पुरातत्त्वविद्या हा इंग्रजीमधील ‘आर्किऑलॉजीʼ (Archaeology) या शब्दाचा मराठीतील प्रतिशब्द आहे. ⇨ पुरातत्त्वविद्येसाठी केवळ पुरातत्त्व असाही शब्द वापरला जातो. मराठीत या ज्ञानशाखेला पुराणवस्तू-संशोधन असेही म्हटले जात असे; परंतु आर्किऑलॉजी हा विषय फक्त पुराणकालीन वस्तूंशी निगडित नसल्याने आता ही संज्ञा वापरली जात नाही. आर्किऑलॉजी या शब्दाचा उगम आधुनिक लॅटिन भाषेतील आर्किओलोगिया या शब्दापासून झाला आहे. तथापि याचे मूळ ग्रीक भाषेत असून आर्किओस (प्राचीन अथवा प्रारंभिक) आणि लोगोस (विवेचन अथवा चर्चा) यांच्यापासून तो तयार झाला आहे. आर्किऑलॉजीचा  (पुरातत्त्वविद्या) मूळ ग्रीक अर्थ प्राचीन इतिहास अथवा पुरातन ज्ञान असा असला, तरी आता ही संज्ञा अधिक व्यापक अर्थाने भूतकाळातील मानवी जीवन व सांस्कृतिक व्यवहारांच्या उपलब्ध अवशेषांचा अभ्यास यासाठी वापरली जाते.

पुरातत्त्वविद्येच्या अनेक व्याख्या आहेत. प्रबोधनयुगापासून ते एकविसाव्या शतकापर्यंत पुरातत्त्वविद्येच्या उद्दिष्टांमध्ये व सिद्धांतांमध्ये बदल घडत गेले. त्या बदलांना अनुसरून पुरातत्त्वविद्येच्या व्याख्या बदलत गेल्या. तथापि भूतकाळातील मानवी संस्कृतीचा आणि मानव-पर्यावरण यांचा सर्वांगीण अभ्यास ही पुरातत्त्वविद्येची सोपी व सर्वसमावेशक व्याख्या आहे.

पुरातत्त्वविद्येची व्याप्ती मोठी आहे. पुरातत्त्व ही एक मानवविद्या आहे, अशी सर्वसाधारण समजूत असली, तरी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या इतर कोणत्याही संशोधनाप्रमाणे आधुनिक पुरातत्त्वीय संशोधनदेखील वैज्ञानिक पद्धतीने केले जाते. पुरातत्त्वात प्राचीन काळातील मानवी वर्तनाचा अभ्यास होतो म्हणून तीन शतकांपूर्वी पुरातत्त्वविद्या ही एक मानवविद्या म्हणून उदयास आली. पुरातत्त्वीय अभ्यासाचे मुख्य काम हे इतिहासाला मदत करणे असावे, अशा कल्पनेमुळे सुरुवातीला पुरातत्त्वीय अर्थनिष्पत्तीची व्याप्ती फारच मर्यादित स्वरूपाची होती. प्राचीन काळातले शिलालेख, नाणी, हस्तलिखिते, कलात्मक वस्तू, देवदेवतांच्या मूर्ती, किल्ले, वाडे इत्यादी सर्व गोष्टी इतिहासाला मदत करण्यासाठी उपयुक्त असतात. आधुनिक पुरातत्त्वीय संशोधनात या गोष्टी नसतातच, असे नाही. ऐतिहासिक पुरातत्त्व (Historical Archaeology) आणि मध्ययुगीन पुरातत्त्व (Medieval Archaeology) या शाखांमध्ये अशा सर्व पुराव्यांचीही मदत घेतली जाते.

पुरातत्त्वविद्येचा इतिहास चांगल्या प्रकारे लिहिण्यात आलेला आहे. पुरातत्त्वविद्येच्या जडणघडणीत आणि उद्दिष्टांमधे कसकसा बदल होत गेला, त्याची कारणमीमांसा झालेली आहे. वेगवेगळ्या उद्दिष्टांनुसार व पद्धतींनुसार पुरातत्त्वविद्येकडे निरनिराळ्या प्रकारे बघता येते. पुरातत्त्वीय संशोधन आणि मानवशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास व इतर ज्ञानशाखांच्या परस्परसंबंधांचे सविस्तर विश्लेषण पुरातत्त्वविद्येच्या इतिहासकारांनी केलेले आहे.

