निळो सोनदेव : ( ?— १६७२). छ. शिवाजी महाराजांचे अमात्य. त्यांचे उपनाम भादाणेकर. त्यांच्या जन्म-मृत्यूच्या तारखांबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. निळोपंतांकडे पूर्वापार देशमुखी वतन होते. १६५७ सालापासून निळोपंत छ. शिवाजी महाराजांच्या सेवेत होते. त्यांच्या वडिलांचे नाव सोनाजी नारायण भादाणेकर. छ. शिवाजी महाराजांनी तळकोकणात स्वारी केली, तेव्हा त्यांना निळोपंतांच्या गुणांची चमक कळून आली. शौर्य, मुत्सद्दीपणा, चातुर्य यांमुळे छ. शिवाजी महाराजांनी ३ एप्रिल १६६२ मध्ये हणमंते यांच्याकडून मुजुमदारी काढून निळोपंतांस दिली. काही ग्रंथांमध्ये निळोपंत यांना १६४५ मध्ये डबीरी मिळाली असा उल्लेख आहे, परंतु तो विश्वसनीय नाही.

निळोपंतांना मुजुमदारी देऊन वतनाचा कारभार करण्यास महाराजांनी सांगितले, मात्र या कामात आपण एकाच ठिकाणी गुंतून राहू व लढाया करून नवीन मुलूख संपादन करणे वगैरे महत्त्वाची कामे आपल्या हातून होणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. तेव्हा महाराजांनी निळोपंतांची समजूत काढली व मुलूख जिंकणे जेवढे महत्त्वाचे, तेवढेच जिंकलेल्या मुलखाची व्यवस्था व कारभार पाहणे देखील महत्त्वाचे आहे, असे समजाविले. मोरोपंत पिंगळे यांच्या प्रमाणे आपणही मुलूखगिरी करून नाव कमाविण्याची इच्छा निळोपंतांनी व्यक्त केली. तेव्हा महाराजांनी त्यांना सांगितले की, आपण आजपर्यंत खूप श्रमाची, धाडसाची, पराक्रमाची कामे केली आहेत, पुढेही कराल याची खात्री आहे, मात्र कारभाराची व्यवस्था लावण्याचे काम महत्त्वाचे व नाजूक आहे, ते सांभाळण्यासाठी आपणांसारखा योग्य मनुष्य पाहिजे. त्यामुळे महाराजांच्या आज्ञेने या कामाची सनद निळोपंतांना मिळाली. कारभार पाहताना निळोपंतांना कमीजास्त बोलावे लागेल, तेव्हा साहजिकच त्यांविषयी तक्रारी आपणाकडे येतील, याची कल्पना छ. शिवाजी महाराजांना होती. पण त्यांकडे दुर्लक्ष करून त्यांची बाजू घेण्याचे महाराजांनी मान्य केले होते. निळोपंतांच्या कामाचा हिशोब इतर कोणी अधिकारी तपासणार नाही, असेही महाराजांनी ठरवून दिले होते. जर एखादा कठीण प्रसंग उद्भवेल, तेव्हा आम्ही स्वत: निवाडा करू, असे आश्वासन छ. शिवाजी महाराजांनी दिले, तेव्हा निळोपंतांनी कारभाराचे काम आपल्या हाती घेतले. त्यांनी स्वराज्यातील जमाबंदी व हिशोब यांची स्वतःच्या ज्ञानाने व्यवस्था लावली.

सिंहगडावरील एका फितव्याच्या (कारस्थान) प्रसंगी महाराजांनी निळोपंत यांना फितुरांना शिक्षा करण्यासाठी पाठविले होते (१६६३). तसेच सुरत लुटीच्या वेळी निळोपंत महाराजांबरोबर होते (१६६४). शहाजीराजांच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा, जिजाबाई यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा निळोपंतांनी चार  समाधानाच्या व उपदेशाच्या गोष्टी सांगून मोठ्या प्रयत्नाने त्यांचा सती जाण्याचा निर्णय बदलण्यास प्रवृत्त केले. दिलेरखान व मिर्झा राजे जयसिंह हे स्वराज्यावर चालून आले, तेव्हा मोरोपंत, अण्णाजी दत्तो व निळोपंत यांनी लढाई न करता तह करण्यासाठीचा सल्ला दिला (१६६५). या तहाने जेव्हा छ. शिवाजी महाराजांना आग्र्यास जावे लागले, तेव्हा पाठीमागे या तिघांनी राज्याची व्यवस्था उत्तम राखली होती. त्यामध्ये निळोपंतांचा मोठा सहभाग होता.

पुरंदरच्या तहाने गेलेले किल्ले परत मिळविण्यासाठी छ. शिवाजी महाराजांनी नेमून दिलेल्या कामगिरीवर निळोपंत आघाडीवर होते. निळोपंतांनी ही कामगिरी पार पाडताच त्यांना लगेच बसरूरच्या स्वारीवर पाठवले. त्या प्रदेशातील कामगिरी उत्तम प्रकारे निळोपंतांनी पार पाडली. छ. शिवाजी महाराजांनी त्यांचे पुत्र रामचंद्रपंत यांना सिंधुदुर्ग किल्ल्याची सबनिशी दिली. निळोपंतांनी १६६८ ते १६७० या काळात राज्यकारभाराच्या नियमांबरोबर सरसालाचे हिशोब तपासण्याचे आणि त्यांविषयी नियम तयार करण्याचे काम केले.

स्वराज्याची सेवा करून १६७२ मध्ये निळोपंतांनी देह ठेवला. कारकून या पदापासून सरकारकून, वतनी कारभारी, सचिव, अमात्य असा त्यांचा ३२ वर्षांच्या कारकिर्दीचा प्रदीर्घ प्रवास झाला. फडावरील कामे करत असताना दुसऱ्या बाजूला त्यांनी अनेक लढाया, तह, मसलती अशी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यांचा विवाह खेडबारे येथील गोविंदपंत कोडोलकर यांच्या कन्येशी झाला होता, त्या देवरुख येथे मृत्यू पावल्या. देवरुख गाव निळोपंतांना छ. शिवाजी महाराजांकडून इनाम मिळाले होते.

संदर्भ :

  • गोरे, रामचंद्र महादेव, श्रीमंत पंत अमात्य संस्थान बावडा यांचे वंशवृत, कोल्हापूर, १९१५.
  • राजवाडे, वि.का. मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८, पुणे, १९०३.

                                                                                                                                                                                       समीक्षक : कौस्तुभ कस्तुरे