बायबल हाती घेतले की, अभ्यासू वाचकांच्या नजरेसमोर दोन व्यक्तिमत्त्वे उभी राहतात; ती म्हणजे चार्ल्स डार्विन (१८०९–८२) आणि गॅलिली गॅलिलीओ (१५६४–१६४२). देवाने सहा दिवसांत विश्वाची निर्मिती केली, असे बायबलच्या ‘उत्पत्ती’ (Genesis) या पहिल्याच पुस्तकात पहिल्या व दुसऱ्या अध्यायांत नमूद केले आहे; तर चार्ल्स डार्विन सांगतात की, हे विश्व हळूहळू उत्क्रांत होत गेलेले आहे. बायबलमध्ये १९ व्या स्तोत्रात म्हटलेले आहे की, सूर्य आकाशाच्या एका टोकाला उगवतो आणि दुसऱ्या टोकाला मावळतो. तसेच १२० व्या स्तोत्रात सांगितले आहे की, पृथ्वी भक्कम खांबावर उभी असून ती स्थिर आहे; तर सूर्य स्थिर आहे व पृथ्वी फिरत आहे, असे गॅलिलीओंनी सिद्ध केले आहे.
वास्तविक बायबलमधील वचने आणि वैज्ञानिकांनी प्रयोगांती सिद्ध केलेली प्रमेये यांच्यात वाद होण्याचे कारण नव्हते; कारण ‘विज्ञान शिकवणे हे बायबलचे काम नाही, म्हणून विज्ञानविषयक समस्यांमध्ये बायबलची साक्ष काढू नये’ अशी शिकवण धर्मपंडित संत ऑगस्टीन (३५४–४३०) व संत थॉमस अक्वायनस (सु. १२२५–७४) यांनी देऊन ठेवली होती; परंतु धर्माचार्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे वाद झाले व अंती धर्माचीच हानी झाली. इ. स. १९७८ साली कोपर्निकस यांच्या पोलंड या देशातील कॅरॉल यूझेफ (जोसेफ) वॉयतिला हे पोप दुसरे जॉन पॉल हे नामाभिधान स्वीकारून पोपपदी विराजमान झाले. त्याच वर्षी म्हणजे १९७८ साली थोर शास्त्रज्ञ ॲल्बर्ट आइन्स्टाइन यांची जन्मशताब्दी होती. त्यानिमित्त आयोजित केलेल्या समारंभात पोप दुसरे जॉन पॉल म्हणाले, “गॅलिलीओंचे मोठेपण सर्वांनी मान्य केले आहे; परंतु चर्चने त्यांना खूप त्रास दिला आहे, ही गोष्ट नाकारता येत नाही”. गॅलिलीओ प्रकरणी धर्ममंडळाने चूक केली होती. ती दुरुस्त करणे आवश्यक होते. ३१ ऑगस्ट १९८१ रोजी पोप दुसरे जॉन पॉल यांनी व्हॅटिकनमधील उच्चपदस्थ फ्रेंच कार्डिनल पोपार्द यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि गॅलिलीओ प्रकरणाचा समग्र अभ्यास करण्याचा आदेश दिला. धर्मशास्त्र, बायबल, विज्ञान, इतिहास आणि कायदा अशा पाच बाजूंनी या प्रकरणाचा सांगोपांग अभ्यास झाला. समितीने ११ वर्षे मेहनतीने संशोधन केले.
इसवी सन १९९२ मध्ये गॅलिलीओंच्या मृत्यूला ३५० वर्षे पुरी झाली. त्याच वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी व्हॅटिकनचे उच्चाधिकारी, धर्मपंडित, विविध देशांचे राजदूत यांच्या उपस्थितीत कार्डिनल पोपार्द यांनी आपला अहवाल पोप दुसरे जॉन पॉल यांना सादर केला.
