जपानच्या होन्शू बेटावरील मीयागी प्रांताची राजधानी व एक प्रमुख शहर. यास सेंडाई शहर असेही म्हणतात. लोकसंख्या १०,९१,४०७ (२०२०). होन्शू बेटाच्या ईशान्य भागात हीरोसे या नदीकाठावर हे शहर वसले असून ते सेंदाई उपसागर किनाऱ्यापासून पश्चिमेस अंतर्गत भागात सुमारे १३ किमी.वर आहे. सरोवराचा पूर्व भाग सखल, मध्यभाग टेकड्यांचा, तर पश्चिम भाग पर्वतीय आहे. शहराच्या परिसरात हिरवीगार दाट वनश्री आढळते. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला झेल्कोव्हा ही शोभेची झाडे मुबलक आढळतात. त्यामुळे या शहराचा ‘वृक्षांचे शहर’ किंवा ‘वनांची राजधानी’ (फॉरेस्ट कॅपिटल) असा उल्लेख केला जातो. शहराचे हवामान आर्द्र समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचे आहे. उन्हाळे उबदार व आर्द्र, तर हिवाळे थंड व कोरडे असतात. येथे ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक (२४° से.), तर फेब्रुवारीमध्ये सर्वांत कमी (- १° से.) तापमान असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११४ सेंमी. असते.

सुमारे २०,००० वर्षांपूर्वीपासून सेंदाई परिसरात मानवी वस्ती असावी. दाइम्यो सरंजामदारांपैकी दाते मासामूने यांनी इ. स. १६०० मध्ये आपल्या राजधानीचे ठिकाण म्हणून वास्तुशास्त्रीय दृष्ट्या नियोजन करून या नगराची सांप्रत नव्या जागी स्थापना केली; कारण त्यांना पूर्वी स्थित असलेल्या सेंदाईचे स्थान सोयीचे वाटत नव्हते. त्यामुळे शहराचा इतिहास खऱ्या अर्थाने इ. स. १६०० पासून सुरू होतो. टोकिओ ते सेंदाई यांदरम्यानचा पहिला लोहमार्ग इ. स. १८८७ मध्ये सुरू झाला. इ. स. १८८९ मध्ये याला शहराचा दर्जा मिळाला. दुसऱ्या महायुद्धकाळात दोस्त राष्ट्रांनी या शहरावर बाँबहल्ले करून याचा विध्वंस केला होता. त्यानंतर संपूर्ण शहराची नियोजनपूर्वक पुनर्रचना करण्यात आली. सांप्रत हे प्रमुख धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक व व्यापारी केंद्र आहे. शहरात रेशीम, लाकडी बाहुल्या व इतर लाकडी वस्तू, खाद्यपदार्थ, रसायने, रबर, पोलाद निर्मिती, यंत्रसामग्री, इतर धातू उत्पादने व छपाई हे उद्योग चालतात. परिसरत धानाची शेती व फळबागा आहेत. रस्ते व लोहमार्ग वाहतुकीचे हे प्रमुख केंद्र आहे. शहर किनाऱ्यापासून अंतर्गत भागात असल्यामुळे जलवाहतुकीसाठी ईशान्येस २४ किमी.वरील सेंदाई उपसागर किनाऱ्यावर असलेल्या शीओगामा बंदरावर अवलंबून राहावे लागते. सेंदाईचा आंतरराष्ट्रीय विमांनतळ नातोरी येथे आहे. शहरात तोहोकू विद्यापीठ (इ. स. १९०७), वस्तुसंग्रहालये, एक वेधशाळा व अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. शहराच्या पश्चिमेस आओबा टेकडीवर सोळाव्या शतकातील सेंदाई (आओबा) किल्ल्याचे भग्नावशेष आढळतात. येथील ओसाकी हाचीमां हा शिंतो स्तूप वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. दरवर्षी येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या ‘तानाबाता (स्टार) फेस्टिवल’ या महोत्सवासाठी देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात.

सेंदाईच्या परिसरात काही मृत ज्वालामुखी असून तेथे गरम पाण्याचे अनेक झरे आढळतात. शहराला वारंवार भूकंपाचे धक्के बसतात. १६ ऑगस्ट २००५ रोजी येथे रिश्टर मापक्रमानुसार ७.२ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. ११ मार्च २०११ रोजी जपानला आणि साहजिकच सेंदाई शहराला भूकंपाचा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड त्सुनामी लाटांचा तडाखा बसला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू सेंदाईच्या पूर्वेस १३० किमी. अंतरावर, पॅसिफिक महासागरात होता. रिश्टर मापक्रमानुसार या भूकंपाची तीव्रता ९.०० इतकी प्रचंड होती. भूकंपाचा हादरा आणि त्सुनामी लाटांमुळे सेंदाईमधील मोठी जीवितहानी व वित्तहानी झाली होती. अनेक लोक मृत्यू पावले, जखमी, बेघर, विस्थापित झाले किंवा काहींचा थांगपत्ताच लागला नाही. प्रचंड वेगाने आलेल्या त्सुनामीमुळे लोकांना बचावाची संधीच मिळू शकली नाही. प्रामुख्याने शहराच्या सखल भागाची जास्त हानी झाली. शासनाने तातडीने आपत्ती निवारणाच्या अनेक योजना आखल्या. बचावकार्य सुरू केले, पायाभूत सुविधांची पुन:निर्मिती केली, नागरी सुविधा सुरू करून लोकांचे विस्कळीत झालेले जीवनमान पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला.

समीक्षक : ना. स. गाडे