प्रत्येक सजीव हा प्रजननाद्वारे अस्तित्वात आलेला असतो. सर्व सजीवांच्या प्रजननाचा आढावा प्रजनन नोंदीत घेतलेला आहे. पुढील नोंद मानवी प्रजननाविषयी आहे. मानवामध्ये प्रजनन लैंगिक पद्धतीने घडून येते. प्रजननासाठी आवश्यक असलेली इंद्रिये मानवाच्या शरीरात जन्मापासूनच असतात. पौगंडावस्थेत या इंद्रियांची वाढ होऊन ती प्रजननक्षम होतात. या अवस्थेत मुलगी व मुलगा यांच्या शरीरात अनेक बदल होतात. हे बदल त्यांच्या शरीरात स्रवलेल्या संप्रेरकांद्वारे नियमित होतात. स्त्री-प्रजनन संस्था व पुरुष-प्रजनन संस्था यांच्या संरचनेत फरक असतो. या दोन्ही प्रजनन संस्था जनन पेशींची म्हणजे शुक्रपेशी व अंडपेशी यांची निर्मिती, पोषण व वहन यांसाठी सक्षम असतात. पुरुष प्रजनन संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे पौगंडावस्थेत चालू झालेली शुक्रपेशी निर्मिती आयुष्यभर चालू असते. वार्धक्यामध्ये शुक्रपेशी कमी संख्येने निर्माण होतात. स्त्री प्रजनन संस्थेतील अंडपेशी निर्मिती साधारणपणे वयाच्या ४५ वर्षांनंतर थांबते.

पुरुष प्रजनन संस्था

पुरुष प्रजनन संस्थेत वृषणकोश, वृषण, अधिवृषण, शुक्रवाहिनी, स्खलनवाहिनी आणि शिश्न ही मुख्य इंद्रिये आणि शुक्राशय, पुरस्थ ग्रंथी व कौपर ग्रंथी ही पूरक इंद्रिये असतात.

वृषणकोश : श्रोणीभागापासून बाहेर आलेल्या त्वचेच्या सैल पिशवीला वृषणकोश म्हणतात. वृषणकोशात दोन वृषणे असतात. वृषणकोशाचे तापमान शरीराच्या तापमानापेक्षा कमी म्हणजे सु. ३३°से. असते. वृषणकोशाचे तापमान वाढल्यास शुक्रपेशी कमी संख्येने तयार होतात. वृषणकोशाच्या त्वचेवर घर्मग्रंथी असतात. वृषणकोशातील स्नायूंमुळे वृषणकोश हिवाळ्यात शरीराजवळ, तर उन्हाळ्यात शरीरापासून दूर असतात. स्नायू आणि घर्मग्रंथी यांच्याद्वारे वृषणकोशाचे तापमान कायम राखले जाते. घट्ट अंतर्वस्त्रे वापरल्यास वृषणकोशाचे तापमान वाढते आणि त्यामुळे शुक्रपेशी कमी संख्येने तयार होतात.

वृषण : वृषणकोशात दोन वृषणे असतात. प्रत्येक वृषण ४ सेंमी. लांब, ३ सेंमी. रुंद व सु. २० ग्रॅ. वजनाचे असते. वृषणाभोवती अंडधर कंचुक व श्वेतकंचुक अशी दोन आवरणे असून ती वृषणाचे रक्षण करतात. श्वेतकंचुकापासून आत गेलेल्या अनेक पडद्यांमुळे वृषणाचे सु. २५० कप्प्यांत विभाजन झालेले असते. प्रत्येक कप्प्यात १–४ परिवलित शुक्रजनक नलिका असतात. दोन्ही वृषणात ४००–६०० शुक्रजनक नलिका असून त्यांची एकूण लांबी सु. ६०० मी. असते. या नलिकेच्या भित्तिका दोन प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात; गोलाकार शुक्रजनक पेशी व स्तंभाकार सर्टोली पेशी. शुक्रजनक नलिकेभोवती अंतराली ऊती असून या ऊतींमध्ये रक्तवाहिन्या व लायडिख पेशी असतात. अंतराली ऊती शुक्रजनक नलिकांना बाहेरून आधार देतात व लायडिख पेशी टेस्टोस्टेरोन या पुरुष संप्रेरकाची निर्मिती करतात. पुरुष प्रजनन संस्थेची वाढ व दुय्यम लैंगिक लक्षणांची वाढ यात टेस्टोस्टेरोन महत्त्वाची भूमिका बजावते. वृषणात शुक्रजनक नलिका जेथे एकत्र येतात तेथे त्यांचे जाळे तयार होते, त्याला ‘वृषणजाल’ म्हणतात.

वृषणात शुक्रजनक पेशींचे विभाजन होऊन दररोज सु. एक कोटी शुक्रपेशी म्हणजेच शुक्राणू तयार होतात. शुक्रपेशी सर्टोली पेशींना चिकटलेल्या असून त्यांद्वारे शुक्रपेशींचे पोषण होते. शुक्रपेशी ५५–६० मायक्रोमीटर लांब असून त्याचे शीर्ष, मध्यभाग व पुच्छ असे भाग असतात. शीर्षाचे शुक्राग्र व केंद्रक असे दोन भाग असतात. शुक्राग्र टोपीसारखे असून त्यात विकरे असतात, तर केंद्रकात जनुकीय द्रव्य असते. शुक्रपेशीच्या मध्यभागात तंतुकणिका असतात. तंतुकणिकांद्वारे शुक्रपेशींना ऊर्जा मिळाल्यामुळे त्या पुच्छाद्वारे हालचाल करतात. सर्व शुक्रपेशी बाहेरून एकसारख्या दिसतात. मात्र त्यांच्यातील गुणसूत्रांचा विचार केला तर ५०% शुक्रपेशींमध्ये २२+X गुणसूत्रे असतात, तर ५०% शुक्रपेशींमध्ये २२+Y गुणसूत्रे असतात.

अधिवृषण : दोन्ही वृषणांलगत दोन अधिवृषणे असतात. अधिवृषणाचे शीर्ष, शरीर व पुच्छ असे भाग असतात. अधिवृषणामध्ये शुक्रपेशी पक्व होऊन सक्रिय होतात. अधिवृषण भित्तिकेद्वारे शुक्रपेशींना आवश्यक असलेले पोषकघटक स्रवले जातात.

शुक्रवाहिनी आणि स्खलनवाहिनी : दोन्ही अधिवृषणे दोन शुक्रवाहिन्यांमध्ये उघडतात. या शुक्रवाहिन्यांचे दुसरे टोक मूत्रमार्गामध्ये उघडत असून तो भाग अधिक विस्फारलेला असतो. या विस्फारलेल्या भागाला स्खलनवाहिनी म्हणतात. शुक्रवाहिन्या जेथे मूत्रमार्गात उघडतात तेथे जवळच शुक्राशयाची जोडी व पुरस्थ ग्रंथी असतात. शुक्रवाहिनी व स्खलनवाहिनी यांत शुक्रपेशी साठलेल्या असतात. वृक्कामध्ये तयार झालेले मूत्र व समागमाच्या वेळी तयार झालेले वीर्य मूत्रमार्गामधून शिश्नाच्या मूत्रमार्ग छिद्राद्वारे बाहेर टाकले जाते.

शिश्न : शिश्न श्रोणीस जुळलेले असते.‍ शिश्नाचा मध्यभाग दंडगोलाकार असून त्याच्या दूरस्थ टोकाला शिश्नमुंड असते. शिश्नमुंड शिश्नमुंडचर्माने आच्छादलेले असते. शिश्नमुंडाच्या टोकावर मूत्रमार्गछिद्र असून या छिद्रातून मूत्र व वीर्य बाहेर टाकले जाते. शिश्नामध्ये तीन मोठ्या दंडगोलाकार व स्पंजासारख्या पोकळ ऊती असतात. शिश्नातील संवेदी चेतापेशी उत्तेजित झाल्या की पोकळ ऊतींमध्ये रक्त साठते व शिश्न उत्थापित होते.

शिश्न हे पुरुषाचे समागमाचे इंद्रिय आहे. समागमाच्या वेळी शुक्रपेशी, शुक्राशय व पुरस्थ ग्रंथींचा स्राव एकत्र येऊन वीर्य तयार होते व ते योनीमध्ये सोडले जाते. वीर्यस्खलनास अडथळा येऊ नये म्हणून समागमाच्या वेळी उत्थापित शिश्नातील मूत्रप्रवाह तात्पुरता खंडित होतो. समागमाच्या वेळी शिश्नमुंडावरची सैल त्वचा मागे सरकल्यामुळे त्या भागातील मृत पेशी शिश्नमुंडाच्या मागे साठून राहतात. याकरीता शिश्नमुंडचर्म मागे सरकवून शिश्नमुंड स्वच्छ करावे लागते.

शुक्राशय : मुत्राशयाच्या खाली शुक्राशय ग्रंथींची एक जोडी असते. या ग्रंथींचा स्राव पिवळसर व अल्कधर्मी असून त्याचा सामू ७․७ असतो. या स्रावात फ्रुक्टोज असून फ्रुक्टोजमुळे शुक्रपेशींना ऊर्जा मिळते. वीर्यातील सु. ८०% भाग शुक्राशय ग्रंथींचा स्राव असतो. या स्रावामुळे समागमाच्या वेळी योनीची आम्लता कमी होते.

पुरस्थ ग्रंथी : या ग्रंथींच्या चार पाली असून त्या संयोजी ऊतींनी बनलेल्या असतात. या ग्रंथीचा स्राव पातळ व अल्कधर्मी असतो. त्यात कॅल्शियम सायट्रेट व फायब्रिनोजेन ही गोठणद्रव्ये व फायब्रिनोलायसिन हे विकर असते. या ग्रंथीत अनेक लहान पोकळ्या असतात. या ग्रंथीचा स्राव पोकळ्यांतील अनेक नलिकांमधून स्खलनवाहिनीत येतो.

कौपर ग्रंथी : मूत्रमार्गाच्या दोन्ही बाजूंस कौपर ग्रंथींची एक जोडी असते. या ग्रंथीचा स्राव बुळबुळीत व अल्कधर्मी असतो. त्यामुळे मूत्रमार्गातील आम्लीयता कमी होते. कौपर ग्रंथीला कंदमूत्रमार्ग ग्रंथी असेही म्हणतात.

थोडक्यात, पुरुष प्रजनन संस्थेत वृषणांमध्ये शुक्रपेशींची निर्मिती होते. या शुक्रपेशी अधिवृषणांतून शुक्रवाहिन्यांमध्ये, तेथून स्खलनवाहिन्यांमध्ये व नंतर मूत्रजननमार्गात येतात. शुक्राशय, पुरस्थ ग्रंथी व कौपर ग्रंथी यांचे स्राव व शुक्रपेशी एकत्र मिसळून वीर्य तयार होते. हे वीर्य समागमाच्या वेळी योनीमध्ये क्षेपित केले जाते.

स्त्री-प्रजनन संस्था

स्त्री-प्रजनन संस्थेत अंडाशय, अंडवाहिनी, गर्भाशय, योनी आणि स्तन ही इंद्रिये असतात.

अंडाशय : स्त्रीच्या उदरगुहेत (ओटीपोटात) उजव्या आणि डाव्या बाजूला प्रत्येकी एक अशी दोन अंडाशये असतात. प्रत्येक अंडाशयाची लांबी सु. ३ सेंमी., रुंदी १·५ सेंमी. व जाडी सु. १ सेंमी. असते. बाल्यावस्थेत अंडाशयाचा रंग भुरकट गुलाबी व पृष्ठभाग गुळगुळीत असून ते बदामासारखे फुगीर व लंबगोल असते. अंडाशयाचे बाह्यक आणि मध्यक असे दोन भाग असतात. बाह्यकाच्या जननअभिस्तरातील घनाकृती पेशींपासून अंडपुटके तयार होतात. जन्मल्यानंतर स्त्री अर्भकाच्या अंडाशयात १०–२० लाख अंडपुटके असतात.

स्त्रीच्या जन्मानंतर नवीन अंडपुटके तयार होत नाहीत. एवढेच नाही तर, प्रत्येक महिन्याला अंडपुटकांचा ऱ्हास होऊन त्यांच्या संख्येत घट होत असते. पहिले ऋतुचक्र म्हणजे मासिक पाळी सुरू होईपर्यंत अंडाशयात ३–४ लाख अंडपुटके श‍िल्लक राहतात. अंडपुटके वाढून अंडपेशीनिर्मिती होऊ लागल्यानंतर अंडाशयाचा पृष्ठभाग खडबडीत व पुटकुळ्या आल्यासारखा दिसू लागतो. या अंडपुटकांचा दर महिन्याला सु. १०० या दराने ऱ्हास होत असतो. राहिलेल्या अंडपुटकांपैकी दर महिन्याला सु. २० अंडपुटके वाढतात आणि त्यांपैकी केवळ एकाच अंडपुटकापासून अंडपेशी तयार होते. स्त्रीच्या ३०—३५ वर्षांच्या प्रजननकाळात म्हणजे पौगंडावस्था ते रजोनिवृत्तीच्या १०—४५ वर्षे वयाच्या कालावधीत सु. ४०० अंडपेशी फलनासाठी उपलब्ध होतात.

अंडाशयात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन ही स्त्री-संप्रेरके निर्माण होतात. स्त्रियांची शारीरिक लक्षणे व प्रजनन यांसाठी इस्ट्रोजेन आवश्यक असते. इस्ट्रोजेनाच्या प्रभावामुळे स्त्रियांमध्ये स्तनांची वाढ, गर्भाशयाची वाढ तसेच गर्भाशय-अंत:स्तराची वाढ, ऋतुचक्राचे नियमन इ. कार्ये घडून येतात. जेव्हा अंडपुटके संपतात, तेव्हा अंडाशयाद्वारे इस्ट्रोजेननिर्मिती थांबते आणि रजोनिवृत्ती अवस्था येते. प्रोजेस्टेरोनाच्या प्रभावामुळे दर महिन्याला गर्भाशय-अंत:स्तरामध्ये होणारे बदल नियंत्रित केले जातात. अंडाशयातून काही वेळा टेस्टोस्टेरोन हे पुरुष संप्रेरक स्रवले जाते. वयाेमानानुसार स्त्री संप्रेरक कमी प्रमाणात स्रवल्यास, टेस्टोस्टेरोन या संप्रेरकाचा प्रभाव वाढताे आणि त्याच्या प्रभावामुळे स्त्रियांमध्ये दाढी-मिशा येण्यासारखी पुरुषांची लक्षणे दिसू शकतात.

अंडवाहिनी : अंडाशयांच्या खाली दोन अंडवाहिन्या असतात. त्यांना ‘फॅलोपी वाहिनी’ म्हणतात. प्रत्येक फॅलोपी वाहिनी १०–११·५ सेंमी. लांब असून ती गर्भाशयात उघडते. तिचा अंडाशयाजवळील भाग नरसाळ्यासारखा असून कडा झालरयुक्त असतात. झालरीच्या आतील बाजूस पक्ष्माभिका असतात. या वाहिनीच्या भित्तिका श्लेश्मयुक्त असून त्यावरही पक्ष्माभिका असतात. अंडाशयातून ऋतुचक्राच्या १४ व्या दिवशी एक अंडपेशी प्रथम उदरपोकळीत व नंतर फॅलोपी वाहिनीत येते. फॅलोपी वाहिनीमध्ये या काळात अंडपेशीचा संयोग शुक्रपेशीबरोबर झाल्यास अंडपेशीचे फलन होते. अन्यथा पक्ष्माभिकांच्या हालचालीमुळे आणि अंडवाहिनीच्या क्रमसंकोचामुळे अंडपेशी फॅलोपी वाहिनीतून गर्भाशयाकडे वाहून नेली जाते. अफलित किंवा फलित अंडपेशी गर्भाशयाकडे वाहून नेणे, हे फॅलोपी वाहिनीचे कार्य असते.

गर्भाशय : उदरगुहेच्या मध्यभागी (ओटीपोट) आणि मूत्राशय व मलाशय या दोन्हींच्या मध्ये गर्भाशय असते. गर्भाशयाचा आकार उलट्या नासपती फळासारखा असून त्याची लांबी सु. ७·५ सेंमी., रुंदी सु. ४·५ सेंमी. व जाडी सु. २ सेंमी. असते. गर्भाशयाच्या ऊर्ध्व भागास बुध्न, मध्यभागास गर्भाशय शरीर आणि योनिमार्गात उघडणाऱ्या मानेसारख्या भागास ग्रीवा म्हणतात. गर्भाशयाची भित्तिका ही परिस्तर, स्नायूस्तर व अंत:स्तर अशा तीन स्तरांनी बनलेली असते. त्यांपैकी स्नायूस्तर हा अनैच्छिक स्नायूंनी बनलेला असतो. गर्भाशयाच्या अंत:स्तरामध्ये असलेल्या ग्रंथींना रक्तवाहिन्यांमधून रक्तपुरवठा होतो. गर्भाशयाच्या अंत:स्तराची जाडी पियुषिका ग्रंथी आणि अंडाशयामध्ये स्रवलेल्या इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन या संप्रेरकांच्या पातळीनुसार बदलते. फलनानंतर भ्रूणरोपण करणे, गर्भाच्या वाढीस मदत करणे, गर्भ सुरक्षित ठेवणे व प्रसूती ही गर्भाशयाची कार्ये आहेत.

योनी : गर्भाशयाच्या मुखापासून योनिरंध्रापर्यंत असलेल्या स्नायुमय नलिकेला योनी म्हणतात. ती सु. १० सेंमी. लांब असते. बाल्यावस्थेत योनिरंध्रावर एक श्लेष्मल व सच्छिद्र पातळ पडदा असतो. त्याला योनिच्छद म्हणतात. प्रथम समागम करताना योनिच्छद विदीर्ण होते. बऱ्याचदा शारीरिक हालचालींमुळे योनिच्छद फाटू शकतो. कौमार्याचा व योनिच्छद सुरक्षित असण्याचा काहीही संबंध नसतो.

योनिरंध्राच्या वरच्या बाजूस मूत्रमार्ग छिद्र व त्यावर शिश्निका असते. शिश्निका ही पुरुषाच्या शिश्नाशी समजात असून उत्थानक्षम असते. योनीवाटे ऋतुचक्रातील मासिक स्राव बाहेर टाकला जातो. प्रसूतीच्या वेळी योनी जन्मनलिका म्हणून कार्य करते. अंत:स्तरातील पेशींमध्ये असलेल्या ग्लायकोजेनचे लॅक्टिक आम्लात रूपांतर झाल्याने योनिमार्गात सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही. योनिरंध्राभोवती प्रघ्राणग्रंथी म्हणजे बार्थोलिन ग्रंथी असतात. या ग्रंथीद्वारे पाझरलेला स्राव समागमाच्या वेळी वंगणाचे कार्य करतो. समागम करताना योनी शिश्नास सामावून घेते आणि त्याद्वारे आलेले वीर्य साठवून ठेवते. योनिछिद्र, मूत्रमार्ग छिद्र व शिश्निका एका अरुंद पोकळीत असतात. या पोकळीच्या दोन्ही बाजूला त्वचेच्या घड्या असून त्या ओठांप्रमाणे दिसतात. या पोकळीच्या बाह्यभागाला भग किंवा विटप म्हणतात, तर पोकळीला प्रघ्राणकोटर म्हणतात.

स्तन : स्त्रियांच्या वक्षभागावर स्तनांची जोडी असून त्यांच्या टोकाला स्तनाग्रे असतात. स्तनांमध्ये दुग्धकोश, दुग्धनलिका, मेदपेशी व स्नायूपेशी असतात. दुग्धकोश दुग्धपेशींनी बनलेले असतात. अनेक दुग्धनलिका सूक्ष्म छिद्रांनी स्तनाग्रात उघडतात. स्तनाग्राभोवती फिकट गुलाबी रंगाचे गोलाकार स्तनमंडल असते. स्तनमंडलात असंख्य स्नेहग्रंथी असतात. वयाच्या १२–१४ वर्षापासून स्तनांची वाढ होते. प्रसूतीनंतर स्तनातून दूध पाझरते.

सारांशाने स्त्री-प्रजनन संस्थेत अंडाशयात दरमहा एक अंडपेशी तयार होते. ही अंडपेशी प्रथम उदरपोकळीत येऊन नंतर फॅलोपी वाहिनीत येते. समागम झाल्यास अंडपेशीचे फलन होऊन गर्भाशयाच्या अंत:स्तरावर भ्रूणरोपण होते. फलन न झाल्यास अंडपेशी मासिक स्रावाबरोबर शरीराबाहेर टाकली जाते.

ऋतुचक्र : स्त्रीच्या प्रजनन कालावधीत दर महिन्याला अंडाशय आणि गर्भाशय यांमध्ये होणाऱ्या बदलांना ऋतुचक्र म्हणतात. हे बदल चक्रीय असून यात दरमहा एक अंडपेशी तयार होत असते. ऋतुचक्राला ‘मासिक पाळी’ किंवा ‘आर्तव चक्र’ असेही म्हणतात.

पौगंडावस्थेत मुलींमध्ये ऋतुचक्र सुरू होते तेव्हा त्यांच्यात ऋतुस्राव होतो आणि त्यांचा प्रजनन कालावधी सुरू होतो. जेव्हा पहिल्यांदा ऋतुस्राव होतो त्याला सामान्य भाषेत ‘वयात येणे’ म्हणतात. शहरी भागातील मुली वयाच्या १०–१२ वर्षांपर्यंत व ग्रामीण भागातील मुली १२–१४ वर्षापर्यंत वयात येतात. सामान्यपणे १८ वर्षांपर्यंत स्त्रिया पूर्ण प्रजननक्षम होतात. म्हणून कायद्याने स्त्रीच्या विवाहाचे वय १८ वर्षे केले आहे. पूर्ण वाढ झाल्यानंतर स्त्रीची प्रजननेंद्रिये कार्यक्षम बनतात व त्यांचे ऋतुचक्र नियमित होते. ऋतुचक्राचा सरासरी कालावधी २८ दिवसांचा असतो. या चक्राचे क्रमाने चार टप्पे मानले जातात; ऋतुस्राव अवस्था ०–४ दिवस, अंडमोचनपूर्व अवस्था ५–१३ दिवस, अंडमोचन अवस्था १४वा दिवस आणि अंडमोचनपश्च अवस्था १५–२८ दिवस. २८ दिवसानंतर पुन्हा ऋतुचक्र सुरू होते.

ऋतुस्राव अवस्था : ऋतुचक्राची सुरुवात गर्भाशयातून व योनिमार्गातून ४ दिवस होत राहणाऱ्या स्रावाने होते. या काळात अंडाशयाद्वारे स्रवणाऱ्या इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरोन या संप्रेरकांची पातळी कमी होते. त्यामुळे गर्भाशयाच्या अंत:स्तराला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो व अंत:स्तरातील सु. ८०% पेशी मृत होतात. परिणामी अंत:स्तर आधारस्तरापासून सुटतो, त्याखालची सूक्ष्म रक्तकोटरे उघडतात आणि तो सु. २·५ मिमी. एवढा पातळ होतो. या मृतपेशी व ऊती सुटून गर्भाशयात साठतात व त्या रक्तात मिसळल्या जाऊन ऋतुस्राव तयार होतो. ऋतुस्राव गोठत नाही. या स्रावात अंत:स्तरातील ५०–१५० मिली. इतके रक्त, ऊतीस्राव, श्लेष्म व अपिस्तर ऊती ‍यांचे मिश्रण असते. हा ऋतुस्राव गर्भाशयातून योनिमार्गाद्वारे बाहेर येतो.

अंडमोचनपूर्व अवस्था : या अवस्थेत अंडाशयाच्या पृष्ठभागावर वाढलेल्या सु. २० अंडपुटकांमधील एका अंडपुटकाची वाढ अधिक होते. अशा पुटकाला ‘ग्राफ पुटक’ (ग्राफ फॉलिकल) म्हणतात. ग्राफ पुटक सु. २० मिमी. वाढले की ते अंडाशयाच्या बाहेरील आवरणाजवळ येते व विमोचनास तयार होते. ग्राफ पुटकाद्वारे इस्ट्रोजेन व इनहिबिन ही दोन संप्रेरके स्रवली जातात. या संप्रेरकांमुळे पियुषिका ग्रंथीमधील पुटक उद्दीपक संप्रेरकाची (एफएसएच : फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन) पातळी कमी होते व इतर अंडपुटकांची वाढ खुंटून त्यांचा ऱ्हास होतो. ग्राफ पुटकामधून मोठ्या प्रमाणात इस्ट्रोजेन स्रवते. विमोचनाच्या आधी एक-दोन दिवस या ग्राफ पुटकामधून प्रोजेस्टेरोन हे संप्रेरक स्रवू लागते.

ग्राफ पुटक विमोचनासाठी तयार होत असताना गर्भाशयात इस्ट्रोजेनाची पातळी वाढल्यामुळे अंत:त्वचेतील आधारपेशी, नवीन रक्तवाहिन्या व ग्रंथींची वाढ होते. या अवस्थेत अंत:त्वचेची जाडी ४–१० मिमी. एवढी होते.

अंडमोचन अवस्था : या अवस्थेत ग्राफ पुटकामधून अंडपेशी बाहेर सोडली जाते. ही क्रिया सर्वसाधारणपणे ऋतुचक्राच्या १४व्या दिवशी घडून येते. पियुषिका ग्रंथीद्वारे पुटक उद्दीपक संप्रेरक स्रवत असताना पीतपिंड संप्रेरक (एलएच : ल्युटिनायझिंग हॉर्मोन) देखील स्रवले जाते. या दोन्ही संप्रेरकांच्या प्रभावामुळे ग्राफ पुटकामधून अंडपेशी बाहेर पडते. याला ‘अंडमोचन’ किंवा ‘अंडपेशीमोचन’ म्हणतात. अंडपेशीभोवती संरक्षक पेशी व पोषक पेशी असतात. अंडपेशी बाहेर पडल्यानंतर ग्राफ पुटकाच्या उर्वरित पेशींचे पीतपिंडामध्ये (कॉर्पस ल्युटियम) रूपांतर होते.

अंडमोचनपश्च अवस्था : या अवस्थेत अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडून फॅलोपी वाहिनीच्या झालरयुक्त मुखातून आत शिरते. अंडपेशी ६–८ तास फॅलोपी वाहिनीमध्ये फलनक्षम राहते. या काळात पीतपिंडातून मोठ्या प्रमाणात प्रोजेस्टेरोन स्रवले जाते. अंडपेशी आणि शुक्रपेशी यांचा संयोग झाला तर फलन घडून येते. अफलित किंवा फलित अंडपेशी फॅलोपी वाहिनीमधून गर्भाशयात जाते. अंडमोचनपश्च अवस्थेचा कालावधी ऋतुचक्राच्या १५व्या ते २८व्या दिवसापर्यंत असतो. २६व्या दिवसापर्यंत पीतपिंडामध्ये इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरोन या संप्रेरकांची पातळी सामान्य असते. त्यामुळे गर्भाशयाच्या अंत:त्वचेची जाडी १२–१४ मिमी. एवढी वाढते. ही सर्व तयारी भ्रूणरोपण होणार या उद्देशाने झालेली असते. या अवस्थेला पीतपिंड अवस्था असेही म्हणतात. २६व्या दिवसापर्यंत भ्रूणरोपण झाले नाही तर पीतपिंडाचा संकोच होतो, इस्ट्रोजेनाची आणि प्रोजेस्टेरोनाची पातळी कमी होते, गर्भाशयातील रक्तवाहिन्यांचा संकोच होतो आणि पुन्हा ऋतुस्राव अवस्था सुरू होऊन पुढले ऋतुचक्र चालू होते. काही वेळा ऋतुचक्राचा कालावधी कमी-जास्त होऊ शकतो. हा कालावधी २४ दिवसांपासून ३२ दिवसांपर्यंत असू शकतो. पियुषिका ग्रंथी, अंडाशय व गर्भाशय यांत घडणाऱ्या विविध चक्रांमुळे ऋतुचक्र नियमित घडून येत असते.

