डच ईस्ट इंडिया कंपनीची नेदरलँड्समधील कागदपत्रे. नेदरलँड्समधील द हेग येथील राष्ट्रीय पुराभिलेखागारात ही कागदपत्रे असून त्यांत डच ईस्ट इंडिया कंपनीचे मोठे दफ्तर आहे. याचा संग्रह क्रमांक १.०४.०२ असून एकूण १४,९३३ खंड आहेत. यांतील बहुतांश कागदपत्रे डच भाषेत असून अत्यल्प प्रमाणात फार्सी व तेलुगु आदी भाषांतही आहेत. अनेक खंडांमध्ये २००० च्या वर पाने आहेत.

राष्ट्रीय पुराभिलेखागार, द हेग, नेदरलँड्स.

या संग्रहाची रचना विविध विभागांखाली अतिशय सुसूत्र पद्धतीने केलेली आहे. प्रत्येक खंडाला व्हिओसी १ ते व्हिओसी १४९३३ (VOC 1 ते VOC 14933) पर्यंत क्रमांक दिलेले आहेत. यांतील पहिला व सर्वांत मोठा भाग आहे तो कंपनीच्या १७ सदस्यीय संचालक मंडळ आणि ॲम्स्टरडॅम चेंबरच्या कागदपत्रांचा. यात व्हिओसी १ ते व्हिओसी ७२३१ या क्रमांकांचे खंड असून इ. स. १६०२-१७९५ पर्यंतची कागदपत्रे आहेत. यांतील कागदपत्रांचे स्वरूप सर्वसाधारणपणे सारख्याच स्वरूपाचे आहे. डच ईस्ट इंडिया कंपनीच्या एखाद्या वखारीतले अहवाल प्रांतीय मुख्यालयाकडे जात, तेथून बटाव्हिया (इंडोनेशिया) मधील गव्हर्नर जनरलकडे व नेदरलँड्समधील १७ सदस्यीय संचालक मंडळाकडे जात. यांतील प्रत्येक पायरीत अहवाल अधिकाधिक संक्षिप्त होत. आवश्यक वाटल्यास संचालक मंडळ त्यांच्याकडील येणाऱ्या अहवालांमधल्या काही भागाचा सारांश काढून ठेवून त्यानंतर बटाव्हिया किंवा प्रादेशिक मुख्यालयांना सूचना करत असे.

डच कागदपत्रांमधील एका खंडाचे चित्र.

व्हिओसी २४ ते व्हिओसी २११ क्रमांकांच्या खंडांत संचालक मंडळाच्या इ. स. १६५३-१७९६ मधील सामान्य व विशेष बैठकींचे तपशीलवार अहवाल आहेत. यातच काही गुप्त बैठकींचे कागदपत्रही आहेत. बैठकींच्या विषयांची व यांत घेतलेल्या निर्णयांची यादीही मूळ हस्तलिखित खंडांत दिलेली आहे. व्हिओसी ४४५५ ते व्हिओसी ४५०६ या खंडांत संचालक मंडळ द हेगमध्ये बसून, आशिया खंडातून आलेल्या अहवालांचा परामर्श घेऊन त्याचा सारांशरूपी अहवाल तयार करत असे. बटाव्हिया येथील गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलने तयार केलेल्या अहवालासारखेच याचेही स्वरूप होते. या अहवालात आशिया खंडात परत पाठवावयाची उत्तरे व त्यासंबंधीच्या टिपण्या असत.

व्हिओसी ३१२ ते व्हिओसी ३५४ क्रमांकांच्या खंडांत संचालक मंडळ व ॲम्स्टरडॅम चेंबरने केप ऑफ गुड होप येथील अधिकाऱ्यांना इ. स. १६१४-१७९५ मध्ये पाठवलेली कागदपत्रे आहेत. यानंतरचा महत्त्वाचा उपविभाग आहे तो व्हिओसी ६५६ ते व्हिओसी ८४७. यांत बटाव्हिया (इंडोनेशिया) मधील गव्हर्नर जनरल व काउन्सिलने घेतलेल्या निर्णयांचे तपशील आढळतात. विविध स्थानिक शासकांकडे पाठवावयाचे वकील, राजकीय संबंध, शासकांना द्यावयाच्या भेटवस्तू, व्यापारी वाहतूक, समुद्रप्रवासाचे परवाने, समुद्री लुटारू, डच वखारी व किल्ले, विविध प्रकारची नाणी, मुसलमान व ख्रिस्ती धर्मोपदेशक, विविध प्रकारचे मसाल्याचे पदार्थ, नानाविध वस्त्रे, मोती, हत्ती इत्यादी अनेकविध गोष्टींबद्दल यांत माहिती मिळते. याच्याशीच निगडित पुढील उपविभागात व्हिओसी ८४९ ते व्हिओसी १०५२ या क्रमांकांचे खंड आहेत. यांत बटाव्हियाकडून अनेक वखारींना लिहिलेली पत्रे आहेत.

