मुहम्मद युनुस (Muhammad Yunus) : (२८ जुन १९४०). बांग्लादेशातील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ, ग्रामीण बँकेचे प्रणेते आणि २००६ मधील शांतता नोबेल पुरस्काराचे मानकरी. मुहुम्मद यांना बँकर, सामाजिक उद्योजक आणि सामाजिक नेतृत्व सांभाळणारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म चितगाँग येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण चटगाव येथे झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी १९५७ मध्ये ढाका विद्यापीठात प्रवेश घेऊन १९६० मध्ये अर्थशास्त्र विषयातील बी. ए. ही पदवी संपादन केली आणि नंतर त्याच विषयात एम. ए. ही पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी १९६९ मध्ये व्हँडरबिल्ट विद्यापीठात प्रवेश घेऊन अर्थशास्त्रात पीएच. डी. ही पदवी संपादन केली. पुढे त्यांनी मिडल टेनेसी स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये अर्थशास्त्राचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. कालांतराने बांग्लादेशात परतून चटगाव विद्यापीठात अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले.
मुहम्मद यांनी दारिद्र्य (गरीबी) निर्मूलनासाठी विशेष कार्य केले. त्यांच्या मते, दारिद्र्य निर्मूलनासाठी बँका महत्त्वाची भुमिका बजावू शकतात. सध्या अस्तित्वात असलेली बँकींग व्यवस्था ही श्रीमंतांसाठी कार्य करते. जगभरातील बहुतांश गरीब समाज आजही बँकींग क्षेत्रापासून लांब आहे. दारिद्र्य निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करायचे असल्यास गरीबांसाठी स्वतंत्र बँका स्थापन करण्याची गरज आहे. या विचारातून मुहम्मद यांनी १९८३ मध्ये बांग्लादेशात ग्रामिण बँकेची स्थापना केली. गरीबांना गरीबीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना योग्य अटींवर कर्ज देऊन मदत करणे आणि चांगले आर्थिक तत्त्व शिकविणे हे त्यांचा मुख्य हेतू होता. बँकिंगक्षेत्रापासून वंचित असलेल्या गरीब समाजाचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना बँकांच्या लाभक्षेत्रात आणले पाहिजे. कर्जाची परतफेड ही गरीबांकडून जास्त प्रमाणात होते. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना अधिकाधीक पतपुरवठा केला पाहिजे, असे मुहम्मद यांचे मत आहे.
मुहम्मद यांच्या नि:स्वार्थ प्रयत्नांमुळे आज बांग्लादेशातील ग्रामीण बँका यशस्वी झाल्याचे दिसून येतात. बांग्लादेशात राबविण्यात आलेल्या ग्रामीण बँकेच्या चळवळीत ९७ टक्के गरीब महीलांचा सहभाग होता. या चळवळीत कर्जाच्या परताव्याचे प्रमाण ९९.६ टक्के इतके होते. या चळवळीत महीलांना पतपुरवठ्याबरोबरच आरोग्य विमा, भविष्य निर्वाह निधी, त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज असे विविध उपक्रम राबविण्यात आले. मुहम्मद यांनी ग्रामीण बँकांच्या माध्यमातून गरीबांना सहानुभूती दाखविण्याऐवजी त्यांना संधी उपलब्ध करून दिली. त्यांचा हा दृष्टीकोन केवळ बांग्लादेशासाठीच नव्हता, तर इतरही देशांमध्ये लाखो गरीब लोकांच्या फायद्यासाठी होता. आज मुहम्मद यांच्या ग्रामीण बँकेच्या धर्तीवर सुमारे १०० देशांनी आपापल्या देशांत ग्रामीण बँकांची स्थापना केल्या असून त्या सुरळीतपणे कार्यरत आहेत. कोणत्याही आर्थिक सुरक्षिततेशिवाय गरीबांना कर्ज देणे, ही अशक्यप्राय कल्पना त्यांनी ग्रामीण बँकेच्या माध्यमातून सुरू करून सूक्ष्म कर्ज ही संकल्पना विकसित केली. बँकींग प्रणालीमध्ये ग्रामीण बँकेचा प्रयोग, सूक्ष्म वित्तपुरवठा, बचतगटांची चळवळ, सामाजिक उद्योग या कार्यांबद्दल मुहम्मद यांना २००६ मध्ये नोबेल पारीतोषिक या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले.
