(टर्मेरिक). हळद ही वनस्पती झिंजिबरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कुर्कुमा लाँगा आहे. इलायची, आले इ. वनस्पतीही झिंजिबरेसी कुलातील आहेत. हळद ही वनस्पती मूळची भारतीय उपखंडातील देश आणि दक्षिण-पूर्व आशिया येथील असून येथे ती लागवडीखाली आहे. कुर्कुमा प्रजातीत हळदीच्या सु. १०० जाती आढळून येतात. भारतात हळदीची लागवड आंध्र प्रदेश, तमिळनाडू, ओडिशा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात, मेघालय, महाराष्ट्र, आसाम या राज्यांत केली जाते. हळदीच्या वाळवलेल्या मूलक्षोडांना (जमिनीखाली वाढलेल्या खोडांना) ‘हळकुंड’ म्हणतात. हळकुंडे दळून हळदीची भुकटी (पावडर) तयार करतात.
हळदीचे झुडूप साधारणपणे १ मी.पर्यंत उंच वाढते. त्याचे मूलक्षोड जाड व मांसल असते. त्यापासूनच पोपटी हिरव्या रंगाची, भाल्यासारखी सहा ते दहा पाने वाढलेली असतात. पानांचा देठ जाड असून पाने एकाआड एक, दोन रागांमध्ये येतात. फुले फुलोऱ्यात येतात; फुलोरा कणिश प्रकारचा असून पानांच्या बगलेत (कक्षस्थ) येतो व त्याला अनेक शाखा असतात. सहपत्रे अनेक व हिरवट लाल, निदलपुंज व दलपुंज नळीसारखे असून फुलांचा रंग फिकट पिवळा असतो. फळे सहपत्रांनी वेढलेली असतात; मात्र लागवडीखाली असलेल्या या वनस्पतीच्या प्रकारात फळे येत नाहीत.
भारताच्या वेगवेगळ्या भागांत हळदीच्या निरनिराळ्या जाती आढळतात; मात्र भारतात दोन जातींचीच लागवड जास्त केली जाते. त्यांपैकी एका जातीची हळकुंडे कठीण व भडक रंगाची असतात. तिला ‘लोखंडी हळद’ म्हणतात. तिचा रंगासाठी वापर केला जातो. दुसऱ्या जातीची हळकुंडे रंगाने सौम्य असून तिचा वापर स्वयंपाकात करतात. हळदीची रानहळद ही जात वन्य स्थितीत वाढते. तिची हळकुंडे फिकट पिवळी, तर गाभ्यात नारिंगी तांबूस रंगाची असतात. आंबेहळद जातीच्या हळकुंडांना कैरीसारखा वास येतो. बंगाल, तमिळनाडू व कोकण येथे ती वन्य स्थितीत आढळते; अनेक ठिकाणी तिची लागवडही केली जाते.
वाळवलेली हळकुंडे दळून हळदीची भुकटी (पावडर) बनवितात. तिच्यात कर्बोदके ६०—७०%, प्रथिने ६—८%, मेद ५—१०%, खनिजे (कॅल्शियम, फॉस्फरस पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम) ३—७%, तेलाचे प्रमाण ३—७%, तंतुमय पदार्थ २—७% आणि कर्क्युमीनयुक्त संयुगे १—६% असतात. हळदीच्या कोवळ्या पानांपासून तेल मिळवतात. हे तेल सुगंधी, पिवळ्या रंगाचे असून सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरतात. हळदीच्या भुकटीपासून ओलिओरेझीन वेगळे करतात. यातला मुख्य घटक ‘कुर्क्युमीन’ असतो. त्यामुळे हळदीला पिवळा रंग येतो. वेगवेगळ्या प्रकारची पेये, खाद्यपदार्थ, आइसक्रीम यांत ओलिओरेझीन वापरतात.
