हॅनो : (इ. स. पू. पाचवे शतक). कार्थेजीनियन मार्गनिर्देशक. इ. स. पू. पाचव्या शतकात त्यांनी आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याचे समन्वेषण करून तेथे काही वसाहतींचीही स्थापना केली. ६० गलबते आणि ३०,००० स्त्री-पुरुषांसह कार्थेज येथून निघून ते जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून अटलांटिक महासागर (Atlantic Ocean) येथे आले. अटलांटिक महासागरातूनच आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याने ते दक्षिणेस गेले. प्रथम त्यांनी थायमिआटेरिआन (सध्याचे मोरोक्कोतील कनीत्र) या ठिकाणाची स्थापना करून कँटिन (मेडौझा) भूशिरावरील सोलोइज येथे मंदिर बांधले. त्याशिवाय त्यांनी सध्याचे मोरोक्कोच्या अटलांटिक किनाऱ्यावर आणि सभोवतालच्या परिसरात पाच नगरांची स्थापना केली. तसेच मोरोक्कोच्या किनाऱ्यावर कॅरिअन गढी बांधली. येथेच प्यूनिक वसाहतकऱ्यांचे पुरातत्त्वीय अवशेष आढळून आले आहेत. त्यानंतर त्यांनी दक्षिण भागात दे ओरो उपसागराच्या काठावर सर्न या व्यापारी ठाण्याची स्थापना केली. पुढे आफ्रिकेच्या किनाऱ्याने गँबिया, सिएरा लिओनमार्गे ते कॅमेरूनपर्यंत पोहोचले. त्यानंतर मात्र खाद्यपदार्थांचा तुटवडा आणि प्रतिकूल व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावामुळे ते तेथून परत फिरले.

सफरीवरून परतल्यानंतर हॅनो यांनी कार्थेज येथील बाल मंदिरावर लेखशिला स्वरूपात आपल्या सफरीचा वृत्तान्त लिहून ठेवला. दी पेरिप्लस ऑफ हॅनो (१९१३) या नावाने ग्रीक भाषेत त्यांच्या प्रवासाचा वृत्तान्त जतन करून ठेवला असला, तरी तत्कालीन परिस्थितीत प्रतिस्पर्धी व्यापाऱ्यांच्या हातात खरी माहिती पडू नये, म्हणून त्यात जाणीवपूर्वक संभ्रमित माहिती दिली गेली होती. त्याचा वृत्तान्त म्हणजे बहुधा प्यूनिकचे ग्रीकमधील भाषांतर असावे. आफ्रिकेतील त्यांची सफर कार्थेजियन व्यापाराचा तेथे विस्तार करण्यासाठी आणि वसाहतींची स्थापना करण्यासाठी होती, हे स्पष्ट होते.

 

समीक्षक संतोष ग्या. गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा