नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च , भुवनेश्वर : प्रवेशद्वार

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च , भुवनेश्वर (नायसर) : (स्थापना:  १० सप्टेंबर, २००७) भारताच्या भविष्यात डोकावताना ज्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे त्याची तयारी म्हणून अणुऊर्जा विभागाच्या (डिपार्टमेंट ऑफ अटॉमिक एनर्जी) मदतीने भुवनेश्वर येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च या संस्थेची स्थापना झाली. मुंबईतील होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटबरोबर ही संस्था संलग्न केलेली आहे. अणुऊर्जा विभागाने या दोन्ही संस्थांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला आहे. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर जटनी शहरातील १८५ हेक्टर जमीन ओडिशा शासनाने संस्थेस देऊ केली. भुवनेश्वर आयआयटी व एआयआयएमएस-एम्स या दोन्ही संस्था येथून जवळ आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सच्या इमारतीत पाच वर्षाच्या एम.एस्सी. भौतिकशास्त्राच्या चाळीस विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी उद्घाटन केले. सध्या पाच वर्षांच्या जैवविज्ञान, रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकी विज्ञानातील डॉक्टरेटपर्यंतच्या शिक्षणाची सोय येथे केली आहे. संस्थेतील प्रवेशासाठी भारतीय पातळीवर प्रवेश परीक्षा दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या शनिवारी घेतली जाते. भविष्यात संगणक विज्ञान, भूशास्त्र आणि पर्यावरण विज्ञान हे विषय येथे सुरू केले जाणार आहेत.

नायसर या संस्थेने आधुनिक विज्ञानाच्या कक्षा परस्परात गुंतलेल्या आहेत, हे ओळखून तरुणांना यापुढे अनेक आव्हाने पेलण्यासाठी अभ्यासक्रम व संशोधन यामधून शिक्षण देण्याचे ठरवले आहे. निवडून घेतलेले २००० विद्यार्थी आणि त्यांना शिक्षण देण्यासाठी त्यांच्या विषयातील अत्यंत कुशल असे तीनशे प्राध्यापक हे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी नायसरमध्ये खालील विभाग चालू करण्यात आले आहेत.

        नायसर स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्स: जैवविज्ञान आकलनासाठी निसर्ग आणि सजीवांच्या विविध पातळ्यांवरून शिकणे आवश्यक आहे. उत्क्रांतीविज्ञान, सहजीवन, परस्परावलंबन, टिकून राहणे, संरक्षण, वृद्धी, प्रतिकार, प्रतिक्षमता आणि सजीव शरीरविज्ञान यामध्ये संशोधन करण्याची तयारी यासाठी नायसर संस्थेतील जैवविज्ञान विभाग २००७ साली सुरू करण्यात आला. परंपरागत निसर्गज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालण्यासाठी आजपर्यंत कधीही अभ्यासक्रमात न आणलेले भाग विद्यार्थ्यांना शिकवण्याचे जैवविज्ञान विभागाने ठरवले. पाच वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम हे त्याचेच उदाहरण होय. पाच वर्षांनी एम.एस्सी. पदवी मिळाल्यावर पीएच्.डी. आणि प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट डॉक्टरेट हा संस्थेच्या नियोजनाचा अत्यंत आकर्षक भाग आहे. पाच वर्षांच्या सलग एम.एस्सी.साठी बारावीनंतर प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.

जैवविज्ञान विभागात सध्या अत्यंत आधुनिक अशा सोळा प्रयोगशाळांतून एम.एस्सी.च्या विद्यार्थांना शिकवण्याचे काम चालू आहे. जानेवारी २०१० मध्ये पीएच्.डी. प्रवेश चालू झाला आहे. यातून जुलै २०१७ पर्यंत साठ विद्यार्थी जैवविज्ञानात पीएच्.डी.साठी संशोधन करीत आहेत. त्यातल्या ९ विद्यार्थ्यांना पीएच्.डी. पदवी मिळाली आहे.

नायसर स्कूल ऑफ केमिकल सायन्स: रसायन विज्ञानाने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात बदल केला आहे त्याचप्रमाणे इतर विज्ञानाच्या शाखेत रसायन विज्ञान पोहोचले आहे. नायसरच्या रसायन विज्ञान विभागात तयार झालेले पदवी आणि पदव्युत्तर संशोधक अत्यंत स्पर्धात्मक संशोधन करण्यासाठी तयार करावे लागतील. सेंद्रिय रसायनशास्त्र, असेंद्रीय रसायनशास्त्र, भौतिक रसायनशास्त्र याबरोबर सैद्धांतिक रसायनशास्त्र, या नेहमीच्या रसायन विज्ञानातील शाखेबरोबर जैवविज्ञान रसायन, मटेरियल सायन्स, आणि औषध रसायने अशा आंतर-रसायन शाखीय विभागातील तज्ज्ञ निर्माण करण्यासाठी या विभागाने प्रयत्न चालू केले आहेत. रसायन विज्ञान विभागाने केलेल्या अभ्यासक्रमातून सर्वसमावेशक रसायनशास्त्रातील सर्वोत्तम वैज्ञानिक तयार होतील असा विश्वास संचालकांना आहे. २०१० मध्ये रसायनविज्ञान विभागाने पीएच्.डी. साठी विद्यार्थ्यांची निवड केली आहे.

