बौमान, ऑस्कर (Baumann, Oskar) : (२५ जून १८६४ – १२ ऑक्टोबर १८९९). ऑस्ट्रियन समन्वेषक, मानचित्रकार आणि मानववंश वर्णनतज्ज्ञ. त्यांचा जन्म ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे झाला. त्यांनी व्हिएन्ना विद्यापीठ, लाइपसिक विद्यापीठ येथून निसर्गेतिहास आणि भूगोल या विषयांचे शिक्षण घेतले. इ. स. १८८५ मध्ये जर्मन-ऑस्ट्रियन भूशास्त्रज्ञ आणि खनिजशास्त्रवेत्ता ऑस्कर लेंझ यांच्या मार्गदर्शनाखाली काँगो खोऱ्याच्या समन्वेषणासाठी काढलेल्या ऑस्ट्रियन मोहिमेत सहभागी होण्याचा निर्णय बौमान यांनी घेतला होता; परंतु गंभीर आजारपणामुळे ही मोहीम अंतिम निर्णयाप्रत येण्यापूर्वीच त्यांना त्यातून बाहेर पडणे भाग पडले. त्यानंतर इ. स. १८८६ मध्ये त्यांनी आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून ३२ किमी. वर आणि विषुववृत्तीय गिनी या देशाचा सर्वांत उत्तरेकडील भाग असलेल्या बीओको (फर्नॅदो पो) बेटावरील मानववंश वर्णनविषयक संशोधनाचे काम हाती घेतले. तेथून परत आल्यानंतर त्यांना लाइपसिक विद्यापीठाची डॉक्टरेट ही पदवी मिळाली (इ. स. १८८८).

बौमान यांनी ‘जर्मन ईस्ट आफ्रिका’ (सांप्रतचे टांझानिया, रूआंडा आणि बुरूंडी देश) या प्रदेशाच्या अंतर्गत भागाचे समन्वेषण आणि त्या प्रदेशाचे नकाशे तयार केल्याबद्दल ते विशेष प्रसिद्धीस आले. इ. स. १८८८ मध्ये जर्मन भूशास्त्रज्ञ हान्स मायर यांच्या बरोबरीने त्यांनी आफ्रिकेतील ऊसम्बारा प्रदेशाचे समन्वेषण केले. तसेच पुढे किलिमांजारो पर्वताचे समन्वेषण करण्याची योजना आखली; परंतु इ. स. १८८८-८९ मध्ये तेथे झालेल्या तथाकथित आबुशिरी बंडामुळे त्या दोघांना आपली किलिमांजारोची मोहीम थांबवावी लागली. त्या वेळी बौमान आणि मेयर या दोघांना पकडून तुरुंगात टाकण्यात आले. नंतर बंडाचा नेता आबुशिरी इब्न सलीम अल-हार्थी यांच्याकडे दंडाची मोठी रक्कम भरल्यानंतर त्या दोघांची सुटका झाली.

बौमान यांनी इ. स. १८९१ – १९९३ मध्ये २०० सहकाऱ्यांसह मसाई लोकांची वस्ती असलेल्या (सांप्रत केन्या व टांझानिया) प्रदेशात काढलेली मोहीम ही त्यांची प्रसिद्ध मोहीम होय. या मोहिमेत बौमान यांनी त्या प्रदेशाचा नकाशा तयार करण्याची जबाबदारी पार पाडली. रूआंडात प्रवेश करणारे ते पहिले यूरोपीय होते (इ. स. १८९२). त्याच बरोबर ईयासी, मन्यारा या सरोवरांना आणि एनगॉरोंगॉर या ज्वालामुखी कुंडाला भेट देणारे तेच पहिले यूरोपीय होते. या मोहिमेत त्यांनी कागेरा नदीच्या शीर्षप्रवाहाचे समन्वेषण करून नाईल नदीचा हाच खरा शीर्षप्रवाह असल्याचे अनुमान काढले. इ. स. १८९४ मध्ये त्यांनी या मोहिवेवर आधारित बाय मसाईलँड टू द सोअर्स ऑफ नाईल बर्लिन, (इं. भा.) हे पुस्तक लिहिले.

ऑस्ट्रो-हंगेरियन शासनाने इ. स. १८९६ मध्ये बौमान यांची झांझिबार येथील राजदूत म्हणून नियुक्ती केली; परंतु त्यानंतर इ. स. १८९९ मध्ये वयाच्या पस्तीसाव्या वर्षी संसर्गजन्य आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथील एका भागाला बौमान यांचे नाव देण्यात आले आहे (इ. स. १९०२). आफ्रिकेतील टोगो (भूतपूर्व जर्मन रक्षित राज्य, टोगोलँड) या देशातील सर्वोच्च शिखर मौंट आगूला पूर्वी त्यांच्या नावावरून पिक बौमान (९८६ मी.) या नावाने ओळखले जाई. बौमान यांच्या वेगवेगळ्या वस्तूंचा संग्रह व्हिएन्ना येथील मानववंशशास्त्र आणि निसर्गेतिहास संग्रहालयात राखून ठेवलेला आहे.

बौमान यांनी आपल्या समन्वेषणाच्या अनुभवावरून पुढील ग्रंथांचे लेखन केले आहे (सर्व इंग्रजी भाषांतरित नावे). इन जर्मन ईस्ट आफ्रिका ड्युरिंग दी रिबेल्यन (१८९०); ऊसम्बारा अँड इट्स ॲड्जेसन्ट टेरिटरिज : जनरल डिस्क्रिप्शन ऑफ दी नॉर्थ ईस्टर्न जर्मन ईस्ट आफ्रिका अँड इट्स हॅबिटन्ट्स (१८९१); मॅप ऑफ नॉर्थ इस्टर्न जर्मन ईस्ट आफ्रिका (१८९३); दी कार्टोग्राफिक रिझल्ट्स ऑफ मसाई एक्स्पिडिशन :दी झांझिबार आर्किपेलगो (१८९६ – १८९९) इत्यादी.

समीक्षक : नामदेव स. गाडे