क्लार्क, डेव्हिड लिओनार्ड : (३ नोव्हेंबर १९३७ – २७ जून १९७६). नवपुरातत्त्व विचारधारेचे अग्रणी ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म इंग्लंडमधील केंट काउंटी येथे  झाला. लंडनच्या डलविच कॉलेजात शिक्षण घेतल्यावर त्यांनी दोन वर्षे लष्करात अनिवार्य सेवा बजावली. रॉयल सिग्नल्स कॉर्प्स या विभागात त्यांची नेमणूक जर्मनीतील एसेन येथे झाली होती. लष्करातील सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला (१९५४) आणि पीटरहाउस कॉलेजमधून पुरातत्त्व व मानवशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीत पदवी प्राप्त केली (१९५७). लगेचच त्यांनी विख्यात ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ ग्रॅहम क्लार्क यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. साठी संशोधन सुरू केले. ब्रिटिश बेटांमधील बिकर प्रकारची मातीची भांडी हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता.

क्लार्क यांनी प्रबंध पूर्ण केल्यावर (१९६४) त्यांची विल्यम स्टोन रिसर्च फेलोशिप (संशोधन छात्रवृत्ती) वर नियुक्ती झाली. दोन वर्षांनंतर ते पीटरहाउस कॉलेजचे फेलो तसेच पुरातत्त्व आणि मानवशास्त्र विभागाचे  संचालक म्हणून निवडले गेले. या पदावर असताना त्यांनी आपल्या प्रबंधावरचे बिकर पॉटरी इन ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंड (१९७०) हे पुस्तक तयार केले. तसेच पुरातत्त्व म्हणजे काय आणि त्याचे स्वरूप काय असावे, याचा ते अभ्यास करत होते.

अनेक विषयांमधील संशोधनपद्धती आणि सिद्धांतांचा सखोल मागोवा घेतल्यावर क्लार्क यांनी भूतकाळाबद्दल विचार करण्याचा आणि त्या काळातील मानवी संस्कृतीचे विविध पैलू शोधण्याचा एक नवीन मार्ग तयार करण्यास सुरुवात केली. हा नवा विचार त्यांनी ॲनॅलिटिकल आर्किऑलॉजी (१९६८) या पुस्तकात मांडला. त्यात त्यांनी असा युक्तिवाद केला की, पुरातत्त्वाने सिद्धांतावर आधारित अशा स्वतःच्या स्पष्ट पद्धती आणि प्रणाली विकसित करून एक विज्ञान बनले पाहिजे. हे कदाचित १९६०-७० च्या दशकात ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेले पुरातत्त्वातील सर्वांत महत्त्वाचे पुस्तक होते. लुईस बिनफर्ड यांनी अमेरिकेत सूचविलेला पुरातत्त्वीय संशोधनाचा नवपुरातत्त्व हा नवीन प्रवाह यूरोपमध्ये निर्माण होण्यात हे पुस्तक पहिले पाऊल ठरले. या पुस्तकातील क्लार्क यांच्या लेखनाने यूरोपीय पुरातत्त्व व मानवशास्त्रात खळबळ उडाली. केंब्रिज विद्यापीठातील क्लार्क यांच्या अनेक सहकाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पना उचलून धरल्या. क्लार्क यांच्या विचारांमधील विश्लेषण, निष्कर्षांसाठी वैज्ञानिक पद्धत आणि संख्याशास्त्र वापरण्याचा त्यांचा आग्रह त्यांच्या मॉडेल्स इन आर्किऑलॉजी (१९७२) या संपादित पुस्तकात स्पष्ट दिसून येतो; तथापि पुरातत्त्वाकडे विज्ञान म्हणून बघावे, या त्यांच्या प्रतिपादनामुळे पुरातत्त्वीय सिद्धांताच्या क्षेत्रात मोठे वादविवाद झाले. विशेषतः आर्किऑलॉजीः द लॉस ऑफ इनोसन्स (१९७३) या अँटिक्विटी नियतकालिकातील लेखाने पारंपरिक मताच्या पुरातत्त्वज्ञांकडून त्यांच्यावर जोरदार टीका झाली; तथापि या लेखामुळे त्यांच्या कल्पना जगभरात पसरल्या.

क्लार्क यांना त्यांच्या प्रक्रियावादी व विश्लेषक विचारांमुळे जगभरात मान्यता मिळत असली आणि ते विद्यार्थ्यांचे आवडते असले, तरी केंब्रिज विद्यापीठातील तत्कालीन प्रशासन व त्यांच्यामध्ये कधीच चांगले संबंध निर्माण झाले नाहीत. सन १९७४ मध्ये क्लार्क यांना केंब्रिज विद्यापीठात डिस्ने चेअर ऑफ आर्किऑलॉजी देण्यात येईल अशी अपेक्षा असताना त्या जागी वेल्श पुरातत्त्वज्ञ ग्लिन डॅनियल यांची निवड करण्यात आली. क्लार्कना १९७६ मध्ये साहाय्यक व्याख्याता हे अगदी कमी महत्त्वाचे अस्थायी पद देण्यात आले. परंतु त्याच वर्षी त्यांची प्रकृती बिघडली आणि तरुणपणीच त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून त्यांच्या लेखांचा संग्रह प्रकाशित केला (१९७९).

संदर्भ :

  • Guidi, Alessandro, “Clarke in Mediterranean Archaeology: David Clarke’s ‘Archaeology: The Loss of Innocence’ (1973) 25 Years After”, Antiquity, 72 (277): 678-680, 1998.
  • Hammond, Norman; Isaac, Glyn; Chapman, Robert; Sherratt, Andrew & Shennan, Stephen, Analytical Archaeologist: Collected Papers of David L. Clarke, Academic Press, Boston, 1979.
  • https://www.oxfordreference.com/view/10.1093/oi/authority.20110803095615314

                                                                                                                                                                              समीक्षक : जयेंद्र जोगळेकर