(एलिफंट). एक सोंडधारी सस्तन प्राणी. हत्तीचा समावेश स्तनी वर्गाच्या प्रोबॉसिडिया गणाच्या एलिफंटिडी कुलात केला जातो. लांब सोंड, लांब सुळे, सुपासारखे पसरट कान आणि खांबासारखे जाडजूड पाय ही हत्तीच्या शरीराची वैशिष्ट्ये आहेत. संस्कृत भाषेत हत्तीला ‘हस्तिन’ असे नाव असून त्यावरून त्याला हत्ती हे नाव पडले आहे.
हत्ती हा प्राणी आफ्रिकेतील सहारा प्रदेश, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया प्रदेशांतील देशांमध्ये आढळून येतो. सद्यस्थितीत एलिफंटिडी कुलाच्या लोक्झोडोंटा आणि एलिफस या दोन प्रजाती अस्तित्वात असून त्यांच्या पुढील जाती आहेत : आफ्रिकन बुश एलिफंट (लोक्झोडोंटा आफ्रिकाना), आफ्रिकन फॉरेस्ट एलिफंट (लो. सायक्लॉटिस) आणि एशियन एलिफंट (एलिफस मॅक्झिमस). एशियन एलिफंट म्हणजेच आशियाई हत्ती. या जातीच्या चार उपजाती आहेत : ए. मॅ. मॅक्झिमस (श्रीलंका), ए. मॅ. इंडिकस (भारत), ए. मॅ. सुमात्रन (सुमात्रा) आणि ए. मॅ. बोर्निन्सीस (मलेशिया, इंडोनेशिया). प्रोबॉसिडिया गणामध्ये केवळ एलिफंटिडी कुल सध्या अस्तित्वात आहे. एलिफंटिडी कुलातील मॅमथ हा प्राणी विलुप्त झाला आहे. प्रोबॅसिडिया गणाच्या इतर कुलांतील हत्तीसारखे शरीर असलेले प्राणी देखील विलुप्त झाले आहेत. उदा., डायनोथिरस (डायनोथेरिइडी कुल), गॉम्फोथिरस (गॉम्फोथिरीडी कुल), मस्टॉडॉन (मॅमुटिडी कुल). आफ्रिकी हत्ती आफ्रिकेतील सहारा वाळवंटाच्या दक्षिणेस आढळतात, तर आशियाई हत्ती दक्षिण व आग्नेय आशियातील भारत, बांगला देश, चीन, नेपाळ, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, व्हिएटनाम या देशांत आढळतात. सदर नोंदीत मुख्यत्वे आशियाई हत्तीसंबंधी माहिती दिलेली आहे.
भारतात समुद्रसपाटीपासून सु. ३,००० मी. उंचीपर्यंत आशियाई हत्ती आढळून येतात. गवताळ प्रदेश, उष्ण प्रदेशातील सदाहरित वने, पानझडी वने आणि डोंगराळ प्रदेश अशा विविध अधिवासात ते राहतात. हत्ती हा जमिनीवर वावरणारा, मोठे आकारमान असलेला शाकाहारी सस्तन प्राणी आहे. आशियाई हत्ती आफ्रिकी हत्तींपेक्षा आकारमानाने लहान असतात. प्राणिसृष्टीत काही व्हेल हत्तींपेक्षा आकारमानाने मोठे आहेत. तसेच प्राणिसृष्टीत जिराफ नंतरचा सर्वांत उंच प्राणी हत्ती आहे.
आशियाई नर हत्तीची खांद्यापर्यंतची सरासरी उंची २.७५ मी., तर मादीची सु. २.४ मी. इतकी असते. नर हत्तीचे वजन सु. ४ टन (४,००० किग्रॅ.) असून मादीचे वजन सु. ३ टन (३,००० किग्रॅ.) इतके असते. शरीराचे वजन पेलण्यासाठी पाय जाड असतात. पावले जवळपास वर्तुळाकार असून पुढील पायांना ४ किंवा ५ बोटे असतात, तर मागील पायांना ३ बोटे असतात. ते ताशी ५–१० किमी. वेगाने चालतात. वजन व पायांची रचना यांमुळे त्याला उडी मारता येत नाही आणि वेगाने पळता येत नाही. आशियाई हत्तीच्या कपाळावर कानाच्या अगदी वर दोन अर्धगोलाकार उंचवटे आढळतात. कान त्रिकोणी व सुपासारखे सपाट असून मोठे असतात. शेपटी सु.१ मी. लांब असते. त्वचेचा रंग सामान्यापणे राखाडी असून मातकट असतो. सोंड, कान आणि मान या भागांच्या त्वचेतील रंगद्रव्य कमी झाल्यामुळे तेथील त्वचा गुलाबी रंगाची दिसते. पाठ वगळता त्वचा सु. २ सेंमी. जाड असून पाठीची त्वचा सु. ३ सेंमी. जाड असते.
हत्तीचे लांब सोंड हे वैशिष्ट्य असून त्याचा वरचा ओठ व नाक पुष्कळ लांब होऊन त्यापासून सोंड बनली आहे. सोंडेचा उपयोग हत्ती हाताप्रमाणे करतात. सोंड सु. १.५ मी. लांब असून तिचे वजन सु. १४० किग्रॅ. असते. सोंड सु. ६०,००० स्नायूंनी बनलेली असते. सोंडेचे स्नायू आडवे, उभे आणि तिरके असल्याने सोंड आकुंचित करता येते, लांब होते, वळते किंवा तिला हलकासा पिळ देता येतो. सोंडेत सु. ४ लिटर पाणी राहू शकते. सोंडेमध्ये त्रिशाखी चेता आणि आननी चेता यांचे जाळे असते. गंध आणि स्पर्शज्ञान यांची जाणीव सोंड आणि जॅकोबसन इंद्रिय यांद्वारे होते. सोंडेच्या टोकाला बोटासारखी एक रचना असते ज्याद्वारे ते एखादी वस्तू पकडू शकतात. सोंडेचा उपयोग श्वसन, पाणी पिणे, खाणे, वास घेणे, आवाज काढणे, धूळ झटकणे, रक्षण करणे तसेच हल्ला करण्यासाठी होतो. पाण्याखाली असताना ते सोंडेचा उपयोग हवानळीसारखा (स्नॉर्केल) करतात.
हत्तीच्या कृंतक दातांमध्ये परिवर्तन होऊन त्यांपासून सुळे तयार झाले आहेत. हत्तीला २ कृंतक दात, १२ उपदाढा व १२ दाढा मिळून एकूण २६ दात असतात. सर्व प्राण्यांच्या दातांच्या तुलनेने हे सुळे लांब असतात. आशियाई हत्तींचे सुळे १.७५–२.७ मी.लांब असून वजन २०–३५ किग्रॅ. असते. प्रत्येक सुळ्याचा दोन-तृतीयांश भाग जबड्याबाहेर आलेला असून एक-तृतीयांश भाग कवटीत असतो. आशियाई हत्तींमध्ये केवळ नराचे सुळे मोठे असतात; मादीला सुळे नसतात किंवा फार लहान असतात. हत्ती आपल्या सुळ्यांचा उपयोग जमीन खणून त्यातून पाणी व क्षार मिळविण्यासाठी, लाकडांचे ओंडके चढविण्यासाठी-उतरविण्यासाठी, झाडे मुळांपासून उपटण्यासाठी, वाटेतील झाडे व फांद्या बाजूला करण्यासाठी, रक्षणासाठी तसेच आक्रमण करण्यासाठी करतात. हत्तीचे दात बहुवारदंती प्रकारचे असतात, म्हणजे ते आयुष्यभर ठरावीक काळाने येतात. माणसामध्ये दुधाचे दात आणि कायमचे दात असे दोनच संच येतात. हत्तीच्या आयुष्यात एकूण सहा वेळा दात बदलतात. हत्तीला चावण्यासाठीचे दात तोंडाच्या मागच्या भागात येतात आणि पुढचे दात जसजसे झिजतात, तसतसे मागचे दात पुढे सरकतात. हत्ती २-३ वर्षांचा झाला की, त्याच्या उपदाढा पडतात. यानुसार ४–६ वर्षे झाली की, दुसऱ्या उपदाढा पडतात. उपदाढा यानुसार ९–१५ वर्षांनी तिसऱ्यांदा, १८–२८ वर्षांनी चौथ्यांदा, ४० वर्षांर्यंत पाचव्यांदा पडतात. सहाव्या आलेल्या उपदाढा अखेरच्या असतात आणि हत्तीच्या जबड्यात शेवटपर्यंत राहतात. त्यांच्या दाढांवर लूपच्या आकाराच्या खाचा असतात. माणसे हाताच्या वापरानुसार जशी उजवी किंवा डावी असतात, तसेच सुळ्यांच्या अवस्थेनुसार हत्ती ‘उजवे’ किंवा ‘डावे’ ओळखले जातात. उदा., उजवा सुळा अधिक वापरात असेल, तर त्याची झीज अधिक होऊन त्याचे टोक गोल बनते. अशा हत्तीला ‘उजवा’ समजतात.
