(कोनिफेरस ट्री). अनावृतबीजी वनस्पतींमधील वृक्षसमूहाचा एक मोठा गण. सूचिपर्णी वृक्षांची पाने सूईसारखी अणकुचीदार असतात, म्हणून या वृक्षसमूहाला ‘सूचिपर्णी वृक्ष’ म्हणतात. या वृक्षांचा समावेश एका वेगळ्या, पाइनॅलिस गणामध्ये केला जात असून या गणात सहा कुले आहेत; पायनेसी किंवा एबीटेसी, क्युप्रेसेसी (साप्रेसेसी), पोडोकार्पेसी, ॲरॉकॅरिएसी, टॅक्सेसी आणि टॅक्सोडिएसी किंवा सायडोपिटेसी. काही वनस्पतिशास्त्रज्ञ पाइनॅलिस गणाचे सेफॅलोटॅक्सेसी हे वेगळे कुल मानतात, तर अन्य शास्त्रज्ञ या कुलाचा टॅक्सेसी कुलात समावेश करतात. या सहा कुलांमध्ये सु. ६७–७० प्रजाती असून ५९४–६८२ जाती आहेत. सहा कुलांतील पायनेसी किंवा एबीटेसी कुल सर्वांत मोठे असून त्यात ११ प्रजाती आणि २२०–२५० जाती आहेत. सूचिपर्णी वृक्ष सामान्यपणे थंड हवामानात व डोंगरमाथ्यावर उंच ठिकाणी वाढतात. या वनस्पती सदाहरित असून बहुधा वृक्ष, तर काही झुडूप प्रकारच्या असतात. त्यांच्या फक्त पाच प्रजातीतील वृक्ष पानझडी असून शरद ऋतूत त्यांची पाने गळून पडतात. जगातील सर्वांत उंच, घनदाट, मोठे आणि जुने वृक्ष अशी वैशिष्ट्ये सूचिपर्णी वृक्षांची आहेत. उदा., सेक्कोया सेंपर्व्हिरेन्स (कोस्ट रेडवुड) या जातीच्या सूचिपर्णी वृक्षाची उंची सु.११५ मी. आढळली आहे, टॅक्सोडियम म्युक्रोनेटम (माँटेझुमा सायप्रस) या सूचिपर्णी वृक्षाचा व्यास सु. ११ मी. आहे, सेक्कोयाडेन्ड्रॉन गिगॅन्टीयम (जायंट सेक्कोया) हा सूचिपर्णी वृक्ष सर्वांत मोठा असून त्याचे आकारमान सु. १,४८६ घ.चौमी. आहे. पायनस लाँगीव्हा (ग्रेट बेसीन ब्रिसलकोन) जातीचे कॅलिफोर्निया येथील तीन वृक्ष सु. ५००० वर्षे इतके जुने आहेत. न्यूझीलंड देशातील लेपिडोथॅम्नस लॅक्सिफोलियस (पिग्मी पाइन) हा सूचिपर्णी वृक्ष सर्वांत लहान असून त्याची कमाल उंची ३० सेंमी. आहे.

सूचिपर्णी वृक्ष जगातील थंड, उपोष्ण प्रदेशांत व बोरियल (उपआर्क्टिक) भागात (कॅनडा, रशिया) हे वृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळतात. भारतात हिमालयाचे सर्व भाग, आसाम, अरुणाचल प्रदेश या भागांत सस. पासून ६०० ते ४,२५० मी. उंचीपर्यंत त्यांची वाढ होते. भारतातील अनेक सूचिपर्णी वृक्ष जगाच्या वेगवेगळ्या देशांमधून आणून लावलेले आहेत आणि येथील हवामानात टिकून राहिल्याने ते वृक्ष येथे स्थिरावले आहेत.

पाइन, जूनिपर, हेम्लॉक, लार्च, फर, हिमालयी देवदार, अटलांटिक सेडार, स्प्रूस, सेक्कोया (रेडवुड), हिमालयी रेडवुड, यू इ. सूचिपर्णी वृक्ष महत्त्वाचे आहेत. यांपैकी देवदार, फर, लार्च, पाइन, स्प्रूस हे वृक्ष पायनेसी कुलात येतात. जूनिपर आणि रेडवुड वृक्ष क्युप्रेसेसी (साप्रेसेसी) कुलातील आहेत. यू वृक्ष टॅक्सेसी कुलातील आहेत, तर जपानी अंब्रेला पाइन हा वृक्ष टॅक्सोडिएसी (सायडोपिटेसी) कुलातील आहे. ॲरॉकॅरिएसी कुलातील सध्या अस्तित्वात असलेले वृक्ष ॲगॅथेसीॲरोकॅरिया जातीचे आहेत.

