द इंटरनॅशनल ॲक्च्युरिअल असोसिएशन : (स्थापना: १८९५) द इंटरनॅशनल ॲक्च्युरिअल असोसिएशन (आयएए) ही आंतरराष्ट्रीय संघटना राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या विमागणितज्ज्ञांच्या संघटनांचे नेतृत्त्व करते. जागतिक पातळीवर विमागणितज्ज्ञांच्या व्यवसायाच्या विकासाला प्रोत्साहन देत त्यांतून लोकहित साधण्यासाठी आयएए दक्ष असते. तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि व्यावसायिकदृष्ट्या विश्वसनीय, ही आयएएची ओळख आहे.
वित्तीयसेवा उद्योगांतील सामाजिक सुरक्षिततेसह जोखीम व्यवस्थापन आणि समाजाच्या एकंदर कल्याणासाठी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणारा व्यवसाय, अशी विमागणितज्ज्ञांच्या व्यवसायाला जागतिक ओळख मिळावी, हे आयएएचे स्वप्न आहे.
व्यावसायिक विमागणितज्ज्ञांचे प्रतिनिधित्त्व करणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या भूमिकेला, प्रतिष्ठेला आणि परिचयाला बळ देणे, हे आयएएचे प्रमुख ध्येय आहे. बदलत्या गरजांनुसार संघटनेचे सदस्य आणि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयएए विमागणितीय शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे आणि त्यांतील संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे काम करते. आयएएच्या सदस्य संघटना, सचोटी, जबाबदारी, पारदर्शकता आणि वस्तुनिष्ठता; या मूल्यांचे पालन इतर भागीदार आणि सामान्य जनता यांच्याशी करतात. सध्या ७३ पूर्ण सदस्य संघटना, २८ सहकारी सदस्य संघटना, सहा भागीदार संघटना आणि चार आश्रयदाता-संस्था आयएएशी जोडल्या गेलेल्या असून, शंभरांहून अधिक देशांतील साठ हजारांपेक्षा अधिक विमागणितज्ज्ञ आयएएचे सदस्य आहेत.
विमागणितीय व्यवसायाच्या विशिष्ट क्षेत्रांतील संशोधन आणि विकास यांना उत्तेजन आणि विमागणितज्ज्ञांमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी आयएए विमाक्षेत्रांतील विषयांनुसार पुढील सात विशेष विभागांमार्फत कार्यरत आहे.
ॲक्च्युरिअल ॲप्रोच फॉर फायनान्शियल रिस्कस (एएफआयआर) हा विभाग १९८६ मध्ये स्थापन झाला. वित्तीय जोखीम आणि समस्या या दोन्हीसंबंधांतील विमागणितीय संशोधनाला बळ देण्याचे काम यात चालते. २०११ पासून त्यात एन्टरप्राईज रिस्क मॅनेजमेंट (इआरएम) विषयही अंतर्भूत केला आहे. याचा मुख्य उद्देश, साहसी उपक्रमांना लागणाऱ्या विमागणितीय जोखीम व्यवस्थापनातील (विशेषत: वित्तीय जोखीम क्षेत्रातील) संशोधनाला प्रोत्साहन देणे; विमागणिताच्या कक्षा विस्तारणे हा आहे. विमागणितीय दृष्टीकोन, सल्ले, संशोधन आणि व्यवहार्य माहिती यांची विमागणितज्ज्ञ आणि इतर तज्ज्ञ यांच्यातील, आंतरराष्ट्रीय स्तरावरील देवाणघेवाण वाढविणे, हा देखील विभागाचा उद्देश आहे.
सन १९५७ मध्ये स्थापन झालेल्या ॲक्च्युरिअल स्टडीज इन नॉन-लाइफ इन्शुरन्स (एएसटीआयएन) विभागाद्वारे विमागणितीय, विशेषतः आयुर्विम्याव्यतिरिक्तचा विमा आणि पुनर्विमा यांसाठी लागणारा गणिती पाया अधिक विकसित करण्यासाठीच्या आणि अनुवांशिकतेच्या, संशोधनाला प्रोत्साहन दिले जाते. एएसटीआयएनतर्फे द जर्नल ऑफ आयएए पत्रिका वर्षातून तीनदा निघते.
ॲक्च्युरिअरिज विदाउट बॉर्डर्स (एडब्ल्यूबी) विभागाची स्थापना २००३ मध्ये झाली. विमागणितीय कौशल्ये आर्थिक स्त्रोतांशी जोडणे जिथे गरजेचे असते, तिथे व्यावसायिक विमागणितज्ज्ञांना हा विभाग आर्थिक सहाय्य देतो. यासाठी बहुधा विकसनशील देशांतील, असा प्रकल्प निवडला जातो, ज्याला स्थानिक पातळीवर पुरेसा निधी उपलब्ध नसतो.
इंटरनॅशनल ॲक्च्युरिअल असोसिएशन हेल्थ सेक्शनची (आयएएएचएस) स्थापना २००३ मध्ये आरोग्यविषयक विमागणितीय व्यवहार, सार्वजनिक आणि खाजगी आरोग्यविमा आणि आरोग्य धोरण यांच्याबाबत आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन तयार व्हावा म्हणून झाली.
