साधारणपणे गर्भ जीवनक्षम बनण्यापूर्वी गर्भाशयातून बाहेर पडल्यास, गर्भाला हेतुपुरस्सर नष्ट केल्यास गर्भपात झाला असे म्हणतात. काही लोकांच्या मते गर्भधारणा झाल्याच्या सुमारापासूनच गर्भ सजीव असतो आणि त्यास जिवंत राहण्याचा हक्क आहे. काहींच्या मते गर्भाची हालचाल सुरू झाली म्हणजे सु. पाचव्या महिन्यापासून तर काहींच्या मते गर्भ गर्भाशयापासून स्वतंत्रपणे जगू शकेल अशा अवस्थेत (सु. सातव्या महिन्यापासून) त्यास सजीव असे समजले जावे. त्यामुळे गर्भाची हत्या करणे कोणत्याही परिस्थितीमध्ये अनैतिक समजले जावे, तर काहींच्या मते गर्भाची हत्या ही गर्भिणीचे आयुष्य वाचविण्यासाठी किंवा अपंग, अपरिपक्व, सदोष मूल होणार असल्यास किंवा जबरी संभोग अगर अन्य कारणाने गर्भिणीच्या इच्छेविरुद्ध झालेल्या गर्भधारणा वगैरे कारणांमुळे गर्भाची हत्या करणे क्रमप्राप्त असून त्यास अनैतिकता म्हणता येणार नाही.
येथे अवैधपणे गर्भपात केल्या जाणार्या कृतींविषयी चर्चने भूमिका मांडली असून गर्भाला नष्ट करण्याच्या सर्व पद्धतींचा चर्च निषेध करते व त्याला प्रखर विरोध करते. ‘माणसाच्या गर्भसंभवापासूनच मानवी जीवनाचे संरक्षण व्हावे, त्याचा आदर राखावा आणि अस्तित्वाच्या पहिल्या क्षणापासून व्यक्तीला इतर व्यक्तींप्रमाणे आदराने वागवावे. माणसाला जन्मजात मिळालेल्या मूलभूत हक्कांपैकी एक हक्क म्हणजे त्या व्यक्तीला जीवन जगण्याचा लाभलेला हक्क’ अशी चर्चची भूमिका आहे. परंतु चर्च काही कृती नैतिकदृष्ट्या योग्य म्हणून मान्य करते ज्या अप्रत्यक्ष रीत्या गर्भाच्या नाशास कारणीभूत ठरू शकतात. उदा., एखाद्या कृतीचा प्रत्यक्ष हेतू हा कर्करोगग्रस्त गर्भायश काढण्याचा असतो; परंतु तसे करत असताना त्यातील गर्भाचाही नाश होत असतो. चर्च केवळ गर्भपातास विरोध करते एवढेच नव्हे, तर काही देशांत गर्भपातास असलेल्या कायदेशीर मान्यतेविरुद्ध भूमिका घेत असते.
इ.स. १९६२–६५ या कालावधीत रोम येथे संपन्न झालेल्या जगभरच्या कॅथलिक बिशपांच्या दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेने घोषित केले की, ‘‘मानवी जीवनाचे त्याच्या गर्भधारणेच्या क्षणापासून अत्यंत काळजीपूर्वक रक्षण करायला हवे. गर्भपात आणि बालहत्या हे गुन्हे तिरस्करणीय आहेत’’.
गर्भपाताविषयी चर्चची भूमिका समजून घेताना ‘प्रिन्सिपल ऑफ डबल इफेक्ट अँड इंडायरेक्ट अबॉर्शन’ हे तत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. ह्या तत्त्वानुसार जेव्हा एखादी गरोदर स्त्री तिच्या गर्भाशयाला झालेल्या जीवघेण्या कर्करोगामुळे मरणाच्या दारात असते व कर्करोगग्रस्त गर्भाशय काढून टाकल्याशिवाय तिचा जीव वाचवणे शक्य नसते, तेव्हा तशी शस्त्रक्रिया करताना त्या स्त्रीचा जीव वाचवणे हा प्रमुख हेतू असतो. परंतु ही शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकताना गर्भाशयातील गर्भाचाही नाश होत असतो. गर्भाचा नाश करणे हा त्या शस्त्रक्रियेचा प्रथम हेतू नसतो. त्या स्त्रीचा जीव वाचवण्याचा जो प्रमुख हेतू असतो त्याचा तो अविरहित दुय्यम परिणाम असतो. अशा शस्त्रक्रियेमुळे गर्भाचा नाश हा अस्पृहणीय पण अनिवार्य परिणाम असतो.