पुरातत्त्वविद्या हा एकूण मानवी प्रागितिहास व इतिहासाकडे बघण्याच्या ऐतिहासिक पद्धतीपेक्षा वेगळा दृष्टिकोन असला, तरी मानवी संस्कृतीचा इतिहास बघणे अशा अर्थाने पुरातत्त्वविद्या हा इतिहासाचा एक भाग ठरतो. व्यापक अर्थाने पाहिले तर मानवशास्त्रामध्ये संपूर्ण मानवजातीची एक प्राणी म्हणून भौतिक ल़क्षणे आणि प्राणिसृष्टीत कोणाकडेही नसलेले वैशिष्ट्य म्हणजे संस्कृती यांचा अभ्यास अपेक्षित असल्याने पुरातत्त्वविद्या ही सांस्कृतिक मानवशास्त्राचीच एक शाखा आहे, असे मानता येते. तथापि प्रत्यक्ष व्यवहारात या दोन शाखा स्वतंत्रपणे काम करताना दिसतात. म्हणजेच सोईसाठी मानवी संस्कृतीच्या वर्तमानकाळाचा अभ्यास मानवशास्त्रात, तर भूतकाळाचा अभ्यास पुरातत्त्वविद्येत केला जातो.

प्राचीन स्थळांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करणे, निवडलेल्या पुरातत्त्वीय स्थळाचे उत्खनन करणे, मिळणाऱ्या सर्व अवशेषांची नोंदणी करणे, अवशेषांचे विश्लेषण करून उपलब्ध पुराव्यांचा अर्थ लावणे आणि संशोधनामागे असलेल्या सिद्धांतकल्पनांच्या संदर्भात उद्दिष्टे गाठली किंवा नाही हे बघून अहवाल प्रकाशित करणे, हे पुरातत्त्वीय संशोधनाचे मुख्य टप्पे असतात. पुरातत्त्वीय अवशेष लक्षावधी वर्षे जमिनीखाली गाडलेल्या अवस्थेत राहिल्याने सहसा पूर्ण नसतात. मिळेल त्या प्रत्येक बारीकसारीक पुरातत्त्वीय वस्तूचा अर्थ लावण्यासाठी विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांमधील तंत्रज्ञानाची व ते वापरणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेतली जाते. म्हणूनच विज्ञानाच्या जीवविज्ञान, भूविज्ञान, भौतिकीविज्ञान, रसायनविज्ञान, जैवरेणुविज्ञान व संगणनविज्ञान अशा वेगवेगळ्या शाखांमधील ज्ञानाचा उपयोग होतो. त्यामुळे पुरातत्त्वविद्येच्या आंतरविद्याशाखीय (Interdisciplinary) व्याप्ती असणाऱ्या अनेक उपशाखा विकसित झालेल्या असून त्या पुरातत्त्वीय संशोधनात मोलाचे योगदान देत आहेत.

आधुनिक पुरातत्त्वीय संशोधनात वैज्ञानिक पद्धतीप्रमाणे गृहीतके मांडली जातात आणि वस्तुनिष्ठ व तर्कशास्त्रीय कसोट्यांचा वापर करून अनुमाने काढली जातात. अशा प्रकारे भूतकाळातील मानवी वर्तन आणि संस्कृती यांच्यामधील बदलांचे पुराव्यांवर आधारित सर्वांत चांगले स्पष्टीकरण देण्यासाठी प्रारूपे बनवली जातात. असे असल्याने पुरातत्त्वीय संशोधन हा विज्ञानाचाच एक भाग आहे, असेही मानले जाते. म्हणजेच पुरातत्त्वविद्या ही मानवविद्येप्रमाणे विज्ञानाचीही शाखा आहे.