नायसर संगणक विज्ञान विभाग: संगणक विज्ञानातील उत्कृष्ट कौशल्ये आत्मसात करावी आणि अनुषंगिक संशोधन संस्थेमध्ये चालावे यासाठी हा विभाग चालू करण्यात येणार आहे. सध्या याची पूर्वतयारी म्हणून एम.एस्सी. आणि पीएच्.डी. संगणक विज्ञान विभाग चालू केले आहेत. संस्थेमधील विविध संशोधकांची पूर्ण गरज भागून इतर संस्थांना संगणक विज्ञानातील मनुष्यबळ पुरवता येईल एवढी यंत्रणा लवकरच उभी राहील.

नायसर भौतिकविज्ञान विभाग: नायसर भौतिक विज्ञान विभाग जागतिक पातळीवरील भौतिक विज्ञानातील संशोधनासाठी सज्ज आहे. एम.एस्सी आणि संयुक्त एम.एस्सी. – पीएच्.डी. अभ्यासक्रमासाठी आजपर्यंत ५१ विद्यार्थी या विभागात नोंदवलेले आहेत. त्यातील चार पीएच्.डी. झाले आहेत.

नायसर पीएच्.डी. अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मूलभूत भौतिक विज्ञानाबरोबर अधिक प्रगत संशोधन करण्यासाठी स्वत:ला सिद्ध करणे.  या विभागात स्फटिक स्थायू विज्ञान (condensed crystalline solids), कार्बन नॅनो ट्यूब, द्रव स्फटिकी (Liquid crystals), अस्फटिकी पदार्थ (amorphous), गुंतागुंतीची रचना असलेले द्रव यांच्या निर्मितीवर संशोधन करण्यात येते. यापासून विशेष तंत्रद्यान विकसित करणे हे अभियांत्रिकी विभागाचे काम आहे. पण अशा क्षेत्रात संशोधन झाल्याशिवाय तंत्रज्ञान तयार होत नाही. यापासून पुढे ट्रांझिस्टर, ऑप्टिक फायबर, लेझर केबल, चुंबकीय विदा (Data) साठवणाऱ्या तबकड्या व द्रव स्फटिक तक्ते बनवणे शक्य होते.

गेल्या दहा वर्षात स्फटिक स्थायू विज्ञान क्षेत्राने भौतिक, रसायन व भौतिक स्थायू विज्ञान एकत्र आल्याने अनेक नवे शोध लागले आहेत. भविष्यात आणखी नवे विभाग सुरू करण्याचा भौतिक विज्ञान विभागाचा प्रयत्न आहे. नायसर भौतिक विज्ञान विभागाने हाय एनर्जी फिजिक्स नावाचा अद्ययावत विभाग चालू केला आहे. भौतिक क्रियांच्या सहाय्याने अधिक ऊर्जा पारंपारिक किंवा पूर्णपणे नव्या स्त्रोतातून निर्माण करणे हे या विभागाचे उद्दिष्ट आहे. कारण पारंपारिक ऊर्जा किती वर्षे मिळत राहील हे आज फक्त अंदाजाने ठरवता येते. अशा वेळी अक्षय्य ऊर्जा स्वस्त क्रियेतून मिळाली तर प्रयत्न केले पाहिजेत. या स्त्रोतासाठी लार्ज हायड्रॉन कोलायडर सर्न (CERN) ला  नायसर भौतिक संशोधन विभाग मदत करीत आहे.

अती शीत तापमानास सुपर कंडक्टर तयार झाले तर अशा वस्तूमध्ये विद्युतरोध शून्य होतो. सर्व जगभर यावर संशोधन होत आहे. अशा पद्धतीचे संशोधन करण्यात आपण मागे नाही हेही संस्था सिद्ध करून दाखवण्यास सज्ज  आहे. नजीकच्या भविष्यात सूर्यमालेतील ग्रहांची रचना, त्यांचे रासायनिक घटक व त्यांच्या प्रतिमा मिळवणे, अशा प्रतिमांचे विश्लेषण, गुरुत्वाकर्षण, प्रतिद्रव्य (antimatter) अशा बाबतीत संशोधन करण्याचा संस्थेचा प्रयत्न राहणार असेल.

संदर्भ: 

समीक्षक: किशोर कुलकर्णी