(वॉटर कल्ट्रॉप). एक जलीय वनस्पती. शिंगाडा ही वनस्पती ट्रापेसी कुलातील असून ट्रापा प्रजातीत येते. ती मूळची यूरोप, आशिया व आफ्रिका या खंडांच्या उष्ण प्रदेशातील असून अनेक देशांत तिच्या स्टार्चयुक्त बियांसाठी लागवड केली जाते. भारत, चीन या देशांत सु. ३,००० वर्षांपूर्वीपासून तिची लागवड केली जात आहे. भारतात पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि पूर्वेकडील राज्यांत जलाशयांतून ती आढळून येते. ट्रापा प्रजातीतील ट्रापा नटान्स, ट्रापा बायकॉर्निस आणि ट्रापा रॉझीका या तिन्ही जातींना सामान्यपणे शिंगाडा म्हणतात. भारतात ट्रापा नटान्स या जातीचा ट्रापा बायस्पिनोजा या नावाने ओळखला जाणारा प्रकार आढळतो. या वनस्पतीला इंग्रजी भाषेत ‘बफेलो नट’, ‘बॅटनट’, ‘शिंगाडा’, ‘वॉटर चेस्टनट’ अशीही नावे आहेत. भारतात काही स्थानिक भाषेत तिला ‘जलफल’ असेही म्हणतात.
शिंगाडा ही वनस्पती संथ प्रवाह असलेल्या पाण्यात वाढते. तिचे खोड पाण्याखाली ३–५ मी. लांब वाढत असून त्यापासून पाण्यात मुळासारखी आणि फणीप्रमाणे समोरासमोर उगवलेली इंद्रिये असतात. मुळे आगंतुक आणि दोन प्रकारची असतात. खोडाच्या खालच्या भागात असलेली मुळे चिखलात रुतलेली असतात, तर खोडावर असलेली मुळे पाण्यावर स्वैरपणे तरंगत असतात. खोडावर पाने दोन प्रकारची असतात; पाण्याखाली असलेल्या खोडावर पाने नीटपणे विभागलेली, पिसांसारखी असतात, तर पाण्याच्या पृष्ठभागावर पाने न विभागलेली, एखाद्या गुच्छाप्रमाणे असतात. पाण्यावर तरंगणारी पाने २-३ सेंमी. लांब, अंडाकृती किंवा त्रिकोणाकृती, वरून गर्द हिरवी व खालून तांबूस-जांभळी असून कडा करवतीसारख्या दंतुर असतात. पानांचे देठ ५–९ सेंमी. लांब असून फुगीर असतात. त्यामुळे पानांना तरंगण्यासाठी अधिक मदत होते. फुले पांढरी असून निदलपुंज व दलपुंज (पाकळ्या) प्रत्येकी चार असतात. ती उन्हाळ्याआधी येत असून परागण कीटकांमार्फत होते. फळ दृढफळ अर्थात कवच प्रकारचे असून पाण्याखाली पिकते. त्यांवर दोन निदलपुंजांची शिंगांसारखी वाढ झालेली असते. म्हणून या वनस्पतीला संस्कृत भाषेत ‘श्रृंगाटक’ म्हटले गेले आहे. प्रत्येक फळात एक स्टार्चयुक्त मोठी बी असते. खोडापासून पाने व फळे अलग होऊन पाण्याच्या प्रवाहाद्वारे अन्यत्र वाहत गेल्यामुळे तसेच एखाद्या वस्तूला किंवा प्राण्याला चिकटून अन्यत्र गेल्यामुळे या वनस्पतीचा प्रसार होतो. बिया जरी दोन वर्षांत अंकुरत असल्या तरी १२ वर्षांपर्यंत सुप्तावस्थेत राहू शकतात.
शिंगाड्याच्या फळांचा वास चेस्टनटासारखा असतो. फळातील बी खाद्य असून ते उकडून तसेच भाजून खातात. त्यांपासून तयार केलेले पीठ महाराष्ट्रात उपवासाचे आणि न्याहारीचे पदार्थ करण्यासाठी वापरतात. पिठापासून गुलाल तयार करतात. बी गोड असून अतिसार व पित्तविकार यांवर गुणकारी असते. घसादुखी, मूत्ररोग, कफ वगैरे विकारांवर उपयुक्त असते. बियांमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, झिंक यांची खनिजे, तसेच ब-समूह जीवनसत्त्वे असतात. त्यांच्यात आयोडीन व मँगॅनीज असल्यामुळे अवटू (थायरॉइड) ग्रंथीचे काम सुरळीत राहण्यास मदत होते.