लिंगभाव आणि विकास हा एक आर्थिक व सामाजिक दृष्टिकोण आहे. लिंगभाव आणि विकास हा दृष्टिकोण लिंगभाव संबंधाच्या परिप्रेक्ष्यातून सर्व सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संरचना व विकास या धोरणांची पुनरतपासणी करण्यासाठी एक विश्लेषणात्मक चौकट प्रदान करतो. १९८० च्या दशकामध्ये हा दृष्टिकोण मांडण्यात आला. भारतातील स्त्रियांच्या स्थितीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी भारत सरकारकडून १९७२ मध्ये एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने १९७४ मध्ये समानतेच्या दिशेने अहवाल प्रकाशित केला. समितीने त्यामध्ये अधोरेखित केल्याप्रमाणे भारतामध्ये स्त्रियांची स्थिती बिकट असल्याचे दिसून आले. घटते लिंग गुणोत्तर, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय प्रतिनिधित्व आणि विकास या सर्व प्रक्रियेत स्त्रियांचे स्थान आणि लिंगभाव समानता साध्य करण्यात येणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक अडथळ्यांचे विश्लेषण या अहवालामध्ये करण्यात आले. अहवाल समोर आल्यानंतर स्त्रियांची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्थिती सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. त्यामध्ये लिंगभाव आणि विकास या दृष्टिकोणाला महत्त्व देण्यात आले. विविध योजना, कायदे हे लिंगभाव समानता, मानवी हक्क, विकास या पैलूंबाबत भाष्य करत असले, तरी या सर्व बाबी लिंगभावाच्या चष्म्यातून बघणे आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा विकास होतो, तेव्हा तो कशाप्रकारे स्त्री-पुरुषांवर भिन्न परिणाम करतो, हे दिसून येते. लिंगभाव आणि विकास दृष्टिकोणाला विकासातील स्त्रिया, स्त्रिया व विकास या दृष्टिकोणांची पार्श्वभूमी आहे.

विकासातील स्त्रिया आणि स्त्रिया व विकास हे दोन्ही दृष्टिकोण केवळ उत्पादक बाबींवर भर देतात; मात्र स्त्रिया या पुनरुत्पादन, घरकाम यांसारख्या कामांमध्ये गुंतलेल्या असतात. त्या केवळ उत्पादक बाबींकडे लक्ष देत नाहीत. या दोन्ही दृष्टिकोणातील त्रुटी विचारात घेऊन १९८० च्या दशकात लिंगभाव आणि विकास हा दृष्टिकोण उदयास आला. हा दृष्टिकोण स्त्री-पुरुष आणि सामाजिक संरचनेच्या संदर्भात लैंगिक असमानतेच्या कारणांचे विश्लेषण करतो. तो कामगारांचे एका साचेबंद कप्प्यात बंदिस्थ करणाऱ्या रचना तसेच लिंग असमानता निर्माण करणाऱ्या संस्था आणि यंत्रणेत बदल करण्याचा प्रयत्न करतो. या दृष्टिकोणाचा सैद्धांतिक पाया आपणास समाजवादी स्त्रीवादामध्ये दिसून येतो. त्यामुळे हा दृष्टिकोण केवळ उत्पादन संबंधावर लक्ष केंद्रित न करता पुनरुत्पादन संबंध आणि स्त्रियांच्या जीवनातील विविध सामाजिक पैलूंवरदेखील प्रकाश टाकतो. केट यंग यांच्या मते, लिंगभाव आणि विकास हा दृष्टिकोण सामाजिक संस्था, आर्थिक आणि राजकीय जीवन यांच्या माध्यमातून समाज कशा प्रकारे घडतो यांसह सर्वांगीण बाबींवर भाष्य करतो. हा दृष्टिकोण स्त्रियांवर लक्ष केंद्रित करत नाही, तर समाजामध्ये लिंगभावाधारित होणारी सामाजिक घडण, भूमिकांचे आदान-प्रदान, स्त्री आणि पुरुषांकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा यांबाबात चिकित्सक मांडणी करून पितृसत्ता ही स्त्रियांच्या शोषणाचे आणि दुय्यमत्वाचे मुख्य कारण आहे, हे अधोरेखित करतो. हा दृष्टिकोण कुटुंबांतर्गत आणि कुटुंबाबाहेर स्त्रियांच्या सहभागाचे आणि योगदानाचे तसेच कुटुंब, घरदार, बाजार व राज्य यांच्यातील आंतरसंबंध आणि गुंतागुंतीचे विश्लेषण करतो.