‘कोनिफर’ या लॅटिन शब्दाचा अर्थ कोन म्हणजे शंकू धारण करणारे असा होतो. अनावृतबीजी सपुष्प वनस्पतींच्या बिया फळांऐवजी शंकूसारख्या अवयवात असतात. या बियांवर आवरण नसल्याने त्यांना अनावृतबीजी म्हणतात. सूचिपर्णी वृक्षांचा गण हा सर्वांत जुन्या वृक्षसमूहांपैकी एक असून या वनस्पतींचे तीन अब्ज वर्षांपूर्वीचे जीवाश्म सापडले आहेत. जगातील सर्व प्रकारच्या वनांपैकी सु. ३०% वने सूचिपर्णी वृक्षांची आहेत. सूचिपर्णी वृक्ष हे बीजी वनस्पतींप्रमाणे संवहनी ऊतींपासून बनलेले असतात. त्यांच्या जीवनचक्रात पिढी-एकांतरण घडून येते म्हणजेच त्यांच्या जीवनचक्रात, द्विगुणित आणि एकगुणित अवस्था आलटून-पालटून पाहायला मिळतात. यात एकगुणित बीजाणूचे अंकुरण होते आणि तो वाढून एकगुणित युग्मकोद्भिद बनतात. ते पक्व झाले की त्यांचे सूत्री विभाजन होऊन युग्मके बनतात; या अवस्थेत गुणसूत्रांच्या संख्येत कोणताही बदल होत नाही. सारख्याच जातीच्या दोन भिन्न सजीवांपासून निर्माण झालेल्या दोन युग्मकांचे संमीलन झाले की द्विगुणित युग्मनज होतो, ज्यापासून द्विगुणित बीजाणुउद्भिद बनतो. थोडक्यात युग्मकोद्भिद ते बीजाणुउद्भिद (किंवा बीजाणुउद्भिद ते युग्मकोद्भिद) अशा मार्गाने जमिनीवरील सर्व वनस्पती आणि शैवाल यांच्यात लैंगिक प्रजनन होत असते.

ख्रिसमस ट्री (ॲरोकॅरिया हेटरोफायला)

सूचिपर्णी वृक्षांचे खोड सरळ व उंच वाढणारे असून फांद्या लहान असतात. काही जातींमध्ये खोडावरच्या फांद्या सारख्याच अंतरावर झुबक्यांनी व समांतर उगवल्याने आणि शेंड्याकडे त्यांची लांबी कमीकमी होत गेल्याने वृक्षांना पिरॅमिडसारखा आकार येतो. या आकारामुळे थंडीत वृक्षावर पडणारे हिमकण पानांवर न जमा होता घसरून जातात. या वृक्षांची मुळे उथळ असली, तरी सोसाट्याच्या वाऱ्याला रोध कमी असल्याने हे वृक्ष उन्मळून पडत नाहीत.

पाने प्रकाशसंश्लेषणाची खास इंद्रिये असतात. सर्व सूचिपर्णी वृक्षांची पाने लांब, पातळ आणि सुईसारखी दिसतात. परंतु, क्युप्रेसेसी कुलातील बहुतकरून आणि पोडोकार्पेसी कुलातील काही वृक्षांची पाने चपटी, त्रिकोणाकृती व शल्कासारखी असतात. ॲरॉकॅरिएसी कुलातील ॲगॅथेस प्रजाती आणि पोडोकार्पेसी कुलातील नेगेया प्रजाती वृक्षांची पाने रुंद, चपट पट्ट्याप्रमाणे असतात, तर ॲरोकॅरिया हेटरोफायला (ख्रिसमस ट्री) या वृक्षाची पाने दाभणीसारखी असतात. सूचिपर्णी वृक्षांच्या पानांमध्ये विविधता असली, तरी पाने खोडांवर एकतर एकेकटी, मळसूत्राकार मांडणीत किंवा जोडीने, परंतु समोरासमोर किंवा त्रिकुटात येतात. ज्या वृक्षांची पाने शल्कासारखी असतात ती पाने २ मिमी. लांब, तर ज्या वृक्षांची पाने सुईसारखी असतात ती सु. ४० सेंमी.पर्यंत लांब असतात. सूचिपर्णी वृक्षांच्या पानांचा आकार कसाही असला, तरी ती बाष्पीभवन रोखतात. पानांवर पर्णछिद्रे ओळीने किंवा गुच्छाने असतात. वातावरण उष्ण किंवा थंड असेल तेव्हा ती बंद होतात. पानाचा रंग गर्द हिरवा असतो, ज्यामुळे उंच ठिकाणी किंवा वनांमध्ये इतर वृक्षांच्या सावलीत सौम्य सूर्यप्रकाशात प्रकाशऊर्जा शोषणे सोपे जाते. पाने अंगाला घासली गेल्यास त्वचेवर पुरळ उठू शकते. उष्ण प्रदेशांत वाढणाऱ्या सूचिपर्णी वृक्षांची पाने पिवळसर हिरवी, तर थंड प्रदेशांत वाढणाऱ्या वनस्पतींच्या पानांवर जाड व मेणचट थर असतो.

