(मॅमॅलिया). प्राणिसृष्टीतील सर्वाधिक विकसित वर्ग. स्तनी किंवा सस्तन प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्राण्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व सात कोटी वर्षांपासून आहे. ‘मॅमल’ हा शब्द मॅमे या लॅटिन शब्दापासून तयार झाला असून त्याचा अर्थ स्तनग्रंथी किंवा स्तन असा होतो. या प्राण्यांना स्तनग्रंथी असतात आणि मादी आपल्या पिलांना अंगावरचे दूध पाजून वाढवते, म्हणून त्यांना स्तनी किंवा सस्तन प्राणी म्हणतात. स्तनी वर्ग हा पृष्ठवंशी प्राण्यांचा एक वर्ग असून यात अस्तित्वात असलेल्या प्राण्यांचे २७ गण व विलुप्त प्राण्यांचे १४ गण आहेत. या प्राण्यांच्या एकूण सु. ४,४०० जाती आणि १२,००० उपजाती आहेत.
सस्तन प्राणी विविध प्रकारच्या अधिवासात राहतात. व्हेल, वॉलरस, सील यांसारखे प्राणी पाण्यात राहतात. वटवाघूळ हवेत संचार करते. कांगारू, हत्ती, वाघ, सिंह, मानव जमिनीवर राहतात. उंदीर, घुशी इत्यादी प्राणी बिळात राहतात; गिबन, अस्वल, खार यांसारखे प्राणी झाडावर राहतात.
सस्तन प्राण्यांच्या शरीराचे सामान्यपणे डोके, मान, धड आणि शेपटी असे भाग असतात. मान स्पष्टपणे दिसते. शेपटी मोठी किंवा लहान असते; काही प्राण्यांना शेपटी नसते. सस्तन प्राणी नियततापी असून शरीरावर त्वचा हे बाह्य आवरण असते. त्वचेवर केस असतात आणि ते दाट किंवा विरळ असतात. त्वचेमध्ये शरीराच्या वेगवेगळ्या भागांत स्वेदग्रंथी, स्नेहग्रंथी, गंधग्रंथी, स्तनग्रंथी अशा त्वचाग्रंथी असतात. स्तनी प्राण्यांच्या आकार व आकारमानांत खूप विविधता आढळते. वटवाघळाची सर्वांत लहान जाती सु. २.९ सेंमी. लांब असते, तर ब्लू व्हेल सु. ३३.५ मी. लांब असतो. चिचुंदरीचे वजन सु. १० ग्रॅ., आफ्रिकेतील हत्तीचे वजन सु. ७,००० किग्रॅ., तर ब्लू व्हेलचे वजन सु. १,३६,००० किग्रॅ. असते. सांगाडा अक्षीय व उपांगी अशा दोन भागांचा असतो. अक्षीय सांगाड्यात कवटी, बरगड्या आणि मणक्यांनी बनलेला पृष्ठवंश यांचा समावेश होतो. कवटीची हाडे एकमेकांना घट्ट जुळलेली असून हाडांमधील शिवण ठळकपणे दिसते. सर्व सस्तन प्राण्यांच्या मानेमध्ये सातच मणके असतात. उपांगी सांगाड्यात हातापायांची हाडे, वक्ष मेखला व श्रोणी मेखला यांचा समावेश होतो.
प्राणिसृष्टीत फक्त सस्तन प्राण्यांच्या आहारात दुधाचा समावेश असल्याने दुधामधून कॅल्शियमचा पुरवठा होतो. कॅल्शियममुळे या प्राण्यांची हाडे व दात प्राणिसृष्टीत सर्वाधिक बळकट असतात. जलचर सस्तन प्राण्यांच्या अवयवांमध्ये विविध प्रकारचे बदल झालेले आढळतात. अशा प्रकारचे बदल जमिनीवर राहणाऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये अधिक दिसून येतात. हालचाल करण्यासाठी त्यांचे पाय जास्त अनुकूलित झाले असून काही प्राणी तळव्याचा वापर करतात, तर काही बोटांचा आणि चवड्याचा वापर करतात. काही प्राणी पळताना बोटांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करतात. जसे, कुत्र्यामध्ये धावताना सर्व बोटे जमिनीला टेकतात, तर घोड्यामध्ये बोटांच्या टोकाचा म्हणजे खुरांच्या टोकांचाच जमिनीला स्पर्श होतो. कांगारू, ससा इत्यादी प्राण्यांत पुढचे पाय आखूड, तर मागचे पाय लांब, मजबूत असून पायांना चवडे असतात. त्यांच्या हालचाली ‘उशी घेणे (उडी घेणे)’ स्वरूपाच्या असतात. कांगारू शेपटीचा उपयोग पाचवा पाय म्हणून करतात. स्तनी वर्गात स्नायू संस्था जास्त विकसित झालेली असते. नरमानव गणातील गिबन, माकड, वानर, चिंपँझी, गोरिला, मानव आणि मांसाहारी प्राण्यांपैकी सिंह, वाघ, बिबट्या, अस्वल यांसारख्या प्राण्यांच्या चेहऱ्यावरील ऐच्छिक स्नायूंचा विकास जास्त झालेला असतो आणि त्यांच्या साहाय्याने हे प्राणी राग, भिती, प्रेम इ. भावना व्यक्त करतात. म्हणून अशा प्राण्यांमध्ये सामाजिक अनुकूलन घडून आलेले दिसते. सस्तन प्राण्यांच्या धडाचे मध्यपटलामुळे दोन भाग होतात. मध्यपटल स्नायुमय असून त्याद्वारे वक्ष गुहा व उदर गुहा वेगळ्या झालेल्या असतात. मध्यपटलाचा उपयोग श्वसन क्रियेसाठी होतो.