ऋतुस्रावाच्या काळात (मासिक पाळी) गर्भाशयातील रक्तवाहिन्यांची तोंडे उघडल्यामुळे गर्भाशयाला संसर्ग होऊ शकतो. म्हणून या दिवसांत स्वच्छता पाळणे आवश्यक असते. याकरिता स्वच्छ व निर्जंतुक सुती कापडाच्या घड्या वापरून योनिमुख कोरडे ठेवतात. बाजारात मिळणारे सॅनिटरी नॅपकिन या उद्देशाने वापरता येतात. भारतातील अनेक राज्यांमध्ये महिला बचत गटांतर्फे वाजवी दराने आरोग्यदायी सॅनिटरी नॅपकिन पुरविले जातात.

१८–२६ वर्षापर्यंत स्त्रीमध्ये भ्रूणरोपण सहज होऊ शकते. वाढत्या वयानुसार भ्रूणरोपणाची शक्यता कमी झाल्यास प्रसूतीमध्ये अडचणी उद्भवू शकतात. स्त्रीचे वय जास्त असल्यास अर्भकामध्ये जनुकीय दोष उद्भवू शकतात. स्त्रीच्या वयाच्या ४०—४५ वर्षानंतर अंडपेशीनिर्मिती थांबते. स्त्रीजीवनातील या कालावधीला ‘रजोनिवृत्ती’ म्हणतात. या कालावधीत स्त्रियांमध्ये चिडचिडेपणा वाढणे, शरीराचे तापमान वाढणे, त्वचेमधून उष्णतेच्या लाटा गेल्यासारखे वाटणे अशी लक्षणे उद्भवू शकतात.

फलन

अंडपेशी आणि शुक्रपेशी यांच्या मीलनाला ‘फलन’ म्हणतात. फलनामध्ये अंडपेशी आणि शुक्रपेशी यांचा संयोग होऊन युग्मनज पेशी तयार होते. याच युग्मनज पेशीला ‘फलित अंड’ म्हणतात.

ऋतुचक्राच्या मधल्या टप्प्यावर साधारणपणे १४व्या दिवशी अंडमोचन होऊन अंडपेशी फॅलोपी वाहिनीत येते. अंडपेशी फॅलोपी वाहिनीत असताना या कालावधीत स्त्री व पुरुष यांचा समागम झाल्यास पुरुषाकडून वीर्याचे क्षेपण योनिमार्गात केले जाते. एका क्षेपणात वीर्यामध्ये सु. ४ कोटी शुक्रपेशी असतात. फलन होण्यासाठी शुक्रपेशी फॅलोपी वाहिनीतील अंडपेशीपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. सु. ८५% शुक्रपेशी अशा असतात, की त्या हालचाल करू शकत नाहीत. त्यामुळे सु. १५% शुक्रपेशी फलनासाठी उपलब्ध होतात. योनी, ग्रीवा आणि गर्भाशयमुख यांकडून मिळालेल्या रासायनिक संकेतांनुसार शुक्रपेशी गर्भाशयाकडे निघतात. मात्र तोपर्यंत सु. १,००० शुक्रपेशी शिल्लक राहतात. अंडपेशी असलेल्या फॅलोपी वाहिनीत ज्या शुक्रपेशी शिरतात त्यांपैकी एक शुक्रपेशी आणि अंडपेशी यांचे मिलन होण्याची शक्यता असते. वीर्यक्षेपणानंतर शुक्रपेशी सु. २० मिनिटात अंडपेशीपर्यंत पोहोचतात. मात्र अंडमोचन झाल्यानंतर साधारणपणे १२—४८ तासांमध्ये शुक्रपेशी अंडपेशीपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. शेवटच्या टप्प्यावर अंडपेशीपर्यंत पोहोचणाऱ्या शुक्रपेशींची संख्या काही डझनभर असते.

शुक्रपेशी अंडपेशीजवळ पोहोचल्या तरी फलन घडून यायला काही तास लागतात. या कालावधीत शुक्रपेशीमध्ये जैवरासायनिक बदल घडून येतात आणि त्यानंतर ती अंडपेशीभोवती असलेल्या पेशींच्या थरातून आत शिरते. शुक्रपेशीच्या प्रवेशानंतर अंडपेशीच्या पटलामध्ये बदल होऊन ते अंडपटल इतर शुक्रपेशींचा प्रवेश रोखते. अंडपेशीच्या आत शुक्रपेशी आणि अंडपेशी यांची केंद्रके एकत्र येतात. याला ‘जनुकीय फलन’ म्हणतात. फलनानंतर फलित अंडपेशीतील गुणसूत्रांची संख्या द्विगुणित (२n) होते आणि भ्रूण लिंगनिश्चिती होते.

भ्रूण लिंगनिश्चिती

अंडपेशीमध्ये २२‌+X गुणसूत्रे असतात. म्हणून अंडपेशीला ‘समयुग्मकी’ म्हणतात. शुक्रपेशीमध्ये २२‌+X किंवा २२‌+Y अशी गुणसूत्रे असतात आणि त्यांचे प्रमाण ५०:५० टक्के असते. म्हणून शुक्रपेशींना ‘विषमयुग्मकी’ म्हणतात. फलनाच्या वेळी २२‌+X गुणसूत्रे असलेल्या शुक्रपेशीचे फलन अंडपेशीबरोबर झाल्यास फलित अंडपेशीमध्ये ४४+XX अशी गुणसूत्रांची संख्या होते व त्यापासून स्त्री भ्रूण तयार होतो. जर फलनाच्या वेळी २२‌+Y गुणसूत्रे असलेल्या शुक्रपेशीचे आणि अंडपेशीचे फलन झाल्यास फलित अंडपेशीमध्ये ४४+XY अशी गुणसूत्रे होतात व पुरुष भ्रूण तयार होतो. निसर्गत: पुरुष आणि स्त्रियांची संख्या ५०% असावी यासाठी शुक्रपेशी विषमयुग्मकी असतात. लिंगनिश्चिती ही यादृच्छ‍िक (रँडम) पद्धतीने पुरुषाकडून आलेल्या शुक्रपेशीमुळे होते. भ्रूणाची लिंगनिश्चिती ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याने स्त्री अर्भक जन्माला आल्यास स्त्रीला जबाबदार धरणे योग्य नाही.

