(गूज). एक पाणपक्षी. हंसांचा समावेश ॲन्सरिफॉर्मिस गणाच्या ॲनॅटिडी कुलात केला जातो. त्यांच्या ॲन्सर (करडा हंस) आणि ब्रँटा (काळा हंस) अशा दोन प्रजातींमध्ये एकूण सु. १९ जाती असून काही उपजाती आहेत. चेन प्रजाती (पांढरा हंस) वेगळी समजली जात असे; मात्र आता या प्रजातीचा समावेश ॲन्सर प्रजातीत केला जातो. ॲन्सर प्रजातीच्या हंसांचे पाय व पावले गुलाबी किंवा नारिंगी असतात; तर चोच गुलाबी, नारिंगी किंवा काळी असते. या प्रजातीत बार-हेडेड (. इंडिकस), ग्रेलॅग (. ॲन्सर), बिन (. फॅबिलिस), पिंक फूटेड (. ब्रॅकिऱ्हिंकस), स्वान (. सिग्नॉइड्स), व्हाइट फ्रण्टेड (. एरिथ्रोपस), स्नो हंस (चेन सिरुलसन्स), रॉस हंस (चेन रॉसी) इ. जाती येतात. ब्रँटा प्रजातीतील हंसाचे पाय व पावले काळी किंवा गडद राखाडी असतात. चोच काळी असून डोके व मान यांचा बराचसा भाग काळा असतो. या प्रजातीत बारनॅकल (ब्रँ. ल्यूकॉप्सिस), ब्रेंट (ब्रँ. बेर्निक्ला), कॅनडा (ब्रँ. कॅनाडेन्सिस), हवाईयन (ब्रँ. सँडव्हिसेन्सिस), रेड ब्रेस्टेड (ब्रँ. रुफिकॉलिस) इ. जातींचा समावेश होतो. राजहंस, बदक हे पक्षीही ॲनॅटिडी कुलातील असून राजहंस आकारमानाने हंसापेक्षा मोठे, तर बदक हंसापेक्षा लहान असतात.

 ग्रेलॅग हंस (ॲन्सर ॲन्सर)

हंसाच्या जाती जगात सर्वत्र आढळतात; कारण बहुतेक जाती स्थलांतर करतात. त्यांच्या काही जातींचे प्रजनन आर्क्टिक प्रदेशात होते. हिवाळ्यात ते दक्षिणेकडे यूरोप, आशिया, अमेरिका खंडांकडे स्थलांतर करतात. म्हणूनच हिवाळ्यात भारताच्या उत्तरेकडील प्रदेशांत हंस दिसून येतात. त्यामध्ये . ॲन्सर, . इंडिकस या जातींचे हंस बहुसंख्येने असतात.

बारनॅकल हंस (ब्रँटा ल्यूकॉप्सिस)

हंसाचे आकारमान व रंग प्रत्येक जातींनुसार वेगवेगळा असतो. त्यांचे आकारमान साधारणपणे राजहंस आणि कबूतर यांच्या दरम्यान असते. रंग शुभ्र पांढरा ते राखाडी, तपकिरी व काळसर हिरवट अशा रंगांचे मिश्रण असलेला असतो. मान शरीराच्या मानाने आखूड असते. चोच रुंद, चपटी व टोकाला निमुळती असते. पंख अरुंद व निमुळते असतात. त्यामुळे त्यांना लांबवर उडता येते. शेपटी लहान असते. पाय आखूड आणि पावले बदकाप्रमाणे पडदे असलेली असतात. पाय शरीराच्या पुढच्या भागात असल्यामुळे ते वेगाने चालू शकतात. शरीरावर लहानलहान भरपूर पिसे असतात व इतर पाणपक्ष्यांप्रमाणे दाट पिसारा असतो. नर मादीपेक्षा मोठा असून दोघांचा रंग सारखा असतो. ते पाण्याच्या आसपास असलेल्या वनस्पती गवत, लव्हाळी खातात. त्यासाठी त्यांच्या चोचींचे अनुकूलन घडून आलेले असते.

