कला आणि समाजशास्त्र यांच्यातील नाते खूप गुंतागुंतीचे आहे. कलेचे समाजशास्त्र असा ढोबळ शब्दप्रयोग केला जात असला, तरी कलांचे समाजशास्त्र अशी संज्ञा वापरणे जास्त संयुक्तिक आहे; कारण आशय, प्रयोजन, शैली, सादरीकरण आणि सामाजिक व राजकीय संदर्भांच्या अनुषंगाने ललित कलांमध्ये खूप वैविध्य आहे. त्यामुळे समाजशास्त्राच्या या उपशाखेत विश्लेषणाच्या पातळीवर समग्रता आणणे आव्हानात्मक आहे. आपापल्या व्यक्तिगत विषयनिवडीनुसार सामाजिक विचारवंतांनी केलेल्या वैविध्यपूर्ण लिखाणांतून ही ज्ञानशाखा आकाराला आली आहे. किंबहुना, यामुळेच कलेच्या समाजशास्त्रात एक प्रबळ सैद्धांतिक प्रवाह दिसत नाही.

पाश्चिमात्य आधुनिकतेच्या ज्या टप्प्यावर समाजशास्त्राचा उदय झाला, त्याच कालखंडात धार्मिक व राजकीय व्यवस्थांपासून कला या हळूहळू वेगवेगळ्या होत एक स्वायत्त क्षेत्र म्हणून स्थापित होत गेल्या. ज्ञाननिर्मितीच्या नव्या पद्धती विकसित होत असण्याच्या या कालखंडात समाजशास्त्राच्या रूपात कला आणि विज्ञान यांना जोडणारा नवीन दुवा अस्तित्वात आला. एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून आपली ओळख निर्माण करताना समाजशास्त्राने एकीकडे नैसर्गिक विज्ञानाची प्रयोगाधिष्ठित ज्ञानाची पायाभूत चौकट स्वीकारली, तर दुसरीकडे कला आणि मानव्यशाखांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या सौंदर्यानुभवाच्या तत्त्वालाही विश्लेषणाच्या परिघात आणले. या कालखंडात नव्याने उदयाला येणाऱ्या सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित संक्रमणाचे विश्लेषण हा समान धागा समाजशास्त्र आणि कलाशास्त्र या दोहोंमध्ये दिसून येतो.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत कलेशी संबंधित लिखाणांत कला आणि समाज यांच्यातील आंतरसंबंधांचा संदर्भ दिसून येतो. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र कलेतील मूलभूत कलात्मक पैलूंचा जास्त प्राधान्याने विचार होऊ लागला. या काळात यूरोपमध्ये जसजसा उच्च शिक्षणाचा संस्थात्मक विस्तार होऊ लागला, तसतसा विविध ज्ञानशाखांनी आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण संशोधनपद्धती आणि अभ्यासविषयांचा पुरस्कार करायला सुरुवात केली. येथूनच कलाशास्त्र आणि समाजशास्त्र यांची फारकत होऊन या दोहोंनी कलाजगताचे विश्लेषण आपापल्या स्वतंत्र विद्याशाखीय व संस्थात्मक चौकटींतून परस्परभिन्न दृष्टिकोणातून करायला सुरुवात केली. रिगल व्योल्फलिन; पॅनोफस्की अशा विचारवंतांच्या लिखाणांतून कलाशास्त्रात हळूहळू कलांच्या सामाजिक संदर्भांपेक्षा कलात्मक पैलूंना महत्त्व देण्याचा आणि कलांचे स्पष्टीकरण सौंदर्यतत्त्वाच्या संदर्भाने करण्याचा कल प्रस्थापित होऊ लागला. दुसरीकडे, सीमेल; ड्यू बोई; माक्स वेबर यांसारख्या समाजशास्त्रज्ञांनी कलांची समाजातील भूमिका, कलांचा सामाजिक आशय अशा गोष्टींना महत्त्व देऊन कलांना सामाजिक संरचनेशी जोडण्याचा आग्रह धरला. कलाशास्त्रासाठी कलेची स्वायत्तता महत्त्वाची होती, तर समाजशास्त्रासाठी कलेची सामाजिक प्रेरणा. कलेची निर्मिती सर्जनशील प्रतिभेतून होते व कलाविष्कारातून निर्माण होणाऱ्या सौंदर्यानुभवाचे मोजमाप वस्तुनिष्ठ पद्धतीने करता येणार नाही, अशी कलाशास्त्राची आग्रही भूमिका राहिली. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कालखंडात एर्न्स्त गोम्ब्रीच या कलाशास्त्रज्ञाच्या लिखाणाचा खूप मोठा प्रभाव सैद्धांतिक मांडणीवर होता. गोम्ब्रीच यांनी समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्याला (विशेषत: जॉर्ज व्हिल्हेल्म फ्रीड्रिख हेगेल आणि मार्क्सवादी) खोडून काढत. त्यांनी ही मांडणी निर्धारणवादी असून अभिव्यक्तीच्या मुलभूत प्रेरणेकडे दुर्लक्ष करते, अशी प्रखर टीका केली. त्या काळात कार्ल मॅनहाईम, अँतल ऑर्केनी, हाऊजर अशा समाजशास्त्रज्ञांनी कलेचे सखोल समाजशास्त्रीय विश्लेषण केले होते; पण गोम्ब्रीच यांच्या टीकात्मक लिखाणामुळे ते निष्प्रभ ठरले. समाजशास्त्रीय विश्लेषणदेखील मुख्यतः कलेमध्ये ती ज्या समाजाचा भाग असते, त्या समाजाचे प्रतिबिंब दिसते, या भूमिकेभोवती फिरत राहिले. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अडोर्नो यांच्या सारख्या काही विचारवंतांचा अपवाद वगळता कलेच्या समाजशास्त्रात सौंदर्यशास्त्राला आव्हान देणारे विश्लेषण मध्यवर्ती होते. या भूमिकेचा दुहेरी उद्देश होता. पहिला, कलांच्या स्वायत्त अस्तित्वाचा आग्रह खोडून काढणे आणि दुसरा, कलेचा रसास्वाद ही सामाजिक व ऐतिहासिक संदर्भातच अर्थपूर्ण ठरणारी प्रक्रिया आहे, हे ठसविणे. दैवी प्रतिभा आणि कलात्मक संवेदनशीलता हेच कलेचे मुख्य आधारस्तंभ आहेत, ही भूमिका या काळात इतक्या प्रभावीपणे प्रसारित झाली होती की, कला आणि कलाकारांभोवतीचे वलय भेदू पाहणाऱ्या समाजशास्त्रीय विश्लेषणाची फारशी दखल घेतली गेली नाही.

कलेच्या समाजशास्त्रात १९८० पर्यंत दोन प्रमुख विचार परंपरा दिसून येतात. अमेरिकन विचारप्रवाहात कलेच्या सामाजिक उत्पादनाचा दृष्टिकोण प्रबळ आहे. सामाजिक आंतरसंबंधांच्या व व्यवस्थांच्या चौकटीत कलेचे उत्पादन व ग्रहण कसे होते, मध्यस्थ पहारेदारांची (प्रकाशक, समीक्षक, म्यूझियम व कलादालने चालवणाऱ्या संस्था, कलांचे शिक्षण-प्रशिक्षण देणारी महाविद्यालये) भूमिका, कलेचे स्वरूप निर्धारित करणाऱ्या निर्णायक अधिकार व्यवस्था यांचे विश्लेषण समाजशास्त्रज्ञांनी केले. यात अन्वयार्थवादी परिप्रेक्ष्यातून हॉवर्ड बेकर यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण मांडणीचा उल्लेख महत्त्वाचा आहे. बेकर यांनी १९८२ मध्ये लिहिलेल्या आपल्या आर्ट वर्ल्ड्स या पुस्तकात कलेकडे सामूहिक क्रियांचे फलित म्हणून पाहिले आहे. त्यांच्या मते, कोणतीही कलाकृती निर्माण होण्यासाठी फक्त कलाकाराच्या व्यक्तिगत क्षमता व कलागुण पुरेसे नसून कलानिर्मिती अनेक व्यक्तींच्या सहयोगातून शक्य होते. कलानिर्मितीकडे एक सामाजिक घटना म्हणून पाहताना बेकर यांनी कलाविश्वातील श्रम विभाजनाचे विश्लेषण केले आहे. कोणताही कलाविष्कार सृजनशील कलाकारांच्या जोडीने असंख्य अशा व्यक्तींच्या कामातून शक्य होतो, ज्या व्यक्ती कलाकार म्हणून ओळखल्या जात नाहीत किंवा त्यांचे कामही कलात्मक श्रेणीत बसणार नाही. उदा., वाद्ये बनविणारे व दुरुस्त करणारे कारागीर, मैफिलीच्या वेळी ध्वनी संयोजन करणारे तंत्रज्ञ, नृत्यासाठी पोशाख व अलंकार घडविणारे कारागीर इत्यादी. बेकर यांनी कलाविश्व ही संकल्पना वापरून कलाकार, तंत्रज्ञ, कारागीर, समीक्षक, आश्रयदाते अशा विविध समूहांतील व्यक्तींमध्ये घडणाऱ्या देवाणघेवाणीतून कलेचे उत्पादन व ग्रहण होत असते; तसेच कलेचा अनुभव ही सामाजिक प्रक्रिया आहे, हे प्रभावीपणे मांडले.