भारतात रोजच्या आहारात, शाकाहारी तसेच मांसाहारी पदार्थांत हळदीचा वापर मसाल्यातील एक मुख्य घटक म्हणून केला जातो. ती पिवळी, सुवासिक व स्तंभक असते. ओल्या हळदीच्या तुकड्यांचे लोणचे करतात. आर्युवेदात उल्लेख केल्याप्रमाणे त्वचा, यकृत, फुप्फुस यांवरील उपचारासाठी हळदीचा वापर केला जातो. हळद सूक्ष्मजीवरोधी, पूतिरोधी, शोथरोधी, अर्बुदरोधी, अधिहर्षतारोधी, प्रतिऑक्सिडीकारक असते. हळदीमुळे जखम लवकर बरी होते. तिच्या भुकटीपासून कुंकू तयार करतात. हळद व चुन्याचे द्रावण एकत्र केले की, तांबड्या रंगाची पूड म्हणजे कुंकू तयार होते.
रानहळद या जातीचे शास्त्रीय नाव कुर्कुमा ॲरोमॅटिका असून ती भारतात पूर्व व पश्चिमेकडील घाटांत वाढलेली दिसते. दक्षिण भारतात तिला ‘कस्तुरी हळद’ म्हणतात. मूलक्षोड हस्ताकृती व मोठे, आत पिवळे व सुगंधी असते. पाने मोठी, रुंद आणि दीर्घवर्तुळाकार असून फुलांच्या पाठीमागून आल्यासारखी भासतात. फुलोरा मूलक्षोडाच्या तळापासून येतो; फुले सुगंधी असून ती एप्रिल-मेमध्ये येतात. रानहळद सुगंधी व स्तंभक असून ती पाण्यात उगाळून सूज व मुरगळणे यांवर लावतात, तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये तिचा वापर करतात.
आंबेहळद या जातीचे शास्त्रीय नाव कुर्कुमा आमडा आहे. ही जाती भारतात व मलेशियात आढळते; याठिकाणी तिची लागवडही करतात. पाने लांब देठाची, काहीशी भाल्यासारखी व मोठी असून एप्रिल-मे महिन्यांत त्यांच्या झुबक्यातून लांब कणिशासारखा फुलोरा येतो; फुलांची सहपत्रे हिरवट पांढरी असून फुले मोठी, पांढरी किंवा फिकट पिवळी असतात. तिच्या मूलक्षोडावर अनेक लांबट गोलसर गाठी (ग्रंथिक्षोडे) असतात. मूलक्षोडांचा रंग फिकट पिवळा असून त्याला ताजेपणी कैरीसारखा वास येतो. सूज आल्यास, शरीराचा भाग मुरगळल्यास, त्वचारोगावर तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये आंबेहळदीचा लेप लावतात.
भारतात इ.स.पू.सु. ३००० वर्षांपासून हळद लागवडीखाली आहे. हळद ही भारतीयांच्या जीवनातील एक अविभाज्य अंग असून अन्न, सौंदर्यप्रसाधने, पारंपरिक विधी, औषधे, रंग इत्यादींकरिता ती वापरतात. जखमा भरून काढण्याच्या हळदीच्या गुणधर्मासाठी १९९५ मध्ये अमेरिकेतील शास्त्रज्ञांना एकस्व दिले गेले होते. वस्तुत: कोणत्याही पदार्थाच्या पारंपरिक उपयोगासाठी एकस्व (पेटंट) दिले जात नाही. भारतात शतकानुशतके हळदीचा वापर जखमा भरून येण्यासाठी केला जातो, हे आंतरराष्ट्रीय समुदायापुढे मांडून व कायदेशीर लढाई देऊन भारतीय वैज्ञानिकांनी वर उल्लेखलेले एकस्व रद्द करून घेतले. या लढ्याचे नेतृत्व डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.
भारतीय हळद गुणवत्तेसाठी जगात सर्वोत्तम मानली जाते. भारत हा २०१८ मध्ये हळदीचे सर्वाधिक उत्पादन करणारा व निर्यात करणारा देश होता. महाराष्ट्रात सांगली येथे हळदीची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे.