भारतातील एक आदिवासी जमात. ही जमात प्रामुख्याने अरुणाचल प्रदेशाच्या पूर्व व पश्चिम सियांग जिल्ह्यात वास्तव्यास आहे. आदी जमातीची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १,२१,०५२ इतकी होती. हे लोक अबुतानीचे वंशज असल्याचे मानतात. आसामीमधल्या ‘अबोर’ या शब्दापासून ‘अबुतानी’ हा शब्द बनला असून त्याचा अर्थ ‘स्वतंत्र’ असा आहे. आदीचा शब्दश: अर्थ टेकडी किंवा पर्वतांचे टोक असा आहे.
आदी जमात ही अशिंग, बोकर, बोरी, गलाँग, कारको, कोमकार, मिलाँग, मियाँग, पदम, पैलीबो, पांगी, पासी, रामो, शिमाँग आणि तंगम या पंधरा उपशाखांमध्ये विभागली आहे. या सर्व उपजाती ‘अबुतानी’ हेच आपले पूर्वज असल्याचे मानतात. त्यांची आदी हिच बोलीभाषा असून आदीच्या उपजमाती आदी हिच भाषा थोड्याशा फरकाने बोलतात. इतर लोकांशी बोलताना ते ‘नेफामीज’ ही आसामी भाषेशी साधर्म्य असलेली भाषा वापरतात. त्यांची विशेष किंवा वेगळी अशी शारिरिक वैशिष्ट्ये नाहीत.
आदी लोकांचे कपडे त्यांच्याच महिलांनी तयार केलेले असतात. काही समूहांमध्ये पुरुष हरीण, काळवीट यांच्या कातड्यापासून शिवलेली टोपी घालतात. प्रौढ महिलांमधे गोंदवून घेण्याची प्रथा आहे. त्या गळ्यात पिवळ्या रंगाच्या माळा आणि कानात सर्पील आकाराच्या रिंगा घालतात. तरुण मुली पाच ते सहा पदरी पितळी माळा गळ्यात घालतात. बांबू, लाकूड, गवत आणि माती यांचा वापर करून साधारणपणे डोंगराच्या उतारावर, तसेच उंचावर ते आपली घरे बांधतात. त्यामुळे ती पर्यावरणपूरक असतात. घरात जायला पायऱ्या असतात. घराला दोन दारे असतात; मात्र खिडक्या नसतात. पुढचे दार पुरुषांसाठी आणि मागचे दार स्त्रियांसाठी असते. घर गरम राहण्यासाठी प्रत्येक घरात शेकोटी असते. जमीन व घराच्या जोत्याच्या मधल्या जागेत ते आपले पाळीव प्राणी ठेवतात.
आदी लोकांचे भात हे मुख्य अन्न असून ते शाकाहारी व मांसाहारी आहेत. ते तांदुळापासून दारू तयार करतात. दारू पिण्यास वयाचे अथवा लिंगाचे बंधन नाही. भात शेती करणे; सापळा रचून उंदीर, खार व इतर प्राण्यांची शिकार करणे; मासेमारी करणे; बांबुंपासून कलाकुसरीच्या वस्तू बनविणे इत्यादी त्यांचे प्रमुख व्यवसाय आहेत. तसेच बायका विणकाम करतात. नद्यांवर पूल बांधण्याच्या कामात आदी लोक तरबेज आहेत. स्त्रियांना पौरोहित्य करण्याचा अधिकार असतो.
आदी जमात स्वंयपूर्ण खेड्यांमधे वास्तव्य करतात. प्रत्येक गावात ‘केबांग’ नामक ग्राम परिषद असते. गावातल्या कामकाजाकरिता ‘गाम’ किंवा ‘गावबु’ या व्यक्तिला निवडतात. गावाचे कामकाज सुरळीत पार पाडणे आणि न्याय निवाडा करण्याचे काम या परिषदेमार्फत केले जाते. गावाच्या मध्यभागी ‘डेरे’ हा परिषद सभागृह असतो. ज्यामध्ये गावाच्या सामाजिक व सांस्कृतिक नियोजनाबाबत आदी लोक चर्चा करतात. तसेच ‘मोसूप’ ही मुलांसाठी आणि ‘राशेंग’ ही मुलींसाठी असे दोन युवागृहे बांधलेली असतात. मुलांमध्ये शिस्त आणि वळण लागावी हा या युवागृहाचा उद्देश असतो. वय वर्ष दहापासून लग्न होईपर्यंतचे मुलगे आणि दहाच्या पुढच्या अविवाहित मुली तेथे राहतात. मोठी माणसे त्यांच्यावर लक्ष ठेवतात. तरुण मुली तेथे विणकामासारखी कामे करतात. तरुण मुले व मुली तेथे एकत्र येतात व याच ओळखीतून ते लग्न करण्याचा निर्णय घेतात. त्यांच्यात एकपत्नीत्वाची पद्धत आहे.
आदी जमातीचे लोक एक अज्ञात धर्म मानतात. धर्माला दोन्यी – पोलो (सूर्य, चंद्र) असे म्हणतात. सूर्य, चंद्र हेच सर्व शक्तींचा स्रोत आहेत, असे ते मानतात. किने-ना-ने, दोइंग बोते, गुमीं सोईन आणि पेडोन्ग नाने ही त्यांची मूळ देवता असून ते त्यांची पूजा करतात. अलीकडे त्यांच्या गावात मंदिरांची स्थापना होऊ लागली असून त्या धर्माला एक निश्चित स्वरूप येते आहे. काही लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे.
आदी लोक शेतीशी निगडित असलेले व इतरही सण साजरे करतात. पेरणीच्या आधी ‘मोपीन’ व सुगीच्या आधी ‘सोलंग’ हे सण साजरे करतात. सोलंग हा स्वास्थ्य व सुबत्तेसाठी साजरा करतात. ते डुकराचा बळी देतात. आरण किंवा उन्यीग (७ मार्च), एटोर किंवा लुटोर (१५ मे), सोलुंग (१ सप्टेंबर) आणि पोडी-बार्बी (५ डिसेंबर) ही सणे हे लोक साजरे करतात. तापू हे युद्ध नृत्य आहे, तर याकजॉन्ग हा आरण सणाच्या वेळेचा त्यांचा नृत्य प्रकार आहे.
आदी लोक मृतास संपूर्ण एक रात्र घरात ठेवतात. दुसऱ्या दिवशी त्यास आंघोळ घालून नवीन कपडे घातले जाते आणि नंतर त्यास पुरले जाते. अपघाती किंवा अनैसर्गिकपणे मृत्यू पावलेल्या व्यक्तीस वेगळ्या स्मशानभूमीत त्वरीत पुरले जाते. ते भुता-खेतांवर विश्वास ठेवतात.
आज आदी जमातीतील लोक शहरांशी आणि इतर समाजांशी संपर्कात येत आहे. त्यामुळे त्यांचा पेहराव, राहणीमान, खानपान, एकूणच त्यांच्या जीवनशैलीत हळूहळू बदल होताना दिसून येत आहे. त्यांची मुले शिक्षण घेत असून काहीजण सरकारी नोकरीत आहेत.
संदर्भ :
- SINGH, K. S., People Of India, Oxford, 1998.
समीक्षक : लता छत्रे