सिरिएशन याचा अर्थ क्रमनिर्धारण अथवा कोणत्याही एखाद्या निश्चित गुणधर्माचा वापर करून वस्तूंची विशिष्ट क्रमाने मांडणी करणे. या तंत्राचा उपयोग कालमापनासाठी करण्यात येतो. पुरातत्त्वविद्येच्या प्रारंभिक काळात सिरिएशन ही सापेक्ष कालमापनाची एक पद्धत म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरली जात होती [पुरातत्त्वीय कालमापन]. विशेषतः आधुनिक काळातील रेडिओकार्बन कालमापनासारख्या अचूक पद्धती उपलब्ध होण्याआधी पुरातत्त्वज्ञ एखाद्या उत्खननात मिळालेले पुरावशेष कोणत्या काळातील होते हे कसे ठरवत असत, हे आताच्या विद्यार्थ्यांना कळणे अवघड जाते. या आधुनिक पद्धतींच्या तुलनेत त्यांना सिरिएशनसारख्या सापेक्ष कालमापन पद्धती ढोबळ आणि सदोष वाटू शकतात. परंतु पुरातत्त्वविद्येच्या वाटचालीत या पद्धतीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच इतर निरपेक्ष पद्धती तुलनेने खर्चिक असल्याने अजूनही सिरिएशनसारख्या सापेक्ष कालमापन पद्धती वापरात आहेत.

सिरिएशन म्हणजे एखाद्या उत्खननात मिळालेल्या पुरावशेषांची पूर्वनिर्धारित लक्षणांनुसार क्रमाने वर्गवारी करणे. समजा एखाद्या उत्खननात अथवा सर्वेक्षणात पुरातत्त्वीय स्थळावर दगडाची अवजारे मिळाली आहेत. या अवजारांच्या विशिष्ट लक्षणानुसार आपण त्यांचे ‘अʼ, ‘आʼ, ‘इʼ आणि ‘ईʼ असे चार प्रकारांत वर्गीकरण करू शकतो व त्यांच्यात हा क्रम आहे, असे म्हणू शकतो. परंतु निव्वळ क्रमवार वर्गीकरण केल्याने ‘अʼ वर्गातील अवजारे ही सर्वांत जुनी आणि ‘ईʼ वर्गातील अवजारे अलीकडच्या काळातील, असे मात्र म्हणता येत नाही; तथापि त्या विशिष्ट सांस्कृतिक काळासाठी असे निरीक्षण अगोदर एखाद्या उत्खननात नोंदवलेले असल्यास त्याचा वापर करून आपण नवीन पुरातत्त्वीय स्थळावर मिळालेल्या अवजारांच्या क्रमबद्ध विश्लेषणाने कालमापन करू शकतो. अशाच प्रकारे विशिष्ट सांस्कृतिक संदर्भात मातीच्या भांड्यांच्या प्रकारात काळानुसार फरक पडत असल्याचे लक्षात घेतले जाते आणि या प्रकारांचा कालक्रम ठरवला जातो. हा कालक्रम निश्चित केला की, नंतर तशाच सांस्कृतिक स्थळावर तेथील स्तरांचे तौलनिक कालमापन करता येते. सिरिएशनसाठी मातीच्या भांड्यांचे आकार-प्रकार, बांधणीच्या शैली, दगडी अवजारांचे प्रकार, नाणी अशा कोणत्याही कालसापेक्ष बदलणाऱ्या पुरावशेषांचा वापर करता येतो. ही पद्धत तौलनिक असल्याने पुरातत्त्वीय स्तरांची फक्त एकमेकांसापेक्ष कालनिश्चिती करता येते. तसेच ही पद्धत ठरावीक सांस्कृतिक संदर्भातच उपयोगी पडते.

सिरिएशनचे दोन प्रकार असून विसाव्या शतकाच्या आधी ब्रिटनमध्ये प्रचलित असलेल्या पद्धतीला कंटेक्शुअल सिरिएशन (Contextual Seriation) असे म्हणतात. सर आर्थर जॉन इव्हान्स (१८५१–१९४१) यांनी ब्रिटनमधील रोमन सुवर्णनाण्यांचा उपयोग सिरिएशनसाठी केला होता. त्याचप्रमाणे सर विल्यम फ्लिंडर्स पिट्री (१८५३–१९४२) यांनी इजिप्तमधील ४००० राजघराणीपूर्व (Pre-dynastic) दफनांचा काळ ठरवण्यासाठी सिरिएशन तंत्र यशस्वीपणे वापरले होते.

विसाव्या शतकाच्या प्रारंभी अमेरिकेत विकसित झालेल्या पद्धतीला वारंवारता सिरिएशन (Frequency Seriation) असे नाव आहे. आल्फ्रेड क्रोबर (१८७६–१९६०) या अमेरिकन मानवशास्त्रज्ञांनी १९१५ मध्ये न्यू मेक्सिकोतील झुनी प्युब्लो (Zuni Pueblo) व इतर स्थळांवर मिळालेल्या मातीच्या भांड्यांचा अभ्यास करताना वारंवारता सिरिएशन तंत्राचा सर्वप्रथम यशस्वीपणे वापर केला.

सिरिएशनचे तंत्र आजही पुरातत्त्वात वापरले जाते आणि आता त्यासाठी संगणकांचा व संख्याशास्त्रातील संगती विश्लेषण (Correspondence Analysis) अशा पद्धतींचा उपयोग केला जातो.

संदर्भ :

  • Lock, Gary, Using Computers in Archaeology: towards virtual pasts, Routledge, London, 2003.
  • Michels, J. W. Dating methods in archaeology, Seminar Press, New York, 1973.
  • O’Brien, Michael J. & Lee Lyman R. Seriation, Stratigraphy and Index Fossils: The Backbone of Archaeological Dating, Plenum Press, New York, 1999.
  • O’Brien, Michael J. ‘Chronological Systemsʼ, Encyclopedia of Global Archaeology (Ed., Claire Smith), pp. 2365-2375, Springer, 2020.
  • Renfrew, C. & Bahn, P.  Archaeology: Theories, Methods and Practice, Thames and Hudson, London, 1996.

                                                                                                                                                                                             समीक्षक : शंतनू वैद्य