सूचिपर्णी वृक्षात शंकू प्रकारचे प्रजोत्पादक अवयव एक किंवा दोन स्वतंत्र वृक्षावर असतात. हे शंकू एकलिंगी व बहुधा दलहीन असतात आणि त्यांची वाढ पूर्ण होण्यास खूप वेळ लागतो. शंकू दोन प्रकारचे असतात; नर शंकू आणि मादी शंकू. नर शंकूमध्ये परागकोश शल्कपर्णाच्या खालच्या बाजूस असतात, मादी शंकूवर बीजके वरच्या बाजूस असून शल्कपर्णे छटांच्या बगलेत असतात. नर शंकू जास्त उंचीवरील फांद्यांवर येतात, तर मादी शंकू खालच्या फांद्यांवर असतात. नर शंकूमध्ये पिवळ्या रंगांचे पराग निर्माण होतात, ते वाऱ्याने मादी शंकूकडे वाहून नेले जातात. तिथे परागातून परागनलिका तयार होऊन ती बीजांडापर्यंत जाते व फलन होते. फलनानंतर भ्रूण तयार होतो. बाहेरील सर्व आवरणासहित त्याचे बी मध्ये रूपांतर होते. वाऱ्याने बी जमिनीवर पडले की, त्याचे अंकुरण होऊन नवीन वृक्ष वाढू लागतो.

सूचिपर्णी वृक्षांना अनेक शाखा असलेली सोटमुळे असून या वृक्षांची मुळे उथळ असतात. मुळांवर विशिष्ट प्रकारचे सहजीवी मायकोऱ्हायझा जीवाणू असतात. वृक्षांच्या खोडात व फांद्यांत राळ तयार करून वाहून नेणाऱ्या नलिका असतात. राळेमुळे या वृक्षांचे कीटकांपासून तसेच जखमांवर वाढणाऱ्या कवकांपासून रक्षण होते.

सूचिपर्णी वृक्षांचे लाकूड फिकट रंगाचे, सुंदर दिसणारे व हलक्या वजनाचे असते. त्यापासून हलके ओंडके, फर्निचर, सजावटीच्या लाकडी वस्तू बनवितात. सूचिपर्णी वृक्षाचे लाकूड वाळवी व कीड प्रतिबंधक असल्याने ते रेल्वेचे डबे, घरांच्या खिडक्या, दारे, खांब, शेतीची अवजारे बनवण्यासाठी वापरतात. राळेचा उपयोग रोगण (व्हॉर्निश), रंग, लाख, औषध बनवण्यासाठी व कागद गुळगुळीत करण्यासाठी होतो. तसेच मलम, लाँड्री साबण, मेण, मेणकापड, छपाईची शाई, विद्युतनिरोधक, कीटकनाशके, बूट पॉलिश बनवण्यासाठी होतो. राळेपासून कॅनडा बाल्सम नावाचे टर्पेंटाइन तयार करतात.

सूचिपर्णी वृक्षांचे परागण व बीजप्रसार वाऱ्यामुळे होतो. त्यांचे पराग पिवळ्या रंगाचे व मोठ्या संख्येने असतात. बियांना पंखासारखे एक किंवा दोन भाग असतात. सूचिपर्णी वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणावर केल्यास वातावरणातील कार्बनचे शोषण घडून येईल, तसेच परिसंस्थांचा व अधिवासाचा होत असलेला ऱ्हास टाळण्यासाठी सूचिपर्णी वृक्षांच्या लागवडीने तो टाळता येईल, असा एक मतप्रवाह आहे.

