संप्रेरकांचे वर्गीकरण (१) रासायनिक संरचना, (२) विद्राव्यता आणि (३) संप्रेरकांचे कार्यतंत्र यांनुसार केले जाते.
(१) रासायनिक संरचना (Chemical Structure) : संप्रेरकांच्या रासायनिक संरचनेमध्ये वैविध्य आढळते. संप्रेरकांचे रासायनिक वर्गीकरण प्रथिन/पेप्टाइड (Protein/Peptide), अमिनो अम्लजन्य (Amines), स्निग्धाम्लजन्य (Fatty acid) आणि स्टेरॉइड (Steroid) अशा चार प्रकारात केले जाते (पहा : तक्ता क्र. १)
तक्ता क्र. १ : संप्रेरकांची रासायनिक रचना
संप्रेरकाचा प्रकार | रासायनिक संरचना | उदाहरणे |
प्रथिन/पेप्टाइड संप्रेरके | प्रथिने किंवा प्रथिनांच्या लहानमोठ्या साखळ्या | थायरोट्रोपीन मुक्तक संप्रेरक (Thyrotropin Releasing Hormone, TRH) – तीन अमिनो अम्लांची साखळी; इन्शुलीन (Insulin) – ५१ अमिनो अम्लांची छोटी साखळी; पियुषिकेमधील गोनॅडोट्रोपीन (Pituitary gonadotropin) – अनेक उपांगके असणारे मोठे ग्लायकोप्रथिन (Glycoprotein) |
अमिनो अम्लजन्य संप्रेरके | अमिनो अम्लांच्या रासायनिक प्रक्रियेतून बनलेली संप्रेरके | ॲड्रीनॅलीन (Adrenaline), कॅटेकोलामाइन (Catecholamines), थायरॉक्झीन (Thyroxine) |
स्निग्धाम्लजन्य संप्रेरके | स्निग्धाम्लांच्या रासायनिक प्रक्रियेतून बनलेली संप्रेरके | प्रोस्टाग्लँडीन (Prostaglandin), प्रोस्टासायक्लीन (Prostacycline) व ल्युकोट्राइन (Leucotrien) |
स्टेरॉइड संप्रेरके | कोलेस्टेरॉलपासून बनलेली संप्रेरके | टेस्टोस्टेरोन (Testosteron), प्रोजेस्टेरोन (Projesteron), अल्डोस्टेरोन (Aldosteron) |
अमिनो अम्लजन्य संप्रेरकांचे रेणू टायरोसिन (Tyrosine) किंवा ट्रिप्टोफॅन (Tryptofan) या अमिनो अम्लापासून तयार होतात. हे रेणू तुलनेने लहान असतात. तसेच जलविद्राव्य असल्याने ही संप्रेरके थेट रक्तात मिसळतात व जलद बाहेर पडतात. या संप्रेरकांच्या नावामागे इन (-ine) लागते. पिनीयल ग्रंथीचे मेलॅटोनीन (Melatonin) संप्रेरक, तसेच अधिवृक्क ग्रंथीमध्ये तयार होणारे ॲड्रेनॅलीन संप्रेरक ही अमिनो अम्लजन्य संप्रेरके आहेत.
(२) विद्राव्यता (Solubility) : यामध्ये संप्रेरकांचे जलविद्राव्य – जलरागी (Water soluble/Hydrophlic hormones) आणि तेलविद्राव्य – मेदरागी किंवा जलद्वेषी (Lipid soluble/ Hydrophobic hormones) असे दोन गट केले जातात.
जलविद्राव्य संप्रेरके जलीय माध्यमामध्ये विरघळतात. इन्शुलीन, ॲड्रीनॅलीन, ग्लुकॅगॉन (Glucagon) ही याची महत्त्वाची उदाहरणे आहेत. ही संप्रेरके पेशी आवरणाच्या (Cell membrane) आत शिरू शकत नाहीत. त्यामुळे या संप्रेरकांचे ग्राही गट (Receptors) पेशी आवरणाच्या पृष्ठभागावर आढळतात.