गॅलिलीओ प्रकरणाचा आढावा घेताना कार्डिनल पोपार्द म्हणाले, “गॅलिलीओंच्या काळी कार्डिनल बेल्लार्मीन यांनी सावध भूमिका घेतली होती. त्या वेळी ‘विज्ञानाचे स्पष्ट संशोधन आणि धर्मग्रंथातील वचने यांच्या संघर्षामुळे जे संशोधन पुढे आले आहे, ते खोटे आहे, असे न मानता ते आम्हाला समजत नाही, अशी भूमिका घ्यावी’ असे बेल्लार्मीन यांनी सूचवले होते. गॅलिलीओंचे परीक्षक याच ठिकाणी कमी पडले. धर्माची शिकवण आणि परंपरागत विश्वोत्पत्तिशास्त्र यांच्यात त्यांना फरक करता आला नाही. कोपर्निकस यांच्या क्रांतिकारक शिकवणीचा स्वीकार करणे म्हणजे पारंपरिक धर्मश्रद्धेला आव्हान देण्यासारखे आहे, असे त्या समितीला वाटले, म्हणून त्यांनी त्यांच्या शिकवणीवर बंदी घातली. ही त्यांची फार गंभीर चूक होती. त्यांची चूक आज आपल्याला सहज जाणवते. त्यांनी गॅलिलीओंना दोषी ठरवले आणि त्यामुळे त्यांना फार मनस्ताप झाला”.
त्यानंतर पोप दुसरे जॉन पॉल यांच्याकडे वळून कार्डिनल पोपार्द म्हणाले, “पोप महोदय, तुम्ही सांगितल्याप्रमाणे या चुकीची स्पष्ट कबुली देणे आवश्यक आहे”. पोपनी कार्डिनल पोपार्द यांचे म्हणणे मान्य केले. ते म्हणाले, “कोपर्निकस यांच्या संशोधनामुळे धर्म आणि विज्ञान या दोन्ही क्षेत्रांपुढे फार मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. धर्माने आणि विज्ञानाने आपल्या बलस्थानांची आणि दुर्बलस्थानांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. गॅलिलीओ हे प्रामाणिक श्रद्धावंत होते. धर्मवचनांचा अन्वयार्थ लावणाऱ्या पंडितांपेक्षा गॅलिलीओंच्या विज्ञानविषयक जाणीवांच्या कक्षा अधिक व्यापक होत्या. आधुनिक ज्ञानशाखांच्या घोडदौडीची जाण धर्मपंडितांनी ठेवणे अत्यावश्यक आहे. गरज भासली, तर या ज्ञानाच्या प्रकाशात त्यांना धर्मशिकवणीत यथार्थ बदल करता येतील. प्रत्येक शास्त्राच्या अभ्यासाच्या पद्धती स्वतंत्र असतात. सर्व ग्रहगोल पृथ्वीभोवती फिरत आहेत, असे त्या काळच्या धर्मपंडितांना वाटत होते. धर्मवचनांचा शब्दश: अर्थ लावल्यामुळे त्यांच्याकडून हा प्रमाद घडला. भौतिक विज्ञान हा बायबलच्या अखत्यारीतील विषय मुळीच नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे”.
पोप पुढे म्हणाले, “चर्च या जगात कार्यरत आहे आणि विज्ञानही प्रगतिपथावर आहे. भविष्यकाळात इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी धर्म आणि विज्ञान यांना आपापल्या मर्यादांची आणि क्षमतांची कल्पना असणे आवश्यक आहे. वैज्ञानिक पद्धतीचा (Scientific Method) आज विकास झाला आहे. या मापनसूत्राच्या प्रकाशात इतिहास, साहित्य, धर्मग्रंथ, तत्त्वज्ञान आणि अध्यात्म या ज्ञानशाखांचे पुनर्मूल्यांकन झाले पाहिजे. तसेच गेल्या काही शतकांच्या घडामोडींचे विज्ञानानेदेखील डोळसपणे निरीक्षण केले पाहिजे. विज्ञानाला तत्त्वज्ञांची आणि तत्त्वज्ञानाला वैज्ञानिकांची गरज आहे. विज्ञानापासून आपणास फटकून राहता येत नाही, ही गोष्ट गॅलिलीओ प्रकरणाच्या निमित्ताने धर्म शिकला आहे. खऱ्या ज्ञानासाठी धर्माने आपले दरवाजे सतत उघडे ठेवले पाहिजेत. विज्ञानाची करुणेपासून फारकत झाली, तर विज्ञान विनाशकारी होऊ शकते. म्हणून विज्ञानानेही धर्माकडून शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे”.
