वॉलरस्टाइन, इमान्युएल (Wallerstein, Immanuel) : (२८ सप्टेंबर १९३० – ३१ ऑगस्ट २०१९). प्रसिद्ध अमेरिकन समाजशास्त्रज्ञ व जागतिक-व्यवस्थाप्रणाली सिद्धांताचे जनक. त्यांनी ऐतिहासिक समाजशास्त्राच्या मुख्यप्रवाहात राहून भांडवली व्यवस्थेचा उगम, विकास आणि तिचे स्वरूप यांबद्दलचे विश्लेषण मार्क्सवादी पद्धतीने केले. वॉलरस्टाइन यांचा जन्म न्यूयॉर्कमधील यहुदी स्थलांतरित कुटुंबामध्ये झाला. त्यांनी १९५१ मध्ये बी. ए., १९५४ मध्ये एम. ए. आणि १९५९ मध्ये पीएच. डी. या पदव्या कोलंबिया विद्यापीठातून संपादन केल्या. शिकत असतानाच त्यांनी १९५१ ते १९५३ या काळात अमेरिकी सैन्यात आपले योगदान दिले. पीएच. डी. नंतर ते १९५८ ते १९७१ या काळात कोलंबिया विद्यापीठातच समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते पाच वर्षांसाठी कॅनडा येथील मॅकगिल विद्यापीठात समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांचे सुरुवातीचे काम आफ्रिका खंडावर होते. १९६० च्या दशकात त्यांनी आफ्रिका खंडातील विविध देशांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जडणघडणीवर लक्ष केंद्र केले. त्यांनी प्रामुख्याने घाना आणि आयव्हरीकोस्ट या देशांचे समग्र अध्ययन करून त्याद्वारे आफ्रिकेतील देशांचा वसाहतवादाविरोधातील लढा जगासमोर आणला. १९७६ मध्ये वॉलरस्टाइन हे न्यूयॉर्कमधील बिंगहॅटन विद्यापीठाच्या ‘फर्नांद ब्रोदेल सेंटर फॉर द स्टडी ऑफ एकॉनॉमीज, हिस्टोरिकल सिस्टीम्स अँड सिव्हिलायझेशन्स’ या संशोधन केंद्राचे प्रमुख झाले. १९७४ ते २०११ या काळात त्यांनी द मॉडर्न वर्ल्ड-सिस्टीमचे चार खंड प्रकाशित करून ‘जागतिक-व्यवस्थाप्रणाली’ या नवीन समाजशास्त्रीय सिद्धांताचा सूतोवाच केला.

जागतिक व्यवस्थाप्रणाली सिद्धांत : वॉलरस्टाइन यांनी भांडवलशाही व्यवस्था जागतिक पातळीवर चालते, हे आपल्या जागतिक व्यवस्थाप्रणाली या सिद्धांतातून सप्रमाण सिद्ध केले आहे. भांडवलशाहीमुळे संपूर्ण जग एक आर्थिक एकक बनले आहे. त्यामुळे सोळाव्या शतकापासून उत्पादन, विक्री, वितरणाची सर्व गणिते ही भांडवलाच्या सोयीने आखली जाऊन पर्यायाने संपूर्ण जग भांडवलशाहीमध्ये गुंफले गेले. याचा परिणाम असा झाला की, यूरोपातील अनेक देशांना एकमेकांशिवाय व्यवहार करणे अशक्य झाले. या गुंतागुंतीच्या आणि प्रामुख्याने शोषणावर आधारित असलेल्या आर्थिक खेळीला वॉलरस्टाइन यांनी ‘जागतिक व्यवस्थाप्रणाली’ असे संबोधिले आहे. या आर्थिक व्यवहारात राष्ट्रांना परस्परांवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळेच हा सिद्धांत ‘परावलंबन सिद्धांत’ म्हणूनही ओळखला जातो.

