वनस्पती व प्राणी यांच्या वर्गीकरणात उपयोगात आणले जाणारे सर्वांत लहान व उत्क्रांतीच्या दृष्टीने महत्त्वाचे असे एकक म्हणजे जाती होय. जीववैज्ञानिक जाती संकल्पना ही जीवविज्ञान व त्याच्याशी संबंधित अभ्यास क्षेत्रांत मुख्यत: वापरली जाते. परंतु, डार्विन यांच्या ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसिस बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन (१८५९) या ग्रंथाच्या प्रकाशनानंतर जातीची (Species) व्याख्या निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. याच्याशी संबंधित व्याख्येप्रमाणे जे दोन सजीव यशस्वीपणे प्रजननक्षम अपत्यांना जन्म देऊ शकतात त्यांचा समावेश एकाच जाती समूहात होतो. याशिवाय जेव्हा दोन सजीव जवळजवळ एकसारखे दिसत असतील, तर त्यानुसार आकारिकी/रूपिकी जाती संकल्पना (Morphological species concept); उत्क्रांतीच्या प्रवासात सजीव एकाच पूर्वजापासून उत्पन्न झाले असतील, तर त्यानुसार जातीवृत्तीय जाती संकल्पना (Phylogenetic species concept); जर सजीव एकाच सूक्ष्म अधिवासात (Niche) असतील आणि त्या अधिवासावर अवलंबून असतील, तर त्यानुसार परिस्थितिकीय जाती संकल्पना (Ecological species concept) अशा विविधप्रकारे जीववैज्ञानिक जाती संकल्पनेचा विस्तार करता येतो.

जाती विविधता ठरवताना जातीची व्याख्या करणे आवश्यक असते. कारण एका जातीमधील सर्व सजीव एकसारखे असतील असे नाही. त्यामुळे एका जातीमध्ये किती बदल असण्याची शक्यता आहे याचा अंदाज घ्यावा लागतो. त्यानुसार जातीची व्याख्या आणि जाती ठरवण्याची पद्धत यांवरून दोन सजीव एकाच जातीचे आहेत की नाही हे ठरवावे लागते.

जीववैज्ञानिक जाती यासंबंधी अर्न्स्ट मायर (Ernst Walter Mayr) या उत्क्रांती वैज्ञानिकांनी केलेल्या व्याख्येनुसार एकाच जातीतील सजीवांत मुक्त नैसर्गिक प्रजनन असून त्या सर्वांत समान जनुकसंच असतो, तर दोन भिन्न जातींतील सजीव प्रजोत्पादन करू शकत नाहीत. भिन्न जातींच्या सजीवांत नैसर्गिक रीत्या प्रजनन होत नाही आणि कृत्रिम रीत्या त्यांच्यात प्रजनन घडवून आणले तरी त्यांना अपत्ये होत नाहीत किंवा झालेली अपत्ये प्रजननक्षम नसतात. उदा., घोडा आणि गाढव या जवळच्या जातींमधील प्रजननातून खेचर जन्म घेते; परंतु, खेचर प्रजननक्षम नसते.

(१) पश्चिमी मीडोलार्क : नर, (२) पूर्वीय मीडोलार्क : नर

काही बाबतीत जीववैज्ञानिक जाति संकल्पना थेट आणि सहज समजण्यासारखी आहे. उदा., पश्चिमी मीडोलार्क (Western meadowlark; शास्त्रीय नाव – Sturnella eglecta) आणि ईस्टर्न मीडोलार्क (Eastern meadowlark; शास्त्रीय नाव – Sturnella magna) हे पक्षी रंगरूपाने जवळजवळ सारखेच असून ते उत्तर अमेरिकेच्या पश्चिम आणि पूर्व भागातील रहिवासी आहेत. अमेरिकेच्या मध्यपश्चिम राज्यांत त्यांचे प्रजनन क्षेत्र परस्परांना आच्छादले जाते. मिशिगन, विस्कोंसिन, इलिनोय, आयोवा, मिसूरी आणि मिनिसोटा येथे या दोन्ही प्रजाती आढळत असल्या तरी त्यांच्यामध्ये परस्पर प्रजनन होत नाही. कारण दोन्ही जातीच्या नर मीडोलार्क पक्ष्यांचे प्रणयाराधन गाणे भिन्न असल्याने त्या गाण्यास त्या त्या जातीची मादी प्रतिसाद देते. यामुळे प्रजननदृष्ट्या या दोन्ही जाती भिन्न ठरतात.

तथापि प्रजननावर आधारलेल्या जाती संकल्पनेला मर्यादा आहेत. ज्या सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन होते (उदा., जीवाणू) त्यांच्याबाबतीत ही संकल्पना गैरलागू ठरते. तसेच ज्या सजीवांच्या प्रजननासंबंधी पुरेशी माहिती उपलब्ध नाही त्यांच्याबाबतीत जाती संकल्पना संदिग्ध ठरते. त्याचप्रमाणे आता विलुप्त झालेले जे सजीव जीवाश्म स्वरूपात आहेत, त्यांच्या प्रजननाबद्दल काहीही सांगणे शक्य नसल्याने पुराजीवविज्ञानात आकारिकी/रूपिकी जाती (Species morphology) संकल्पना वापरली जाते.

पहा : क्रमविकास (प्रथमावृत्ती नोंद), जाति (प्रथमावृत्ती नोंद).

संदर्भ :

  • https://bio.libretexts.org/Courses/University_of_California_Davis/BIS_2B%3A_Introduction_to_Biology_-_Ecology_and_Evolution/02%3A_Biodiversity/2.01%3A_Species_Concepts
  • https://bioprinciples.biosci.gatech.edu/module-1-evolution/speciation/
  • Rice, Stanley A. Encyclopedia of Evolution, New York : Facts On File, McCabe 2007.
  • Rittner, Don and Timothy L. Encyclopedia of Biology, New York : Facts On File, McCabe 2004.

समीक्षक : प्रमोद जोगळेकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.