भ्रूणरोपण : शुक्रपेशीचा अंडपेशीमध्ये प्रवेश झाल्यानंतर दोन्ही पेशींची केंद्रके एकत्र येतात. फलनानंतर सु. ३० तासांत फलित अंडपेशीचे पहिले विभाजन होते; याला ‘विदलन’ म्हणतात. त्यानंतर क्रमाने होत गेलेल्या विदलनामुळे बहुपेशीय भ्रूण तयार होतो. फलनानंतर ४ थ्या दिवशी तयार होणाऱ्या स्थायुरूप पेशीसमूहाला ‘मूलपुंज’ (मोऱ्युला) म्हणतात. या स्थितीमध्ये तीन ते चार दिवस भ्रूण फॅलोपी वाहिनीमध्ये असतो व त्याचे पोषण फॅलोपी वाहिनीतील स्रावापासून होते.

चार ते पाच दिवसांनी मूलपुंजाचे रूपांतर पेशींच्या पोकळ गोलामध्ये म्हणजे कोरकपुटीमध्ये (ब्लास्टुला) होते. कोरकपुटी गर्भाशयामध्ये अल्पकाळ तरंगत राहते आणि त्यानंतर गर्भाशयाच्या अंत:स्तराला चिकटते. कोरकपुटी गर्भाशयाला चिकटण्याच्या प्रक्रियेला ‘भ्रूणरोपण’ म्हणतात. भ्रूणरोपणाची सुरुवात ७व्या दिवशी होऊन ११व्या दिवशी संपते. कोरकपुटीच्या बाह्यपेशी पोषणपेशीचे कार्य करतात. कोरकपुटीच्या आंतरभागातील भ्रूणपेशींपासून भ्रूणाच्या ऊती तयार होतात. कोरकपुटीलगत असलेल्या गर्भाशयाच्या भित्तिकेमध्ये रक्तकोटरे (सायनसेस) तयार होतात. या रक्तकोटरांच्या समूहाला ‘भ्रूणपोष’ म्हणतात. भ्रूणपोषापासून भ्रूणास अन्नपुरवठा होतो. भ्रूणरोपणानंतर भ्रूणाभोवती उल्ब, जरायू, अपरापोषिका आणि पुष्क कोश अशी क्रमाने चार आतून बाहेर आवरणे तयार होतात. ही आवरणे भ्रूणबाह्य पेशींपासून तयार झालेली असतात. उल्ब आवरणाच्या आत उल्बद्रव असतो. भ्रूण सुरक्षित ठेवणे आणि त्याचे पोषण करणे ही या आवरणांची कार्ये असतात.

क्वचितप्रसंगी भ्रूणरोपण गर्भाशयाऐवजी फॅलोपी वाहिनीतच घडून येते. अशा भ्रूणरोपणातील भ्रूण जगण्याची शक्यता फारच कमी असते. या प्रकारात गर्भाशयातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो व मातेला असह्य वेदना होतात. त्यावर उपाय म्हणून भ्रूण काढून टाकतात किंवा ज्या फॅलोपी वाहिनीत भ्रूणरोपण झालेले असते ती फॅलोपी वाहिनी शस्त्रक्रियेने काढून टाकतात. एका बाजूची फॅलोपी वाहिनी काढली तरी फलित अंडपेशी दुसऱ्या बाजूच्या फॅलोपी वाहिनीतून गर्भाशयात पोहोचून तेथे भ्रूणरोपण होऊ शकते.

भ्रूणाच्या वाढीसाठी प्रोजेस्टेरोन आवश्यक असते. भ्रूणरोपणानंतर पीतपिंडाद्वारे अधिक प्रोजेस्टेरोन स्रवले जाते. मात्र भ्रूणरोपण झाले की पियुषिका ग्रंथीद्वारे पुटक उद्दीपक संप्रेरक स्रवणे थांबते. त्यामुळे अंडपेशी निर्मिती घडून येत नाही, गर्भाशयाचा अंत:स्तर टिकून राहतो आणि परिणामी मासिक पाळी थांबते. मासिक पाळी थांबणे हे गरोदरपणाचे मुख्य लक्षण आहे.

भ्रूणविकास : गर्भाशयात कोरकपुटीचे रोपण झाल्यानंतर कोरकपुटीबाहेर आणखी एक पोषजनक पेशींचा थर तयार होतो. या पेशीथरापासून बोटांसारखी जरायू उद्वर्धने निघालेली असतात. ती गर्भाशय ऊतींनी आच्छादलेली असतात. त्यांच्यामार्फत गर्भाशयाच्या रक्तकोटरांकडून भ्रूणाचे पोषण होते. गर्भभित्तिकेपासून निघालेली उद्वर्धने, रक्तकोटरे व गर्भाशयाच्या ऊती यांच्यापासून बनलेल्या संयुक्त रचनेला ‘अपरा’ म्हणतात. भ्रूणाची वाढ झाल्यानंतर भ्रूण जेथे गर्भाशयाला चिकटलेला असतो तेथून नाळ तयार होते. या नाळेद्वारे भ्रूण अपरेला जोडला जातो. अपरेद्वारे स्रवलेल्या संप्रेरकांमुळे मातेच्या शरीरातील चयापचय नियंत्रित केला जातो. याच संप्रेरकांमुळे भ्रूण सुस्थितीत राखला जाऊन भ्रूणाची वाढ होते. भ्रूणरोपणानंतर कोरकपुटीच्या पेशींपासून बहिर्जननस्तर, मध्यजननस्तर व अंतर्जननस्तर असे तीन पेशीस्तर तयार होतात. या स्तरांपासून भविष्यातील अर्भकाच्या ऊती आणि इंद्रिये बनतात. भ्रूण ४ आठवड्यांचा झाल्यानंतर त्याच्या हृदयाचे कार्य सुरू होते. हृदयाचे ठोके स्टेथॉस्कोपमधून ऐकू येतात. सोनोग्राफीच्या साहाय्याने हृदयाचे ठोके प्रत्यक्ष पाहता येतात. ७व्या आठवड्यात भ्रूणामध्ये प्रजनन इंद्रियांची वाढ होण्यास सुरुवात होते. ८वा आठवडा संपताच भ्रूणाची लांबी ३० मिमी. होते. ८व्या आठवड्यापर्यंतच्या या अवस्थेला भ्रूण (एम्ब्रिओ) म्हणतात आणि त्यानंतर जन्म होईपर्यंत गर्भ (फीटस) ही संज्ञा वापरतात.

गर्भविकास : सामान्यपणे ८—१२ आठवड्याच्या कालावधीत गर्भाचे हात, पाय व बोटे इ. अवयव तयार होतात. ७व्या आठवड्यात सुरू झालेली प्रजनन इंद्रियांची वाढ १२ आठवड्यापर्यंत पूर्ण होते. यानंतर गर्भाचे लिंग सोनोग्राफीद्वारे ओळखता येते. भारतात प्रसूतीपूर्व गर्भलिंग चाचणी करण्यास कायद्याने बंदी आहे. अशी चाचणी केल्यास तो गुन्हा समजला जातो.