वॉलरस्टाइन यांच्या मते, जागतिक भांडवलशाहीच्या विस्तारामागे यूरोपीय भांडवलशहांनी केलेले सिमांतिक वसाहतींचे शोषण हे एकमेव कारण आहे. त्यांच्या या मांडणीपूर्वी भांडवलशाहीच्या विस्ताराचे विश्लेषण प्रामुख्याने प्रकार्यवादी सिद्धांत आणि आधुनिकीकरण सिद्धांत यांद्वारे केले जात होते. प्रकार्यवादी सिद्धांतानुसार भांडवलशाहीची उपयुक्तता हे जागतिक भांडवलशाहीच्या विस्ताराचे कारण आहे, असे प्रतिपादित करतो; तर आधुनिकीकरण सिद्धांतानुसार यूरोपातील आधुनिकतेचे उर्वरित जगाला अनुकरण करावेसे वाटल्यामुळे खऱ्या अर्थाने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन पद्धती, जीवनसरणी आणि पर्यायाने भांडवलशाही जगभर पसरली. वॉलरस्टाइन यांनी या दोन्ही सिद्धांतांची चिकित्सा करत असे प्रतिपादन केले की, भांडवलशाहीचा विस्तार मुळात यूरोपीय देशांनी नफा कमविण्याच्या उद्देशाने काबीज केलेल्या वसाहतीच्या शोषणामुळे शक्य झाला. यातून त्यांनी या जागतिक भांडवलशाही व्यवस्थेत जगाची वाटणी केंद्र, परीघ आणि अर्ध परीघ या संकल्पनांच्या आधारावर झाली आहे, हे स्पष्ट केले. त्यांच्या मते, यूरोप हे या व्यवस्थेचे केंद्र ठरले. तसेच भांडवलशाहीने एक  प्रकारची गुंतागुंतीची आर्थिक व्यवस्था निर्माण केली की, ज्यात परस्परांवर अवलंबून राहावे लागते. भांडवलशाही प्रक्रियेत तिसऱ्या जगाला (परिघावरचे देश) केंद्रावर म्हणजेच विकसित देशांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागत असल्यामुळे त्यांचे शोषण होते. या व्यवस्थेत परिघाचे कार्य कायमच कचा माल पुरविणे, स्वस्त श्रमिक पुरविणे आणि तयार माल विकत घेणे हे असल्याचे दिसते. तसेच जे देश धड केंद्रस्थानीही नसतात आणि परिघावरही नसतात त्यांचे वॉलरस्टाइन यांनी अर्ध परीघ म्हणून वर्गीकरण केले. उदा., जागतिक भांडवलशाहीच्या या व्यवस्थेत स्पेन व ऑस्ट्रिया या ढासळत्या सत्ता आणि रशिया व जपान या नव्या औद्योगिक सत्ता या अर्ध परीघ बनल्या.

वॉलरस्टाइन यांच्या सर्व सिद्धांतांवर प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा प्रभाव होता. मार्क्स यांनी वर्गजाणिवेच्या संदर्भात जी मांडणी केली, त्याला वॉलरस्टाइन दुजोरा देतात. भांडवलशाही व्यवस्थेत भांडवलदार कामगारवर्गाचे शोषण करून आणखी श्रीमंत होतो आणि मजूर आणखी गरीब होत जातो. त्यामुळे एक दिवस मजुरांना आपल्या सर्व शोषणाची जाणीव होईल आणि तो भांडवलदाराविरुद्ध संघर्ष करेल, हा मार्क्स यांचा वर्गसंघर्ष सिद्धांत वॉलरस्टाइन मान्य करतात; परंतु क्रांतीतून वर्गविहीन, शोषणरहित समाज उदयाला येईल’ हे तथ्ये न तपासताच मार्क्स यांनी भविष्यवाणी केली, त्याबद्दल वॉलरस्टाइन चिकित्साही करतात. ब्रोदेल यांच्या मतांचा पुनरुच्चार करून वॉलरस्टाइन प्रतिपादन करतात की, केवळ अर्थव्यवस्थेचा अभ्यास उपयुक्त असला, तरी तो पुरेसा नसतो. संपूर्ण संस्कृतीच्या दीर्घकालीन वाटचालीचा अभ्यास झाला पाहिजे, तरच तथ्यांमधील सत्यत: समजू लागते आणि ते सिद्धांत मांडणीला पोषक असते. सगळा कालखंड तुकड्यांमध्ये वाटला जाऊ नये, तर समाजव्यवस्थेला समष्टीच्या पार्श्वभूमीतून बघायला हवे. त्या कारणास्तव वॉलरस्टाइन सोळाव्या शतकापासून ते विसाव्या शतकापर्यंतच्या व्यवस्थाप्रणालीची मांडणी अधिक बारकाईने करतात.

वॉलरस्टाइन यांनी आपल्या सिद्धांतामध्ये सामाजिकशास्त्रे, यूरोपकेंद्रिता व विद्याशाखीयता यांसंदर्भात महत्त्वाची मांडणी केलेली आहे. त्यांच्या मते, सामाजिकशास्त्रे ही आधुनिक जागतिक-प्रणालीचे एक उत्पादन आहे आणि यूरोपकेंद्रितता हे त्याचे वैशिष्ट्य आहे. भांडवलशाही व वसाहतवाद या जगाची पुनर्मांडणी करणाऱ्या दोन प्रक्रियांनी मानवाच्या सत्याच्या (शास्त्रीय सत्य) शोधाची दिशा आणि स्वरूप बदलून टाकली आहे. याचा परिणाम नवे विषय, व्याख्या व अभ्यासक्षेत्रे साचेबंद पद्धतीने ठरविली गेली. उदा., ब्रिटन, जर्मनी, इटली आणि अमेरिका या देशांत किमान इ. स. १९४५ पर्यंत सामाजिकशास्त्राच्या शाखांची संख्या काही प्रमाणात होती. आज सामाजिकशास्त्रे जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात विस्तारलेली असली, तरी जगभरातील सामाजिक शास्त्रज्ञांचे बहुतेक अभ्यासक, विचावंत यूरोपियनच आहेत. आशिया आणि आफ्रिका या खंडांत असलेल्या देशांतील लोकांना या ज्ञानाच्या राजकारणात स्थान दिले गेले नसून त्यांना कमी महत्त्वाचे मानले गेले.