पोप शेवटी म्हणाले, “गतकालात गॅलिलीओ प्रकरणाचे मिथकमध्ये रूपांतर झाले. त्यानुसार विज्ञान आणि (ख्रिस्ती) धर्म यांच्यात वैर आहे, अशी काही शास्त्रज्ञांचीही समजूत झाली आहे; परंतु ते खरे नाही, हे आज दिसून आले आहे”.
सोळाव्या शतकापर्यंत बायबलचा शब्दश: अर्थ लावण्याची पद्धत चर्चमध्ये सुरू होती. सोळाव्या शतकापासून बायबलच्या चिकित्सक अभ्यासाला गती मिळत गेली. अन्वयार्थशास्त्र (Hermeneutics) आणि शैलीसमीक्षाशास्त्र (Form Criticism) या दोन अभ्यासपद्धती विकसित झाल्या. अन्वयार्थशास्त्राच्या आधारे शब्दार्थांच्या पलीकडे जाऊन वचनांचा अर्थ लावला जातो. उदा., देवाने सृष्टीची निर्मिती सहा दिवसांत केली, असे बायबलच्या पहिल्या पुस्तकात म्हटले आहे. या विधानातील वाच्यार्थाच्या पलीकडे जाऊन लाक्षणिक अर्थ शोधला जातो. तो अर्थ असा आहे की, ही सृष्टी आपोआप निर्माण झाली नसून तिच्यामागे कर्ता आहे; तो देव आहे.
शैलीसमीक्षाशास्त्राच्या मदतीने धर्मग्रंथातील मूळ वचनांचा स्थळ, काळ आणि संदर्भ निश्चित केला जातो. उदा., संत मार्क यांनी चौथ्या अध्यायात पेरणाऱ्याचा दृष्टान्त सांगितला आहे. त्या दृष्टान्ताचे दोन स्पष्ट भाग आहेत. पहिल्या भागात (४ : १–९) येशू ख्रिस्त यांनी सांगितलेला दृष्टान्त, तर दुसऱ्या भागात (४ : १०–२०) त्या दृष्टान्तावर केलेले भाष्य आहे. शुभवर्तमानाचे प्रत्यक्ष लेखन झाले, तेव्हा ते भाष्य जोडले गेले असावे. अन्वयार्थशास्त्र आणि शैलीसमीक्षाशास्त्र या अभ्यासपद्धतींचा वापर करून आज पंडित बायबलच्या वचनांचा अर्थ लावून स्पष्टीकरण देत आहेत.
बायबलच्या ‘उत्पत्ती’ या पहिल्या पुस्तकातील पहिल्या अकरा अध्यायांत (आदिपर्व) आदिमानव आदाम आणि एवा यांची निर्मिती, त्यांचे अध:पतन, त्यांना झालेले शासन, त्यांच्या मुलांमधील वैरभाव, देवदूतांचे दुराचरण, जलप्रलय, नोहाची नौका, बेबलचा बुरुज आदी कथा आहेत. विश्वाची आणि मानवाची निर्मिती कशी झाली, जगात पाप कसे संचारले, हे बायबलच्या लेखकांनी कथारूपाने सांगितले आहे. सोळाव्या शतकापर्यंत या कथांचा शब्दश: अर्थ घेतला जात होता. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात बायबलच्या चिकित्सक अभ्यासाला सुरुवात झाली आणि बायबलमधील पहिल्या अकरा अध्यायांतील मजकुराचा शब्दश: अर्थ लावता येणार नाही, याची जाणीव विद्वानांना झाली. उदा., देवाने मातीचा बाहुला केला, त्यात प्राण फुंकला आणि आदामची निर्मिती झाली, देवाने आदामच्या फासळीपासून स्त्रीची निर्मिती केली किंवा देवाने सहा दिवसांत विश्वाची निर्मिती केली इत्यादी. ही रूपकांची भाषा आहे.