पुरातत्त्वविद्येत मानवाच्या उगमापासून ते लेखनाची सुरुवात होईपर्यंतच्या कालखंडाचा अभ्यास प्रागितिहासात (Prehistory), तर त्यानंतरचा अभ्यास इतिहासपूर्व काळात (Protohistory) केला जातो. परंतु पुरातत्त्वीय संशोधनात फक्त प्रागितिहासाचा समावेश होतो, अशी समजूत आहे. भूतकाळातील मानवी संस्कृतीकडे बघणे हा एक दृष्टिकोन असल्याने फक्त लेखनपूर्व काळासाठीच नाही, तर पुरातत्त्वीय साधनांचा वापर करून अतिप्राचीन काळापासून ते अगदी गेल्या अर्धशतकापर्यंतच्या घटनांचा अभ्यास करता येतो. म्हणूनच पर्यावरणीय पुरातत्त्व (Environmental Archaeology), परिदृश्य पुरातत्त्व (Landscape Archaeology),   वसाहतकालीन पुरातत्त्व (Colonial Archaeology), रणभूमी पुरातत्त्व (Battlefield Archaeology), औद्योगिक पुरातत्त्व (Industrial Archaeology), कारागृह पुरातत्त्व (Prison Archaeology), संघर्षाचे पुरातत्त्व  (Conflict Archaeology), न्यायसहायक पुरातत्त्व  (Forensic Archaeology) आणि समकालीन पुरातत्त्व (Contemporary Archaeology) अशा पुरातत्त्वविद्येच्या अनेक उपशाखांमध्ये आता महत्त्वपूर्ण संशोधन केले जात आहे. अशा कालखंडांमधील ज्ञात घटनांचे स्पष्टीकरण देण्यासाठी लिखित साधनांपेक्षा निराळी माहिती अशा पुरातत्त्वीय संशोधनांमधून मिळू लागली आहे.

पुरातत्त्वविद्या ही केवळ विविध ज्ञानशाखांमधील विद्वानांच्या जगापुरती मर्यादित राहू शकत नाही. अद्याप पुरातत्त्वीय कामांसाठी मिळणारा निधी प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातून येत असल्याने पुरातत्त्वीय ज्ञान मिळणे हा लोकांचा अधिकार आहे, याची जाणीव असल्याने पुरातत्त्वज्ञ मिळालेली माहिती लोकांपर्यंत जावी यासाठी विशेष प्रयत्न करतात. याला लोकलक्ष्यी पुरातत्त्व (Public Archaeology) असे म्हणतात.

पुरातत्त्वविद्येचा संबंध इतिहासाशी असतो आणि प्राचीन काळातील गूढ व रम्य घटनांबद्दल सर्वांनाच आकर्षण असते. म्हणूनच प्राचीन वारसास्थळे बघण्यासाठी लक्षावधी पर्यटक जगभर फिरतात. तसेच प्राचीन काळातील अद्भुत व रहस्यमय गोष्टींकडे निराळ्या (सामाजिक-राजकीय फायद्याच्या) व अवैज्ञानिक प्रकारे बघणारे काही तथाकथित स्वयंभू पुरातत्त्वज्ञ हे लोकांमध्ये भ्रामक कल्पना पसरवतात. यालाच भ्रामक पुरातत्त्व (Pseudoarchaeology) असे नाव आहे. चित्रपट व इतिहासावर आधारित काल्पनिक कथा-कादंबऱ्यांमुळे पुरातत्त्वविद्येच्या अभ्यासकांना सतत भ्रामक पुरातत्त्वाशी झगडावे लागते.

संदर्भ :

  • Bahn, Paul G. Ed., World Atlas of Archaeology, New York, 2000.
  • Brothwell, D. & Pollard, A. M. Eds., Handbook of Archaeological Science, 2004.
  • Fagan, Brian M. A Brief History of Archaeology: Classical Times to the Twenty-First Century, 2004.
  • Preucel, R.W. & Hodder, Ian Eds., Contemporary Archaeology in Theory : A Reader, Oxford, 1996.
  • Renfrew, Colin ; Bahn, Paul G. Archaeology, London, 2012.
  • Renfrew, Colin ; Bahn, Paul G. Eds., Key Concepts in Archaeology, New York, 2004.
  • Renfrew, Colin  Prehistory: The Making of the Human Mind, London, 2007.
  • Scarre, Chris  Ed., The Human Past : World Prehistory and the Development of Human Societies, New York, 2009.

समीक्षक : शरद राजगुरू