वॉलरस्टाइन यांनी गुल्बेन्कियन फाउंडेशनमार्फत लिहिलेल्या ‘ओपन सोशल सायन्सेस’ या अहवालात त्यांनी सत्याच्या शोधातील श्रमविभागणीविषयी चिकित्सक मांडणी केली. त्याच बरोबर त्यांनी ही श्रमविभागणी अधिक बळकट करण्यामागचे जागतिक अर्थकारणदेखील त्यामध्ये दाखवून दिले. त्यांनी ज्ञानशाखेतील पाश्चिमात्य प्रभुत्व कमी करून स्वतंत्र समाजातील ज्ञान व्यवस्थांची स्वायत्तता जपण्यासाठीचे उपायदेखील सुचविले आहेत.

वॉलरस्टाइन यांनी १९९८ पासून सामाजिकशास्त्रांची पुनर्रचना करणे आवश्यक आहे, असे आग्रही प्रतिपादन केले. त्यांच्या मते, औद्योगिक क्रांती आणि त्यातून निर्माण झालेल्या विशेषीकरणाचा एक परिणाम म्हणजे सामाजिकशास्त्रांमध्ये निर्माण झालेली साचेबंद विद्याशाखीयता होय. आधी एकसंध असलेले सामाजिकशास्त्र विभिन्न प्रकारच्या साचेबंद शास्त्रांमध्ये विभागले गेले. एवढेच नाही, तर या विभागांचीही अंतर्गत दालने तयार झाली व त्यांचा परस्परांशी संवाद तुटला. प्रत्येक शास्त्राने आपल्याभोवती एक तटबंदी निर्माण करून घेतली आहे. त्यामुळे अभ्यासकांना तथ्याचे सम्यक नव्हे, तर एकांगी ज्ञान मिळते. ही परिस्थिती बदलायची असेल, तर सर्व शास्त्रांनी (विशेषत: समाजशास्त्र) आपली दारे सर्वांसाठी खुली ठेवली पाहिजे आणि आंतरविद्याशाखीय संशोधन, अभ्यास व सहयोग वृद्धिंगत केला पाहिजे, असे मत वॉलरस्टाइन यांनी मांडले आहे.

वॉलरस्टाइन यांनी २००० ते २०१९ पर्यंत येल विद्यापीठात वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत होते. समाजशास्त्राची वाटचाल एका बंदिस्त शास्त्र-विषयाकडून ऐतिहासिक, सामायिक-सामाजिक शास्त्राकडे झाली पाहिजे, असे त्यांचे मत होते. त्यांनी व्यक्तीपेक्षा समष्टी दृष्टीकोनाचा पुरस्कार केला व जागतिक भांडवलशाही व्यवस्थेचे तिच्या परिणामांसहित व्यवस्थात्मक व चिकित्सक विश्लेषण केले आहे. ते आय. एस. ए. चे अध्यक्ष होते.

वॉलरस्टाइन यांनी अनेक ग्रंथ लिहिली असून काही महत्त्वपूर्ण ग्रंथ पुढील प्रमाणे आहे. आफ्रिका, द पोलिटिक्स ऑफ इंडिपेंडन्स, १९६१; द मॉडर्न वर्ल्ड सिस्टिम, १९७४; द कॅपिटॅलिझ्म वर्ल्ड इकॉनॉमी, १९७९; वर्ल्ड सिस्टिम ॲनालिसिस, १९८२; हिस्टॉरिकल कॅपिटॅलिझ्म, १९८३; द पोलिटिक्स ऑफ द वर्ल्ड इकॉनॉमी, १९८४; रेस, नेशन, क्लास, १९८८; ट्रान्सफॉर्मिंग द रिव्होल्यूशन, १९९०; अनथिंकिंग सोशल सायन्स, १९९१; जिओपोलिटिक्स अँड जिओकल्चर, १९९१; आफ्टर लिबरॅलिझ्म, १९९५;  ओपन द सोशल सायन्सेस, १९९६; उटोपिस्टिक्स, १९९८; एल‘हिस्टोरी कन्टिन्यू, १९९९; द इसेन्शिअल वॉलरस्टाइन, २०००; अल्टरनेटिव्ह, २००४; द अनसर्टेन्टिज ऑफ नॉलेज, २००४; यूरोपियन युनिव्हर्सॅलिझ्म, २००६; डज कॅपिटॅलिझ्म हॅव ए फ्युचर, २०१३; द ग्लोबल लेफ्ट, २०१७ इत्यादी.

संदर्भ :

  • गर्गे, स. मा. (संपा.), भारतीय समाजविज्ञान कोश खंड-६, पुणे, २०१७.
  • रावत, हरिकृष्ण, समाजशास्त्रीय चिन्तक एवं सिद्धान्तकार, जयपूर, २०१७.
  • Wallerstein, Immanuel, Open the Social Sciences, Stanford, 1996.
  • Wallerstein, Immanuel, The Capitalist World-Economy, Cambridge, 1979.

समीक्षक : मयुरी सामंत