बायबलमधील आदिपर्वातील या कथा ख्रिस्तपूर्व हजार-पंधराशे वर्षांपासून प्रचलित होत्या. साक्षात्कारी व्यक्तींनी त्या कथन केल्या. ती आध्यात्मिक वृत्तीची माणसे होती; परंतु इतिहास, भूगोल, विश्वरचना, वैद्यकशास्त्र, जीवशास्त्र आदींविषयक त्यांचे ज्ञान अतिशय मर्यादित होते. त्यांना श्रेष्ठ आध्यात्मिक सत्य सांगायचे होते. त्यासाठी त्यांनी वापरलेला आकृतिबंध वर्णनात्मक होता. या कथांचा मर्मभेद करून त्यांत दडलेल्या दैवी संदेशाचा वेध घेण्याचा प्रयत्न अभ्यासक करीत आहेत.
मार्टिन ल्यूथर (१४८३–१५४६) आणि जॉन कॅल्व्हिन (१५०९–६४) हे प्रॉटेस्टंट चळवळीचे अध्वर्यू होते. बायबलच्या वचनांचा रूपकात्मक अर्थ न लावता त्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा अभ्यास केला जावा, अशी भूमिका या प्रॉटेस्टंट पंडितांनी घेतली. त्यावर प्रतिक्रिया म्हणून कॅथलिक पंडितांनी वचनांचा आध्यात्मिक अर्थ लावण्याचा आग्रह धरला. रिचर्ड सायमन (१६३८–१७१२) या कॅथलिक पंडितांनी शब्दचिकित्सापद्धतीचा अवलंब केला. आधुनिक बायबल टीकाकारांपैकी ते एक होते. उत्पत्ती (Genesis), निर्गम (Exodus), लेवीय (Leviticus), गणना (Numbers) व अनुवाद (Deuteronomy) हे पाच ग्रंथ मोझेस यांनी एकटाकी लिहिले आहेत, असे तोपर्यंत समजले जात होते. सायमन यांनी चिकित्सक पद्धतीचा अवलंब करून सिद्ध केले की, या पाच ग्रंथांच्या निर्मितीमागे मोझेस यांच्याबरोर इतरांचेही हात आहेत. हे मूलगामी संशोधन होते. त्यामुळे बायबलच्या शास्त्रीय अभ्यासाला प्रोत्साहन मिळत गेले.
जे. डी. मिकाएलस (१७१७–९१) स्वत: बुद्धिप्रामाण्यवादी होते. त्यांना बायबलचा आध्यात्मिक (Theological) अर्थ मान्य होता. तरीही भाषाशास्त्र, इतिहास, भूगोल आणि पुराणवस्तुशास्त्र या शास्त्रांचा आधार घेऊन त्यांनी बायबलचे भाषांतर केले.