गर्भ गर्भाशयात न उतरता जेव्हा तो अंडवाहिनी (Fallopian tube)मध्ये अडकून राहतो व तिथे तो वाढू लागतो, तेव्हा त्याला ‘अस्थायी गर्भधारणा’ (Ectopic Pregnancy) असे म्हणतात. काही काळानंतर अंडवाहिनी फुटून गर्भवती स्त्रीचा मृत्यू अटळ असतो; तेव्हा त्या स्त्रीचा जीव वाचवण्यासाठी तिची अंडवाहिनी काढून टाकणे आवश्यक असते. परंतु अशी शस्त्रक्रिया करताना साहजिकच अंडवाहिनीमधील गर्भाचाही नाश होत असतो.
पोप बारावे पायस ह्यांनी वरील प्रकारच्या शस्त्रक्रियेस मान्यता दिली; कारण अशा शस्त्रक्रियेमुळे गर्भाचा नाश होणार ह्याची पूर्वकल्पना असली, तरीही हा गर्भपात करण्याचा प्रत्यक्ष हेतू नसून तो एकूण प्रक्रियेतील अप्रत्यक्ष गर्भपात मानला जातो.
चर्चची ही भूमिका पुढील दोन तत्त्वांवर आधारित आहे : १) संत थॉमस ह्यांचे सर्वांगीण भल्यासाठी अवलंबविण्याचे तत्त्व (The Thomistic Principle of Totality) : ह्या तत्त्वाचा अर्थ ‘व्यक्तीचा एकूणच जीव वाचविण्यासाठी एक रोगग्रस्त अवयव काढून टाकणे’. २) द्विविध परिणामांचे तत्त्व (Principle of Double Effect) : एखादा चांगला परिणाम साधण्यासाठी व्यक्तीला अपाय होईल अशी कृती करण्यास परवानगी नसली, तरी जेव्हा तोच चांगला परिणाम साधण्यासाठी एखादी कृती करत असताना त्या कृतीचा दुय्यम परिणाम म्हणून त्या व्यक्तीला अपाय होत असूनही जेव्हा ती कृती करण्यासाठी संमती दिली जाते, तेव्हा त्यास द्विविध परिणामांचे तत्त्व असे म्हणतात.
मूलपेशी संशोधन (Stem Cell Research) : सदर पृथक्करणात्मक संशोधनात सूक्ष्म मूलपेशींची रचना व घटक ह्यांचा अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे औषधोपचारासाठी त्यांचा उपयोग ह्यावर संशोधन केले जाते. मानवी बीजांकुरावर अशा संशोधनाला चर्च मान्यता देत नाही; कारण ह्या संशोधनात बीजांकुराचा नाश होत असतो व कुठलेही अंकुर बीज नष्ट करणे म्हणजे उद्या ज्याचे मानवी गर्भात रूपांतर होणार आहे त्या गर्भाचा नाश करणे, म्हणजेच गर्भपात करणे होय, अशी चर्चची भूमिका आहे.
जे कॅथलिक श्रद्धावंत स्वखुषीने हे कृत्य करतात, ते चर्चमधून आपोआप बहिष्कृत होत असतात. ह्याचा अर्थ असा की, त्यांच्यावर तशी शिक्षा लादण्याची गरज भासत नाही. परंतु चर्चच्या कॅनन लॉनुसार काही विशिष्ट परिस्थितीत जर गर्भपात घडला, तर त्या व्यक्तीला अशी शिक्षा होत नाही. उदा., ती व्यक्ती जर १६ वर्षांपेक्षा कमी असेल, किंवा अशा प्रकारचा कायदा व शिक्षा आहे ह्याची माहिती जर त्या व्यक्तीला नसेल, किंवा एखाद्या व्यक्तीला गर्भपात करण्यासाठी तीव्र भीती घातली गेली असेल, किंवा एखाद्या गरजेमुळे किंवा प्रचंड गैरसोय होणार असल्यामुळे जर गर्भपात करणे एखाद्याला भाग पडले असेल, तर चर्च-बहिष्कृतपणाची शिक्षा होत नाही.
संदर्भ :
- Kelly, David F. Contemporary Catholic Health Care Ethics, Georgetown, 2004.
- कॅथलिक खिस्तसभेचा नवा श्रद्धाग्रंथ, जीवनदर्शन प्रकाशन, १९९८.
- https://www.vatican.va/archive/hist_councils/ii_vatican_council/documents/vat-ii_const_19651207_gaudium-et-spes_en.html
- https://www.cacatholic.org/article/gaudium-et-spes-hope-and-joy
समीक्षक : फ्रान्सिस कोरिया