गाच्या किल्लेदाराने डचांच्या मदतीस सैन्य पाठवण्याची घोषणा करूनही आंग्र्यांचा जहाजांना कोणताही अडथळा केला नाही.
या दरम्यान सिंधुदुर्गाजवळच्या एखाद्या योग्य जागेवरून आंग्र्यांच्या आरमारावर मारगिरी करण्यासाठी चर्चा करण्यात आली. पहिल्या दिवशी काही मोजमापे घेतल्यावर आसपासचा भाग खूप उथळ असल्याचे लक्षात आले. दुसऱ्या दिवशी परस्परविरोधी मते आल्याने डच आरमार स्तब्ध राहिले. तिसऱ्या दिवशीची काही मोजमापे पहिल्या दिवशीच्या मोजमापांशी जुळल्यामुळे कार्सेनहॉफ, सूटेलिंग्सकर्क, पोलानेन, ॲना कॅथरिना, झ्वाईनड्रेख्ट या पाच जहाजांनी खाडीत एका रेषेत दक्षिण बाजूने प्रवेश करून आंग्र्यांच्या आरमारावर हल्ला करावा व उर्वरित जहाजांनी उत्तर बाजूस थांबून त्याची सुटका न होईल असे पाहावे, असा बेत ठरला; परंतु हा बेत तडीस गेला नाही. कार्सेनहॉफ जहाजाचा मुख्याधिकारी ब्रुखमान याने किनाऱ्याजवळ जाण्यास नकार देऊन जहाज नांगरले. मोहिमेचा मेजर कमांडर (मुख्य सेनाधिकारी) सीर्स्मा याने ब्रुखमानला आपला निर्णय बदलण्यास परोपरीने विनवले; परंतु ब्रुखमान बधला नाही. एका रेषेत असल्याने पोलानेन आणि सूटेलिंग्सकर्क ही जहाजेही कार्सेनहॉफप्रमाणेच अडकून पडली. तोपर्यंत सिंधुदुर्गाच्या दक्षिण बाजूने भिंती व कडे यांमधून आंग्र्यांच्या आरमाराने आपली सुटका करून घेतली. अखेरचा उपाय म्हणून कमांडर सीर्स्मा हा कार्सेनहॉफ जहाज सोडून सूटेलिंग्सकर्क जहाजावर चढला व आंग्र्यांच्या आरमाराचा पाठलाग करण्यासाठी जहाज वळवू लागला. घाईघाईत जहाज अडकून पडले व त्याचे सुकाणू मोडले. थोड्या वेळाने जहाज पुढे गेले तोपर्यंत आंग्र्यांचे आरमार खूप पुढे निघून गेले होते. यानंतर पुन्हा एकदा आंग्र्यांचा पाठलाग करण्याचे ठरले; परंतु दोन दिवसांनी डचांच्या लक्षात आले की, ही मोहीम पूर्णपणे फसली होती. या पूर्ण मोहिमेत दोन्ही बाजूंनी मनुष्यहानी झाली नाही, मात्र डच कंपनीच्या अनेक जहाजांचे मोठे नुकसान झाले. आंग्र्यांविरुद्धची डचांची ही सर्वांत मोठी, पण अयशस्वी मोहीम ठरली.
संदर्भ :
- Sen, Surendra Nath, Early career of Kanhoji Angria and other papers, University of Calcutta, Calcutta, India, 1941.
- VOC 2472, pp.879-995, pp.1011-1083, Reports prepared in 1739 (Unpublished manuscripts), VOC (Verenigde Oostindische Compagnie i.e. Dutch East India Company) Archives, Archive no. 1.02.04., Part of the Nationaalarchief, The Hague, Netherlands.
समीक्षक : सचिन जोशी