वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील सेंट लुसीया या द्वीपीय देशाची राजधानी आणि प्रमुख बंदर. लोकसंख्या ६५,६५६ (२०२२ अंदाजे). सेंट लुसीया बेटाच्या वायव्य किनाऱ्यावर हे शहर वसलेले आहे. कॅरिबियन समुद्राच्या पूर्व भागात असलेल्या लेसर अँटिलीस द्वीपमालिकेतील विंडवर्ड द्वीपसमूहात सेंट लुसीया हा देश आहे. विंडवर्ड बेटांपैकी मार्तीनीक बेटे हा फ्रान्सचा सागरपार प्रांत आहे. या सागरपार प्रांताची प्रशासकीय राजधानी आणि प्रमुख शहर असलेल्या फॉर द फ्रान्सच्या दक्षिणेस ६५ किमी. वर कॅस्त्री शहर आहे.

कॅस्त्री शहर फ्रेंचांनी इ. स. १६५० मध्ये वसविल्याचे मानले जाते. दुसऱ्या महायुद्धात ९ मार्च १९४२ रोजी जर्मन नौसेनेने मित्रराष्ट्रांची दोन जहाजे या बंदरात बुडविली होती. हे देशातील प्रमुख भूवेष्टित खोल सागरी बंदर आहे. या बंदरातून केळी, ऊस, मळी, रम दारू, कोको, नारळ, खोबरे, लिंबु व लिंबांची सरबते, बाष्पनशील तेल, विविध उष्ण कटिबंधीय फळे व भाजीपाला इत्यादी मालांची निर्यात केली जाते. येथे वेस्ट इंडीज विद्यापीठाची शाखा आहे. कॅस्त्री शहर हे देशातील प्रमुख पर्यटन केंद्र असून लगतच्या २६० मी. टेकडीवरील मौंट फॉर्ट्युन किल्ला, वनस्पती उद्यान, व्हीजीए पुळण ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. बेटावरील इतर भागांशी हे शहर रस्त्यांनी जोडलेले आहे. व्हीजीए हा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. बंदरात क्रूझ जहाजांच्या सुविधा आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी