भारतातील एक आदिवासी जमात. आंध्र प्रदेश आणि ओडिशा या दोन राज्यांच्या सीमेवर या जमातीचे वास्तव्य आढळून येते. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील मनचिंगपूट मंडल या जंगलात; बोंडो पर्वतीय भागातील चित्रकोंडा, खैरापुट, कुदुमूलगुम्मा आणि ओडिशा राज्याच्या सीमेवरील रंगाबायलू व कोंडाकांबेरू पर्वतीय भागातील मलकांगिरी जिल्ह्यात ही जमात विखुरलेली आहे. यांची २०११ च्या जनगणनेनुसार ११,००० इतकी लोकसंख्या होती.

दिदयी जमातीची अनेक कुळे आहेत; पण संशोधनातून सिसा (पाल व सरडा), पांगी (पतंग), किल्लो (वाघ), किरसानी (दूध), जांबा (झाडुच्या काड्या), वरथाला (साप) आणि मुंडली (पक्षी) ही ७ कुळे निश्चित झाली असून त्यांना कुळचिन्हे आहेत. त्यांच्या कुळांची नावे हीच त्यांची आडनावे असतात.

दिदयी स्त्रिया लाल किंवा पांढऱ्या रंगाची चोळी घालतात व साडी नेसतात आणि पुरुष अरुंद सुती कापड कमरेभोवती गुंडाळतात. तरुण मुले पायात विजार आणि पूर्ण किंवा अर्ध्या बाह्यांचा शर्ट घालतात; परंतु सण-समारंभात पिसे व फुलांनी सजविलेले रंगीबेरंगी कपडे ते घालतात. स्त्रिया नाकात, कानात, गळ्यात, हातात, बोटात पितळ, ॲल्युमिनियम व क्वचित चांदीचे दागिने घालतात आणि केसांत कुपींग नावाची धातुची पिन लावतात. त्यांची भाषा ऑस्ट्रो-आशियाई भाषासमूह प्रकारची आहे. आपांपसात ते ‘दिदयी’ (मुंडारी) भाषेचा वापर करतात, तर इतरांशी बोलताना ओडिया भाषा वापरतात. त्यांच्यापैकी खूप थोड्या लोकांना तेलुगु भाषा समजते.

दिदयी लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. डोंगर उतारावर ते शेतीची लागवड करतात. जंगलातील लाकूडतोड करणे, विविध वस्तू, फळे, कंदमुळे गोळा करून ते विकणे तसेच शिकार करणे इत्यादी त्यांचा व्यवसाय आहे. ते शाकाहारी व मांसाहारी आहेत. गावठी दारू, भातापासून बनविलेली दारू आणि ताडी ते पितात.

दिदयी लोकांची घरे उंचवट्यावर बांधलेली असतात. लाकूड आणि मातीचा वापर करून ते घरे बांधतात. बांबूंच्या साहाय्याने घराचे छत बनविलेले असते. एकाच खोलीचे दोन भाग केलेले असतात आणि बाहेरच्या बाजूला वऱ्हांडा असतो. त्याचा उपयोग बसायला, झोपायला, पाळणा बांधायला तसेच दळण-कांडण करायला केला जातो.

दिदयी जमातीत आत्ते-मामे भावंडांची लग्ने लावली जातात. मुलांचे वय बारा ते पंधरा, तर मुलीचे वय दहा ते बारा या लहान वयात लग्न लावली जातात. अनैतिक आणि अनौपचारिक लग्नास संमती असते. दारू, बकऱ्या, २ गोणी तांदूळ, साड्या, रोख रक्कम आणि वऱ्हाडाला जेवण या स्वरूपात हुंडा घेतला जातो. जमातीत घटस्फोट आणि पुनर्विवाहास मान्यता आहे. बाळाच्या जन्मानंतर सात दिवस विटाळ पाळतात आणि सातव्या दिवशी बाळाचे बारसे करतात. मुलाचे किंवा मुलीचे जावळे त्यांच्या तिसऱ्या वर्षी समारंभपूर्वक करतात.

दिदयी जमातीत लेंडी पांडा, घिआ पांडा, भैरो पुजा इत्यादी सण-समारंभ साजरे करतात. या वेळी पुरुष गावठी दारू व ताडी पितात. स्त्रिया पारंपरिक लोकसंगीत म्हणून पुरुषांबरोबर समुहाने विशिष्ट प्रकारचे ‘डिमसा’ (ढेमसा) हे लोकनृत्य करून आपले सण-समारंभ साजरे करतात. त्यांचा अलौकिक शक्तीवर विश्वास असून प्रेतात्म्यावर त्यांचा विश्वास आहे. दिदयी जमातीतील पुजारी सर्व धार्मिक विधी पार पाडतो.

दिदयी समाज स्वच्छतेबद्दल सजग असल्याचे दिसून येते. शिक्षणासाठी यांचा फारसा सकारात्मक दृष्टिकोण दिसून येत नसला, तरी काही सुजाण पालक आपल्या पाल्यांना सरकारी शाळेत पाठवीत आहेत.

दिदयी जमातीत मृताला दफन किंवा दहन केले जाते आणि सात दिवसांचा दुखवटा पाळला जातो.

संदर्भ : Singh, K. S., People Of India, Delhi, 1998.

समीक्षक : लता छत्रे