दुसरीकडे, मार्क्सवादी परंपरेतील लिखाण हे कलेकडे सरधोपटपणे वर्गीय/आर्थिक व्यवस्थेचे प्रतिबिंब म्हणून पाहणाऱ्या मांडणीत अडकले होते. ते अडोर्नो, ग्रामसी, अल्थुझर, गोल्डमन अशा विचारवंतांच्या लिखाणांतून अधिक परिष्कृत झाले. कलेच्या उत्पादन व ग्रहणातील सामाजिक मध्यस्थ व्यवस्थांची भूमिका अधोरेखित करतानाच व्यक्तिगत जाणीव व अनुभवातून नवनिर्मिती करण्याच्या कलेच्या सामर्थ्याचे सखोल सैद्धांतिकिकरण नव-मार्क्सवादी लिखाणातून शक्य झाले. भांडवलवादी समाजात व संस्कृतीचा उद्योग झालेल्या युगात कलेला मनोरंजनाचे स्वरूप आले असले आणि कलेचे मोठ्या प्रमाणात वस्तुकरण झाले असले, तरी मुक्त व मोकळा अवकाश कलेतूनच प्राप्त होतो, असा ठाम विश्वास अडोर्नो यांनी व्यक्त केला होता. त्यांच्या मते, कलेचे समाजाशी असलेले नाते द्वंद्वात्मक स्वरूपाचे असते. विशुद्ध सर्जन व नवनिर्मितीचा दावा अडोर्नो यांना अमान्य होता. कलानिर्मितीची सामग्री समाजातूनच मिळते. नवीन विचार, नवीन आकृतिबंध जन्माला घालण्याचे आणि समाजातील विसंगती दाखविण्याचे सामर्थ्यही कलेतच असते, असे दृढ प्रतिपादन अडोर्नो यांनी केले.

कलेच्या समाजशास्त्रात झालेल्या विविधांगी संशोधनामुळे समाजात शास्त्रीय/शास्त्रीयेतर, उच्च/हिणकस, अभिजात/लोकप्रिय असे सांस्कृतिक भेद कसे निर्माण होतात आणि ते हेतुपुरस्सर कसे चालू ठेवले जातात, यांवर प्रकाश टाकला गेला. बोर्द्यू यांनी वापरलेल्या ‘सांस्कृतिक भांडवल’ या संकल्पनेतून कलात्मक अभिरुचीचा वापर अभिजनवर्ग आपला उच्च दर्जा ठसविण्यासाठी कसा करतो, हे स्पष्ट झाले. ज्या अनेक सांस्कृतिक घटकांचा भांडवल म्हणून वापर करून उच्च वर्गातील व्यक्तींमध्ये समाजात अधिकार व प्रतिष्ठा मिळविण्याची चढाओढ सुरू असते, त्यात कलात्मक अभिरुची, विशेषतः संगीतातील अभिरुची, महत्त्वाच्या  चिन्हकाचे काम करते, असे प्रतिपादन बोर्द्यू यांनी केले. अभिजनांच्या कलात्मक अभिरुचीला केवळ सामाजिक प्रतिष्ठा मिळत नाही, तर संस्थात्मक तसेच आर्थिक पाठबळही मिळते. कलेच्या समाजशास्त्रातून कलाप्रकारांचे वर्गीकरण समाजातील अभिजन/अभिजनेतर या वर्गीकरणातून जन्माला येते, याचे आकलन होण्यात मदत झाली.