हत्तीची त्वचा करडी, सुरकुत्या असलेली व काही ठिकाणी लोंबणारी असते. शरीराचे तापमान सरासरी ३६० से. असते. हत्तीला घाम येणाऱ्या ग्रंथी (स्वेद ग्रंथी) नसतात. त्यामुळे त्याला इतर मार्गांनी शरीर थंड ठेवावे लागते. यासाठी तो कान फडफडवतो किंवा सोंडेने शरीरावर पाणी फवारून घेतो. अधूनमधून तो चिखलात लोळतो, तसेच चिखल शरीरावर सुकू देतो. त्यामुळे त्याचे उन्हापासून, कीटकांपासून संरक्षण होते. हत्तीची श्रवणक्षमता चांगली असते. माणसाला २०–२०,००० हर्ट्झ इतक्या कंप्रतेचा आवाज ऐकू येतात. हत्ती २० हर्ट्झ कंप्रतेपेक्षा कमी आवाज (अवश्राव्य ध्वनी) काढू शकतात व ऐकू शकतात. साधारणपणे ४ किमी. अंतरावरून ते एकमेकांशी संपर्क साधू शकतात. ते विविध प्रकारे एकमेकांशी संपर्क साधतात. उदा., हावभाव करणे, अंगविक्षेप करणे, आविर्भाव दाखविणे किंवा विशेष आवाज काढणे. ते गुरगुरण्याचे निरनिराळे आवाज काढतात. त्यांच्या प्रत्येक गुरगुरण्याला एक निश्चित अर्थ असतो. कधीकधी संपर्क साधण्यासाठी ते किंकाळी मारतात, कण्हतात, विव्हळतात किंवा आक्रोश करतात.
आशियाई हत्ती संध्याचर असतात. ते दिवसाला सु. १५० किग्रॅ. चारा खातात. त्यांच्या चाऱ्यात गवत, झाडाझुडपांचा पाला, मुळे, शेंगा इत्यादींचा समावेश असतो. दिवसातून ते एकदाच साधारणपणे ८०–२०० लि. पाणी पितात आणि नेहमी पाण्याच्या स्रोताजवळ वावरतात; आंघोळीसाठी त्यांना अधिक पाणी लागते.
हत्ती हा प्राणी अधिक बुद्धिमान समजला जातो. मानव, कपी आणि डॉल्फिन यांच्या काही जातींप्रमाणे हत्तीच्या मेंदूचे बाह्यांग मोठे असते. हत्तीची बोधनक्षमता विकसित झालेली असते. परिस्थितीनुसार ते त्यांच्या भावना जसे, शोक करणे, शिकणे, समूहातील लहान पिलांची काळजी घेणे, नक्कल करणे, खेळणे, नि:स्वार्थी असणे, वस्तूंचा वापर करणे, सहकार्य करणे, दया दाखविणे, गोष्टी लक्षात ठेवणे, स्मरण करणे आणि एकमेकांशी संवाद साधणे अशा अनेक क्रिया वर्तनातून प्रकट करतात.
आशियाई हत्तींच्या कळपात बहुतकरून माद्या आणि पिले एकत्र वावरतात. कळपात वयस्कर मादीच्या सूचना सर्वजण ऐकतात. एकमेकांना संदेश देण्यासाठी ते कमी कंप्रतेचा आवाज काढतात. कळपातील लहान नर पौगंडावस्था आली की, मातेपासून दूर राहतात. त्यामुळे प्रौढ नर त्यांच्या कळपापासून दूर असतात. नर हत्ती बहुधा एकेकटे राहतात.
आशियाई हत्तींचे नर-मादी दोघेही १०–१४ वर्षांपर्यंत प्रौढावस्थेत येतात. साधारणपणे नर वयाच्या १०–२० वर्षांपर्यंत दरवर्षी ठरावीक काळात माजावर येतात. त्यावेळी त्यांच्या शरीरात टेस्टोस्टेरोन संप्रेरकाची पातळी १०० पटीने वाढलेली असते. अशा काळात ते खूप आक्रमक होतात. नराच्या डोक्याच्या दोन्ही बाजूला डोळा व कान यांच्या दरम्यान गंडस्थळात शंख ग्रंथी असतात. संप्रेरकाची पातळी वाढल्यावर या ग्रंथी सुजतात व त्यांतून गडद, तेलकट व उग्र द्रव स्रवला जातो. या स्थितीत त्यांचे डोळे लालबुंद दिसतात, ते आक्रमक होतात, त्यांच्या कामभावना उत्तेजित होतात. काही वेळा मादींच्याही गंडस्थळातून असाच द्रव स्त्रवलेला दिसून येतो. गर्भावधी काल १८–२२ महिने असतो. मादी एकावेळी एकाच पिलाला जन्म देते. साधारणपणे १९ महिन्यांत पिलाची वाढ पूर्ण होते. परंतु, त्यानंतरही पिलू बराच काळ कळपात राहते. जन्माच्या वेळी पिलाचे वजन सु. १०० किग्रॅ. असते. जन्मल्यावर एका तासाने पिलू चालू लागते. सुरुवातीला ते आईच्या दुधावर राहते. ३–४ महिन्यांचे झाल्यावर ते गवत, इतर वनस्पती खाऊ लागते. ३ वर्षे मादी पिलाला दूध पिऊ देते. वन्य स्थितीत हत्ती सु. ६० वर्षे जगतात, तर पाळलेल्या अवस्थेत सु. ८० वर्षे जगतात. त्यांच्या उपदाढांचा शेवटचा म्हणजेच सहावा संच झिजून नष्ट होऊ लागला की, हत्तींची उपासमार होऊ लागते आणि हळूहळू ते मृत्युपंथाला लागतात.
आशियाई हत्ती लाजाळू असतात आणि शत्रूंवर हल्ला करण्यापेक्षा ते पळून जातात. परंतु, एकेकटे वावरणारे मोठे हत्ती जवळून जाणाऱ्या बेसावध व्यक्तींवर हल्ला करतात. काही वेळा रस्त्याच्या मधोमध उभे राहून ते वाट अडवतात. जेव्हा ते एखाद्या व्यक्तीला पकडतात तेव्हा त्या व्यक्तीला सोंडेने वेढून पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न करतात किंवा पकडलेल्या व्यक्तीला जमिनीवर पाडून सुळ्यांनी भोसकतात. माजाच्या काळात ते माणसांबरोबर तसेच अन्य प्राण्यांवर हल्ला करतात. एखाद्या प्राण्याने हत्तीवर हल्ला केल्यास तो त्या प्राण्याला तुडवून मारून टाकतो. पिलांसमवेत वावरणाऱ्या हत्तींच्या माद्या तर अधिक घातक असतात.
माणूस हा हत्तींचा सर्वांत मोठा शत्रू आहे. हत्तींच्या नैसर्गिक अधिवासावर माणसाने शेती, उद्योग, वसाहत यांसाठी आक्रमण केल्याने त्यांच्या अधिवासाचे क्षेत्र कमी झाले आहे. लोकसंख्येतील वाढ आणि नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास यांमुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. अधिवास नष्ट झाल्यामुळे किंवा विभागला गेल्यामुळे हत्ती आणि माणूस यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. त्यांच्यापासून मिळणारी किंमती त्वचा व सुळे (हस्तिदंत) मिळविण्यासाठी अजूनही हत्तींची शिकार केली जाते.
सु. ५ हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीत हत्तीला माणसाळविण्याचे प्रयत्न झाल्याचे पुरावे आढळून येतात. पाकिस्तानातील मोहें-जो-दडो व हडप्पा येथे केलेल्या उत्खननात या संस्कृतीमध्ये शंखजिऱ्याच्या दगडांवर हत्ती कोरले जात होते. युद्धात वेढा घालण्यासाठी, प्रतिष्ठेसाठी, ओझे वाहून नेण्यासाठी हत्तींचा उपयोग होत असे. म्यानमार देशात कचिन राज्यात कचिन इंडिपेंडन्स आर्मी अजूनही हत्तींचा वापर करतात. मागील काही शतकांत वन्य हत्तींना पकडून माणसाळविण्याचे प्रयत्न केलेले दिसतात. ते जड वस्तू सहज वाहून नेत असल्याने वनांमध्ये लाकडांची ओंडकी वाहून नेण्यासाठी त्यांचा वापर करतात.
१९८६ पासून इंटरनॅशनल युनियन फॉर कंझर्व्हेशन ऑफ नेचर (आययुसीएन) या संस्थेने ए. मॅक्झिमस जातीचा समावेश संकटग्रस्त प्राण्यांच्या यादीत केला आहे; कारण आधीच्या तीन पिढ्यांपासून त्यांची संख्या ५०% कमी झाल्याचे आढळले आहे. २००३ मध्ये त्यांची संख्या ४१,०००–५२,००० असावी, असा अंदाज आहे. सर्वच जातींच्या हत्तींचे संरक्षण व्हावे म्हणून जागतिक वन्य जीव निधीद्वारे १२ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक हत्ती दिवस’ म्हणून पाळला जातो. भारतात हत्तींच्या संवर्धनासाठी सिंहभूम (झारखंड), मयूरभंज (ओडिशा), निलगिरी (तमिळनाडू), पेरियार (केरला) इ. ठिकाणी गज प्रकल्प (प्रोजेक्ट एलिफंट) राबविण्यात आले आहेत.
आफ्रिकी हत्ती : आशियाई हत्ती आणि आफ्रिकी हत्ती दिसायला सारखे असले, तरी दोन्हींमध्ये शरीर, वर्तन इ. बाबतींत फरक दिसून येतात. आफ्रिकी हत्ती आकारमानाने आशियाई हत्तीपेक्षा मोठे असतात. आफ्रिकी नर हत्तीची खांद्याजवळ उंची सु. ३.२–४ मी. इतकी असून मादीची उंची २.२–२.६ मी. असते. त्वचा करड्या रंगाची असते. आफ्रिकी हत्तीचे नर-मादी दोघांनाही सुळे असून सुळे १.५–२.४ मी. लांब असतात. सुळे पुढच्या टोकाला वाकडे असून त्यांची वाढ आयुष्यभर होत राहते. डोक्याचा माथा सपाट असतो. सोंडेच्या टोकाला वर-खाली अशी दोन बोटांसारखी रचना असते. त्याद्वारे ते अन्न पकडतात आणि तोंडात घेतात.
आफ्रिकी हत्तींचे प्रौढ नर व माद्या बराच काळ वेगवेगळे राहतात. एका कुटुंबात फक्त माद्या व पिले असून कुटुंबात सरासरी दहा हत्ती असतात. कुटुंबाचे नेतृत्व वयस्क मादी करते. नर हत्ती प्रौढ झाल्यावर कुटुंबातून बाहेर पडतात. त्यांच्या समूहात एकाच क्षेत्रात राहणारी अनेक कुटुंबे व स्वतंत्र प्रौढ नर यांचा समावेश असतो. त्यांच्या समूहात काहीशेपासून हजारो हत्ती असतात. प्रत्येक समूह अन्नाच्या शोधात विशिष्ट क्षेत्रात भटकतात. अन्नाच्या शोधात त्यांना खूप अंतर भटकंती करावी लागते. गवत, जल वनस्पती, वृक्षांची पाने, मुळे, साली, फांद्या, फळे, झुडपे इत्यादी ते खातात. दिवसाला साधारणपणे सु. ४५० किग्रॅ. पाला ते खातात. त्यासाठी ते सोंडेने झाडांची पाने खुडतात, सुळ्यांनी कोवळ्या फांद्या तोडतात आणि मोठ्या प्रमाणावर झाडांची हानी करतात. आफ्रिकी हत्ती वयाच्या १०–१२ वर्षांपर्यंत प्रजननक्षम होतात. मादी साधारणपणे ३–६ वर्षांत एकाच पिलाला जन्म देते. ५० वर्षांच्या आयु:कालात ती साधारणपणे सात पिलांना जन्म देते. मादी आणि कळपातल्या इतर माद्या मिळून पिलांची काळजी घेतात.