(एलिफंटॅसीस). हत्तीरोग हा गोलकृमींमुळे (नेमॅटोडांमुळे) अर्थात सूत्रकृमींमुळे होतो. हा रोग मुख्यत: उष्ण कटिबंधीय प्रदेशांत दिसून येतो. वुच्छेरेरिया बँक्रॉफ्टी नावाचे परजीवी गोलकृमी हत्तीरोगाला कारणीभूत असतात. बारीक धाग्याप्रमाणे दिसणाऱ्या या गोलकृमींना फायलेरिया असे म्हणतात. त्वचेखाली वाढणाऱ्या या प्रौढ गोलकृमीची लांबी २–५० सेंमी. इतकी असते. क्युलेक्स डासाची मादी या कृमीची वाहक आहे. क्युलेक्स डासाची मादी जेव्हा हत्तीरोगाने बाधित असलेल्या रुग्णाला चावते, तेव्हा हे गोलकृमी तिच्या पोटात जातात. काही दिवसांनंतर या गोलकृमीचे रूपांतर डिंभांमध्ये होते. हे डिंभ संक्रामणक्षम असतात. एखाद्या निरोगी व्यक्तीला क्युलेक्स डासाच्या मादीने दंश केल्यास हे डिंभ त्या निरोगी व्यक्तीच्या रक्तप्रवाहात शिरतात आणि तेथून लसीका संस्थेत प्रवेश करतात. लसीका संस्थेत या गोलकृमीची वाढ होत असल्याने लसीका संस्थेच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे लसीका संस्थेची हानी होते. परिणामी रुग्णाचे एक किंवा दोन्ही पाय, दोन्ही हात, छाती तसेच बाह्य जननेंद्रिये (जसे पुरुषांमध्ये वृषणे) सुजलेली दिसतात. या रोगामुळे रुग्णाची त्वचा हत्तीच्या त्वचेप्रमाणे जाड, खरखरीत होऊन तिला भेगा पडतात; म्हणून या रोगाला हत्तीरोग म्हणतात.

हत्तीरोगावर वेळीच उपचार न केल्यास ही सूज प्रचंड प्रमाणात वाढून पाय हत्तीच्या पायांसारखे दिसू लागतात. दीर्घकाळ ही प्रक्रिया चालत राहिल्यास त्वचेचा रंग गडद होतो व रुग्णाच्या हालचालींवर मर्यादा येतात. सुजून कठीण झालेल्या ऊती शस्त्रक्रियेने काढून टाकतात. पूर्वी काही वेळा पायाचा भाग कायमचा वाढल्यानंतर काय उपचार करायचे, ते माहीत नव्हते. अशा परिस्थितीत काही वेळा रुग्णाचे पायदेखील कापून टाकावे लागत.

पूर्वी भारतात २० राज्यांतील सु. ६० कोटी जनता हत्तीरोग प्रवणक्षेत्रात राहात असावी, असा अंदाज होता. विदर्भात या रोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असत. त्यामुळे वर्धा येथे हत्तीरोग संशोधन केंद्र स्थापले गेले होते. मागील काही वर्षांत हत्तीरोगावर प्रभावी औषधे उपलब्ध झाल्याने हत्तीरोगाचे रुग्ण क्वचित दिसून येतात. या रोगावर डाय-एथिल कार्बमेझीन (हेट्राझान), आयव्हरमेक्टीन आणि ॲलबेंडॅझोल ही औषधे उपलब्ध आहेत. या औषधांच्या उपचारामुळे पोटातील गोलकृमी शौचावाटे बाहेर पडतात. त्यामुळे या रोगाचा प्रसार बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे. याखेरीज क्युलेक्स डासांची निर्मिती थांबविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

भारत, इंडोनेशिया, मेक्सिको, ग्वातेमाला, काही आफ्रिकी देश, दक्षिण पॅसिफिक बेटे इत्यादी ठिकाणी हत्तीरोगाचे रुग्ण तुरळकपणे आढळतात. भारतातून या आजाराचे निर्मूलन व्हावे, म्हणून जोमाचे प्रयत्न चालू आहेत.