बालकाच्या आयुष्यातील जन्मानंतरचा साधारणत: चार आठवड्यापर्यंतचा कालावधी हा नवजात शिशू कालावधी म्हणून ओळखला जातो. प्रत्येक बालकाची शारीरिक आणि मानसिक वाढ ही त्याची मातेच्या उदरात असतानाची वाढ, जन्म झाल्यानंतर त्याच्या आरोग्याचा आलेख आणि नवजात शिशू असताना घेण्यात आलेली त्याची आवश्यक ती काळजी यांवर अवलंबून असते. भारतात नवजात शिशूमधील (Neonatal; वय १ दिवस ते २८ दिवस) मृत्यूचे प्रमाण हे २७.६९५ /१००० जीवित जन्म (२०२२) इतके नोंदले गेले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी नवजात शिशू शुश्रूषा महत्त्वाची आहे.

नवजात शिशू परिचर्या ही बाल आरोग्य शाखेची उपशाखा म्हणून कार्यरत असते. नवजात शास्त्र (Neonatology) आणि नवजात परिचर्या शास्त्र (Neonatal Nursing ) या स्वतंत्र शाखांतील तज्‍ज्ञ नवजात शिशूंना आरोग्य सेवा देतात. याची सुरुवात साधारणत: १६ व्या शतकात झाली. आजच्या घडीला यामध्ये अद्ययावत सोयी, संरचना आणि विविध उपकरणांचा उपयोग करून गुणवत्तापूर्ण शुश्रूषा दिली जाते.

नवजात शिशू शुश्रूषा विभागातील सर्व नवजात बालकांच्या शुश्रूषेचे नियोजन व व्यवस्थापन करणे हे या विभागातील परिचारिकेची प्राथमिक जबाबदारी असते. नवजात शिशू परिचर्येचे नियोजन पुढील वर्गीकरणाप्रमाणे केले जाते.

  • सर्वसाधारण परिचर्या : सुदृढ नवजात बालकाच्या मातेला शिशूच्या जन्मानंतर अर्धा तासात स्तनपान, बाळाचे शारीरिक तापमान तसेच स्वच्छता राखणे, बाळाला संसर्ग होऊ नये याकरिता घ्यावयाची काळजी इत्यादींसंदर्भात परिचारिका जे मार्गदर्शन करते यालाच सर्वसाधारण परिचर्या असे संबोधले जाते
  • विशिष्ट परिचर्या : कमी वजन असलेल्या आजारी नवजात बालकांना स्वतंत्र विभागात ठेवले जाते. या विभागात सर्वसाधारण परिचर्येच्या जोडीला काही विशिष्ट तपासण्या करून परिचारिका उपचाराचे नियोजन करते.
  • अतिदक्षता विभाग परिचर्या : क्वचित प्रसंगी नवाजत शिशूला अतिक्लिष्ट उपचार पद्धती द्यावी लागते. अशा वेळी शिशूला अतिदक्षता विभागात उष्णपेटीत (incubator) किंवा वातायक लावून ठेवले जाते.  या विभागात कार्यरत परिचारिका अनुभवी आणि विशिष्ट प्रशिक्षित असतात.

नवजात शिशू विभागात कार्यरत परिचारिका : या विभागात कार्यरत असणारी परिचारिका प्रशिक्षित व नोंदणीकृत असते. परिचारिका बाल परिचर्येत पारंगत असून त्यांना नवजात शिशू परिचर्येचे अद्ययावत ज्ञान असते. या विभागातील व्यवस्थापन, आयोजन व प्रशासकीय कामे तसेच प्रशिक्षकाची जबाबदारी देखील परिचारिकेला सांभाळावी लागते. परिचारिका शिशूच्या आरोग्य संवर्धनासाठी पालकांना आरोग्य शिक्षण देतात. परिचर्या प्रक्रियेतील प्राथमिकतेनुसार निर्णय क्षमता, विभागाचे सांघिक नेतृत्व, सहृदयता, इतर विभागाशी समन्वय राखणे इ. गुण परिचारिकेच्या अंगी असतात. नवजात शिशूची उपचार प्रक्रिया बालरोगतज्‍ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच केली जाते. शिशूला औषध देत असताना शिशूचे वय, वजन यांचा विचार करून औषधाचे प्रमाण ठरविले जाते. या प्रमाणातच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषध दिले जाते. शिशूची शारीरिक स्वच्छता तसेच विभागाची स्वच्छता राखणे ही महत्त्वपूर्ण जबाबदारी परिचारिका पार पाडत असतात.

नवजात शिशू आरोग्य समस्या व उपाययोजना :

  • शिशूला जन्मत: धनुर्वात होण्याची शक्यता असते. ती टाळण्यासाठी माता गरोदर असताना तिला धनुर्वात लसीच्या दोन मात्रा देण्यात येतात. बाळंतपणादरम्यान स्वच्छता, निर्जंतुकीकरणाची व बाळाच्या नाळेची काळजी घेतली जाते.
  • जंतुसंसर्गाने शिशूचा मृत्यू होऊ नये याकरिता संपूर्ण विभाग व उपकरणे वेळोवेळी निर्जंतूक केली जातात. बालकाची रोगप्रतिकार शक्ती वाढावी याकरिता जन्मानंतर अर्ध्या तासात बाळाला स्तनपान करण्यास मातेला तयार केले जाते.
  • मातेच्या गर्भाशयातून बाहेर आल्यानंतर बाळाच्या शरीराचे तापमान स्वाभाविक राखणारी यंत्रणा पूर्णपणे कार्यरत नसते, त्यामुळे बाळाचे शारीरिक तापमान कमी होण्याची शक्यता असते. तापमान स्वाभाविक रहावे याकरिता बाळाला उष्णपेटीत ठेवतात किंवा खोलीचे तापमान वाढवतात. आवश्यकतेनुसार अंगावर कपडे व पांघरूण घालून मातेच्या जवळ उबेत ठेवतात.
  • बाळंतपणादरम्यान बाळास प्राणवायू मिळण्यास अडथळा येऊ शकतो, त्यामुळे शिशूला काही क्लिष्ट आजारांना बळी पडावे लागते. हे टाळण्यासाठी मातेची गरोदरपणात वेळोवेळी तपासणी करावी. प्रसूती प्रशिक्षित तज्ज्ञांकडून दवाखन्यातच करावी. परिचारिकेला देखील नवजात शिशूचे पुनरुज्जीवन (Resuscitation) करण्याचे प्रशिक्षण दिलेले असावे.
  • अद्ययावत उपकरणे व प्रक्रियांचा वापर करताना अडचणी उद्भवू नयेत याकरिता आरोग्य संघाच्या प्रत्येक घटकाला या उपकरणांच्या वापराचे प्रशिक्षण दिलेले असावे.

नवजात शिशूला परिचर्या देत असताना परिचारिकेने परिचर्या प्रक्रियेच्या सर्व पायऱ्या समजून घ्याव्यात. आजारी नवजात शिशू म्हणजे कोण? त्याची शुश्रूषा करण्याची उद्दिष्टे, प्राथमिकता काय असावी? नवजात शिशू अतिदक्षता विभागात वापरण्यात येणारी नवनवीन उपकरणे, अत्याधुनिक रुग्ण सेवा पद्धतीच्या ज्ञानाचा व कुशलतेचा वापर करून जोखमीच्या बालकांना सेवा देऊन त्यांचा जीवन आलेख वाढविण्यात मदत करणे ही नवजात शिशू परिचारिकेची जबाबदारी असते.

समीक्षक : सरोज वा. उपासनी