त्यानंतर झां ॲस्ट्रूक (१६८४–१७६६) यांनी ऐतिहासिक-टीकात्मक (Historical Critical) या पद्धतीचा अवलंब करून १७५३ साली कंजेक्चर्स नावाचा ग्रंथ लिहिला. बायबलचा चिकित्सक अभ्यास करताना त्यांना आढळून आले की, बायबलच्या पहिल्या पाच पुस्तकांत दोन प्रकारच्या लेखनस्रोतांची सरमिसळ झाली आहे. त्यांच्यानंतर जे. एस. झेमलर (१७२१५–९१) आणि योहान गेओर्ग हामान (१७३०–८८) यांनीही ऐतिहासिक-टीकात्मक पद्धतीचा वापर करून मौलिक संशोधन केले. या अभ्यासपद्धतीमुळे बायबलच्या संहितेची पूर्वपीठिका, मूळ लेखकाला अभिप्रेत असलेला अर्थ, मजकुरात घुसलेला प्रक्षिप्त भाग, मजकुराचे निरनिराळे स्रोत यांचा पडताळा घेण्यास मदत झाली आहे. उदा., बायबलच्या उत्पत्ती या पहिल्या पुस्तकातील पहिले अकरा अध्याय हे कथनात्मक (Mythopoeic) स्वरूपाचे आहेत, हे सिद्ध झाले आहे.
मिथककथा म्हणजे भाकडकथा असे पूर्वी समीकरण केले जात असे; परंतु आज तसे मानले जात नाही, तर मिथककथा हाही सत्य सांगण्यासाठी वापरलेला साहित्याचा एक आकृतिबंध आहे, ही गोष्ट आता सर्वमान्य झाली आहे. मिथकाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली जाते : “जी मूलभूत प्रतीके मानवी अस्तित्वासाठी आवश्यक आणि नमुनात्मक आहेत, त्यांच्यासंबंधीची वर्णने (कथा) म्हणजे मिथक होय”. मिथककथांमध्ये मूलभूत मानवी प्रतीकांवर प्रकाश टाकलेला असतो. विज्ञानपूर्व आणि तत्त्वज्ञानपूर्व काळांत मिथक हे सत्य प्रकट करण्याचे एक प्रभावी माध्यम होते. मानवी जीवनासंबंधीची काही सत्ये प्रतीकांच्या रूपाने त्यांतून व्यक्त केली गेली आहेत.
बायबलचा (आणि सर्वच धर्मग्रंथांचा) अभ्यास करताना तत्कालीन लेखकांच्या विश्वरचनाशास्त्राच्या (Cosmology) ज्ञानाची माहिती करून घेणे आवश्यक आहे. वर अंतराळ, मध्ये पृथ्वी आणि पृथ्वीच्या खाली अधोलोक (हिब्रू भाषेत शिओल) अशा प्रकारची तीन मजल्यांची (Tier) विश्वरचना त्या काळी गृहीत धरलेली होती. पृथ्वी हा ग्रह अवकाशात अधांतरी आहे, हे ज्ञान बायबलच्या तत्कालीन लेखकांना नव्हते. सूर्य उगवत आणि मावळत असलेला ते पाहात होते. त्यामुळे सूर्य फिरतो आणि पृथ्वी स्थिर आहे, अशी सर्वांची समजूत होती. ‘जुन्या करारा’तील लेखकांच्या समजुतीनुसार पृथ्वी अचल अशा खांबांवर स्थिर होती. पृथ्वीच्या वर घुमटाकार आकाश असून त्या घुमटात चंद्र, सूर्य, तारे हे टांगलेले आहेत. घुमटाच्या वर जलाशय आहे. त्याची दारे अधूनमधून खुली होऊन पाऊस पडतो. त्या जलाशयाच्या वर पलीकडे देवाचे वसतिस्थान आहे. तिथे देव आसनावर आरूढ झालेला असून त्याच्यासमोर देवदूतांचा दरबार भरलेला असतो. देव स्वर्गातून पृथ्वीवर लक्ष ठेवतो. पृथ्वीच्या खाली अधोलोक आहे. मृत्यूनंतर सज्जन स्वर्गात आणि दुर्जन अधोलोकात जातात. तसेच पृथ्वीच्या पोटात जलाशय आहे. त्यातून झरे उसळी मारून वर येतात आणि ते वनस्पतींचे पोषण करतात, अशी समजूत होती.