कलेच्या समाजशास्त्रात १९८० नंतर कला व समाज यांच्यातील सहसंबंधांचा अभ्यास संस्कृती अध्ययन, चित्रपट अध्ययन, स्त्रीवादी विश्लेषण अशा आंतरविद्याशाखीय क्षेत्रांतून तसेच संरचनावादी, मिमांसावादी आणि मनोविश्लेषणात्मक सिद्धांतांतून मिळालेल्या आंतरदृष्टीचा समावेश करून जास्त परिणामकारक रीत्या केला जात आहे. कलेचे समाजशास्त्र ही एक आंतरविद्याशाखीय स्वरूपाची ज्ञानशाखा आहे. कलेचे स्पष्टीकरण जसे केवळ अंगभूत आशय, आकृतिबंध व आविष्काराच्या माध्यमातून होणार नाही, तसेच ते फक्त बाह्य वस्तुनिष्ठ परिस्थितीच्या विश्लेषणातूनही परिपूर्ण रीत्या होणार नाही. या दोहोंच्या परस्परपूरकतेतूनच कलेचे समाजशास्त्रीय विश्लेषण शक्य आहे, ही जाणीव आज प्रबळ आहे.

कलेच्या समाजशास्त्रात आंतरविद्याशाखीय परिदृष्टीतून संशोधन होत असल्याने संशोधन पद्धती व अभ्यासविषयांच्या कक्षा विस्तारल्या आहेत. कला आणि सामाजिक संरचना व सामाजिक व्यवस्था यांच्यातील परस्परसंबंध, कला आणि सांस्कृतिक अस्मिता, कला आणि सामाजिक स्तरीकरण व विषमता अशा अनेक अंगांनी कलेचे परीक्षण शक्य झाले आहे. स्त्रीवादी अभ्यासकांनी कलेच्या उत्पादनात स्त्रियांचे कर्तेपण कसे नाकारले गेले आहे, स्त्रियांचे आणि पुरुषांचे साचेबद्ध सादरीकरण कसे होते आणि कलेच्या क्षेत्रात लिंगभावात्मक विचारप्रणालीचे पुनरुत्पादन कसे होते, हे मुद्दे अधोरेखित केले. असेच समांतर मुद्दे बिगर पाश्चिमात्य, वांशिक अल्पसंख्यांक समूहांच्या बाबतीत उत्तरवसाहतवादी सिद्धांकनातून उपस्थित करण्यात आले. हे समूह प्रस्थापित सांस्कृतिक, कलात्मक वर्तुळाच्या बाहेर का राहतात आणि अभिजात कलेची सर्वमान्य संभावित चौकट मुख्यतः श्वेतवर्णीय, पाश्चिमात्य, पुरुष कलाकारांच्या व समीक्षकांच्या योगदानालाच कसा अग्रक्रम देते, असे प्रश्न विचारले गेले. कलेचे क्षेत्र फक्त विशुद्ध आनंदाचे क्षेत्र नसून ते एक सांस्कृतिक सत्तासंबंधाचे क्षेत्र आहे, हे अलीकडील काळात प्रकर्षाने मांडले जात आहे. भारतीय कलांच्या अनुषंगाने झालेल्या लिखाणांतून कला आणि धार्मिक व जातीय विषमतेचा मुद्दाही पुढे आला आहे.

भारतीय समाजशास्त्रात डी. पी. मुखर्जी, राधाकमल मुखर्जी, ओ. पी. जोशी, विनायक पुरोहित असे काही निवडक समाजशास्त्रज्ञांचे अपवाद सोडले, तर भारतीय कला आणि समाज यांच्यातील सहसंबंध तपासून पाहण्याचे फारसे प्रयत्न झालेले नाहीत. डी. पी. मुखर्जी यांनी बदलत्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा हिंदुस्तानी संगीतावर कसा परिणाम झाला, याचा अभ्यास केला; तर राधाकमल मुखर्जी यांनी कलेच्या सामाजिक कार्यात्मकतेचे विश्लेषण केले. ओ. पी. जोशी यांच्या विश्लेषणाचा भर कलाकारांचा सामाजिक दर्जा, स्थान आणि त्यांच्या सामाजिक परिस्थितीचे आकलन करण्यावर आहे. विनायक पुरोहित यांनी वसाहतवादी कालखंडात भारतीय कलांमध्ये झालेल्या परिवर्तनाचा आढावा घेतला आहे.

