कॅरिबियन समुद्रातील सेंट व्हिन्सेंट व ग्रेनेडीन्झ या द्वीपीय देशाची राजधानी. लोकसंख्या १२,९०९ (२०१२). पूर्व कॅरिबियातील अँटिलीस द्वीपमालिकेत सेंट व्हिन्सेंट व ग्रेनेडीन्झ ही बेटे स्थित आहेत. त्यांतील सेंट व्हिन्सेंट या सर्वांत मोठ्या व मुख्य बेटाच्या अगदी नैर्ऋत्य टोकावर हे शहर वसले आहे. शहराच्या उत्तरेस बर्कशर हिल ही टेकडी आणि दक्षिणेस केन गार्डन पॉइंट हा समुद्रात घुसलेला चिंचोळा भूभाग आहे.

फ्रेंच वसाहतकऱ्यांनी इ. स. १७२२ नंतर आधुनिक किंग्स्टाउन शहराची स्थापना केली. हे देशातील प्रमुख सागरी बंदर आणि व्यापारी केंद्र असून तेथून केळी, आरारूट, नारळ, रताळी, सुरण, टारो कंद यांची निर्यात केली जाते. हे एक प्रमुख पर्यटन केंद्र आहे. येथील वनस्पती उद्यान (स्था. इ. स. १७६५) हे वेस्ट इंडीजमधील सर्वांत जुन्या वनस्पती उद्यानांपैकी एक असून ते पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. ब्रिटिश कॅप्टन विल्यम ब्लाय यांनी पॅसिफिक प्रदेशातून आणलेल्या भाकरीच्या वृक्षांची या उद्यानात पहिल्यांदा लागवड केली (इ. स. १७९३). पर्यटकांसाठी येथील बंदरात क्रूझ या जलपर्यटन जहाजांची सुविधा करण्यात आलेली आहे.

येथील ग्रंथालय, वस्तुसंग्रहालय, सेंट जॉर्जेस कॅथीड्रल, व्हिला पुळण इत्यादी प्रसिद्ध आहेत. सेंट व्हिन्सेंट बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावरील शॅतोबलॉर, पूर्व किनाऱ्यावरील जॉर्जटाउन आणि उत्तर टोकाशी असलेल्या फॅन्सी या शहरांशी हे रस्त्यांनी जोडलेले आहे. शहराच्या दक्षिणेस आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

समीक्षक : वसंत चौधरी