गंडूष म्हणजे तोंडात औषध धरून ते न गिळता केली जाणारी उपचारात्मक क्रिया. गंडूषासोबत कवल या क्रियेचा विचार ग्रंथांत नेहमी एकत्रितपणे केलेला आढळत असून ही सुद्धा थोड्याफार फरकाने गंडूषासारखी क्रिया आहे. दातातून कळ येणे, दात हालणे इत्यादी दातांचे आजार; तोंड बेचव होणे, दुर्गंध येणे, कोरड पडणे, घशात जळजळ होणे इत्यादी तोंडाचे आजार; मानेचे, डोक्याचे, डोळ्यांचे आजार तसेच जीभ, घसा, कान यांचे आजार यांत गंडूष आणि कवल लाभदायी ठरते.

गंडूष व कवल करण्यासाठी वारा येणार नाही अशा उबदार खोलीत रूग्णाला बसवावे. त्यानंतर त्याचे गळा, गाल, कपाळ, खांदे व मान यांना शेकून हळूवारपणे दाबावे. गंडूष करावयाचे असल्यास तोंडात औषध गच्च भरून घ्यावे. त्याचे प्रमाण इतके असावे की जेणेकरून ते तोंडात फिरवता येणे किंवा खुळखुळणे शक्य होणार नाही. त्यानंतर मान किंचित वर करावी. तोंडात चिकटा येईपर्यंत तसेच नाक व डोळ्यांतून पाणी येईपर्यंत ते औषध न गिळता धरून ठेवावे आणि त्यानंतर ते थुंकून द्यावे. कवल करताना वरीलप्रमाणेच क्रिया केली जाते; परंतु थोड्या कमी मात्रेत औषध घेऊन ते तोंडात खुळखुळवले जाते. रोगानुसार असे साधारण तीन, पाच किंवा सात गंडूष किंवा कवल केले जातात. कवल व गंडूष करण्यासाठी औषधियुक्त तूप, तेल, दूध, मध, पाणी, मद्य या पातळ पदार्थांचा वापर केला जातो. काही विशिष्ट अवस्थांमध्ये कवल करण्यासाठी पातळ औषधाऐवजी औषधींचे चाटण किंवा कल्क (वाटून बारीक केलेली औषधी वनस्पती) वापरला जातो.

गंडूष व कवल या क्रिया निरोगी व्यक्तीने रोज केल्या तरी चालतात. निरोगी व्यक्तीने कान, नाक, डोळे, तोंड यांचे आरोग्य टिकविण्यासाठी तीळ तेल किंवा मांसरस (मांसाचे तुकडे पाण्यात शिजवून विशिष्ट पद्धतीने तयार केलेले सूप) यांचा कवल किंवा गंडूष करावा असे आयुर्वेदात सांगितले आहे.

पहा : पंचविध कषायकल्पना.

संदर्भ :

  • अष्टांग हृदय — सूत्रस्थान, अध्याय २२ श्लोक ५-१२.
  • अष्टांग संग्रह — सूत्रस्थान, अध्याय ३१ श्लोक ३- ११.

समीक्षक – जयंत देवपुजारी