एखाद्या प्रदेशात (देशात, राज्यात, जिल्ह्यात, वनांत इ.) असलेले पाळीव प्राणी तसेच वन्य प्राणी यांची संख्या निश्चित करण्याच्या प्रक्रियेला ‘प्राणी गणना’ म्हणतात. प्राणी गणनेच्या अभ्यासातून एखाद्या परिसंस्थेत असलेल्या प्राण्यांची संख्या किती असते, परिसंस्थेनुसार प्राण्यांची संख्या कशी बदलते, पर्यावरण बदलाचे त्यांच्यावर कसे परिणाम होतात, प्राण्यांच्या एका गटामध्ये नर व मादी यांचे प्रमाण कसे असते, विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात प्राणी कसे आणि किती विखुरलेले आहेत, अनुकूल वातावरणात जास्तीत जास्त किती प्राणी राहतात आणि पिलांचे वयानुरूप गट इत्यादी बाबींची माहिती मिळते. या माहितीचा व्यावहारिक दृष्ट्या वापर करून एखाद्या परिसंस्थेच्या नियोजनासाठी व पुढील अभ्यासासाठी प्रतिमाने तयार करता येतात. प्राणी गणना एका ठराविक कालावधीनंतर केली जाते.
पाळीव प्राण्यांमध्ये गाय, बैल, म्हैस, रेडा, घोडा, गाढव, शेळ्या, मेंढ्या, डुकरे, कोंबड्या, बदके इत्यादींचा समावेश हा पशुधन म्हणून केला जातो. त्यांची गणना राज्य स्तरावर त्या-त्या विभागातील शासकीय सर्वेक्षणाद्वारे केली जाते आणि ते सर्वेक्षण दर चार-पाच वर्षांनी केले जाते. पाळीव प्राण्यांची गणना केल्याने पशुपालन करणाऱ्या व्यावसायिकांची आर्थिक स्थिती आणि पाळीव प्राण्यांपासून मिळणारे दूध, अंडी, मांस, लोकर, कातडे, चरबी इ. उत्पादनांची स्थिती समजते. गावपातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत आर्थिक नियोजन करण्याच्या दृष्टीने ही माहिती उपयुक्त असते.
वन्य प्राण्यांची गणना शासकीय वन विभागातर्फे दरवर्षी केली जाते. त्यासाठी शासन निमसरकारी तसेच सेवाभावी संस्था व स्थानिक नागरिक यांची मदत घेते. सामान्यपणे ही गणना दरवर्षी बुद्धपौर्णिमेला केली जाते. वन्य प्राण्यांच्या गणनेमुळे एखाद्या वनात कोणकोणते वन्य प्राणी आहेत, कोणत्या वन्य प्राण्यांच्या संख्येत बदल झाला आहे, कोणते प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत ते समजते. या माहितीनुसार प्रत्येक जातीच्या प्राण्यांच्या संवर्धनासाठी वेळीच योग्य काळजी घेता येते किंवा उपाय करता येतात. या गणनेत हत्ती, गवे, वाघ, सिंह, गेंडे, हरिण, भेकर, जिराफ, झेब्रा, चितळ, चिंकारा, चौशिंगा, नीलगाय, रानडुक्कर, कोल्हा, लांडगा, माकडे व अस्वल यांसारख्या प्राण्यांची मोजदाद केली जाते. तसेच गिधाड, माळढोक यांसारखे पक्षी आणि मगर, कासव यांसारखे सरीसृप यांचीही गणना केली जाते. वन्य प्राण्यांची गणना प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे करतात.
प्रत्यक्ष गणना : या प्रकारच्या गणनेमध्ये प्राणी पाहून किंवा प्राण्यांची छायाचित्रे काढून त्यानुसार मोजदाद करतात. त्यासाठी पुढील पद्धतींचा वापर केला जातो.
क्षेत्रविभागणीनुसार गणना : या प्रकारात हव्या असलेल्या प्रदेशाचे नकाशे घेतात. त्या नकाशांवर उभ्या-आडव्या रेषा मारून त्या प्रदेशाचे १ चौ.किमी. क्षेत्रफळाचे सोयीस्कर असे भाग करतात. अशा काल्पनिक भागांमध्ये आढळणाऱ्या वन्य प्राण्यांची मोजणी करण्यासाठी प्रत्येक भागात कर्मचारी नेमले जातात.
पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांची गणना : प्राणी त्यांच्या विशिष्ट सवयीनुसार पाणी पिण्यासाठी दिवसातून वेगवेगळ्या वेळी पाणवठ्यावर येत असतात. या प्रकारात संपूर्ण प्रदेशातील पाणवठ्याच्या जागा हेरून तेथे पाणी पिण्यासाठी आलेल्या प्राण्यांना प्रत्यक्ष पाहून त्यांची मोजदाद करण्यासाठी प्राण्यांना दिसणार नाहीत अशा पद्धतीने निरीक्षक बसविले जातात. एक निश्चित दिवस ठरवून आणि एक ठराविक कालावधी ठरवून प्राण्यांवर नजर ठेवून त्यांची गणना केली जाते.