आयएए लाइफ सेक्शन (आयएएएलएस) विभाग २००५ मध्ये निर्माण झाला. जगभरच्या आयुर्विमा क्षेत्रातील संशोधनाला बळ देणे आणि तत्संबंधी ज्ञानाची देवाणघेवाण घडविणे, हे त्याचे ध्येय आहे.
इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग ॲक्च्युरिअरिज (आयएसीए) हा १९६८ मध्ये आयएएशिवाय, स्वतंत्रपणे स्थापलेला विभाग आहे. सल्लागार विमागणितज्ज्ञांच्या व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि हितसंबंधांवर परिणाम करणार्या बाबींवरील दृष्टीकोनांची आंतरराष्ट्रीय पातळीवर देवाणघेवाण घडविणे हा याचा मुख्य हेतू आहे. १९९९ मध्ये याला आयएएचा एक विभाग म्हणून मान्यता मिळाली. आपल्या मुख्य उद्दिष्टांची अंमलबजावणी आणि सदस्यांना उत्तम सेवा देण्यासाठी आयएसीएने प्रकाशने, व्यावसायिकता, सदस्यसेवा आणि विकास यांसाठी उपसमित्या स्थापन केल्या आहेत. सल्लागार-विमागणितज्ज्ञ व्यवसाय सार्वजनिक क्षेत्रांत आणण्यासाठी आणि विमागणितीय सल्ला देण्याच्या पद्धतींना, तसेच संदर्भ साहित्याच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी, आयएसीए विभाग दरवर्षी दोन पुरस्कार देतो.
निवृत्तीवेतन (पेन्शन), कर्मचारी लाभ आणि सामाजिक सुरक्षा (पीबीएसएस) विभागाची स्थापना २००३ मध्ये सार्वजनिक आणि खाजगी निवृत्तीवेतन, सामाजिक सुरक्षा, कर्मचारी लाभ आणि सार्वजनिक धोरण या मुद्यांवर काम करणाऱ्या विमागणितज्ज्ञांसाठी झाली. पीबीएसएसच्या कार्यकक्षेत सार्वजनिक उपक्रम आणि खाजगी निवृतीवेतन योजना, परस्पर-लाभकारी उपक्रम/संस्था (mutual benefit organisations), व्यावसायिक विमा आणि निवृतीवेतन-कंपन्यांचे करार, वार्षिकी, सहभाग (शेअर) पर्याय आणि इतर कर्मचारी लाभ-तरतुदी, समाविष्ट आहेत. पीबीएसएस सदस्यांना निवृतीवेतन आणि सामाजिक सुरक्षेच्या विविध पैलूंवर अलिकडेच प्रकाशित झालेल्या शोधनिबंधांची अद्ययावत मासिक संदर्भ-यादी देते.
सर्व विभाग आपआपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वार्षिक चर्चासत्रे, खास ज्वलंत विषयांवर स्थानिक चर्चा, एएसटीआयएनच्या पत्रिकेतील लेखनात सहभाग, आंतरजालामार्फत विचारांची देवाणघेवाण, वेबकास्ट व्यासपीठ इत्यादी मार्ग वापरतात. एएफआयआर/ इआरएम, आयएएएलएस आणि पीबीएसएस हे विभाग एएसटीआयएनच्या पत्रिकेत प्रकाशित होणाऱ्या किंवा चर्चांत सादर होणाऱ्या, आपल्या विषयांतील सर्वोत्कृष्ट शोधनिबंधांना प्रतिवर्षी पुरस्कार देतात.
वरील सात विभागांच्या सहाय्याने आयएए राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख विमागणितज्ज्ञांच्या संघटनांशी संबंध जोडणे, विमागणितज्ज्ञांचे कार्यक्षेत्र, कार्यक्षमता व सेवांची उपलब्धता वाढवेल असे विमागणितीय ज्ञान व्यापक क्षेत्रांत विस्तारणे, सामान्य विमागणितीय शिक्षणाची मानके, व्यावसायिक आचरणाची तत्त्वे आणि सराव यांसाठी मार्गदर्शन करणे; पूर्ण सभासद संघटनांच्या कार्यक्षेत्रांत विमागणितीय मानके विकसित आणि लागू करण्यास प्रोत्साहन देणे, विमागणितीय मानदंडांचे जागतिक अभिसरण घडवणे, जगभरातील विमागणितीय व्यवसायाचा विकास, संगठन आणि प्रसाराला पाठबळ देणे इत्यादी कामे पार पाडते. आयएए दर चार वर्षांनी जगभरांतील विमागणितज्ज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद भरवते.
सन १९४४ मध्ये भारतात स्थापन झालेल्या, व्यावसायिक विमागणितज्ज्ञांच्या संस्थेचे नांव द ॲक्च्युरिअल सोसायटी ऑफ इंडिया होते, जे विमागणितज्ज्ञांसाठीच्या २००६ च्या कायद्यांतर्गत बदलण्यात येऊन इन्स्टिट्यूट ऑफ ॲक्च्युरिज ऑफ इंडिया (आयएआय) करण्यात आले. ही संस्था आयएएची पूर्ण सदस्य आहे.
संदर्भ :
समीक्षक : विवेक पाटकर