जोशी, श्रीपाद भालचंद्र : (२८जानेवारी, १९५०). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक. कवी, समीक्षक, विचारवंत, माध्यमतज्ज्ञ, वक्ते, संपादक अशी त्यांची विविधांगी ओळख आहे. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ साहित्यविषयक आणि विविध सामाजिक चळवळींमध्ये ते सक्रिय आहेत. नागपूर येथे जन्मलेल्या जोशी यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. त्यांनी भाषाविज्ञान, मराठी आणि राज्यशास्त्र या तीन विषयांत पारंगत पदवी (एम.ए.) प्राप्त केली असून जाहिरातींचे शैलीशास्त्र या विषयावर आचार्य पदवी (पीएच.डी.) चे संशोधन केले आहे. मराठी भाषेतील संवादमाध्यमविषयक पहिल्या संवाद आणि माध्यम या नियतकालिकाचे संपादन त्यांनी केले आहे. तसेच सुमारे दहा वर्षे विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणी या वाङ्मयीन नियतकालिकाचे संपादन त्यांनी केले आहे. मराठी ग्रामसेवक या महत्त्वाच्या नियतकालिकाचेही त्यांनी पाच वर्षे संपादन केले. शिवाय लोकमत साहित्य जत्रेच्या संपादनासह महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांच्या साप्ताहिक पुरवण्यांचे संपादन आणि काही वार्षिकांकांचे व ग्रंथांचेही संपादन त्यांनी केले आहे. साक्षेपी, संग्राहक, गुणग्राहक, चोखंदळ संपादक असणाऱ्या जोशी यांनी या काळात महाराष्ट्रासह देशविदेशातील मराठी लेखक व अनुवादकांच्या उत्तम लेखनास विचारपीठ उपलब्ध करून दिले. मराठी नियतकालिकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी संघटनात्मक प्रयत्न केले.
श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे सळाळ आणि सळाळनंतर, समायत, मथितार्थ आणि इत्यादी हे चार कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांची कविता असंख्य स्तर आणि पदर असणाऱ्या समकालीन समाज वास्तवाचा आश्वासक उच्चार आहे. जागतिक सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, वाङ्मयीन वास्तवाचे अंकन करीत समग्र मानवी जीवनाच्या मानवीय पातळीवरील सुखासाठी ही कविता आकांत मांडते. या कवितेतील विद्रोहाचा स्वरही विवेकनिष्ठ, विज्ञाननिष्ठ, लोकशाही विचारांचा आग्रह धरणारा आहे. ही कविता विचारांचे सौंदर्य असणारी कविता आहे. संवादमाध्यम या ज्ञानशाखेविषयी त्यांनी विपुल लेखन केले आहे. फ्रंटिअर्स ऑफ कम्युनिकेशन्स, संवादशास्त्र, संवादाची मूलतत्त्वे, जनसंवाद आणि जनमाध्यम: सैद्धांतिक संकल्पन, सुसंवाद : इतरांशी व स्वतःशी, माध्यमपत्रकारिता आणि आपण, माध्यमांचा अन्वयार्थ, मास मिडिया : कम्युनिकेशन, थिअरी,रिसर्च अँड् कल्चर, ज्ञानेश्वरी : संवादशास्त्रीय आकलनाचा प्रयत्न, प्रसारमाध्यमांची स्वायतता : किती खरी ?,किती खोटी ?, आणि जागतिकीकरण, संवादमाध्यमे आणि फेरमांडणीचे नवे आव्हान या पुस्तकांतून माध्यमांविषयीचे सैद्धांतिक आणि समीक्षणात्मक लेखन त्यांनी केले आहे. याशिवाय जाहिरातींचे शैलीशास्त्र, माध्यमांची नीतिमत्ता, मिडिया एथिक्स हे माध्यम क्षेत्रातील त्यांचे संशोधनपर ग्रंथ आहेत. संवाद – माध्यम या ज्ञानशाखेची परिभाषा तयार करण्याच्या व संज्ञानिश्चितीच्या महत्त्वाच्या कार्यात जोशी यांचे मोलाचे आणि अद्वितीय योगदान आहे.
हस्तक्षेप, सहिष्णुतेचे बांधकाम, आणि संदर्भासहित या तीन ग्रंथातून जोशी यांनी समकालीन राजकीय,आर्थिक, सामाजिक वास्तवाचे वाङ्मयीन वास्तवाशी असणारे अनुबंध उकलून दाखवीत काही ऐतिहासिक, काही समकालीन प्रश्नांची चिकित्सा केली आहे. वेगळा विदर्भ की अखंड महाराष्ट्र ? : एका वादाची सद्य:स्थिती या ग्रंथात त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या चळवळीचा इतिहास,त्यातील वास्तव आणि समाजकारण यांची चिकित्सा केली आहे. नवभारताचे उत्तुंग राष्ट्रपुरुष: डॉ.राममनोहर लोहिया या ग्रंथात त्यांनी राममनोहर लोहिया यांच्या विचार आणि कार्याचा साक्षेपी वेध घेतला आहे. सांस्कृतिक धोरणाचे वास्तव आणि सांस्कृतिक अनुशेष या ग्रंथात राज्याच्या सांस्कृतिक धोरणाची मीमांसा करीत सांस्कृतिक अनुशेषाची चिकित्सा केली आहे. जोशी यांचे हे सर्व लेखन समकालीन सामाजिक पर्यावरणाची, वाङ्मयीन पर्यावरणाची मूलगामी चिकित्सा करणारे आहे. हवी तशी नक्षी आणि तो ती ते आणि तो हे दोन मुक्तललित चिंतनसंग्रह आहेत. त्यांच्या मुक्तललित चिंतनात्मक लेखनालाही समाज वास्तवाचे भान आहे. हे चिंतनात्मक मुक्तललित लेखन नवे आहे, प्रयोगशील आहे. याशिवाय त्यांनी महत्त्वपूर्ण अशी काही संपादने केली आहेत. विदर्भ साहित्य संमेलने : अध्यक्षीय भाषणे खंड दोन, विविध प्रवाही साहित्य संमेलने : अध्यक्षीय भाषणे, नवसमाजासाठी…( भाई बर्धन गौरव ग्रंथ), लेखक कलावंतांचा एल्गार : असहिष्णुतेच्या विरोधात आदी ग्रंथांचे संपादन त्यांनी केले आहे. ही सर्व संपादने संग्रहणीय आणि संदर्भमूल्य असणारी आहेत.
श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे लेखन बहुआयामी आहे. साहित्य, कला, भाषा, संस्कृती, नाटक, चित्र, शिल्प, नृत्य, संगीत आदी अनेक क्षेत्रांशी संबंधित चळवळी आणि संस्थांच्या निर्मितीत, उभारणीत, जडणघडणीत आणि संवर्धनासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे. सांस्कृतिक प्रबोधनाच्या कार्याचा वसा त्यांनी घेतला असून त्यांचे लेखन, विचार आणि दृष्टी लोकशाहीमूल्यांनी परिपूर्ण अशा समाज निर्मितीचा ध्यास बाळगणारे आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांचे अनुबंध साहित्य आणि भाषा यांच्याशी जुळलेले असतात. त्यामुळे भाषा आणि साहित्य यांच्या माध्यमातून सम्यक परिवर्तन घडू शकते यावर त्यांचा विश्वास आहे. या विश्वासामुळेच सांस्कृतिक पडझडीच्या काळातही ते नवसमाजनिर्मितीची बीजे मनामनात रुजविणारे विवेकनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ लेखन विलक्षण सकारात्मक दृष्टीने करीत आहेत. प्रबोधनाची ऊर्जा देणारी वाणी आणि लेखणी हे त्यांचे सामर्थ्य आणि सौंदर्य आहे.
संवाद-माध्यमांच्या क्षेत्रात केलेल्या संशोधन कार्यासाठी त्यांना ट्रांस आशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संस्थेने द पिलर्स ऑफ हिंदुस्थानी सोसायटी हा सन्मान प्रदान केला आहे. त्यांच्या सळाळ आणि सळाळनंतर या कवितासंग्रहाला विदर्भ साहित्य संघाचा शरच्चंद्र मुक्तिबोध काव्य पुरस्कार लाभला आहे तर जनसंवाद आणि जनमाध्यम : सैद्धांतिक संकल्पन या ग्रंथास डॉ. य. खु. देशपांडे शास्त्रीय लेखन पुरस्कार लाभला आहे. राष्ट्रीय पुस्तक मेला, दिल्ली या संस्थेचा सुरेश भट स्मृती साहित्य पुरस्कार यांसह त्यांना अनेक पुरस्कार लाभले आहेत. संत गाडगेबाबा साहित्य संमेलन जरूड, साहित्य संस्कृती संमेलन, सावनेर, कविता संमेलन, नागपूर, लेखक – प्रकाशक संमेलन, भिलार, ग्रामीण साहित्य संमेलन, येळ्ळूर, कर्नाटक यांसह अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. ते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे २०१६ ते २०१९ या काळात अध्यक्ष होते. विदर्भ साहित्य संघाचे सुमारे पंचवीस वर्षांहून अधिक काळ उपाध्यक्ष असलेले जोशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विद्या विभागाचे पहिले पूर्ण वेळ प्राध्यापक व विभागप्रमुख होते.
संदर्भ :
- सबनीस, श्रीपाल, यथार्थ (डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी गौरव ग्रंथ), पुणे, २०१९.