मात्र आज विश्वासंबंधीचे ज्ञान खूप प्रगत झाले आहे. विज्ञानाने विश्वाच्या अनेक गुढांची उकल केली आहे; करत आहे. त्यामुळे बायबलमधील प्राचीन लेखनाचा अर्थ लावताना सावधानता बाळगली पाहिजे, याबद्दल बहुसंख्य विद्वानांत एकमत झाले आहे (तरीही शब्दश: अर्थ लावणारे मूठभर सनातनी अजूनही आहेत). बायबलचे थोर अभ्यासक फादर रेमंड ब्राऊन सांगतात, “त्यांच्या (बायबलमधील पुस्तकांच्या) लेखकांनी विश्वनिर्मिती आणि मानवनिर्मिती यांसंबंधी केलेले लेखन रूपकात्मक आहे, म्हणून कोणी त्याचा शब्दश: अर्थ लावू नये किंवा त्या लेखनाचा आधार घेऊन उत्क्रांतिविरोधी भूमिका घेऊ नये; कारण त्या लेखकांचे विश्वरचनाशास्त्राचे ज्ञान इतके रूपकात्मक होते की, उत्क्रांतिवादी आणि उत्क्रांतिविरोधक यांना ते सारखेच गोंधळात टाकणारे होते”.
ऐतिहासिक-टीकात्मक पद्धतीप्रमाणे अभ्यास केल्यावर ‘उत्पत्ती’च्या पुस्तकातील काही बाबींचा खालीलप्रमाणे अर्थ लावला जातो :
- देवाने सर्व चराचराची हेतुपूर्वक निर्मिती केली आहे (निर्मितीच्या कथा).
- देवाने मानवाला स्त्री आणि पुरुष असे निर्माण केले आहे व ते दोघे समान असून एकमेकांना पूरक आहेत. कुणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. तसेच पती-पत्नीचे नाते पवित्र असून परस्परनिष्ठा हा या नात्याचा स्थायिभाव आहे (मानवाची निर्मिती).
- माणूस मूलत: चांगला आहे; परंतु देवाच्या इच्छेचा भंग केल्यामुळे मानवी स्वभाव जखमी झाला आहे, म्हणून माणसाची दुष्टपणाकडे प्रवृत्ती होते (मानवाचे पतन).
- देवाने मानवाला स्वतंत्र इच्छेचे वरदान आणि निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. आपल्या कृत्याला माणूस स्वत: जबाबदार असतो. चांगले निर्णय घेतले, तर आनंद मिळतो; चुकीचे निर्णय घेतले, तर त्याची शिक्षा भोगावी लागते (मानवाला शासन).
- देवाने मानवाला निसर्गाचा विश्वस्त नेमला आहे. सृष्टीची काळजी घेणे, तिची मशागत करणे हे त्याचे कर्तव्य आहे (निसर्गरक्षण).
- देव जीवनाचा दाता आहे, म्हणून मानवाची हत्या करणे हे महान पाप आहे (एबलचा खून).
- अनीतीमुळे अराजक निर्माण होते. परिणामत: निसर्गाचे संतुलन बिघडते. देवाचे मानवावर अपरंपार आणि निर्व्याज असे प्रेम आहे. तो त्याला विपत्तीतून वाचवतो (नोहाची नौका).
संदर्भ :
- Barker, Kenneth L., Ed., The NIV Study Bible, Michigan, 1984.
- Brown, Raymond; Fitzmyer, Joseph; Murphy, Roland, Eds., The New Jerome Biblical Commentary, Minnesota, 1971.
- दिब्रिटो, फादर फ्रान्सिस, पोप दुसरे जॉन पॉल : जीवनगाथा, पुणे,
- पवित्र शास्त्र अध्ययन, बायबल सोसायटी ऑफ इंडिया, बंगळुरू, २००८.
समीक्षक : फ्रान्सिस कोरिया