सस्तन प्राण्यांमध्ये शरीरातील सर्व संस्था इतर पृष्ठवंशी प्राण्यांच्या तुलनेने जास्त विकसित असतात. पचनसंस्थेत अन्ननलिका आणि पचनग्रंथी असून पचनग्रंथीत यकृत, स्वादुपिंड यांबरोबर लाळग्रंथी असतात. मुखगुहेत दोन्ही जबड्यांत दात असून ते खळग्यात घट्ट रुतलेले असतात. दातांचे पटाशीचे दात अथवा कृंतक, सुळे, उपदाढा आणि दाढा असे चार प्रकार असतात. प्रत्येक जातीनुसार दातांची संख्या विशिष्ट असते आणि ती दंतसूत्राने मांडता येते. बहुतेक प्राण्यांमध्ये दुधाचे दात आणि कायमचे दात असे दोन प्रकार असतात. अन्ननलिका शरीराबाहेर उघडण्यासाठी गुदद्वार असते. लहान आतड्याच्या टोकाला अंधनाल असतो. मानव वगळता इतर प्राण्यांत त्याचा उपयोग सेल्युलोजच्या पचनासाठी होतो. मानवाला अंधनालाचा दाह त्रासदायक ठरू शकतो. सस्तन प्राणी फुप्फुसांच्या साहाय्याने श्वसन करतात. श्वसन संस्थेत स्वरयंत्र असल्याने स्वररज्जूच्या साहाय्याने ते निरनिराळे आवाज काढतात. जिराफात स्वररज्जू नसतात. अभिसरण संस्थेत रक्ताभिसरण आणि लसीका अशा संस्था असतात. रक्ताभिसरण संस्थेत वक्षगुहेत हृदय मध्यभागी असून ते दोन अलिंद व दोन निलय अशा चार कप्प्यांचे बनलेले असते. हृदयात डाव्या बाजूच्या कप्प्यात अधिक ऑक्सिजनयुक्त रक्त आणि उजव्या बाजूच्या कप्प्यात तुलनेने कमी ऑक्सिजनयुक्त रक्त असते. हृदयात रक्त मिसळले जात नाही. रक्तातील तांबड्या पेशी वाटोळ्या असून त्यांच्यात केंद्रक नसते; परंतु उंटाच्या तांबड्या पेशींमध्ये केंद्रक असते.
उत्सर्जनासाठी उदरगुहेत दोन वृक्के असतात. वृक्कांमध्ये मोठ्या संख्येने मूत्रजनन नलिका असून त्या मूत्र तयार करतात. सामान्यपणे मूत्र मूत्रछिद्राद्वारे शरीराबाहेर टाकले जाते. सस्तन प्राणी एकलिंगी असून बाह्य गौण लैंगिक लक्षणांवरून नर आणि मादी वेगवेगळे ओळखता येतात. नरामध्ये वृषणकोश उदरगुहेच्या बाहेर असलेल्या वृषणकोशात उघडतात. वृषणकोश एक किंवा दोन असून लोंबते असतात. मादीमध्ये दोन अंडाशय असून अंडाशय व अंड लहान असतात. मीलनाच्या वेळी नर शिश्नाच्या मदतीने वीर्य मादीच्या योनीत सोडतो. आंतरफलनानंतर गर्भाशयात भ्रूणाची वाढ होते. वार आणि अपरा यांद्वारे भ्रूण गर्भाशयाला जुळलेला असतो. भ्रूणाभोवती उल्ब, जरायू आणि अपरापोषिका अशा तीन भ्रूणकला असतात. जातीनुसार गर्भावधी वेगवेगळा असतो. काही अपवाद वगळता सस्तन प्राणी जरायुज असून पिलांना जन्म देतात. जन्मानंतर मादीच्या दुधावर पिलांचे पोषण होते. चेतासंस्थेतील मेंदू सरीसृपांच्या मेंदूच्या तुलनेने मोठा असतो. मेंदूच्या प्रमस्तिष्क गोलार्धावर खाचा व उंचवटे असतात; त्यांना संवेलक आणि सीता म्हणतात. कर्पार अथवा मस्तिष्क चेतातंतूंच्या १२ जोड्या असतात. वातावरणातील उद्दीपनांचे आकलन होण्यासाठी डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा ही ज्ञानेंद्रिये असतात. बाह्यकर्ण अथवा कानाची पाळी व तीन कर्णास्थी हे स्तनी वर्गाचे वैशिष्ट आहे.