लिंगभाव आणि विकास दृष्टिकोण स्त्रियांना विकासाच्या निष्क्रीय लाभार्थी न बघता बदलाच्या कर्त्या म्हणून बघतो. तो पुरुषांची लिंगभाव असमानता दूर करण्यामधील भूमिकेला महत्त्व देतो. तसेच स्त्रियांचे सक्षमीकरण यावरही प्रकाश टाकतो. विकासाची प्रक्रिया ही राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अशा किचकट घटकांनी समाविष्ट आहे. त्यामुळे समाजातील वंचित घटकांना सक्षम बनवून त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्यावर हा दृष्टिकोण भर देतो. १९९५ मध्ये बीजिंग येथे स्त्रियांवर झालेल्या चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर लिंगभाव मुख्यप्रवाह, लिंगभाव अर्थसंकल्प आणि नियोजन या संकल्पनांना राबविण्यासाठीही एक प्रभावी पद्धत म्हणून या दृष्टिकोणाला मान्यता देण्यात आली. सर्वांना सामान संधी उपलब्ध होण्यासाठी विविध धोरणे, कार्यक्रम आणि प्रकल्पांच्या सर्व स्तरांवर आणि पातळींवर लिंग समानता दृष्टिकोणाचा समावेश करणे म्हणजे लिंगभाव मुख्यप्रवाह होय. लिंगभाव अर्थसंकल्प आणि नियोजन हा डावपेच लिंगभाव समानतेच्या तत्त्वाला प्रोत्साहन देऊन स्त्रिया आणि पुरुषांसाठी अर्थसंकल्पामध्ये आवश्यक त्या तरतुदी आखतात. त्याच प्रमाणे लिंगभाव आणि विकास हा दृष्टिकोण व्यावहारिक पातळीवर विविध डावपेच आखून लिंगभाव गरजा पूर्ण करण्यावर प्रकाश टाकतो. हे करत असताना तो लिंगभाव नातेसंबंधामध्ये बदल घडवून आणण्यासाठी एकापेक्षा जास्त पातळ्यांवर काम करतो. तसेच पुरुषांना या बदलाच्या प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणून समाविष्ट करतो.

विकासातील स्त्रिया : लिंगभाव आणि विकास यासंदर्भात मांडणी करताना विकासातील स्त्रिया आणि स्त्रिया व विकास हे दृष्टिकोण बघणे आवश्यक आहे. विकासाच्या प्रक्रियेमध्ये स्त्रियांना एकतर अदृश्य ठेवले गेले किंवा वगळण्यात आले. स्त्रिया या कुटुंबामध्ये आणि समूहांमध्ये मध्यवर्ती भूमिका बजावतात, तरीही त्यांच्या श्रमाची मोजदात होत नाही. त्यामुळे स्त्रियांचा वैयक्तिक विकास व्हावा यासाठी स्त्रियांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यावर हा दृष्टिकोण भर देतो. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला ईस्टर बोसरप यांच्या वुमेन्स रोल इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या पुस्तकात सदरच्या संकल्पनेला धरून मांडणी करण्यात आली. ईस्टर यांनी सर्वांत प्रथम स्त्रियांना एक स्वतंत्र विकासाच्या प्रक्रियेतील एक अभिव्यक्ती म्हणून पाहिले. अभ्यासक या दृष्टिकोणावर टीका करताना नमूद करतात की, विकासातील स्त्री दृष्टिकोण समाजातील विविध संरचना मान्य करतो; मात्र स्त्रियांचे दुय्यमत्व, शोषण, लिंगभाव संबंध, पुरुष पूरक तंत्रज्ञान, संसाधनांचे वाटप यांबाबत चिकित्सक प्रश्न उभे करीत नाही.