इनामदार, अ. चिं.

 

 

अनावृतबीजी वनस्पतींमधील वृक्षसमूहाचा एक मोठा गण. सूचिपर्णी वृक्षांची पाने सूईसारखी अणकुचीदार असतात, म्हणून या वृक्षसमूहाला ‘सूचिपर्णी वृक्ष’ म्हणतात. या वृक्षांचा समावेश एका वेगळ्या पिनेलिस गणामध्ये केला जात असून या गणात सहा कुले आहेत; पायनेसी किंवा एबीटेसी, क्युप्रेसेसी (साप्रेसेसी), पोडोकार्पेसी, ॲरॉकॅरिएसी, टॅक्सेसी आणि टॅक्सोडिएसी किंवा सायडोपिटेसी. काही वनस्पती शास्त्रज्ञ पिनेलिस गणाचे सेफॅलोटॅक्सेसी हे वेगळे कुल मानतात, तर अन्य शास्त्रज्ञ या कुलाचा टॅक्सेसी कुलात समावेश करतात. या सहा कुलांमध्ये सु. ६७-७० प्रजाती असून ५९४-६८२ जाती आहेत. सहा कुलांतील पायनेसी किंवा एबीटेसी कुल सर्वांत मोठे असून त्यात ११ प्रजाती आणि २२०-२५० जाती आहेत. सूचिपर्णी वनस्पती सामान्यपणे थंड हवामानात व डोंगरमाथ्यावर, उंच ठिकाणी वाढतात. या वनस्पती सदाहरित असून बहुधा वृक्ष, तर काही झुडूप प्रकारच्या असतात. त्यांच्या फक्त पाच प्रजातीतील वृक्ष पानझडी असून शरदऋतूत त्यांची पाने गळून पडतात. जगातील सर्वांत उंच, घनदाट, मोठे आणि जुने वृक्ष अशी वैशिष्ट्ये सूचिपर्णी वृक्षांची आहेत. उदा., सेकोया सेंपरविरेन्स (कोस्ट रेडवुड) या जातीच्या सूचिपर्णी वृक्षाची उंची सु.११५ मी. आढळली आहे, टॅक्सोडियम म्युक्रोनेटम (माँटेझुमा सायप्रस) या सूचिपर्णी वृक्षाचा व्यास सु. ११ मी. आहे, सेकोयाडेन्ड्रॉन गिगॅन्टीयम (जायंट सेकोया) हा सूचिपर्णी वृक्ष सर्वांत मोठा असून त्याचे आकारमान सु. १४८६ घचौमी. आहे. पाइनस लाँगीव्हा (ग्रेट बेसीन ब्रिसलकोन) जातीचे कॅलिफोर्निया येथील तीन वृक्ष सु. ५००० वर्षे इतके जुने आहेत. न्यूझीलंड देशातील लेपिडोथॅम्नस लॅक्सिफोलियस (पिग्मी पाइन) हा सूचिपर्णी वृक्ष सर्वांत लहान असून त्याची कमाल उंची ३० सेंमी. आहे.

जगातील थंड, उपोष्ण प्रदेशांत व बोरियल (उपआर्क्टिक) भागात (कॅनडा, रशिया) हे वृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळतात. भारतात हिमालयाचे सर्व भाग, आसाम, अरुणाचल प्रदेश या भागांत समुद्रसपाटीपासून ६०० ते ४,२५० मी. उंचीपर्यंत त्यांची वाढ होते. भारतातील अनेक सूचिपर्णी वृक्ष जगाच्या वेगवेगळ्या देशांमधून आणून लावलेले आहेत आणि येथील हवामानात टिकून राहिल्याने ते वृक्ष येथे स्थिरावले आहेत.