मुहम्मद हे एक प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी दारिद्र्याचे उच्चाटन व्हावे आणि सामाजिक विकास साध्य व्हावे यांसाठी अथक प्रयत्न केले आहेत. जगातील अन्य राज्यांनी बांग्लादेशाप्रमाणे गरीबांसाठी बँका प्रस्थापित केल्यानंतर त्या राज्यांचा आर्थिक व सामाजिक विकास होण्यास मदत होऊन महिला सक्षमीकरण विकासासाठी निश्चित पोषक ठरतील, असे त्यांनी मत व्यक्त केले. दी न्यु स्टेट्समन या ब्रिटीश नियतकालिकाने जगातील सर्वांत प्रभावशाली व्यक्तींमध्ये मुहम्मद यांना चाळीसावा क्रमांक दिला आहे.
मुहम्मद यांचे अनेक लेख, पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या लिखानामध्ये त्यांनी प्रामुख्याने गरीबी कमी करण्यावर, तसेच गरीबांना बँकर, सूक्ष्म कर्ज, अर्थव्यवस्था यांवर भर दिलेला दिसून येतो. त्यांचे पर्सन्स, पॅशन्स अँड पॉलिटिक्स (१९८०); बँकर टु दी पुअर : दी स्टोरी ऑफ दी ग्रामीण बँक (२००३); बँकर टु दी पुअर : मायक्रो-लेंडिंग अँड दी बॅटल अगेन्स्ट वर्ल्ड पॉव्हर्टी (२००७); क्रिएटींग ए वर्ल्ड विदाउट पॉव्हर्टी (२००७); बिल्डिंग सोशल बिझनेस (२०१०); ए वर्ल्ड ऑफ थ्री झीरोज (२०१७) इत्यादी ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
मुहम्मद यांना त्यांच्या कल्पना, कार्य आणि प्रयत्नांसाठी पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले : रामॉन मागसायसाय पुरस्कार (१९८४); युएसएचा स्वातंत्र दिन पुरस्कार (१९८७); आगा खान अवॉर्ड (१९८९); मोहम्मद शब्दीन पुरस्कार (१९९३); श्रीलंकेचा मानवतावादी पुरस्कार (१९९३); युएसएचा वर्ल्ड फूड प्राईज (१९९४); इंदीरा गांधी शांतता पुरस्कार (१९९८); सिडनीचा शांतता पुरस्कार (१९९८); बांग्लादेशचा सर्वोच्च पुरस्कार, राजा हुसेन मानवीय नेतृत्व पुरस्कार (२०००); गांधी शांतता पुरस्कार (२०००); व्हॉल्वो पर्यावरण पुरस्कार, स्वीडन (२००४); जपानचा निहॉन किझाई शिम्भून पुरस्कार (२००६); नेदरलँड आणि सोलचा शांतता पुरस्कार (२००६); राष्ट्रपती पदक (स्वातंत्र – २००९); गोल्डन बायटेक अवॉर्ड (२००९); काँग्रेशीअनल गोल्ड मेडल (२०१०); ऑलिंपिक लॉरेल अवॉर्ड (२०२१); चॅम्पिअन ऑफ ग्लोबल चेंज अवॉर्ड (२०२१) इत्यादी.
मुहम्मद यांना २० देशांतील विद्यापीठांतून ५० मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान करण्यात आल्या आहेत. ते युनायटेड नेशन्स फाउंडेशन बोर्डाचे सदस्य आहेत. त्यांच्या कार्यांचा गौरव करीत बांग्लादेश सरकारने त्यांचा फोटो असलेले स्टँप काढले आहे. त्यांचे आजही सामाजिक कार्य सुरू आहे.
समीक्षक : अनिल पडोशी