स्त्रिया आणि विकास : १९७० दशकाच्या मध्यास हा दृष्टिकोण विकसित झाला. स्त्रिया या पूर्वीपासून आर्थिक उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होत्या, यावर हा दृष्टीकोन भर देतो. शेती क्षेत्रामध्ये स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. असे असले तरी, स्त्रियांच्या श्रमाचे मूल्यांकन केले जात नाही. त्यांना केवळ विकासाचे लाभार्थ म्हणूनच पाहिले जाते. त्यामुळे विकासातील स्त्रिया हा हा दृष्टीकोन महत्त्वाचा असून तो स्त्रियांचे योगदान अधोरेखित करतो. तो स्त्रिया आणि विकास यांमधील संबंधावर प्रकाश टाकतो; मात्र तो पितृसत्ता, उत्पादनाची विभिन्न साधने आणि स्त्रियांचे शोषण व दुय्यमत्व यांच्यातील संबंधाचे विश्लेषण करीत नाही. स्त्रिया आणि विकास हा हा दृष्टीकोन गृहीत धरतो की, आंतरराष्ट्रीय संरचना जेव्हा अधिक न्याय व शोषण विरहित बनतील, तेव्हा तिसऱ्या जगातील स्त्रियांची परिस्थिती सुधारेल.

फायदे :

  • लिंगभाव सत्तासंबंधामध्ये सकारात्मक बदल समानता आणण्यास मदत होते.
  • निर्णय प्रक्रियेमध्ये स्त्रियांचे प्रमाण व वाटाघाटीची क्षमता वाढण्यास मदत होते.
  • हिंसाचार कमी होऊन स्वतःच्या हक्कांविषयी माहिती मिळण्यास मदत होते.
  • पितृसत्ता, लिंगभाव यांसारख्या सामाजिक संस्थाना शह देण्यास मदत होते.

विकासाची व्याख्या करताना आर्थिक विकास या दृष्टिकोणातून विचार केला जातो; मात्र व्यक्तीचा (स्त्री-पुरुष, तृतीयपंथी) सर्वांगिण (सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय) विकास यावर भर दिला जात नाही. ठराविक समूहातील लोक हे विकासाचे लाभार्थी ठरतात, तर बहुतांश वेळा परिघावरील लोक बळी ठरतात. बरेचदा या गटांमध्ये स्त्रिया, लहान मुले, सत्ताहीन समूहांचा समावेश असतो. थोडक्यात, विकासाची प्रक्रिया ही सर्वांसाठी समान नाही. लिंगभाव आणि विकास एक विश्लेषणाची चौकट उपलब्ध करून देतो. त्या माध्यमातून आपण विकासाच्या असमान प्रक्रियेला प्रश्नांकित करू शकतो. सैद्धांतिक पातळीवर लिंगभाव आणि विकास हा जरी समग्र दृष्टिकोण वाटत असला, तरी व्यावहारिक पातळीवर त्याची अंमलबजावणी करताना समस्या येतात. स्त्रियांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्याचे सूत्र बऱ्याच संस्थांनी स्वीकारले असले, तरी स्त्रियांचे समाजातील स्थान, शिक्षण, प्रथा, परंपरा, हिंसा या बाबींमुळे स्त्रियांना समानता मिळविण्याची वास्तविक प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही.

संदर्भ :

  • Boserup, E., Women’s Role in Economic Development, London, 1970.
  • Rathgeber, E., WID, WAD, GAD : Trends in Research and Practice, Ottawa, 1989.
  • Young, K., Gender and Development : Notes for a Training Course on Gender and Development, Toronto, 1987.

समीक्षक : स्नेहा गोळे