हंसाची नर-मादी आयुष्यभर सोबत राहतात. काही कारणाने नर किंवा मादी मृत झाली अथवा कायमची दूर गेली, तर क्वचित ते दुसरा जोडीदार निवडतात. यासाठी अनेक वर्षे ते वाट पाहू शकतात. अन्यथा ते आयुष्यभर एकटे राहतात. दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी हंस प्रजननक्षम होतात. मादी तिसऱ्या वर्षी अंडी घालायला लागते आणि एकदा वयात आली की, ती दरवर्षी अंडी घालते.

स्थलांतर करणारे हंस उपजत प्रवृत्तीमुळे ३,२००–४,८०० किमी. अंतराचा प्रवास करून आपल्या जन्मस्थानी जोडी जमविण्यासाठी तसेच घरटे बांधण्यासाठी येतात. नर घरटे करण्यासाठी एखादा प्रदेश निवडतो आणि तेथे तो कोणालाही अतिक्रमण करू देत नाही. नंतर मादी त्या प्रदेशातील विशिष्ट जागा निवडते आणि तेथे घरटे करते. घरटी जमिनीवर तळ्याच्या काठावर किंवा चिचुंदरीच्या रिकाम्या झालेल्या बिळात असते. घरट्याच्या आतील भागात पक्ष्यांची लहानलहान पिसे असतात. त्यामुळे अंडी पटकन दिसून येत नाहीत. मादी दिवसाला एक याप्रमाणे ४–७ अंडी घालते. अंडी उबविण्याचा कालावधी २१–३० दिवस असतो. या काळात नर घरट्याजवळ राहून घरट्याची राखण करतो. अंडी उबल्यानंतर त्यातील पिलू अंड्याचे कवच फोडून बाहेर येते. त्यासाठी पिलाला साधारणपणे २४ तास लागतात. सर्व पिले बाहेर येईपर्यंत मादी घरट्यातच थांबते. पिले एका दिवसाची झाली की, नर-मादी त्यांना खोल पाण्यात पोहायला शिकवितात. साधारणपणे ४०–८५ दिवसांत पिले उडायला शिकतात. पिले २-३ महिन्यांची होऊन उडू लागल्यानंतर सर्वच हंस थव्याने स्थलांतर करतात.

बहुतेक सर्व हंस एकाच थव्यात कायम राहत असल्याने ते एकमेकांना ओळखतात. त्यांच्या थव्यात हजारो पक्षी असतात. एखाद्या संकटाची सूचना काहींनी केली, तर क्षणार्धात सर्व थवा उडून जातो. कोल्हा, घुबड व समुद्री कासव हे हंसांचे शत्रू आहेत. जेव्हा ते घाबरतात, तेव्हा ते मान उंच करून मोठमोठ्याने ओरडतात. नर नेहमीच मादीचे रक्षण करतो. थव्यामध्ये ते एकमेकांशी सहकार्याने वागतात. थव्यातील एखादा पक्षी जखमी झाल्यास किंवा आजारी असल्यास त्याला ते सुरक्षित जागी सोडतात. अशा वेळी काही हंस त्याच्यासोबत मदतीसाठी व सुरक्षिततेसाठी थांबतात. जोपर्यंत तो उडू शकत नाही अगर त्याचा मृत्यू होत नाही, तोपर्यंत ते सोबत राहतात. तो हंस उडू लागल्यास ते मिळून सगळे उडतात किंवा दुसऱ्या थव्यात सामील होतात. उडताना ते २-३ पावले चालत जाऊन नंतर उडतात.

