अरिष्ट म्हणजे मरणसूचक चिन्ह. भारतीय तत्त्वज्ञान व आयुर्वेद शास्त्रानुसार जन्म आणि मृत्यू या अपघाताने होणाऱ्या किंवा आकस्मिक होणाऱ्या घटना नसून त्यामागे निश्चित कारणमीमांसा असते. एखाद्या जीवाला दीर्घायुष्य प्राप्त होते, तर एखाद्या जीवाला जन्मत:च मृत्यू प्राप्त होतो. त्यामुळे कोणत्या जीवाचे आयुर्मान किती आहे हे त्याने केलेल्या कर्मसंचितानुसार ठरते, असे चार्वाक दर्शन वगळता सर्व आस्तिक आणि नास्तिक दर्शनांमध्ये स्वीकारलेले आहे. योगसूत्र (३.२२) नुसार एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कधी होणार आहे, याचे ज्ञान दोन प्रकारे होऊ शकते – (१) व्यक्तीने केलेल्या कर्मसंस्कारांवर संयम (धारणा-ध्यान-समाधि) केल्याने आणि (२) अरिष्टांचे ज्ञान झाल्याने. व्यक्तीचा मृत्यू होण्यापूर्वी काही विशिष्ट मरणसूचक चिन्ह स्वत: त्या व्यक्तीला आणि इतरांना दिसू शकतात, त्यांनाच अरिष्ट असे म्हणतात. अरिष्टांचे योग्य ज्ञान झाल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू कधी होणार आहे याचे अनुमान करता येऊ शकते. योगसूत्रावरील व्यासभाष्यानुसार अरिष्टे ही तीन प्रकारची असतात –

(१) आध्यात्मिक (स्वत:च्या शरीराशी किंवा मनाशी संबंधित) अरिष्ट : दोन्ही कान बंद केल्यावर सामान्यपणे ऐकू येणारा शंखासारखा आवाज ऐकू येत नसेल किंवा दोन्ही डोळे बंद केल्यावर जर ज्योती दिसत नसेल, तर त्या व्यक्तीचा मृत्यू लवकरच होणार आहे असे समजावे.

(२) आधिभौतिक (अन्य जीवांशी संबंधित) अरिष्ट : व्यक्तीचा मृत्यू जवळ आला असेल तर पूर्वज किंवा लहानपणी भेटलेल्या व हयात नसलेल्या व्यक्तींचे दर्शन होते. कधी कधी विचित्र वेष धारण केलेल्या यमदूतांचे दर्शन होते.

(३) आधिदैविक (निसर्गातील काही तत्त्वांशी संबंधित) अरिष्ट : सिद्ध पुरुषांचे अथवा स्वर्ग-नरक इत्यादी विषयी ज्या प्रकारचे वर्णन केले जाते, त्याच्याशी अनुरूप स्थानाचे दर्शन होत असेल तर तेही मरण सूचित करते.

एखाद्या व्यक्तीचा मूळ स्वभाव पूर्णपणे बदलून तो पूर्वीपेक्षा पूर्ण विरुद्ध होत असेल, तर तेही मरणसूचक चिन्ह होय. उदा., शांत स्वभावाची व्यक्ती अचानक रागीट बनली किंवा कठोर स्वभावाची व्यक्ती मृदु बनली, तर ते अरिष्ट समजावे. कधीकधी मृत्यू जवळ आल्यास व्यक्तीला सर्व विपरीत दिसू लागते, जसे चांगल्या गोष्टीत दोष दिसू लागतात, वाईट गोष्टीत गुण दिसू लागतात. अशा प्रकारे विपरीत ज्ञान होत असेल, तर तेही मरणसूचक चिन्ह समजावे.

मार्कण्डेयपुराणामध्ये मृत्युपूर्वीच्या एक वर्षापासून एक दिवस पूर्वीपर्यंत कोणकोणती सूचक चिन्हे दिसतात, त्याविषयीचे वर्णन केले आहे. मार्कण्डेयपुराणामध्ये वर्णिलेल्या अरिष्टांपैकी काही अरिष्टे पुढीलप्रमाणे आहेत : मृत्यूपूर्वी १ ­वर्ष ­­­­­–­ ध्रुवतारा, शुक्र, अरुंधती तारा न दिसणे; ११ महिने ­­­–­ सूर्याचे बिंब किरणरहित दिसणे, अग्नीच्या ज्वाळांतून किरणे निघताना दिसणे; १० महिने ­­­–­ स्वप्नातील मूत्रात, विष्ठेत, उलटीत सोने, चांदी दिसणे; ९ महिने ­­­–­ सोनेरी रंगाचे झाड दिसणे; ८ महिने ­­­–­ शरीरयष्टीमध्ये अकस्मात बदल होणे, जाड मनुष्य अचानक बारीक किंवा बारीक मनुष्य अचानक जाड होणे; ७ महिने ­­­–­ मातीत किंवा चिखलात पूर्ण पावलाचा ठसा न उमटणे; ६ महिने ­­­–­ गिधाड, कबूतर, वटवाघूळ, कावळा, निळ्या रंगाचा किंवा मांसभक्षक पक्षी डोक्यावर बसणे; ४-५ महिने ­­­–­ अनेक कावळ्यांनी टोची मारणे, स्वत:ची सावली विचित्र दिसणे; ३ महिने ­­­–­ आकाशात ढग नसतांना दक्षिणेकडे वीज दिसणे, रात्री इंद्रधनुष्य दिसणे; १ महिना ­­­–­ पाणी, तेल, तूप किंवा आरसा यामध्ये प्रतिबिंब न दिसणे किंवा मस्तकरहित प्रतिबिंब दिसणे; १५ दिवस­­­ –­ शरीराला बोकडाचा किंवा प्रेताचा गंध येणे; १० दिवस ­­­–­ आंघोळ करताक्षणी छाती आणि पाय कोरडे पडणे व पाणी पीत असतानाही घसा कोरडा पडणे.

आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्येही अरिष्टांचे वर्णन विस्ताराने केलेले आहे. व्यक्तीच्या शरीराचा वर्ण, गंध, स्पर्श, पाच इंद्रिये, मन, आचार-विचार, स्मृती, आकृती, बल, मेधा, सावली, स्वप्न इत्यादी अनेक गोष्टींचे निरीक्षण केल्यास मृत्युसूचक चिन्हे स्पष्टपणे दिसून येतात. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांशी संबंधित कोणकोणती अरिष्टे दिसून येतात त्याचे विस्ताराने वर्णन चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, अष्टांगहृदय  या आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये केलेले दिसून येते. परंतु, त्यातील अनेक अरिष्टे केवळ वैद्यच जाणून घेऊ शकतात.

‘अरिष्ट’ हा योगशास्त्रातील प्रमुख विषय नसल्याने त्याचे केवळ संक्षिप्त वर्णन भाष्यांमध्ये मिळते. परंतु, याविषयीचे विस्ताराने वर्णन आयुर्वेद, पुराण, तंत्रशास्त्र व अन्य काही ग्रंथांमध्ये प्राप्त होते.

संदर्भ :

  • लेले, काशिनाथ वामन (संपा.), श्रीमार्कण्डेयपुराण, वाई, १९१६.
  • स्वामी श्री ब्रह्मलीनमुनि, पातञ्जलयोगदर्शन, वाराणसी, २००३.

समीक्षक : संतोष जळूकर