रान उठवून करण्याची गणना : यात अनेक कर्मचाऱ्यांच्या मदतीने ठराविक भागात निरीक्षक बसवितात आणि इतर अनेक लोकांना हाकारे घालावयास लावून आणि वाद्ये वाजवून हाकारे दिले जातात. अशा रीतीने वन्य प्राण्यांना निरीक्षकांच्या दिशेने हाकलतात आणि त्यांची गणना करतात.
हवाई निरीक्षणातून गणना : काही प्रदेशात प्राण्यांचे मोठे कळप असतात आणि वने घनदाट नसतात. अशा ठिकाणी कळपांचे हवाई सर्वेक्षण करून त्यांची छायाचित्रे घेतली जातात आणि प्राण्यांच्या संख्येचा अंदाज केला जातो.
वनवाटेवरून केलेले सर्वेक्षण : वनक्षेत्रातून जाणाऱ्या वाटा आणि पायवाटा या मार्गावरून प्रत्यक्ष चालत जाऊन निरीक्षक त्यांना प्रत्यक्ष दिसलेल्या प्राण्यांची नोंद करतात.
अप्रत्यक्ष गणना : या प्रकारात प्रत्यक्ष प्राणी न पाहता त्यांच्या पावलांचे ठसे, लेंड्या किंवा विष्ठा यांच्या अभ्यासातून किंवा स्वयंचलित छायाचित्रांद्वारे प्राण्यांची गणना करतात.
ठशांचा अभ्यास : या प्रकारात ठराविक दिवशी प्राण्यांच्या पावलांचे ठसे घेण्यात येतात. या ठशांचा अभ्यास करून प्राणितज्ज्ञ त्या प्राण्यांची जाती, वय, लिंग इत्यादी तपशील ठरवू शकतात. त्यांच्या चालण्यात काही अनैसर्गिकता आढळली तर त्याचाही अंदाज करता येतो. पाणवठ्याजवळचे ठसे घेताना तिथल्याच मातीने आधीचे ठसे बुजविण्यात येतात आणि नवे ठसे घेतले जातात. वाघ, बिबटे अशा प्राण्यांच्या पावलांच्या ठशांवरून त्यांची गणना करता येते.
विष्ठा अथवा लेंड्यांचा अभ्यास : या प्रकारात प्राण्यांनी घातलेल्या लेंड्या किंवा त्यांची विष्ठा यांचा वापर अचूकपणे करता येतो. हत्ती, गवे, गेंडे यांच्या विष्ठेच्या अभ्यासावरून त्यांची गणना करता येते. हरिण, भेकर वगैरे प्राणी कळपाने वावरतात. ते एकत्रच लेंड्या टाकतात. या एकत्रित असलेल्या लेंड्यांच्या ढिगांवरून कळपातल्या प्राण्यांची संख्या ठरविता येते. प्राण्यांच्या विष्ठेमध्ये आंत्रश्लेष्मकातील पेशी मिळतात. त्या पेशींमधील डीएनएच्या (डीऑक्सिरिबोन्यूक्लिक आम्लाच्या) मदतीने त्या प्राण्याची जाती ओळखता येते. हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायॉलॉजी या संस्थेने वन्य प्राण्यांची डीएनए चाचणी विकसित केली असून त्यांच्याकडे सर्व वन्य प्राण्यांच्या डीएनएची माहिती संग्रहित आहे. या माहितीच्या आधारे वन्य प्राण्यांच्या बेकायदेशीर हत्येचे गुन्हेदेखील उघडकीस आले आहेत.
स्वयंचलित छायाचित्रे : छायाचित्र सापळा (कॅमेरा ट्रॅप) पद्धतीत जनावरांच्या जाण्या-येण्याच्या मार्गावर स्वयंचलित छायाचित्रण यंत्रणा बसविली जाते. ही पद्धत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून त्यातून निघणाऱ्या अवरक्त किरणांना प्रतिबंध झाल्यास ती यंत्रणा कार्यरत होते आणि संबंधित जनावरांचे छायाचित्र कॅमेऱ्याद्वारे घेतले जाते. वाघाच्या छायाचित्रांवरून विशेषकरून त्याच्या अंगावरील पट्ट्यांवरून तो ओळखता येतो.
क्षेत्रीय अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यांखेरीज वन विभागाच्या क्षेत्रातील प्राण्यांची गणना दरवर्षी केली जाते. महाराष्ट्रात चांदोली, सागरेश्वर, भीमाशंकर, रेहेकुरी, ताडोबा, नान्नज इत्यादी अभयारण्यात नियमितपणे प्राण्यांची गणना केली जाते. अशा गणनेत नकाशावर चौकटी पाडून चौकटीतील प्राण्यांची गणना करण्याची पद्धत आहे.