२० आठवड्यांनंतर गर्भाची हालचाल मातेला जाणवू लागते. २४ आठवड्यानंतर गर्भाच्या त्वचेवर केस येऊ लागतात. तसेच डोळ्यांच्या पापण्या व पापण्यांचे केस तयार होतात. गर्भावधीच्या ३६ आठवड्यांनी किंवा नवव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची वाढ पूर्ण होते. ३७ आठवड्यानंतर केव्हांही प्रसूती होऊ शकते. ३७ आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत जन्मलेली अर्भके अपुऱ्या दिवसांची समजली जातात. अशा अर्भकांची खास काळजी घ्यावी लागते.

प्रसूती

गर्भाशयातील अर्भक योनिमार्गातून बाहेर येण्याच्या क्रियेला ‘प्रसूती’ म्हणतात. पियुषिका ग्रंथी, अंडाशय आणि अपरा यांनी स्रवलेल्या संप्रेरकांच्या प्रभावामुळे मातेचे शरीर प्रसूतीसाठी तयार होते. सामान्यपणे प्रसूती योनिमार्गातून होत असून प्रसूतीचे टप्पे पुढीलप्रमाणे असतात; प्रसूतिकळा सुरू होणे, गर्भाशयमुख उघडणे, योनिमार्गातून अर्भक बाहेर येणे, अपरा व नाळ गर्भाशयातून बाहेर येणे. प्रसूतीच्या पहिल्या टप्प्यात प्रसूतिकळा सुरू होऊन गर्भाशय आकुंचन पावते व गर्भाशयमुख १० सेंमी.पर्यंत उघडते. गर्भाशयाच्या आकुंचनामुळे उल्ब आवरण फाटते व उल्बद्रव योनीतून बाहेर पडतो.

प्रसूतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये गर्भाशयाचे आकुंचन तीव्र होते. त्यामुळे गर्भाशयमुख अधिक उघडले जाते व प्रसूतिकळा वाढतात. याच वेळी पियुषिका ग्रंथीतून ऑक्सिटोसीन संप्रेरक स्रवू लागते. ऑक्सिटोसिनच्या प्रभावामुळे गर्भाशयाचे स्नायू अधिक आकुंचन पावतात आणि गर्भाशयमुख अधिकाधिक उघडते. जोपर्यंत अर्भक बाहेर येत नाही तो पर्यंत ऑक्सिटोसिन स्रवले जाणे आणि गर्भाशयाचे आकुंचन पावणे, हे चालूच राहते. प्रसूती होण्यापूर्वी उदरगुहेचे आणि श्रोणिगुहेचे स्नायू सतत आकुंचन व शिथिल होत राहिल्यामुळे अर्भक योनिमार्गातून बाहेर येते. दर दहापैंकी नऊ प्रसूतींमध्ये अर्भकाचे डोके आधी बाहेर येते. काहीं प्रसूतीमध्ये अर्भकाचे पाय, खांदा, हात किंवा ढुंगण आधी बाहेर येते.

प्रसूतीच्या तिसऱ्या टप्प्यात उल्बावरण, अपरा आणि नाळ गर्भाशयाबाहेर येते. अपरा गर्भाशय भित्तिकेपासून वेगळी होते. याच क्षणी गर्भाशय भित्तिका आणि अपरा यांच्यातील रक्तकोटरे उघडतात आणि रक्तस्राव होतो. प्रसूतीच्या वेळी १५०–२५० मिली. रक्तस्राव होतो. अर्भक जन्मल्यानंतर साधारणपणे ५ मिनिटांनी अपरा आणि नाळ बाहेर येतात. अपरा आणि नाळ बाहेर आल्यानंतर १–४ तासांत उघड्या झालेल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तस्राव थांबतो.

जन्मलेल्या अर्भकाला हवेत श्वसन करता यावे, म्हणून त्याच्या शरीरात अनेक बदल घडून येतात. भ्रूण गर्भाशयात असताना अपरेवाटे होणाऱ्या रक्तपुरवठ्यातून पोषक पदार्थ व वायूंची देवाणघेवाण होत असते. हा रक्तपुरवठा फुप्फुसामार्गे न होता हृदयातील उजवे अलिंद व डावे अलिंद यांच्यातील पटाला असलेल्या अंडाकार रंध्रातून होत असतो. जन्मानंतर अर्भकाच्या नाळेला चिमटा लावून नाळ कापतात आणि अर्भक हवा शरीरात घेऊ लागते. शरीरात श्वसन वायूंची (ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड वायू) देवाणघेवाण होण्यासाठी उजव्या निलयापासून रक्त फुप्फुसाकडे वाहू लागते आणि ऑक्सिजनयुक्त रक्त डाव्या अलिंदामध्ये परत येते, जे नंतर डाव्या निलयात ढकलले जाऊन पुढे रक्ताभिसरण संस्थेत प्रवाहीत होते. परिणामी डाव्या अलिंदातील रक्तदाब उजव्या अलिंदातील रक्तदाबापेक्षा वाढतो. रक्तदाबातील फरकामुळे अंडाकार रंध्र बंद होते व हृदयाची उजवी आणि डावी अशा दोन बाजू होतात.

अर्भक म्हणजेच बाळ जन्मल्यानंतर पहिल्यांदा श्वास घेते व रडते. त्याच्या रडण्याच्या क्षणापासून श्वसन संस्थेचे कार्य चालू होते, म्हणून जन्मताना बाळ रडणे आवश्यक असते. त्याक्षणी ते न रडल्यास त्याच्या तळव्याला चिमटा घेऊन किंवा पाठीवर थोपटून त्याला रडविण्याचा प्रयत्न करतात.

गर्भावस्थेत मातेचे पोषण, मातेचे आरोग्य व मानसिक ताण इ.चा गर्भाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. साधारणपणे जन्मलेल्या बाळाचे वजन सु. ३,२०० ग्रॅ. असल्यास बाळ योग्य वजनाचे समजतात. मात्र बाळाचे वजन १,५००—२,५०० ग्रॅ. असल्यास ते वजन कमी समजले जाते.

योनिमार्गातील प्रसूती अवघड आणि अधिक वेळ घेणारी असल्यास माता व अर्भक या दोघांना धोकादायक ठरू शकते. अशा वेळी शस्त्रक्रिया करून अर्भक गर्भाशयाबाहेर काढतात. याला शस्त्रक्रिया प्रसूती (सिझेरियन डिलिव्हरी) म्हणतात. सामान्य प्रसूतीत स्त्रीच्या श्रोणी मेखलेच्या (कंबरेच्या भागातील हाडे) श्रोणी मार्गातून अर्भकाचे डोके योनिमार्गामध्ये यावे लागते. प्रसूती होत असताना ही हाडे रिलॅक्स‍िन या संप्रेरकामुळे सैल होत असतात आणि त्यामुळे प्रसूती सुलभ होण्यास मदत होते.

गरोदर स्त्रीचे वय अधिक असल्यास श्रोणी मेखलेची हाडे कडक झालेली असतात. त्यामुळे सामान्य प्रसूती अवघड व त्रासदायक होते. काही वेळा प्रसवकळा अचानक थांबल्यास अर्भक योनिमार्गामध्ये अडकून राहू शकते. क्वचितप्रसंगी प्रसूती होत असताना अर्भकाची नाळ त्याच्या गळ्याभोवती वेढली गेल्यास मेंदूचा रक्तपुरवठा खंडित होऊन अर्भकाच्या मेंदूमध्ये दोष उत्पन्न होऊ शकतात. अशा स्थितीत बहुधा शस्त्रक्रिया प्रसूती करतात.

