राजगुरू, बसवराज महंतस्वामी : (२४ ऑगस्ट १९१७—२१ जुलै १९९१). कर्नाटक व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे प्रसिद्ध गायक. त्यांचा जन्म उत्तर कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यातील यलीवाळ येथे झाला. त्यांचे वडील महंतस्वामी हे स्वतः गायक असल्याने त्यांनी लहानवयातच बसवराजांचे संगीत शिक्षण सुरू केले. वयाच्या ११व्या वर्षी बालनट म्हणून वामनराव मास्तरांच्या नाटक मंडळीमध्ये बसवराजांना प्रवेश मिळाला. त्या दरम्यान सुरेशबाबू माने, गोविंदराव टेंबे यांच्याकडून नाट्यगीतांचे मार्गदर्शन त्यांना प्राप्त झाले. वयाच्या तेराव्या त्यांच्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यामुळे बसवराज यांच्या काकांनी त्यांची जबाबदारी घेतली आणि त्यांना हुबळी येथील मुरसावीर मठातील संस्कृत पाठशाळेत दाखल केले. हा एक वेगळा योग ठरला, कारण याच पाठशाळेत एकदा गदगचे ज्येष्ठ गुरू गानयोगी पंचाक्षरीबुवा यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी बसवराजांचे गायन ऐकले आणि त्यांना हेरून स्वतःच्या गदग येथील शिवयोगी आश्रमात त्यांची व्यवस्था केली. या ठिकाणी पंचाक्षरीबुवांनी त्यांना सतत १२/१३ वर्षे गायनाची तालीम दिली. दररोजची तालीम आणि कठोर रियाज यामुळे बसवराजांचा आवाज तेजदार झाला. इथेच त्यांना पंचाक्षरीबुवांचे गुरू आग्रा घराण्याचे निळकंठबुवा मिरजकर यांचेही मार्गदर्शन मिळाले. १९४४ साली पंचाक्षरीबुवांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे बसवराज मुंबई येथे आले. तिथे त्यांनी सवाई गंधर्व आणि सुरेशबाबू माने यांच्याकडून विद्या घेतली. शक्य तिकडून विद्या घेऊन आपले गाणे समृद्ध करण्याचे त्यांनी ठरविले होते. त्यामुळे १९४५ च्या सुमारास त्यांनी कराची येथे कूच केले. तिथे त्यांनी उस्ताद वहीद खान आणि उस्ताद लतीफ खान यांच्याकडून किराणा घराण्याची गायकी शिकून घेतली. याशिवायही अनेक गायक कलाकारांकडून त्यांनी संगीत शिक्षण घेतले. ‘मी चोवीस गुरु केले’ असे ते अभिमानाने सांगत असत. १९४७ साली ते धारवाडला परतले.
आपल्या चढ्या, जोरकस पण मुलायम आणि लोचदार आवाजामुळे आणि रागदारीबरोबरच सर्व प्रकारची गायकी तितक्याच समर्थपणे गाऊन जाणकार आणि सर्वसामान्य रसिकास मोहित करणारे असे कलाकार म्हणून बसवराज राजगुरू मान्यता पावले. किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे मिश्रण त्यांच्या सादरीकरणात जाणवते. गाण्यातील चपळता आणि आकर्षकता ही त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये होत. हमखास लागणारा आवाज, चढी पट्टी, खर्जात देखील खुलणारा आवाज, काकू प्रयोगाचा (आवाज प्रसंगानुसार बारीक मोठा करणे) मजेदार उपयोग, गायनामध्ये रागदारीबरोबरच धृपद, धमार, नाट्यसंगीत, ठुमरी, कन्नड वचने या साऱ्या गायनप्रकारावर तेवढीच हुकूमत यामुळे त्यांचे गायन कायमच रसिकांच्या मनात घर करून राहिले. त्यांनी केलेला स्वरलयीचा आनंददायी खेळ सर्वांना मोहून टाकी. त्यांनी अनेक मैफिली गाजवल्या. बेगम अख्तर यांनी त्यांना ‘सुरोके बादशाह’ तर तत्कालीन प्रसारण मंत्री बी. व्ही. केसकर यांनी त्यांना ‘गाण्यातला हुकूमी एक्का’ अशा पदव्या दिल्या.
बसवराज राजगुरू यांना अनेक मानसन्मानांनी गौरविण्यात आले. भारत सरकारने १९७५ साली पद्मश्री, १९९१ साली पद्मभूषण या पुरस्कारांनी त्यांचा गौरव केला. त्यांना १९७१ मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला. कर्नाटक विश्वविद्यालयाकडून त्यांना त्यांच्या सांगीतिक कारकीर्दीच्या सन्मानार्थ मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली. त्यांचा शिष्यपरिवार देखील मोठा आहे. परमेश्वर हेगडे, गणपती भट, बिंदुमाधव पाठक, शिवानंद पाटील, श्रीपाद हेगडे, शांताराम हेगडे, संगीता कट्टी इत्यादी ख्यातकीर्त शिष्य कलाकारांनी त्यांची परंपरा पुढे चालविली आहे. त्यांचे धारवाड येथे निधन झाले.
मराठी भाषांतर : सुधीर पोटे