पाइन, जूनिपर, हेम्लॉक, लार्च, फर, हिमालयी देवदार, अटलांटिक सेडार, स्प्रूस, सेकोया (रेडवुड), हिमालयी रेडवुड, यू इत्यादी सूचिपर्णी वृक्ष महत्त्वाचे आहेत. यांपैकी देवदार, फर, लार्च, पाइन, स्प्रूस हे वृक्ष पायनेसी कुलात येतात. जूनिपर आणि रेडवुड वृक्ष क्युप्रेसेसी (साप्रेसेसी) कुलातील आहेत. यू वृक्ष टॅक्सेसी कुलातील आहेत, तर जपानी अंब्रेला पाइन हा वृक्ष टॅक्सोडाएसी (सायडोपिटेसी) कुलातील आहे. अराऊकॅरिएसी कुलातील सध्या अस्तित्वात असलेले वृक्ष अगाथीॲरॉकॅरिया जातीचे आहेत.

‘कोनिफर’ या लॅटिन शब्दाचा अर्थ कोन म्हणजे शंकू धारण करणारे असा होतो. अनावृतबीजी सपुष्प वनस्पतींच्या बिया फळांऐवजी शंकूसारख्या अवयवात असतात. या बियांवर आवरण नसल्याने त्यांना अनावृतबीजी म्हणतात. सूचिपर्णी वृक्षांचा गण हा सर्वांत जुन्या वृक्षसमूहांपैकी एक असून या वनस्पतींचे तीन अब्ज वर्षांपूर्वीचे जीवाश्म सापडले आहेत. जगातील सर्व प्रकारच्या वनांपैकी सु. ३०% वने सूचिपर्णी वृक्षांची आहेत. सूचिपर्णी वृक्ष हे बीजी वनस्पतींप्रमाणे संवहनी ऊतींपासून बनलेले असतात. त्यांच्या जीवनचक्रात पिढी-एकांतरण घडून येते म्हणजेच त्यांच्या जीवनचक्रात, द्विगुणित आणि एकगुणित स्वरूप आलटून-पालटून पाहायला मिळते. यात एकगुणित बीजाणूचे अंकुरण होते आणि तो वाढून एकगुणित युग्मकोद्भिद बनतात. ते पक्व झाले की त्यांचे सूत्री विभाजन होऊन युग्मके बनतात; या अवस्थेत गुणसूत्रांच्या संख्येत कोणताही बदल होत नाही. सारख्याच जातीच्या दोन भिन्न सजीवांपासून निर्माण झालेल्या दोन युग्मकांचे संमीलन झाले की द्विगुणित युग्मनज होतो, ज्यापासून द्विगुणित बीजाणुउद्भिद बनतो. हे चक्र म्हणजेच युग्मकोद्भिद ते बीजाणुउद्भिद (किंवा बीजाणुउद्भिद ते युग्मकोद्भिद) अशा मार्गाने जमिनीवरील सर्व वनस्पती आणि शैवाल यांच्यात लैंगिक प्रजनन होत असते.

सूचिपर्णी वृक्षांचे खोड सरळ व उंच वाढणारे असून फांद्या लहान असतात. काही जातींमध्ये खोडावरच्या फांद्या सारख्याच अंतरावर झुबक्यांनी व समांतर उगवल्याने आणि शेंड्याकडे त्यांची लांबी कमीकमी होत गेल्याने वृक्षांना पिरॅमिडसारखा आकार येतो. या आकारामुळे थंडीत वृक्षावर पडणारे हिमकण पानांवर न जमा होता घसरून जातात.

पाने प्रकाशसंश्लेषणाची खास इंद्रिये असतात. सर्व सूचिपर्णी वृक्षांची पाने लांब, पातळ आणि सुईसारखी दिसतात. परंतु, क्युप्रेसेसी कुलातील बहुतकरून आणि पोडोकार्पेसी कुलातील काही वृक्षांची पाने चपटी, त्रिकोणाकृती व शल्कासारखी असतात. अराऊकॅरियसी कुलातील अगाथी प्रजाती आणि पोडोकार्पेसी कुलातील नेगेई प्रजाती वृक्षांची पाने रूंद, चपट पट्ट्याप्रमाणे असतात, तर ॲरॉकॅरिया हेटरोफायला (ख्रिसमस ट्री) या वृक्षाची पाने दाभणीसारखी असतात. सूचिपर्णी वृक्षांच्या पानांमध्ये विविधता असली, तरी पाने खोडांवर एकतर एकेकटी, मळसूत्राकार मांडणीत किंवा जोडीने, परंतु समोरासमोर किंवा त्रिकुटात येतात. ज्या वृक्षांची पाने शल्कासारखी असतात ती पाने २ मिमी. लांब, तर ज्या वृक्षांची पाने सुईसारखी असतात ती सु. ४० सेंमी. लांब असतात. सूचिपर्णी वृक्षांच्या पानांचा आकार कसाही असला, तरी ती बाष्पीभवन रोखतात. पानांवर पर्णछिद्रे ओळीने किंवा गुच्छाने असतात. उष्ण किंवा थंड वातावरणात ती बंद होतात. पानाचा रंग गर्द हिरवा असतो, ज्यामुळे उंच ठिकाणी किंवा वनांमध्ये इतर वृक्षांच्या सावलीत सौम्य सूर्यप्रकाशात प्रकाशऊर्जा शोषणे सोपे जाते. पाने अंगाला घासली गेल्यास त्वचेवर पुरळ उठू शकते. उष्ण प्रदेशांत वाढणाऱ्या सूचिपर्णी वृक्षांची पाने पिवळसर हिरवी असतात, तर थंड प्रदेशांत वाढणाऱ्या वनस्पतींच्या पानांवर जाड व मेणचट थर असतो.