तेलविद्राव्य संप्रेरके तैल/स्निग्ध पदार्थांमध्ये (Lipids) विरघळतात. त्यामुळे हे रेणू लिपिड द्विस्तराचे (Lipid bilayer) बनलेले पेशी आवरण भेदून आत जाऊ शकतात. या संप्रेरकांचे ग्राही गट पृष्ठभागावर तसेच पेशींच्या आत आढळतात. स्टेरॉइड संप्रेरके व अवटू ग्रंथीची संप्रेरके (Thyroid hormones) या प्रकारात मोडतात. बहुतांश तेलविद्राव्य संप्रेरके स्टेरॉइड या प्रकारची असतात. ही संप्रेरके कोलेस्टेरॉल रेणूपासून तयार होतात. त्यामुळे त्यांची रासायनिक रचना कोलेस्टेरॉल रेणूच्या रचनेशी मिळतीजुळती असते. रासायनिक संरचना बघता या रेणूंमध्ये कीटोन (Ketone) किंवा अल्कोहॉल गट (Alcohol) असतात. त्यांच्या नावाच्या शेवटी अनुक्रमे -ऑल (-ol) किंवा -ओन (-one) लागते. जलविद्राव्य नसल्याने स्टेरॉइड संप्रेरके रक्तामध्ये सहज मिसळत नाहीत. विशिष्ट प्रकारची वाहक प्रथिने (Transport/carrier proteins) त्यांना रक्तात मिसळण्यास मदत करतात. तसेच ती रक्तात दीर्घकाळ फिरत राहतात. याउलट जलविद्राव्य संप्रेरके रक्तामधून लवकर बाहेर पडतात. उदा., कॉर्टिसोल या स्टेरॉइड संप्रेरकाचे रक्तामधील अर्धायुष्य (Half-life) ६०—९० मिनिटे आहे. याउलट ॲड्रीनॅलीन या जलविद्राव्य संप्रेरकाचे अर्धायुष्य केवळ एक मिनिट आहे.
(३) संप्रेरकांचे कार्यतंत्र (Function of Hormones) : वर्गीकरणाची तिसरी पद्धत संप्रेरकांच्या कार्यतंत्रावर आधारित आहे. कार्यतंत्र आणि कार्यस्थान यांच्या आधारे संप्रेरकांचे चार गट पडतात (पहा: तक्ता क्र. २).
तक्ता क्र. २ : संप्रेरकांची कार्यस्थाने
प्रकार | कार्यतंत्र | उदाहरणे |
स्वयंप्रेरक संप्रेरके (Autocrine hormones) | पेशीने तयार केलेले संप्रेरक त्याच प्रकारच्या पेशीवरील ग्राही गटांशी जुळते व त्याच पेशींवर परिणाम घडवून आणते. | इन्शुलीनसदृश वृद्धीकर घटक-१ /सोमॅटोमेडिन सी (Insulin-like growth factor-1, IGF-1 / Somatomedin C) |
परप्रेरक संप्रेरके (Paracrine hormones) | एका पेशीने तयार केलेले / स्रवलेले संप्रेरक आजूबाजूच्या पेशी किंवा ऊतींवर परिणाम करते. | स्वादुपिंडामधील सोमाटोस्टॅटिन (Somatostatin) हे संप्रेरक त्याच इंद्रियामधील इन्शुलीन बनवणाऱ्या पेशींना निर्बंध करते. |
आंतरप्रेरक संप्रेरके (Intracrine hormones) | एका पेशीमध्ये तयार झालेले संप्रेरक त्याच पेशींमधील अंतर्गत ग्राही गटांबरोबर जुळते. पेशीअंतर्गत प्रक्रियांवर या संप्रेरकाचा परिणाम होतो. | परा-अवटू संप्रेरक संलग्न प्रथिन (Parathyroid hormone related protein), रेनिन-अँजियोटेन्सिन –अल्डोस्टेरोन प्रणालीमधील संप्रेरके (Renin-angiotensin–aldosterone system) |
अंत:स्त्रावी संप्रेरके (Endocrine hormones) | एका प्रकारच्या पेशीने बनवलेले संप्रेरक रक्तात मिसळते व शरीरात लांबवर वाहून नेले जाते. लक्ष्य-पेशी संप्रेरकाच्या उगमस्थानापासून लांब असतात. | मुक्तक संप्रेरके (Releasing Hormones), पियुषिकेमधील गोनॅडोट्रोपीन (Pituitary gonadotropin) |
पहा : हॉर्मोने (पूर्वप्रकाशित नोंद).
संदर्भ :
- https://www.hopkinsmedicine.org/health/conditions-and-diseases/hormones-and-the-endocrine-system
समीक्षक : प्रमोद जोगळेकर