यानंतर व्हिओसी १०५३ ते व्हिओसी ३९८६ या सर्वांत मोठ्या उपविभागात आशिया खंडातून ॲम्स्टरडॅम चेंबर आणि १७ सदस्यीय संचालक मंडळाला पाठवलेले कागदपत्र आहेत. आजपर्यंत डच ईस्ट इंडिया कंपनीच्या इतिहाससंशोधनासाठी सर्वाधिक वेळेस वापरली गेलेली ही कागदपत्रे असून, यांपैकी जवळपास प्रत्येक खंडांत सुरुवातीला पृष्ठक्रमांकांसह त्या त्या अहवालाचे मथळेही दिलेले आहेत. यालाच आलेली कागदपत्रे  (Overgekomen Brieven en Papieren किंवा OBP) म्हणतात. प्रत्येक खंडातील मथळ्यांची एक वेगळी ३६ खंडी सूचीही हेग पुराभिलेखागारात जलद संशोधनाकरिता उपलब्ध आहे. ओबीपीमध्ये अनेक प्रकारची कागदपत्रे असून, यांत सेवानिवृत्त होणाऱ्या गव्हर्नरने आपल्या नंतरच्या गव्हर्नरकरिता लिहिलेले संक्षिप्त अहवाल, विविध बैठकींचे निर्णय, काही वखारींमधील रोजच्या हकीकतींचे अहवाल, विविध ठिकाणांहून येणाऱ्या व जाणाऱ्या जहाजांची यादी इत्यादींचा समावेश आहे. अनेक अहवालांमध्येही खूप विविध विषयांबद्दल तपशीलवार हकीकत आढळते – विशेषत: तत्कालीन राजकीय परिस्थिती व घडामोडींविषयी. व्यापारविषयक धोरणे ठरवण्याकरिता हे खूप उपयुक्त होते. व्हिओसी ४७७७ ते व्हिओसी ४७८३ मध्ये विविध सत्ताधीशांशी केलेले करारनामे आहेत. क्वचितप्रसंगी यात नसलेले करार ओबीपीमध्ये आढळतात.

यानंतर व्हिओसी ५१६५ ते व्हिओसी ६९६२ यांमध्ये आशिया खंडातील डच कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आहेत. यात साधे कारकून, सैनिक, खलाशी इ. पासून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाचे नाव, मूळ देश व गाव, हुद्द्याचे नाव, कार्यकाळ, कार्यरत असलेल्या विभागाचे नाव, मिळालेला पगार, इ. अनेक गोष्टींचा समावेश आहे. यातच कंपनीच्या जहाजांवरील कर्मचाऱ्यांचाही वेगळा विभाग आहे. त्याखेरीज व्हिओसी ६९६३ ते व्हिओसी ७०१५ या खंडांत आशिया खंडाहून नेदरलँड्समध्ये आणलेल्या विविध व्यापारी वस्तू व त्यांच्या विक्रीसंबंधीचे तपशील आढळतात.

यानंतर व्हिओसी ७२३२ ते व्हिओसी १३८६६ हा दुसरा सर्वांत मोठा भाग कंपनीच्या झीलँड चेंबरने व्यापलेला आहे. याची व्याप्ती, अंतर्गत विभागणी आणि एकूण रचना ही ॲम्स्टरडॅम चेंबरप्रमाणेच आहे. परंतु ॲम्स्टरडॅम चेंबरप्रमाणे झीलँड चेंबरमधील ओबीपी विभागातील खंडांच्या मथळ्यांची सूची उपलब्ध नसल्याने त्यांचा आजवर तितकासा वापर झालेला नाही. त्यानंतर डेल्फ्ट चेंबर (व्हिओसी १३८६७ ते व्हिओसी १४०९३), रॉटरडॅम चेंबर (व्हिओसी १४०९४ ते व्हिओसी १४३१७), एन्खाउझेन चेंबर (व्हिओसी १४३१८ ते व्हिओसी १४६२५), होर्न चेंबर (व्हिओसी १४६२६ ते व्हिओसी १४९११) ही कंपनीच्या अन्य चेंबर्समधील कागदपत्रे आहेत.

या संग्रहातील एकूण पाने जवळपास अडीच कोटी असून, नेदरलँड्सच्या राष्ट्रीय पुराभिलेखागारातील हा एक लहानसा उपविभाग आहे. हा संपूर्ण संग्रह https://www.nationaalarchief.nl  या संकेतस्थळावर संशोधकांना पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे (२०२१).

संदर्भ :

  • Gommans, Jos; Bes, Lennart & Kruijtzer, Gijs, Dutch Sources on South Asia, Volume 1, Manohar Publishers, New Delhi, India, 2001.
  • छायासौजन्य : निखिल बेल्लारीकर यांनी नेदरलँड्स येथील भेटीदरम्यान घेतलेली छायाचित्रे, जुलै २०१६.

                                                                                                                                                                                       समीक्षक : सचिन जोशी