या वनस्पतीत शंकू नावाचे प्रजोत्पादक अवयव एक किंवा दोन स्वतंत्र वृक्षावर असतात. हे शंकू एकलिंगी व बहुधा दलहीन असतात आणि त्यांची वाढ पूर्ण होण्यास खूप वेळ लागतो. शंकू दोन प्रकारचे असतात; नर शंकू आणि मादी शंकू. नर शंकुमध्ये परागकोश शल्कपर्णाच्या खालच्या बाजूस असतात, मादी शंकूवर बीजके वरच्या बाजूस असून शल्कपर्णे छटांच्या बगलेत असतात. नर शंकू जास्त उंचीवरील फांद्यांवर येतात, तर मादी शंकू खालच्या फांद्यांवर असतात. नर शंकुमध्ये पिवळ्या रंगांचे पराग निर्माण होतात, ते वाऱ्याने मादी शंकुकडे वाहून नेले जातात. तिथे परागातून परागनलिका तयार होऊन ती बीजांडापर्यंत जाते व फलन होते. फलनानंतर भ्रूण तयार होतो. बाहेरील सर्व आवरणासहित त्याचे बी मध्ये रूपांतर होते. वाऱ्याने बी जमिनीवर पडले की त्याचे अंकुरण होऊन नवीन वृक्ष वाढू लागतो.

सूचिपर्णी वृक्षांना अनेक शाखा असलेली सोटमुळे असून या वृक्षांची मुळे उथळ असतात. मुळांवर विशिष्ट प्रकारचे सहजीवी मायकोऱ्हायझा जीवाणू असतात. वृक्षांच्या खोडात व फांद्यांत राळ तयार करून वाहून नेणाऱ्या नलिका असतात. राळेमुळे या वृक्षांचे कीटकांपासून तसेच जखमांवर वाढणाऱ्या कवकांपासून रक्षण होते.

सूचिपर्णी वृक्षांचे लाकूड फिकट रंगाचे, सुंदर दिसणारे व हलक्या वजनाचे असते. त्यापासून हलके ओंडके, फर्निचर, सजावटीच्या लाकडी वस्तू बनवितात. सूचिपर्णी वृक्षाचे लाकूड वाळवी व कीड प्रतिबंधक असल्याने ते रेल्वेचे डबे, घरांच्या खिडक्या, दारे, खांब, शेतीची अवजारे बनवण्यासाठी वापरतात. राळेचा उपयोग व्हॉर्निश, रंग, लाख, औषध बनवण्यासाठी व कागद गुळगुळीत करण्यासाठी होतो. तसेच मलम, लाँड्री साबण, मेण, मेणकापड, छपाईची शाई, विद्युतनिरोधक, कीटकनाशके, बूट पॉलिश बनवण्यासाठी होतो. राळेपासून कॅनडा बाल्सम नावाचे टर्पेंटाइन तयार करतात.

सूचिपर्णी वृक्षांचे परागण व बीजप्रसार वाऱ्यामुळे होतो. त्यांचे पराग पिवळ्या रंगाचे व मोठ्या संख्येने असतात. बियांना पंखासारखे एक किंवा दोन भाग असतात. सूचिपर्णी वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणावर केल्यास वातावरणातील कार्बनचे शोषण घडून येईल, तसेच परिसंस्थांचा व अधिवासाचा होत असलेला ऱ्हास टाळता येईल, असा एक मतप्रवाह आहे.