भारतात प्रामुख्याने त्रिपुरा, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांत वास्तव्यास असणारी एक आदिवासी जमात. ही जमात काही प्रमाणात मेघालय आणि पश्चिम बंगाल तसेच भारताबाहेर बांगला देशातही स्थलांतरित झालेली दिसून येते. या समाजाचे अनोखीया, तंटुगिया आणि मोंगला ही तीन मुख्य प्रकार असून गस्टी, गाचीला, फ्रांगसा, अर्का, बंगालू, बाला हे त्यांचे उपप्रकार आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या ९७,४८६ इतकी होती.
चक्मा जमातीचा इतिहास फारसा स्पष्ट नाही. काही मौखिक इतिहासानुसार ही जमात प्राचीन मगध राज्यातून आराकन येथे स्थलांतरित झाली असावी. नंतर तेथून हे लोक हळूहळू बांगला देशातील चितगाँगच्या डोंगर भागांत स्थलांतर केले. त्यांनी तेथे बांबू, तांदूळ, कापूस (कपाशी), भाजीपाला यांची लागवड करण्यास सुरुवात केली. इ. स. १७१७ मध्ये मोगल व बंगाल यांच्यात करार होऊन चक्मांना स्वायतत्ता देण्यात आली. चक्मा लोक हिमालयीन आदिवासी समुदायांपैकी शाक्य बौद्ध कुळाचा एक भाग असल्याचे मानतात.
चक्मा लोक उंचीला बुटके असून त्यांचे डोके गोल, छोटे नाक, डोळे लहान आणि चेहरा चपटा व मध्यम आकाराचा असतो. त्यांची मूळ भाषा इंडो-आर्यन प्रकारची असून ते बंगाली, हिंदी, आसामी या भाषा बोलतात. चक्मा पुरुष आखूड धोतर आणि बंडी घालतात, तर स्त्रिया काळ्या किंवा निळ्या रंगाची व लालकाठ असलेली लुंगी आणि अरुंद कापडाची चोळी परिधान करतात. काळाप्रमाणे त्यांच्या पेहरावात बदल होत असून मुले पँट-शर्ट, तर मुली आधुनिक वस्त्रे परिधान करताना दिसतात.
चक्मा जमातीचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. पिकांची लागवड करणे, बदली लागवड करणे यांबरोबर मासेमारी आणि टोपल्या बनविणे, बांबूंपासून विविध घरगुती वस्तू आणि टोपल्या बनविणे इत्यादी व्यवसायसुद्धा या जमातीचे पुरुष व स्त्रीया करतात. काही तरुण-तरुणी शिक्षण घेऊन सरकारी नोकऱ्यांसह वेगवेगळ्या क्षेत्रांत नोकरी करीत आहेत. चक्मा लोक मांसाहारी आहेत. त्यांचे मुख्य अन्न भात असून त्यासोबत ते कोळंबी, मासे, विविध भाजीपाला खातात. हे लोक गुडु हरा किंवा हा-डू-डू, घिलय हारा, नादेंग हारा व पोट्टी हारा इत्यादी खेळ खेळतात.
चक्मा जमातीत ठरवून विवाह केला जातो. आत्ते-मामे संबंधात लग्न केले जातात. तसेच विवाहित जोडप्यातील मुलाच्या लहान भावाचे लग्न मुलीच्या लहान बहिणीशी केले जाते. त्यांच्यात विधवा विवाहास संमती आहे; परंतु या वेळी लग्न सोहळा केला जात नाही.
चक्मांचे नेतृत्व चक्मा राजा करतात; ज्यांचा दर्जा इंग्रजांच्या काळापासून मान्य झाला आहे. तसेच बांगला देशाचे सरकारसुद्धा चक्मा राजाचा दर्जा मान्य केला आहे. चक्मा जमातीतील काही लोकांनी सर्वचेतनावाद व हिंदू धर्मातील काही तत्त्वांसह बौद्ध धर्मातील थेरवादाचा स्वीकार केला आहे. बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यापूर्वी ते प्रचलित असलेल्या परंपरा उदा., नववधूच्या सासरी होणाऱ्या आगमनाच्या वेळी वराच्या गावात किंवा घरी होणारा वहार बली आणि त्या अनुषंगाने वराहमांस भक्षण अशा प्रथा आजही पाळल्या जातात. बौद्ध धर्माबरोबरच काही चक्मा लोकांनी मुस्लीम धर्म स्वीकारला आहे. त्यांच्या संस्कृतीत बौद्ध आणि हिंदू संस्कृतींचा मेळ दिसून येतो. हे लोक काली, लक्ष्मी आणि विश्वकर्मा या देवतांची उपासना करतात. ते बिजू, अल्फालोनी, बुद्ध पोर्णिमा, कथीन सिवार दान इत्यादी सण साजरे करतात. बिशू हा बंगाली नववर्षदिनसुद्धा ते साजरा करतात.
चक्मा जमातीत मृतदेहावर संस्कार करून ते पुरतात आणि ७ दिवसांचा दुखवटा पाळतात. त्यांचा भुत-प्रेत या काल्पनिक गोष्टींवर विश्वास असून आत्म्यांना तृप्त करण्यासाठी आणि रोगांपासून दूर राहण्यासाठी ते बकरा, कोंबडी किंवा बदके यांचा बळी देतात.
संदर्भ :
- Singh, K. S., People of India, Oxford, 1998.
समीक्षक : शौनक कुलकर्णी