प्रसूतिपूर्व काळात मातेने संतुलित आहार घेणे गरजेचे असते. तसेच धनुर्वाताला प्रतिबंध म्हणून त्यावर अंत:क्षेपणे (इंजेक्शन) दिली जातात. त्यामुळे माता आणि बाळाचे धनुर्वातापासून संरक्षण होते. मातेच्या रक्तातील हीमोग्लोबिनची नियमित चाचणी केली जाते. मातेचे हीमोग्लोबिन कमी असल्यास माता गरोदर असताना हीमोग्लोबिनपूरक आहार व औषधे दिली जातात. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गर्भवती स्त्रियांचा आहार व आरोग्य यांची काळजी शासनातर्फे घेतली जाते. जेथे प्राथमिक आरोग्य केंद्र दूर असेल तेथे प्रशिक्षित सुईणी गरोदर स्त्रीची व बाळाची शुश्रूषा करतात. गर्भवती मातांना योग्य ती माहिती आणि पुरेसे शिक्षण दिल्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी होत आहे.

स्तनपान

प्रसूतीनंतर मातेच्या स्तनांमध्ये दूध स्रवणे आणि ते बाळास पाजणे याला स्तनपान म्हणतात. सामान्यपणे गर्भावधीच्या २४व्या आठवड्यांपासून स्तनांमध्ये दुग्धकोश आणि दुग्धनलिका यांची वाढ होते. प्रसूतीनंतर प्रोजेस्टेरोन, इस्ट्रोजेन, प्रोलॅक्टिन, वृद्धिसंप्रेरक (जीएच), थायरॉइड उत्तेजक संप्रेरक (टीएसएच), ऑक्सिटोसीन आणि लॅक्टोजेन या संप्रेरकांच्या प्रभावामुळे घडणाऱ्या क्रियांद्वारे दूध तयार होते. प्रसूतीनंतर पहिल्या एक-दोन दिवसांत स्तनांमध्ये दाट व पिवळसर रंगाचा स्राव तयार होतो. याला नवस्तन्य अथवा चीक (कोलोस्ट्रम) म्हणतात. यात मोठ्या संख्येने पांढऱ्या पेशी आणि इम्युनोग्लोबिन ‘ए’ असते. हा चीक बाळाची प्रतिकारशक्ती वाढवतो. यातील पांढऱ्या पेशींचा पातळ थर बाळाच्या अन्ननलिकेच्या नाजूक श्लेष्मल अंत:स्तराचे रक्षण करतो. त्यामुळे बाळास हा चीक आवर्जून पाजतात.

दूधनिर्मितीचे कार्य स्थिरावल्यानंतर स्थानिक प्रतिक्षेपी क्रियेमुळे यात नियमितता येते. या टप्प्यात बाळ जेवढे दूध ओढून घेईल तेवढे दूध निर्माण होते. स्तनांमधून दूध पाझरणे ही प्रतिक्षेपी क्रिया आहे. बाळाने दूध पिण्यासाठी स्तनाग्र चोखण्यास सुरुवात केल्यानंतर पियुषिका ग्रंथीतून ऑक्सिटोसीन संप्रेरक स्रवू लागते. या संप्रेरकाच्या प्रभावामुळे स्तनांमधील स्नायू आकुंचन पावल्यामुळे दुग्धकोशातून दुग्धनलिकेवाटे दूध बाहेर पाझरायला लागते. ही क्रिया काही सेकंदात चालू होते. बाळास एकदा दूध पाजण्याची सवय झाली की बाळाच्या रडण्यामुळे किंवा त्याला भूक लागल्याच्या जाणिवेमुळे स्तनामधून दूध पाझरू लागते. बाळ दूध पिऊ लागले की दोन्ही स्तनांतून दूध स्रवू लागते. अशावेळी बाळास आलटून पालटून डाव्या व उजव्या स्तनांचे दूध पाजतात.

स्तनाग्रांना इजा झाल्यास, वैद्यकीय कारणांमुळे बाळाला मातेपासून दूर ठेवल्यास, बाळ अपुऱ्या दिवसांचे असल्यास, अशक्तपणामुळे बाळ दूध ओढू न शकल्यास, जन्मत: बाळाचा ओठ दुभंगलेला असल्यास, मातेची शस्त्रक्रिया झाली असल्यास स्तनपानामध्ये खंड पडतो. अशा वेळी दूध पंपाने काढून घेतात, ते साठवून ठेवतात आणि ते योग्य वेळी बाळाला पाजतात. प्रसूतिगृहामध्ये मातेच्या दुधाच्या पेढ्या तयार झाल्या आहेत.

मातेचे दूध बाळासाठी पोषणाच्या दृष्टीने सर्वोत्तम असते. मातेच्या रक्तप्रवाहातील आणि शरीरात साठलेल्या पोषक घटकांपासून मातेचे दूध तयार होते. बाळाची वाढ आणि विकास होण्यासाठी गरज असलेले शर्करा, मेद, प्रथिने, जीवनसत्त्वे, क्षार आणि पाणी यांचे योग्य संतुलन मातेच्या दुधात असते. दुधात आढळणारी लॅक्टोज ही दुग्धशर्करा आणि केसीन हे प्रथिन बाळाला दुधाखेरीज अन्य दुसऱ्या स्रोतांपासून मिळत नाहीत. या गुणधर्मामुळे मातेच्या दुधास पर्याय नाही, असे मानले जाते. युनिसेफ संस्थेने दरवर्षी १–७ ऑगस्ट हा आठवडा जागतिक स्तनपान आठवडा म्हणून जाहीर केलेला आहे.

दुग्धस्रवणाच्या काळात पियुषिका ग्रंथीमधील प्रोलॅक्टिन संप्रेरकामुळे पुटक उद्दीपक संप्रेरक (एफएसएच) स्रवत नाही. त्यामुळे अंडपुटकांची वाढ होत नाही. परिणामी काही महिने ऋतुस्राव होत नाही आणि काही काळ गर्भधारणा होत नाही.

This Post Has 4 Comments

  1. अनिल गोडबोले

    अतिशय उपयुक्त, साध्या सोप्या सरळ भाषेत लिहिण्याचे कसब फक्त मोहन madvanna सरांनाच आहे.
    छान लेख

    1. siddhesh jadhav

      खूप माहितीपूर्ण . इतक्या मराठी शब्दांची ओळख करुन देणे आणि ठेवा जपणे , कौतुकास्पद .मनापासून धन्यवाद .

  2. Pranav Jadhav

    महत्व पूर्ण ठेवा , अथक प्रयत्नां साठी लक्ष आभार .

  3. राजेंद्र चव्हाण

    माहितीपूर्ण वाचनीय आणि चिंतनीय असा लेख आहे।अप्रतिम मांडणी आणि शब्दप्रयोग।

प्रतिक्रिया व्यक्त करा