खाँ, रजब अली : (१८७५—८ जानेवारी १९५९). हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्रभावशाली गायनामुळे प्रसिद्ध झालेले गायक. त्यांचे गाणे जयपूर घराणे आणि किराणा घराण्याचे वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण असलेले होते. रजब अली खाँ यांचा जन्म देवास येथे झाला. त्यांचे वडील मुगलू खाँ यांचे संगीत शिक्षण रेवा आणि जयपूर येथील सांगीतिक क्षेत्रात झाले. रजबअली खाँ यांना सुरुवातीचे संगीताचे शिक्षण त्यांच्या वडिलांकडून मिळाले. वयाच्या पंधराव्या वर्षी ते बीन शिकण्यासाठी सुप्रसिद्ध बीनकार बंदे अली खाँ यांच्याकडे इंदूर येथे आले. बंदे अली खाँ हे त्यावेळी तत्कालीन इंदूरचे राजे शिवाजीराव होळकर यांनाही संगीतकलेची प्राथमिक माहितीवजा शिक्षण देत असत. रजब अली खाँ रूद्र वीणा, जलतरंग आणि सतारदेखील वाजवत असत. बंदे अली खाँ यांचे १८९६ साली पुणे येथे निधन झाले. त्यानंतर रजब अली आणि त्यांचे वडील कोल्हापूर येथे आले आणि सरदार बाळासाहेब गायकवाड यांच्याकडे राहिले. काही काळानंतर जयपूर-अत्रौली घराण्याचे संस्थापक अल्लादियाखाँसाहेब हे देखील दरबार गवई म्हणून कोल्हापूर येथे रुजू झाले. त्या काळी मुगलू खाँ आणि रजब अली खाँ यांची शिष्या दत्तीबाई आणि अल्लादियाखाँ यांची शिष्या तानीबाई या दोघींमध्ये गायनासंबंधी मोठी चुरस असे. अल्लादियाखाँ यांच्या घराजवळ बसून रजब अली यांनी त्यांचा रियाझ ऐकून आपली गायकी त्याबरहुकूम घोटायला सुरुवात केली. त्यामुळे अल्लादियाखाँची गायकी त्यांच्या गळ्यावर चांगलीच चढली; पण यामुळे या दोन कलाकारांमध्ये वितुष्ट आले ते कायमच राहिले. बंदे अलींच्या किराणा घराण्याचा गायनाचा प्रभाव रजब अलींच्या गायनात दिसून येई. दोन्ही गायकीचा सुंदर मिलाफ म्हणजे रजब अली खाँ यांचे गायन होते. गुंतागुंतीची, अतिशय पेंचदार आणि वेगाने तान घेण्याची त्यांची पद्धत हे त्यांच्या गायनाचे एक वैशिष्ट्य होय. चांदनी केदार, शिवमत भैरव, ललिता गौरी, केदार, काफी कानडा, बसंतिकेदार, जौनपुरी, बागेश्री या रागांमध्ये ते विशेषत: सादरीकरण करीत. खोलवर संगीताचे सादरीकरण आणि श्रोत्यांना विस्मयचकित करणारे असे त्यांचे गाणे असे. त्यांचा स्वभाव काहीसा विक्षिप्त असा होता.

रजब अली खाँ यांचा संगीत नाटक अकादमीने १९५४ मध्ये पुरस्कार देऊन सन्मान केला. गणपतराव देवासकर, रजब अलींचे पुतणे अमानत खाँ हे त्यांचे ख्यातकीर्त शिष्य होत. व्यवसायाने इंजिनियर असलेले कृष्णराव मुजुमदार यांनाही त्यांची चांगली तालीम मिळाली होती.

देवास येथे रजब अली खाँ यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • देवधर, बी.आर. थोर संगीतकार, मुंबई, १९७४.

समीक्षण : सुधीर पोटे