भारतीय समाजशास्त्रात १९८० नंतर भारतीय कलांचे, विशेषतः संगीत व नृत्य, आंतरविद्याशाखीय परिदृष्टीतून विश्लेषण होऊ लागले. डॅनियल न्यूमन, हॅरॉल्ड पॉवर्स, बॉनी वेड या अभ्यासकांनी वसाहतवादी कालखंडात आधुनिक भारतीय कलांचा विकास कसा झाला आणि बदलत्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीशी हे संक्रमण कसे जोडलेले होते, याचे विश्लेषण केले. रिचर्ड लेपर्त, फॅरेल, ॲलन या अभ्यासकांनी वसाहतकालीन सत्तासंबंधांच्या चौकटीत भारतीय कलांचे आधुनिकीकरण हा मुद्दा ब्रिटिश साम्राज्याच्या सांस्कृतिक अधिसत्तेशी कसा जोडलेला होता, हे पाहण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश वसाहतवादी कालखंडात भारतीय राष्ट्रवादाच्या विकासात भारतीय कलांच्या पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेची काय भूमिका राहिली, राष्ट्रीय अस्मितेच्या जडणघडणीत कलांचे शुद्धीकरण करण्याचे प्रयत्न होऊन शास्त्रीय/विशुद्ध/उच्च अभिरुचीपूर्ण असा दर्जा काही ठराविक कलाप्रकारांना कसा प्राप्त झाला आणि अभिजन/अभिजनेतर असे विभाजन कसे झाले, यांचे सखोल स्पष्टीकरण करणारे विस्तृत आंतरविद्याशाखीय संशोधन २००० नंतर झाले आहे. नव्याने उदयाला आलेल्या सार्वजनिक क्षेत्रांत मध्यमवर्गीय सांस्कृतिक मूल्यांची अधिसत्ता निर्माण झाल्याने कलेचा परंपरागत वारसा चालविणाऱ्या कलाकारांना बाजूला काढून कलाविष्काराचे नवीन मापदंड निर्माण करण्यात आले. कलेच्या क्षेत्रात उच्चवर्णीय, मध्यमवर्गाची मक्तेदारी कशी निर्माण झाली; तसेच सांस्कृतिक क्षेत्रातदेखील लिंगभाव आणि जातीच्या आधारे विशिष्ट समूहांना एकीकडे त्यांच्या सांस्कृतिक श्रमाचे शोषण करून दुसरीकडे त्यांच्या कला प्रकारांना उथळ, अश्लील ठरवून त्यांना हीन दर्जा देण्याचे राजकारण कसे चालते, हे या संशोधनात तपासून बघितले गेले; मात्र या बहुतांश संशोधनात चित्र, शिल्प वा दृश्यकलेच्या संस्कृतीचे फारसे अवलोकन झालेले नाही.

सौंदर्यानुभूती ही जरी कलेची मुलभूत प्रेरणा मानली, तरी सामाजिक व्यवस्थेतील विषमता व सत्तासंबंध यांपासून कला अस्पर्शित राहू शकत नाहीत. सर्जनशील उर्मीच्या देणगीमुळे कलाकारांना तारांकित वलय लाभते; मात्र उदरनिर्वाहाचा झगडा आणि जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी कलाकारांनाही चुकलेल्या नाहीत. म्हणूनच ‘नकोशा सहप्रवाशाप्रमाणे – सोबत असले तर अडचण, नसले तर अपूर्णता’, असे मत बोर्द्यू यांनी कलाविज्ञानासाठी व्यक्त केले आहे.

आज बहुतांश कलाकार लौकिक यशासाठी तडजोडी करत अलौकिक निर्मितीचा दावा करताना दिसतात; परंतु ‘कलेसाठी कला’ असे मानून आयुष्यभर सत्य, सुंदर व शिवाचा शोध घेणारे कलाकार क्वचितच आहेत. त्यामुळे कलाविश्वाला या वास्तवाचा आरसा दाखविण्यासाठी कलेचे समाजशास्त्र आज महत्त्वाचे आहे.

संदर्भ :

  • रानडे, अशोक, संगीत विचार, मुंबई, २००९.
  • Bourdieu, Pierre. Distinction : A Social Critique of the Judgement of Taste, Cambridge, 1987.
  • Economic and Political Weekly, 2002.
  • Martin, Peter J., Sounds and Society : Themes in the Sociology of Music, New York, 1995.
  • Tanner, Jeremy (edit.), Sociology of Art : A Reader, London, 2004.
  • Wolff, Janet, Aesthetics and the Sociology of Art, Oxon, 2021.

समीक्षक : दिवाकर, वैशाली