बार्थोलोमिओ, युस्टॅशियो : (अंदाजे १५०३ – अंदाजे १५६८) बार्थोलोमिओ युस्टॅशियो यांचा जन्म इटलीतील सान सेव्हेरीनो नगरीत झाला. सुमारे इ.स. १३० ते २०० दरम्यान गेलन हे ग्रीक शरीररचनाशास्त्र तज्ज्ञ होऊन गेले. त्याकाळी असलेल्या धार्मिक समजुतीमुळे मृतदेहांचे विच्छेदन निषिद्ध मानले जात असे. लहान-मोठ्या जखमा पाहणे, त्यावर उपचार करून त्या बऱ्या करणे, तुटलेली हाडे जोडणे यातून डॉक्टर शिकत असत. गेलन यांच्या दबदब्यामुळे सारेजण पिढ्यान पिढ्या त्यांची री ओढत. हे चित्र अँड्रीयस व्हेसॅलियस, गॅब्रिएल फॅलॅपियो, ­­­बार्थोलोमिओ युस्टॅशियो, हायरोनिमस फॅब्रिसियस, विल्यम हार्वे अशा शल्यविशारदांनी बदलले.

युस्टॅशियो यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती मिळत नाही. युस्टॅशियो चांगले डॉक्टर होते, तसेच त्यांचे ग्रीक, हिब्रू आणि अरेबिक भाषांवर चांगले प्रभुत्व होते.

युस्टॅशियो यांचे वैद्यकीय शिक्षण रोममध्ये तसेच पादुआ विद्यापीठात झाले. रोममध्येच त्यांनी शरीररचनाशास्त्र विषयाचे अध्यापन केले. रोममध्ये असताना अभ्यासासाठी शवविच्छेदन केले. अल्पकाळ अर्बिनोचे ड्यूक यांचे वैद्यकीय सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. कोल्लेजिया डेला सॅपिएन्झा रोम, येथे ते शरीररचनाशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. बार्थोलोमिओ युस्टॅशियो इटालियन, आधुनिक शरीररचना शास्त्रज्ञ, विशेषतः कान आणि घसा याना जोडणाऱ्या युस्टॅशियन नलिकेच्या शोधाबद्दल प्रसिद्ध आहेत.

हृदयाच्या वरच्या कप्प्यास अलिंद (जुने नाव कर्णिका- atrium) म्हणतात. उजवे आलिंद आणि अधोमहाशीर यामधील झडपेचा शोध युस्टॅशियो यांनी लावला. या संशोधनाचे श्रेय म्हणून या झडपेला युस्टॅशियन झडप असे नाव देण्यात आले. (इंग्रजीत युस्टॅशियो यांचे नाव दिल्याने युस्टॅशियन शब्द तयार झाला). युस्टॅशियन झडप गर्भाच्या रक्त अभिसरणात महत्त्वाची कामगिरी बजावते. युस्टॅशियन झडप (Eustachian valve) उजव्या निलयाकडे रक्त न पाठवता थेट डाव्या अलिंदामध्ये पाठवायला मदत करते. डाव्या अलिंदातून रक्त गर्भाच्या शरीरभर, अवयवांकडे जाते. जन्मानंतर अर्भकाचा श्वासोच्छवास सुरू होतो. तेव्हा त्याच्या फुफ्फुसांत हवा जाऊ लागते. गर्भाच्या हृदयाच्या उजव्या निलयाकडून त्याच्या फुफ्फुसांत हवा पाठवणे तेथे ऑक्सिजन शोषून रक्त पुन्हा हृदयात येणे असा क्रम सुरू होतो. श्वासोच्छवास सुरू होण्यापूर्वी गर्भाला उपयुक्त असणाऱ्या युस्टॅशियन झडपेचा एकदा बाळाचा जन्म झाला की फुफ्फुसे हवा घेऊ लागतात. अशी निरुपयोगी युस्टॅशियन झडप आकाराने लहान होते. तिचे अवशेषांग बनते.