स्तनी वर्गाचे तीन उपवर्ग आहेत – (१) अंडजस्तनी, (२) शिशुधानी, (३) अपरास्तनी.
(१) अंडजस्तनी (मोनोट्रिमॅटा) : या उपवर्गातील प्राणी अंडज (अंडी घालणारे) आहेत. ते ऑस्ट्रेलिया आणि सभोवतालच्या न्यू गिनी व टास्मानिया या बेटांवरच आढळतात. या प्राण्यांत काही लक्षणे सरीसृपांची, काही पक्ष्यांची आणि काही अपरास्तनींची आढळतात. त्यांना बाह्यकर्ण व दात नसतात. स्तने असून स्तनाग्रे नसतात. वृषण उदरगुहेत असतात. अवस्कर एकच असून पचन संस्था, उत्सर्जन संस्था आणि प्रजनन संस्था त्यात उघडतात. त्यांना गर्भाशय व योनी नसतात. शरीरावर एकच छिद्र म्हणजे अवस्कर असल्याने त्यांना मोनोट्रिमॅटा म्हणतात (मोनो म्हणजे एक आणि ट्रिमा म्हणजे छिद्र). अंड्यात मोठ्या प्रमाणावर पीतक असतो. मेंदू लहान असतो. उदा., काटेरी मुंगीखाऊ (एकिड्ना), बदकचोच्या (डकबिल प्लॅटिपस).
(२) शिशुधानी (मार्सुपिएलिया) : या उपवर्गातील बहुतेक प्राण्यांच्या मादीच्या उदरावर पिशवी म्हणजे मार्सुपिएम असते. या पिशवीच्या त्वचेला पाळ अथवा झोळ म्हणजेच शिशुधानी म्हणतात. शिशुधानी स्तनाग्रांच्या वर असते. हे प्राणी पिलांना जन्म देतात; मात्र पिले अपूर्ण वाढलेल्या अवस्थेत जन्मतात. त्यांची पुढील वाढ मातेच्या दुधावर होते. या काळात पिलू मातेच्या स्तनाग्रांना चिकटून राहते. माता पिलांच्या तोंडात दूध ढकलते, कारण पिलांना दूध ओढता येत नाही. दात एकदाच येतात. गर्भाशय आणि योनी दोन असतात. नरामध्ये शिश्न असून टोकाला ते दोन भागांत विभागलेले असते. हे प्राणी ऑस्ट्रेलिया व टास्मानिया येथे जास्त संख्येने आढळतात. काही दक्षिण अमेरिका व उत्तर अमेरिका येथेही आढळतात. उदा., कांगारू, ऑपॉसम, बँडिकूट (घूस), वाँबट, कोआला (टेडी बेअर).
(३) अपरास्तनी (प्लॅसेंटॅलिया) : या उपवर्गात अपरा (वार) म्हणजे प्लॅसेंटा विकसित झालेली असते. म्हणून अपरास्तनी अथवा प्लॅसेंटॅलिया म्हणतात. या उपवर्गात सर्व आधुनिक सस्तन प्राण्यांचा समावेश केला जातो. गर्भाचे पोषण गर्भाशयात अपरेद्वारे होते. गर्भाची पूर्ण वाढ झाल्यावर पिलांचा जन्म होतो. स्तनग्रंथींचा विकास झालेला असून स्तनाग्रे असतात. दात विविध प्रकारचे असतात. या उपवर्गाची लक्षणे आणि स्तनी वर्गाची लक्षणे यांमध्ये साम्य असते. या उपवर्गात पुढील गणांचा समावेश आहे.
इन्सेक्टिव्होरा : यांत कीटक खाणारे लहान प्राणी येतात. यांच्या शरीरावर काटे किंवा केस असतात. मुस्कट लांब असून खालच्या जबड्यापेक्षा थोडे पुढे आलेले असते. उदा., चिचुंदरी, जाहक.
किरोप्टेरा : यांत पुढील पायांचे रूपांतर पंखांसारख्या अवयवांत झालेले प्राणी येतात. उदा., वटवाघूळ.
डर्मोप्टेरा : यांत मांजराच्या आकारमानाचे हवेत तरंगणारे प्राणी येतात. उदा., उडता लेमूर.
प्रायमेट्स (नरवानर) : हे सर्वभक्षी प्रगत प्राणी आहेत. यांच्या हातापायांना पाच लांबट बोटे असून अंगठा व शेजारचे बोट एकमेकांना टेकू शकतील अशी पंजाची रचना असते. चिमट्यासारखी ही रचना वस्तू पकडण्यासाठी उपयोगी असते. उदा., लेमूर, इंड्री, लाजवंती, माकड, बॅबून, गिबन, चिंपँझी, गोरिला, ओरँगउटान, मानव.
रोडेंशिया (कृंतक) : कुरतडण्यासाठी लांब व धारदार दात हे या गणाचे वैशिष्ट्य असते. उदा., उंदीर, खार, घूस, बिव्हर, गिनीपिग, साळींदर, जरबिल.
एडेंटाटा : यातील काही प्राण्यांना दात असतात, तर काहींना दात नसतात. उदा., स्लॉथ, आर्मडिलो.
फोलिडोटा : यांच्या शरीरावर एकावर एक असे खवले असतात. उदा., खवल्या मांजर, चिनी मुंगीखाऊ.
ट्युबिलिडेंटाटा : यांचे मुस्कट लांब असून जीभ तोंडाबाहेर फेकता येते. उदा., ओरिक्टेरोपस.
कार्निव्होरा (मांसाहारी) : मांस फाडणे आणि त्याचे तुकडे करणे यांसाठी यांचे दात अनुकूलित झालेले असतात. उदा., वॉलरस, सील, वाघ, चित्ता, तरस, कुत्रा, अस्वल, सिंह, कोल्हा, पाणमांजर, मुंगूस, लांडगा इत्यादी.
सीटॅसिया : हे सागरी प्राणी असून यांचे पुढील पाय पोहण्यासाठी विकसित झालेले असतात. उदा., स्पर्म व्हेल, ब्लू व्हेल, हम्पबॅक व्हेल.
पेरिसोडॅक्टिला (विषमखुरी) : यांच्या पायाला एक किंवा तीन खूर असून त्यांपैकी मधला खूर जास्त विकसित असतो. उदा., घोडा, गाढव, गेंडा, खेचर या प्राण्यांमध्ये १ खूर, तर झेब्रा या प्राण्याला ३ खूर असतात.
आर्टिओडॅक्टिला (समखुरी) : यांच्या पायाला दोन किंवा चार खूर असतात. यांपैकी चार खूरी प्राण्यांत बहुतांशी दोन खूर टेकतात व दोन अधांतरी राहतात. उदा., भेकर, डुक्कर, पाणघोडा, उंट, गाय, म्हैस, शेळी, मेंढी, याक, मिथून, काळवीट, नीलगाय, सांबर, जिराफ इत्यादी प्राण्यांमध्ये २ खूर असतात; चिंकारा, चौशिंगा, रेनडियर इत्यादी प्राण्यांमध्ये ४ खूर असतात.
हायरॅकॉयकडिया : यांच्या अंगावर दाट केस असून कान व शेपटी लहान असतात. उदा., हायरूना.
प्रोबॉसिडिया (सोंडधारी) : यांना लांब सोंड व मोठे डोके असते. वरच्या जबड्यात लांब सुळे असतात. उदा., हत्ती.
सायरेनिया : शरीराचा आकार होडीसारखा असलेले हे सागरी प्राणी आहेत. यांना मागचे पाय नसतात. उदा., सागरी गाय (डूगाँग).
लॅगोमॉर्फा : यांचे बाह्यकर्ण लांब व मागचे पाय मजबूत असतात. वरच्या जबड्यात कृंतक दातांच्या दोन जोड्या असतात. उदा., ससा.
मानव आणि इतर सस्तन प्राणी यांचा संबंध फार घनिष्ट आहे. सस्तन प्राणी हे आहारातील दूध, मांस यांसाठी उपयोगी आहेत. जुन्या आणि आधुनिक काळात त्यांचा वाहतुकीसाठी उपयोग केला जात होता. मृत प्राण्यांच्या कातडीचा उपयोग नित्योपयोगी वस्तू करण्यासाठी होतो; मात्र काही सस्तन प्राणी मानवाचे नुकसान करतात. अनेक प्राणी पिके, धान्य यांची नासाडी करतात. हिंस्र प्राणी पाळीव प्राण्यांना ठार मारतात, मानवावर हल्ला करतात आणि मानवी जीवनासाठी धोकादायक ठरतात; मात्र अनुभवातून शिकणे, चांगल्या गोष्टींचे निवड पद्धतीने अनुकरण करणे, वातावरणातील बदलांस योग्य प्रतिसाद देणे या गुणधर्मांमुळे सस्तन प्राणी इतर प्राण्यांच्या तुलनेने जगण्याच्या स्पर्धेत यशस्वी ठरले आहेत.