आशियातील पूर्व तिमोर देशाची राजधानी व देशातील प्रमुख सागरी बंदर. लोकसंख्या २,२२,३२३ (२०१५ अंदाजे). हे शहर तिमोर बेटाच्या उत्तर किनाऱ्यावर, ऑम्बाई सामुद्रधुनीवर वसलेले आहे. शहराच्या दक्षिणेस पर्वतीय प्रदेश आहे. तिमोर हे इंडोनेशियाच्या छोटी सुंदा द्वीपसमूहातील अगदी पूर्वेकडील बेट आहे. राजकीय दृष्ट्या तिमोर बेटाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग आहेत. जुलै १९७६ मध्ये इंडोनेशियाने घेईपर्यंत पूर्वेचा साधारण निम्मा भाग पोर्तुगीजांकडे होता आणि पश्चिमेकडील नुसा तेंगारा तिमूर हा निम्मा भाग आधीच इंडोनेशियाकडे होता.
पोर्तुगीजांनी सुमारे इ. स. १५२० मध्ये दिली शहर वसविले आणि त्यांनी पोर्तुगीज तिमोर वसाहतीचे (पूर्व तिमोरचे) हे प्रशासकीय केंद्र केले. स्पॅनिश, डच, ब्रिटिश यांनी याचा ताबा मिळविण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. इ. स. १७६९ मध्ये पोर्तुगीज तिमोरची दिली राजधानी करण्यात आली. इ. स. १८६४ मध्ये यास शहराचा दर्जा देण्यात आला. दुसऱ्या महायुद्धकाळात दोस्तराष्ट्रे आणि जपानी फौजांमधील लढाईचे दिली हे प्रमुख केंद्र बनले होते. त्या वेळी जपानने या शहराचा ताबा घेतला. त्यामुळे अनेक वर्षांची पोर्तुगीज सत्ता अल्पकाळ संपुष्टात आली; मात्र इ. स. १९४५ पासून हे शहर पुन्हा पोर्तुगालच्या अधिपत्याखाली आले. पोर्तुगालपासून पूर्व तिमोरने १९७५ मध्ये स्वातंत्र्य मिळविले. त्याचवर्षी तिमोरीय राजकीय पक्षांमध्ये यादवी युद्धाचा भडका उडाला. १९७६ मध्ये इंडोनेशियाने यावर आपला अंमल प्रस्थापित केला व दिली हीच राजधानी ठेवली. इंडोनेशियन राजवटीत दिली येथे पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला. त्यांच्याच राजवटीत येथे इमॅक्यूलेट कन्सेप्शन कॅथीड्रल या रोमन कॅथलिक चर्चची आणि क्रिस्तो रेइ ऑफ दिली या २७ मी. उंचीच्या येशू ख्रिस्ताच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली. पूर्व तिमोरमधील गनिमी सैनिकांनी इंडोनेशियन राजवटीच्या विरोधात गनिमी काव्याने लढाई करीत तीव्र प्रतिकार केला. पूर्व तिमोरची लोकसेना आणि इंडोनेशियन सैन्य यांच्यामध्ये झालेल्या या युद्धात हजारो स्थानिक नागरिक मारले गेले. या वेळी पायाभूत सुविधांची प्रचंड हानी झाली. त्यामुळे इंडोनेशियावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला. तद्नंतर १९९९ मध्ये यूनोच्या देखरेखीखाली पूर्व तिमोरला स्वातंत्र्य दिले गेले व दिली हे प्रशासकीय केंद्र बनले. त्यानंतर २००२ मध्ये पूर्व तिमोरला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले आणि दिली ही त्याची राजधानी झाली.
दिली येथील हवामान उष्ण कटिबंधीय आहे. देशातील हे प्रमुख आर्थिक, व्यापारी, ऐतिहासिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. येथे शैक्षणिक सुविधा चांगल्या आहेत. पर्यावरणीय, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांचा विकास करून पर्यटन व्यवसायाला चालना दिली जात आहे. येथील बहुतांश इमारतींमध्ये पोर्तुगीज वास्तुकला दिसून येते. येथील मार्केट हॉल (इ. स. १८३०), दिली कॅथीड्रल, रोमन कॅथलिक चर्च, मॉटील चर्च, गिरिनाथ हे हिंदु मंदिर, राष्ट्रीय ग्रंथालय आणि प्रेक्षागार, येशू ख्रिस्ताचा पुतळा आणि सुंदर पुळणी प्रसिद्ध आहेत. दिलीमध्ये प्रामुख्याने तिमोरीज आणि अँटोनीज लोकांचे आधिक्य असून पोर्तुगीज, यूरेशियन आणि अरब मुस्लिम अल्पसंख्य आहेत. टेटम ही येथील स्थानिक भाषा आहे.
समीक्षक : वसंत चौधरी