स्केट माशांचा समावेश कास्थिमत्स्य वर्गाच्या राजीफॉर्मिस गणातील राजीडी कुलात होतो. स्केट माशांच्या सु. १७ प्रजाती आणि सु. १५० जाती आहेत. यांतील काही जातींचा आकार गिटार या वाद्यासारखा असल्यामुळे त्यांना इंग्लिशमध्ये ‘गिटार फिश’ असेही म्हणतात. तांबडा समुद्र ते मलेशिया द्वीपकल्पापर्यंतच्या समुद्रात स्केट आढळतात. भारतात पश्चिम किनाऱ्यावर आढळणाऱ्या स्केट माशांना ‘रांजा’, ‘राजा’ म्हणतात. याशिवाय भारतात व्हाईट स्पॉटेड स्केट, स्पेकल्ड स्केट, शॉर्ट नोज स्केट, बँडेड गिटार फिश असे काही स्केट मासे आढळून येतात. स्केट मासे उथळ पाण्यात तसेच सु. ७०० मी. पेक्षा अधिक खोल पाण्यातही आढळतात.

स्केट

स्केटची लांबी ५० सेंमी.— २.५ मी. असते. शरीराची रुंदी सु. १ मी.पर्यंत, तर वजन १०० किग्रॅ.पर्यंत असते. स्केटचा रंग वरच्या बाजूस फिकट राखाडी, तर खालच्या बाजूस पांढरट असतो. सर्व शरीरावर पांढरे ठिपके असतात. तसेच सर्व शरीरावर कंटकांच्या आणि उंचवट्यांच्या रांगा असतात. डोके, धड व शेपूट असे शरीराचे तीन भाग असतात. यांच्या बाह्यरूपात काही लक्षणे शार्क माशाची, तर काही लक्षणे रे माशाची दिसून येतात. डोक्याचा अग्रभाग शार्क माशाप्रमाणे त्रिकोणी असतो. त्याला मुस्कट म्हणतात. डोके व धडाचा भाग रे माशाप्रमाणे वक्षपरांनी वेढलेला असतो. हा भाग पतंगासारखा किंवा पक्ष्यांच्या पंखांप्रमाणे दिसतो. दोन पृष्ठपर व एक अधरपर शार्कप्रमाणे असतात. मुख व कल्ले रे माशाप्रमाणे शरीराच्या अधर बाजूला असतात. मुख जबड्यांनी वेढलेले असून त्यावर दाढांसारखे दात असतात. दात फरसबंदीसारखे एकमेकांना चिकटून असतात. ते भक्ष्याचे कवच फोडण्यासाठी उपयोगी पडतात. डोळे मोठे असून त्यांच्या मागे श्वासरंध्रे असतात. शेपटी रे माशाप्रमाणे जाड असली, तरी ती शार्कप्रमाणे पुच्छपराने वेढलेली असते.

स्केट मोठ्या समूहाने राहतात. ते उथळ पाण्यात समुद्राच्या तळाशी राहतात, तर काही वेळा ते स्वत:ला वाळूत पुरून घेतात. स्केट मांसाहारी असून कोळंबी, शेवंड, खेकडे, माखली, ऑक्टोपस, कवडी, कालव हे त्यांचे भक्ष्य आहेत.

स्केट जरायुज असून मादी पिलांना जन्म देते; मात्र काही स्केट अंडजरायुज असून मादी फलित अंडी पिशवीत घालते आणि पिशवी समुद्रात सुरक्षित जागी ठेवते. या पिशवीला जलपरी पिशवी म्हणतात. या पिशवीतून पिले बाहेर येतात.

स्केट मासे एक लोकप्रिय खाद्य असून त्यांचे मांस रुचकर आणि पौष्टिक असते. स्केटपासून यकृत तेल काढतात. त्यात आणि जीवनसत्त्वे असतात.