लेव्हरन, चार्ल्स लुईस अल्फोन्ज : (१८ जून १८४५ – १८ मे १९२२) अल्फोन्ज लेव्हरन यांचा जन्म पॅरिसमधील बौल्वर्ड सेन्ट मिशेल येथे झाला. अल्फोन्ज यांचेउच्च शिक्षण कॉलेज सेन्ट बार्बे व नंतर लायसी लुईस ले ग्रँड या दोन खाजगी संस्थांमध्ये झाले. लेव्हरन यांना वैद्यकीमध्ये आवड होती त्यासाठी स्ट्रॉसबर्ग येथील पब्लिक हेल्थ स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. पुढे स्ट्रॉसबर्ग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निवासी वैद्यकी विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला आणि मज्जातंतूंच्या पुनर्निर्माणावर प्रबंध सादर करून स्ट्रासबर्ग विद्यापीठाकडून वैद्यकीची पदवी प्राप्त केली.

पुढे फ्रेंच सैन्यामध्ये वैद्य म्हणून ते रुजू झाले आणि वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची  नियुक्ती झाली. त्यानंतर एक परीक्षा पास करून इकॉल डे वाल-डे-ग्रेस येथे चेयर ऑफ मिलिटरी डिसीजेस अँड एपिडेमिक्स या पदावर ते रुजू झाले. पुढे त्यांना अल्जेरियाला पाठविण्यात आले. तेथे त्यांनी बॉन आणि कॉन्स्टन्टाईन येथील सैनिकी रूग्णालयात काम केले. तेथे असताना त्यांना असे काही वॉर्ड दिसले जे मलेरियाच्या रुग्णांनी भरलेले होते. फ्रेंच सैनिकसुद्धा या घातक रोगाच्या तावडीत सापडलेले होते. त्यांनी रुग्णाच्या रक्ताचे आणि मातीचे नमुने गोळा करायला व तपासायला सुरुवात केली तसेच त्यांनी शवविच्छेदनही करून पहिले.  असेच एकदा सूक्ष्मदर्शकाखाली रुग्णाच्या रक्ताचा नमुना तपासताना त्यांना एक शेपटी असलेला वेगाने फिरणारा परजीवी दिसला. हाच तो क्षण होता जेंव्हा मलेरियाला कारणीभूत असणार्‍या प्लास्मोडियमचा शोध लागला. प्लास्मोडियम हा एक एकपेशीय सूक्ष्मजीव होता, ज्यामध्ये केंद्रक होते आणि ज्याचे बरेचसे गुणधर्म, उदा., चयापचय आणि सेंद्रिय पदार्थांचे सेवन, हे उच्च वर्गीय प्राण्यांसारखे होते. त्यांनी त्या जीवाला ऑसिलेरिया मलेरी (Oscillaria malariae) असे नाव दिले ज्याचे नामांतर पुढे प्लास्मोडियम (Plasmodium) असे केले गेले.

लेव्हरनने मलेरियाला कारणीभूत असणार्‍या परजीवीची काढलेली चित्रे

लेव्हरन यांनी या शोधावर एक लेख लिहिला. शीर्षक होते, ‘A new parasite found in the blood of malarial patients. Parasitic origin of malarial attacks.’ परंतु त्यांचे हे संशोधन कुणीही मान्य केले नाही कारण तेव्हा इतर शास्त्रज्ञ हे जिवाणू मलेरियाला करणीभूत आहेत यावर भर देत होते. पुढे बर्‍याच वर्षांनंतर लेव्हरनच्या निरीक्षणाला मान्यता प्राप्त झाली. मलेरियाग्रस्त भागातील माती, पाणी आणि हवा यांचा व्यवस्थित अभ्यास करून त्यांनी असे गृहीतक मांडले की रोगाचा संसर्ग डासांमुळे होतो. त्यांचे हे गृहीतक प्रबंधात लिहून तो प्रबंध बुडापेस्ट, हंगेरी येथील इंटरनॅशनल काँग्रेस ऑन हायजिन (International या संस्थेला पाठवला. पुन्हा त्यांच्या या गृहीतकांना विरोधाचा सामना करावा लागला, पण नंतर ब्रिटिश संशोधक रोनॉल्ड रॉसने प्लास्मोडियम या परजीवीची वाढ ही डासांमध्ये होते आणि डासांमुळेच प्लास्मोडियमचा प्रसार होतो याचा पुनरुच्चार केला.

लेव्हरनच्या संशोधनामुळे पॅरिस तसेच आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक समुदायामध्ये त्यांना  प्रतिष्ठा प्राप्त झाली. पण सैनिकी वैद्यकी विभागाने लेव्हरन यांना म्हणावे तेवढे महत्त्व दिले नाही. त्यामुळे लेव्हरन यांनी सैनिकी वैद्यकीय सेवेचा राजीनामा दिला. पॅरिसमधील पाश्चर इन्स्टिटयूटने त्यांना प्रयोगशाळेत काम करण्यासाठी जागा दिली. तसेच तेथे काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. पुढे त्यांनी ट्रायपेनोसोम्स (Trypanosomes) या आणखी एका परजीवीबद्दल संशोधन केले.  ट्रायपेनोसोम्सचे जीवनचक्र, त्याच्यामुळे होत असलेला रोग स्लीपिंग सिकनेस (Sleeping sickness) तसेच त्या रोगावरील व रोगप्रतिबंधात्मक उपचार अशा सर्व मुद्यांवर त्यांनी  संशोधन केले.

मलेरियाला कारणीभूत असणार्‍या परजीवीच्या संशोधनासाठी लेव्हरन यांना फ्रेंच विज्ञान अकादमीचे ब्रेंट प्राईझ, रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिनचे एडवर्ड जेन्नर मेडल मिळाले. आदिजीवांमुळे (Protozoa) होणारे रोग या संबंधित संशोधनासाठी त्यांना फिजिओलॉजी आणि मेडिसिन या विभागातील नोबेल पारितोषिक त्यांना प्राप्त झाले. फ्रेंच अकॅडेमी ऑफ मेडिसिनचे ते अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी ६०० पेक्षा जास्त संशोधनपर लेख लिहिले.

त्यांच्या सहकार्‍यांनी त्याच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त पाश्चर इन्स्टिट्यूटचे आदरणीय संचालक म्हणून त्यांना नियुक्त केले. लेव्हरन यांच्या कार्याच्या सन्मानार्थ अल्जेरियाने एक पोस्टाचे तिकीट सुरु केले.

लेव्हरन यांना अज्ञात रोगाने ग्रासले व त्यातच त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे