फ्रान्समधील एक प्रसिद्ध गुहा. प्रागैतिहासिक काळात समुद्राची पातळी आजच्यापेक्षा बरीच खाली असताना मानवाने वसती केली होती, त्याचे अवशेष आता पाण्यात बुडलेले आहेत. अधोजल प्रागैतिहासिक पुरातत्त्वामध्ये अशा पाण्यात बुडलेल्या गुहांमधील अवशेषांचाही अभ्यास केला जातो. त्यात फ्रान्सच्या मार्सेयच्या किनाऱ्याजवळ असलेल्या कॉस्के गुहेच्या (Cosquer Cave) संशोधनाला विशेष महत्त्वाचे स्थान आहे.
जगभरात मेक्सिको, फिलिपीन्स, बेल्जियम, इटली व फ्रान्स यांच्या किनारी भागात पाण्यात बुडलेल्या अनेक गुहा आहेत. फ्रान्स ते बेल्जियम या टापूत पुराश्मयुग ते नवाश्मयुगातील अवशेष असलेल्या पाण्याखालील १८० गुहांचा शोध लागला असला, तरी कॉस्के गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रागैतिहासिक मानवांनी काढलेली चित्रे आणि तळहातांचे ठसे असलेली जगातील ही समुद्राच्या पाण्याखाली असलेली एकमेव गुहा आहे. या गुहेचा शोध १९८५ मध्ये हेन्री कॉस्के या पाणबुड्याने लावला. या गुहेचे तोंड समुद्राच्या सध्याच्या पातळीच्या ३४ मी. खाली आहे. १९९१ मध्ये गुहेत शिरलेल्या तीन पाणबुड्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा शोध घेत असताना गुहेतील चित्रे सापडली.
कॉस्के गुहेच्या मुखातून शिरल्यानंतर मोठी पोकळी आहे. त्याच्या आत गुहेची मुख्य पोकळी आहे. या दोन पोकळ्यांना जोडणारा ११८ मी. लांबीचा बोगदा आहे. गुहेचा वरचा काही भाग पाण्यात बुडालेला नसल्याने वरच्या भागातील चित्रे व कोरीव आकृती टिकून आहेत. गुहेत काजळी व कोळसा वापरून काढलेली प्राण्यांची चित्रे (१७७) असून त्यात बायसन, रानबैल, रानटी बोकड (आयबेक्स), घोडे, सील, हरिण व मार्जार कुळातील प्राणी यांचा समावेश आहे. तसेच कोरलेल्या काही भौमितिक आकृती (२१६) आहेत. या पोकळीत जवळजवळ सर्व भिंतींवर मिळून मानवी तळहातांचे ६५ ठसे आढळले आहेत. ते काळ्या आणि लाल रंगांचे असून त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे काही ठशांमध्ये पाचपेक्षा कमी बोटे उमटली आहेत. काही बोटे मुद्दाम वळवून असे केलेले आहे. तळहाताच्या काही ठशांवर ठिपके व छोट्या उभ्या रेषा कोरलेल्या दिसल्या.
प्राण्यांची चित्रे आणि मानवी हातांचे ठसे यांचे कालखंड वेगवेगळे आहेत. बायसनचे चित्र, हाताचा एक ठसा आणि गोलाचे चिन्ह यांचा काळ आजपूर्व २८००० ते २७००० असा आहे. हाताचा एक ठसा आणि घोड्याचे चित्र हे आजपासून २५००० वर्षांपूर्वीचे आहे, तर प्राण्यांची इतर सर्व चित्रे आणि ताऱ्याप्रमाणे भासणारे एक चिन्ह हे आजपूर्व १९७०० ते १८५०० या काळातले आहे.
संदर्भ :
- Clottes, J., Beltran, A.; Courtin, J. & Collina-Girard, J. The Cosquer Cave, Marseilles, France, The Archaeology of Underwater Caves (Ed., Campbell, P. B.), pp. 105-118, Highfield Press, Southmpton, 2017.
- Clottes, J.; Beltran, A.; Courtin, J. & LucVanrell, ‘The Cave Paintings of Cosquer Caveʼ, http://www.bradshawfoundation.com/cosquer/
- Collina-Girard, J. ‘Prehistory and Coastal Karst Area: Cosquer Cave and the “Calanques” of Marseilleʼ, Speleogenesis and Evolution of Karst Aquifers, 2(2): 1-13, 2004.
लेखक : प्रमोद जोगळेकर
समीक्षक : शरद राजगुरू