हंस स्थलांतर करताना ते थव्याने खूप उंचीवरून इंग्लिश व्ही (V) अक्षराच्या आकारात उडतात. उडत असताना पुढील भागातील हंस थकल्यास त्यांची जागा इतर हंस घेतात. वेग कायम राखण्यासाठी इतर हंस विशिष्ट ध्वनी काढून त्यांना प्रेरणा देत राहतात. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी विविध प्रकारचे सु. १० आवाज काढू शकतात. ते रात्री किंवा दिवसा प्रवास करतात आणि आकाशातील तारे, नक्षत्र यांच्या स्थानावरून प्रवासाचा मार्ग बिनचूक ठरवितात. त्यांच्या प्रवासाचा मार्ग नेहमी तोच असतो. ते प्रवासात ठराविक जागीच थांबतात. वर्षातून एकदा प्रौढ हंसाच्या शेपटीची पिसे गळून पडतात. नवीन पिसे येईपर्यंत उडू शकत नसल्याने तो आपला थवा सोडून देतो. नवीन पिसे सहा आठवड्यांत येतात. तोपर्यंत शत्रूंपासून संरक्षण व्हावे यासाठी तो पाण्याच्या आसपासच राहतो.

बार-हेडेड हंस (ॲन्सर इंडिकस)

ग्रेलॅग हंस जगात बहुतेक सर्वत्र आढळतात. भारतात हिवाळ्यात ही जाती काश्मीर, पंजाब, राजस्थान व आसाम या राज्यांत तसेच नेपाळमध्ये दिसते. त्यांचा रंग राखाडी असतो. याखेरीज बार-हेडेड हंसदेखील भारतात दिसून येतात. त्यांचे प्रजनन लडाखच्या परिसरात होते व इतर भागांत ते हिवाळ्यात आढळतात. त्यांच्या डोक्यावर काळा पट्टा असतो. शरीराचा रंग फिकट तपकिरी असून चोच व पाय नारिंगी असतात. या जातीचे हंस सर्वांत उंच उडत स्थलांतर करतात. ते सु. ५,५०० मी. उंचीवरून उडत हिमालय पर्वत ओलांडून हिवाळा घालविण्यासाठी भारतात येतात.

हंस अतिशय सावध असतात. परिसरात काहीही हालचाल दिसली, तरी ते मोठा आवाज करून इतरांना सावध करतात. म्हणूनच १९५० च्या दशकात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून व्हिएटनाममध्ये विमानतळावर रात्रीच्या वेळी विमाने सुरक्षित राहण्यासाठी हंसांचा वापर केला गेला होता.

हंसांना माणसाळविण्याचे कार्य इ. स. पू. १,०००–४,००० या काळात सुरू झाले. ते सहजासहजी रोगाला लवकर बळी पडत नसल्याने त्यांना पाळणे सोपे असते. पाश्चात्त्य देशांत कुक्कुटपालनात हंसाचाही समावेश केला जातो. हंसाच्या सर्व पाळीव जाती ग्रेलॅग हंस या जातीपासून निर्माण झालेल्या आहेत. सामान्यपणे पाळीव हंस लठ्ठ असतात. त्यामुळे ते उडू शकत नाहीत. पाळीव हंसाचे नर अनेक माद्यांशी मीलन करतात. त्यामुळे व्यापारी उपयोगासाठी ते जास्त उत्पादक ठरतात. पाळीव हंसाची मादी एका वर्षात सु. ५० अंडी घालते. त्यांच्या अंड्यांचे वजन १२०–१७० ग्रॅ. असून ती कोंबडीच्या अंड्यांप्रमाणे आहारात वापरतात. पाइटीर (फ्रान्स) येथे हंसाच्या एका विशिष्ट जातीची पैदास करतात. त्यांच्या अंगावर खूप दाट लहानलहान पिसे असतात. ही पिसे रजया, उश्या, झोपण्याच्या पिशव्या, कोट इ. उष्णतारोधक बनविण्यासाठी वापरतात. हंसांच्या यकृतापासून फवाग्रास नावाचा रुचकर पदार्थ तयार करतात. हंसांचा आयु:काल १०–१५ वर्षे असतो. पाळलेले हंस २०–३० वर्षे जगतात.