प्राचीन ग्रीकमधील अथेन्समध्ये इ.स.पू.सु. सहाव्या शतकाच्या शेवटी उदयास आलेली मृत्पात्रांवरील चित्रकलेतील एक महत्त्वाची चित्र तंत्रपद्धती. या चित्रण पद्धतीत मृत्पात्रावर पांढऱ्या रंगाच्या चुनखडीच्या मातीच्या राळेचा थर देऊन त्यावर रेखांकित आकृत्या व रंगांचे लेपण केलेले असल्याने तिला पांढऱ्या पृष्ठावरील तंत्र म्हणून ओळखले जाते.
पांढऱ्या पृष्ठभागावरील तंत्र पद्धती प्रामुख्याने धार्मिक व अंत्यविधीच्या अथवा दफनविधीसाठी वापरण्यात आलेल्या मृत्पात्रांवर वापरलेली दिसते. काळ्या आकृत्यांची व लाल आकृत्यांची मृत्पात्र शैली या समांतरकालीन महत्त्वाच्या मृत्पात्र चित्रशैलींपेक्षा ह्या पद्धतीत पांढऱ्या रंगाचा पृष्ठभाग नाजूक असला तरीही अनेकविध विषयांचे चित्रण कौशल्याने केलेले दिसते. काळ्या व लाल आकृत्यांच्या शैलींप्रमाणे पांढऱ्या पृष्ठावरील मृत्पात्रांचा पांढरा रंग मातीच्या राळेचे लेपन व ती भाजण्याचे तंत्र वापरून न करता चित्रणासाठी पांढऱ्या पृष्ठावर रंगांचा व सोन्याचा वापर केलेला दिसतो. ह्यामुळे इतर पद्धतींपेक्षा ह्या तंत्रात बहुरंगांचा (polychromy) वापर झालेला दिसतो. ह्या तंत्राने इ.स.पू. पाचव्या ते चौथ्या शतकात उच्च प्रगती केल्याचे आढळते. उदा., लहान आकारातील लेकिथोईचा (पात्राचा) दफनविधीसाठी सहसा वापर केलेला दिसतो. हे त्यांच्या उपलब्धतेवरून दिसून येते. त्यांच्या निर्मितीकारांमध्ये प्रामुख्याने अकिलीझ (Achilles), सायआक्स (Psiax), पिस्टोक्सेनोस (Pistoxenos ), थानाटोस (Thanatos ), साप्फो (Sappho), फिआले (Phiale), रीड (Reed) या चित्रकारांचा समावेश होतो.
पांढऱ्या पृष्ठावरील तंत्रामध्ये मृत्पात्रांवर पांढऱ्या वा फिकट रंगातील चिनी माती अथवा केओलिन (kaolin) पासून तयार केलेल्या राळेचा थर दिला जात असे. भौमितिक व आर्ष काळातील मृत्पात्रांवरील चित्रांसाठीही अशाच प्रकारच्या राळेचा थर दिलेला दिसतो. पांढऱ्या पृष्ठावरील तंत्रातील मृत्पात्रांची निर्मिती प्रामुख्याने लॅकोनिया (Laconia), आयोनिया (Ionia) आणि सिक्लाडिझ (Cycladic) बेटांवर झाल्याचे आढळते; परंतु अथेन्समध्ये काळ्या व लाल आकृत्यांच्या शैलींव्यतिरिक्त वेगळी शैली म्हणूनही विकसित झाल्याचे आढळून येते. ज्यामुळे ॲटिक मृत्तिकेत बनविण्यात आलेल्या ह्या शैलीला पांढऱ्या पृष्ठभागावरील तंत्र पद्धती असे संबोधले जाते. तज्ञांच्या मते मृत्पात्रांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या रंगातील राळेचा वापर हा बहुधा संगमरवरी वा हस्तिदंती अथवा भित्तिचित्रांसदृश्य परिणाम साधण्यासाठी केलेला असावा. बऱ्याचदा किलीक्ससारख्या मृत्पात्रांवर पांढऱ्या पृष्ठावरील तंत्राचा वापर आतील बाजूस व लाल आकृत्यांच्या शैलीतील चित्रण बाह्य बाजूवर केलेले दिसते. पांढऱ्या पृष्ठावरील तंत्रातील चित्रकाम काळ्या व लाल आकृत्यांच्या शैलींपेक्षा कमी टिकाऊ असल्याचे आढळून येते. म्हणूनच बहुधा ह्या तंत्रातील मृत्पात्रांचा वापर प्रामुख्याने थडग्यात स्मारक पात्र म्हणून तसेच ऐच्छिक वा नवसाच्या परिपूर्तीसाठी अर्पण करण्याकरिता केल्याचे दिसून येते.
अथेन्समध्ये मृतात्म्यांच्या थडग्याला दफनविधी नंतर तिसऱ्या, नवव्या व तिसाव्या दिवशी नंतर महिन्याला वा वार्षिक भेट दिली जात असे. अशावेळी पांढऱ्या पृष्ठावरील तंत्रातील (पाचव्या शतकाचा उत्तरार्ध) तेल ठेवण्यासाठी वापरण्यात आलेल्या लेकिथोई (lekythoi) या मृत्पात्रांचा प्रामुख्याने वापर केलेला आढळून येतो. अनेक लेकिथोईच्या मानेच्या अगदी खाली प्लग असतात. जेणेकरून थोडेसे तेल जरी भरले तरी ते पूर्ण भरल्यासारखे वाटते. लेकिथोईच्या पांढऱ्या पृष्ठावरील चित्रे अंत्यसंस्काराच्या पद्धती व त्याबाबतीत असलेल्या समजुतींची माहिती देतात. उदा., लंडनमधील ब्रिटिश म्युझियममध्ये जतन केलेल्या अंत्यसंस्काराचे देखावे असलेल्या तीन लेकिथोई. यातील डावीकडील लेकिथोई (१) सबोरोफ (Sabouroff) या चित्रकाराने केलेली असून ती इ.स.पू.सु. ४५० ते ४४० या काळातील असून १३ इंच उंचीची आहे. चित्रातील दृश्यात एका तरुणाचे पार्थिव दफनभूमीवर नेण्यापूर्वी घरात तिरडीवर ठेवलेले आढळते. पार्थिवाच्या डोक्याजवळ उभा असलेला तरुण दु:ख व्यक्त करीत स्वत:च्या डोक्यावर हात मारत शोक करतांना दाखविलेला दिसतो. मध्यभागी असलेली लेकिथोई (२) रीड चित्रकाराने केलेली असून इ.स.पू.सु. ४२० ते ४१० या काळातील असून ११.५ इंच उंचीची आहे. यातील चित्रणात मृतात्म्यास यमलोकी नेणाऱ्या स्टिक्स नदीचा वृद्ध दाढीधारी नावाडी म्हणजे चॅरॉन (Charon) देव दाखवलेला दिसतो. वास्तविक भेटवस्तूंपेक्षा विधीची कृती आणि त्याचे स्वरूप अधिक महत्त्वाचे असल्याचे यातून दिसून येते. चित्रातील उजवीकडील (३) लेकिथोई देखील रीड या चित्रकाराने केलेली असून ती इ.स.पू.सु. ४२० या काळातील असून १२.५ इंच उंचीची आहे. त्यावर दगडी कबरीतील मृताम्यावर अंत्यविधी संस्काराचे दृश्य चित्रित केलेले आढळते. कबरीवर माळा बांधलेल्या दिसतात. कबरीच्या डावीकडील स्त्रीच्या हातातील टोपलीत हार लटकत असून ती त्या माळा कबरीवर बांधण्याच्या अविर्भावात दिसते. उजवीकडील तरुण थोडा झुकलेला दिसतो. या तिन्ही लेकिथोईच्या मानेचा थोडा भाग व पोटाच्या पूर्ण भागावर पांढऱ्या पृष्ठावरील चित्रण केलेले दिसते. तर लेकिथोईचा उर्वरित भाग मान, मूठ व पायाच्या भागावर काळ्या रंगाचा लेप दिलेला आढळतो.
पाचव्या शतकांत लेकिथोई या मृत्पात्राशिवाय किलिक्स (kylix) या मृत्पात्रावरतीही पांढऱ्या पृष्ठावरील तंत्रात चित्रण केलेले आढळते. उदा., ब्रिटिश म्युझियम येथील सोतादेस (Sotades) या चित्रकाराचे किलिक्सच्या अंतर्भागावरील ‘थडग्यातील पॉलीइडोस आणि ग्लूकोस’ (Polyeidos and Glaukos in the tomb) हे चित्र. हे किलिक्स १३.३ सें.मी. व्यासाचे असून इ.स.पू. सु. ४६० ते ४५० या कालावधीतील आहे. चित्रांत उजवीकडे तपकिरी-जांभळ्या रंगाचा अंगरखा डोक्यावरून घेऊन बसलेला मुलगा ग्लूकोस वाकून बसलेला दिसतो. चित्रांत कपड्यावरील गडद रेषा घड्यांचा भास निर्माण करतांना दिसतात. तर कपड्याच्या कडा व घडीवरील पांढऱ्या रेषांमुळे कपड्यावर प्रकाश पडल्याचा आभास निर्माण होतो. डोक्यावरील केस हलके तपकिरी असून वरच्या बाजूस जास्त दाट दाखवलेले दिसतात. चित्रातील आकृतीला वस्तुमान व घनता देण्याचा भावनेने हे चित्रण केलेले दिसते. अशाप्रकारच्या सावलीच्या बाह्यरेषेत छायांकन करून दाखविलेल्या आकृती त्रिमितीय चित्रणास स्किआग्राफिया (skiagraphia) असे संबोधिले जाते. या शैलीचा वापर चौथ्या शतकात सहसा केलेला दिसून येतो. चौथ्या शतकांत जेव्हा लेकिथोई या मृत्पात्रांची निर्मिती संपुष्टात आली. तेव्हा पांढऱ्या पृष्ठावरील तंत्राचा वापरही कमी झालेला आढळतो.
संदर्भ :
- Herford, Mary Antonie Beatrice, A Handbook of Greek Vase Painting, 1995.
- Von Bothmer, Dietrich, Greek Vase Painting, New York, 1987.
समीक्षक : मनीषा पोळ