इसे मोनोगातारी : अभिजात जपानी साहित्यातील सुप्रसिद्ध काव्यकथा (इ.स. ९८०). पद्य- गद्य मिश्रित असलेल्या या साहित्यकृतीत १४३ कथा संगृहीत आहेत. लेखकाच्या नावाबद्दल निश्चितपणे काही सांगता येत नाही. काही पुराव्यानुसार आरिवारा नो नारिहीरा हा या कथांचा रचयिता असू शकतो असा तर्क आहे. या संग्रहातील ३० कविता कोकिन वाकाश्यु (इ.स.९०५) या संग्रहात समान शीर्षकासह आल्या आहेत. या कविता आरिवाराने लिहिल्या आहेत. इसे मोनोगातारी ही साहित्यकृती जपानी अभिजात साहित्यातील पहिली काव्यकथा आहे. यातील पद्य वाका (अभिजात जपानी काव्यप्रकार) या प्रकारातील आहे. कविता असल्यामुळे त्या छोट्या आहेत. त्यांची अर्थाबाबतची संदिग्धता स्पष्ट करण्यासाठी गद्याचा उपयोग केला आहे. या साहित्यकृतीपासून काव्यकथा हा नवीन साहित्यिक प्रकार सुरू झाला. यामध्ये वयात आलेला तरुण ते वृद्ध झालेला माणूस असा प्रवास रेखाटला आहे. दरम्यान युवकाचे साहस, प्रेम या भावना त्यात अभिव्यक्त झाल्या आहेत. हे जीवनचरित्र नाही. परंतु यातील काही घटनांचे आरिवारा नो नारिहीरा या उमद्या उच्चकुलीन सरदाराच्या आयुष्यातील घटनांशी साधर्म्य दिसून येते. हेइआन काळातील साहित्यात प्रचलित असलेल्या रीतीनुसार सौंदर्यशास्त्राचा पुरेपूर उपयोग यामध्ये केल्याचे दिसते. या साहित्यकृतीचा नंतरच्या जपानी साहित्यावर आणि विशेषतः गेंजी मोनोगातारी या साहित्यकृतीवर मोठा प्रभाव दिसून येतो. या साहित्यकृतीचे इंग्रजीमध्ये Tales of Ise, Stories of Ise ही भाषांतरे झाली आहेत.
संदर्भ :
- Kodansha, Kodansha Encyclopedia of Japan, Vol.3, New York,1983.
समीक्षक : निस्सीम बेडेकर