युस्टॅशियो यांनी वृक्काच्या ऊर्ध्व बाजूस असलेल्या अधिवृक्क (adrenal gland) ग्रंथींचा शोध लावला. त्यांच्या नावे या शोधाची नोंद केली गेली. याशिवाय मध्य-कर्णातील तीन सूक्ष्म हाडांची साखळी, त्यांना जोडलेले सूक्ष्म स्नायू आणि आंतरिक कर्णातील (internal ear) कर्णावर्त हे भाग त्यांनीच प्रथम पाहून नोंदून ठेवले. त्यांनी दंत विन्यास, दातांची सूक्ष्मरचना, दंतमज्जा आणि दुधाचे आणि कायमचे दात यांचा अभ्यास जगाला उपलब्ध करून दिला. शरीरातून हृदयाकडे रस वाहून नेणारी, छातीत असणारी सर्वात मोठी रसवाहिनी (lymphatic), आणि डोळ्यांच्या स्नायूंचे परिणामी हालचालींचे नियंत्रण करणारी परीघवर्ती चेता क्रमांक ६ (अपवर्तनी चेता abducens) त्यांनीच प्रथम पाहून नोंदली.

मध्य-कर्णात तीन, अगदी लहान, हाडांची (श्रवण अस्थिकांची) साखळी असते. या हाडांना घण (मॅलियस – malleus), ऐरण (इंकस – Incus) आणि रिकिब (स्टेपीज – stapes) अशी आकारानुसार रूढ झालेली नावे जुन्या मराठी पुस्तकांत आढळतात. या तीन हाडांना जोडणारे दोन लहान स्नायू आणि अस्थिरज्जू हे युस्टॅशियो यांनी प्रथम पाहिले व त्यांचे वर्णन लिहून ठेवले. गळ्यात समोरच्या बाजूस असणाऱ्या अवटु (थायरॉइड) ग्रंथीचे दोन अर्ध जोडणारा पट्टा म्हणजे अवटु ग्रंथी संयोजी भाग (isthmus of thyroid) युस्टाकी यांनी शरीररचनाशास्त्राला अवगत करून दिला. तसेच इस्थमस – isthmus म्हणजे संयोजी पट्टा हा नवा शब्द अवटु ग्रंथी संयोजी जोडणीसाठी वापरायला सुरुवात केली.

युस्टॅशियो यांनी केलेले अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे नाटॉमिकल एन्ग्रेव्हिंगज या ग्रंथाची निर्मिती. त्यांनी मानवी हाडे आणि स्नायूंची रचनात्मक तपशील स्पष्ट करणारी सत्तेचाळीस रंगीत कोरीव चित्रे (engravings) काढण्याचे योजले. या कामात त्यांना पिअर मॅटिओ पिनी (Pier Matteo Pini) यांची मदत झाली. तांब्याच्या पातळ पत्र्यावर केलेल्या या कोरीव कामातून युस्टॅशियो यांचे निरीक्षण, शरीररचनेचे सखोल ज्ञान आणि हस्तकौशल्य दिसते. दुर्दैवाने हा संग्रह त्यांच्या हयातीत प्रकाशित होऊ शकला नाही. यापैकी फक्त आठच चित्रे त्यावेळी मजकुरासह छापून संग्रही राहिली. उरलेली सर्व चित्रे सुदैवाने कालांतराने व्हॅटिकन वाचनालयात सापडली. ती ग्रंथात समाविष्ट होऊ शकली. अठराव्या शतकात पोप यांचे डॉक्टर, जीओवॅनी मारिया लान्सिसी यांनी बऱ्याच परिश्रमानी चित्रांचे संकलन केले. विवेचनात्मक मजकुराची भर घातली आणि संच पूर्णत्वाला नेला. एवढ्या सव्यापसाव्या नंतर आणि युस्टॅशियो यांच्या मृत्यूनंतर, तब्बल एकशे चाळीस वर्षांनी नाटॉमिकल एन्ग्रेव्हिंगज या ग्रंथाचे प्रकाशन झाले. त्याचे इटालियन भाषेत शीर्षक आहे, Bartholomaei Eustachii anatomici summi Romanae archetypae tabulae anatomicae novis explicationibus. या सुमारे चारशे पानी ग्रंथाचे आगळेपण म्हणजे त्यातील एकेका मनुष्य आकृतीत स्नायू, चेता, रक्त किंवा रस वाहिन्या इ. पैकी एकावर भर दिला आहे. तसेच समोरून, बाजूने किंवा पाठून पाहिल्यास तोच शरीर भाग कसा दिसतो ते ही दाखवले आहे.

