आफ्रिकेतील नायजेरिया देशाची राजधानी आणि देशातील एक योजनाबद्ध नगररचना केलेले शहर. लोकसंख्या ९२,४०,००० (२०१६ अंदाज). देशाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या फेडरल कॅपिटल टेरिटरी (एफसीटी) किंवा आबूजा फेडरल कॅपिटल टेरिटरी (स्था. १९७६) या राज्यक्षेत्राच्या मध्यावर आबूजा हे शहर आहे. नायजर-बेन्वे या नद्यांच्या संगमाच्या उत्तरेस हे राज्यक्षेत्र आहे. देशाची भूतपूर्व राजधानी लागोस या शहरापासून ईशान्येस सुमारे ४८० किमी.वर हे शहर आहे. लागोसपेक्षा येथील हवामान थंड आणि कमी आर्द्रतेचे आहे. १९८० च्या दशकात चिकूकू हिल्स या स. स. पासून ३६० मी. उंचीच्या गवताच्छादित टेकडीवर नियोजनबद्ध रीत्या या शहराची उभारणी करण्यात आली. देशातील हे पहिलेच नियोजनबद्ध शहर असून त्याचा आराखडा जपानी वास्तुविशारद केंझो टँगी यांनी तयार केलेला आहे. देशातील मध्यवर्ती स्थान, सुगमता, आल्हाददायक हवामान, विरळ लोकसंख्येचा प्रदेश, भविष्यातील शहराचा विकास आणि विस्तार यांसाठी पुरेशा भूक्षेत्राची उपलब्धता यांमुळे आबूजाची राजधानीसाठी निवड करण्यात आली. १२ डिसेंबर १९९१ पासून ही देशाची राजधानी आहे.

आबूजा हे देशातील सर्वांत वेगाने वाढ झालेले शहर आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात नगरभवन, राष्ट्रीय सांस्कृतिक संस्था व इतर प्रशासकीय कार्यालये आहेत. तसेच येथे राष्ट्राध्यक्ष निवास, राष्ट्रीय विधानभवन, सर्वोच्च न्यायालय हे शासनाचे महत्त्वपूर्ण तीन विभाग आहेत. त्यामुळे त्या भागाला ‘थ्री आर्म्स झोन’ या नावाने संबोधिले जाते. त्याशिवाय राष्ट्रीय वनस्पती वाटिका, राष्ट्रीय ख्रिश्चन केंद्र, राष्ट्रीय मशीद, शहरातील सर्वांत मोठे मिलेनिअम पार्क, मिलेनिअम टॉवर, नॅशनल चिल्ड्रेन्स पार्क, प्राणि संग्रहालय इत्यादी शहर व परिसरात असून ती पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. शहराच्या इतर भागांत उत्तम निवास व्यवस्था, खरेदी सुविधा आणि नागरी सुविधा उपलब्ध आहेत. शहराच्या पश्चिम सीमेवर विविध खेळांच्या सुविधा असलेले प्रशस्त असे राष्ट्रीय क्रीडागार आहे. आबूजा हे देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र असून बाझे, नाईल, आबूजा, नायजेरिया राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नायजेरिया-तुर्कीश नाईल विद्यापीठ ही येथील प्रमुख विद्यापीठे आहेत. हे प्रस्तावित लागोस-कानो या लोहमार्गावर असून द्रुतगती महामार्गांनी ते देशातील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. एन्नाम्दी अझीकिवे हा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहे. शहरात भुयारी मार्गाने वीजपुरवठा केलेला आहे. आबूजाच्या नैर्ऋत्येस नायजर नदीवर शिरोरो हे धरण बांधण्यात आले असून तेथील जलविद्युतनिर्मिती केंद्र हा शहरातील विजेचा प्रमुख स्रोत आहे.

समीक्षक : वसंत चौधरी