व्हेसॅलियस या नामांकित शल्यविशारदानी लिहिलेला दे ह्युमानी कॉर्पोरा फॅब्रिका युस्टॅशियो यांच्या पुस्तकाआधी प्रकाशित झाला होता. त्यात मानवी शरीररचनेबद्दल माहिती होती आणि त्या विषयातील तो सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जाई. असे असले तरी व्हेसॅलियस यांच्या पुस्तकापेक्षा युस्टॅशियो यांच्या ग्रंथात अनेक मुद्यांचे विवेचन जास्त अचूक होते. त्यातून युस्टॅशियो यांच्या आकलनाचा आवाका जास्त होता हे दिसते. लिखाण आणि प्रकाशन यांच्या मध्ये एकशे चाळीस वर्षे एवढा प्रचंड काळ गेला नसता तर कदाचित व्हेसॅलियस आणि युस्टॅशियो या दोघांनाही आधुनिक शरीररचनाशास्त्राचे सहजनक म्हटले गेले असते. मानवी शरीर रचनाशास्त्राला त्यांचे ज्ञान आधीच उपलब्ध झाले असते आणि शंभर वर्षांपूर्वीच त्याचा लाभ मिळाला असता.

स्वतःच्या हयातीत युस्टॅशियो यांची काही पुस्तके प्रकाशित झाली. युस्टॅशियो यांनी दे डेटिंबस या पुस्तकात गर्भावस्थेपासून एखाद्या विशिष्ट इंद्रियाची रचना कशी असते, त्याचा विकास कसा होतो, वयोमानानुसार त्यात कोणते बदल घडतात असा वेगळाच मुद्दा मांडला आहे. दातांच्या बाबतीत हे बदल (नवजात बालकापासून ते जख्ख म्हाताऱ्या लोकांपर्यंत) सामान्यांनाही सहज दिसू शकतील असे ठळक असतात. आपण दातांशिवाय जन्मतो आणि वयोवृद्ध होऊन (नैसर्गिक) दातांशिवाय मरतो.

युस्टॅशियो त्यांच्या ऑस्सीयम एक्झामेन या पुस्तकात माकडांच्या हाडांचे वर्णन करतात. मानवी हाडांमध्ये किती आणि कसे फरक असू शकतात याबद्दलही लिहितात. अन्य एका पुस्तकात युस्टॅशियो यांनी छातीतील कण्याला समांतर धावणाऱ्या अयुग्मज (Azygos vein) म्हणजे विनाजोडीची शीर या रक्तवाहिनीचा तपशील दिला आहे. माणसाच्या वेगवेगळ्या वयात तसेच घोड्यासारख्या प्राण्यातील या शिरेचे वर्णन ते देतात. त्यांच्या आणखी एका पुस्तकाचा विषय कानाची रचना हा आहे.

अन्य शरीररचनाशास्त्रज्ञ आणि युस्टॅशियो यांनी रक्तवाहिन्या, स्नायू, अस्थी, चेतातंतू, मेंदू, जठर, वृक्क अशा अनेक अवयवांची वर्णने लिहून ठेवल्यामुळे अभ्यासकांची आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांची मोठी सोय झाली. तसेच सामान्य कार्य कळल्यावर अपसामान्य म्हणजे रोग झालेल्या स्थितीत काम का होऊ शकत नाही आणि पूर्वी कसे होत असे हे कळू लागले.

युस्टॅशियो यांचा मृत्यू मध्य इटालीतील ॲन्कोना शहराजवळच्या फॉसॉम्ब्रोन या गावात झाला. मृत्युसमयी त्यांचे वय साधारण पासष्ट असावे.

संदर्भ :

 समीक्षक : मोहन मद्वाण्णा