ब्रुनर, जेरोम  (Bruner, Jerome) : (१ ऑक्टोबर १९१५ ते ५ जून २०१६). प्रसिद्ध अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञ. जेरोम यांचा जन्म अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात हरमन व रोज ब्रुनर या दाम्पत्यापोटी झाला. ते जन्मतः अंध होते; परंतु वयाच्या दुसऱ्या वर्षी डोळ्यांच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे त्यांना दृष्टी प्राप्त झाली. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर आपल्या आईसोबत वारंवार फिरावे लागल्यामुळे त्यांना विविध शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली. त्यांनी इ. स. १९३७ मध्ये ड्युक विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात बी. ए. ही पदवी आणि इ. स. १९३९ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केली. तसेच इ. स. १९४१ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून मानसशास्त्र या विषयात डॉक्टरेट ही पदवी संपादन केली. पीएच. डी.चे शिक्षण घेत असताना त्यांना जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जी. डब्ल्यू. ऑलफोर्ट यांचे मार्गदर्शन लाभले.

जेरोम यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेच्या आर्मी इंटेलिजन्स खात्यामध्ये काम केले. इ. स. १९४५ मध्ये ते हार्वर्ड विद्यापीठामध्ये मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि बोधात्मक मानसशास्त्र व शैक्षणिक मानसशास्त्राशी संबंधित संशोधनांमध्ये सहभागी झाले. अमेरिकेमध्ये १९५० ते १९६० यांदरम्यान अभ्यासक्रम सिद्धांताच्या विकसनामध्ये त्यांनी खूप मोठे योगदान दिले. त्यांचे बरेचसे व्यावसायिक जीवन अमेरिकेच्या पूर्वोत्तर भागामध्ये व्यतीत झाले. त्यांनी १९७० ते १९७२ यांदरम्यान इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये प्रायोगिक मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी १९९० च्या उत्तरार्धापासून न्यूयॉर्क विद्यापीठाच्या कायदा विभागामध्ये मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले.

बोधात्मक मानसशास्त्र : जेरोम हे बोधात्मक मानसशास्त्राच्या उद्गात्यांपैकी एक होते. त्यांनी ‘संवेदना’ व ‘अवबोध’ या मानसिक प्रक्रियांवरती संशोधन केले. यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले. या प्रयोगांनंतर त्यांनी आपले लक्ष वास्तविक बोधात्मक मानसशास्त्राकडे वळविले. त्यांनी १९६५ मध्ये अ स्टडी ऑफ थिंकींग नावाचे पुस्तक प्रकाशित केले. संबोधावरील प्रदीर्घ संशोधनाचा परिपाक म्हणजे त्यांचे हे पुस्तक होय. लोक संबोध कोणत्या प्रक्रियेने शिकतात? या प्रश्नाची उकल करण्यापूर्वी त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबोध म्हणजे काय? संबोध समजणे म्हणजे काय? यांसारख्या अन्य प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांचे संबोधाविषयीचे हे कार्य संबोध अध्ययनास अत्यंत पायाभूत ठरते. शिक्षणशास्त्रातील ‘संबोध साध्यता प्रतिमान’ हे जेरोम व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनावर आधारित आहे. अध्ययन प्रक्रियेमध्ये नवीन माहितीचे संपादन करणे, ज्ञानाचे रूपांतरण करणे आणि ज्ञानाची पर्याप्तता व समर्पकता तपासणे या तीन प्रक्रियांचा समावेश जेरोम करतात. ते अध्ययनाला  साधक संकल्पना मानतात. त्यांच्या मते, एखाद्या व्यक्तीचे जगाविषयीचे ज्ञान हे त्या व्यक्तीच्या वास्तवतेच्या सुरचित रचनांवर आधारित असते. या सुरचित रचना ती व्यक्ती तिच्या संस्कृतीतून तयार करते आणि नंतर त्याचा वापर व्यक्तिगत उपयोगासाठी करते.

संबोध ꞉ जेरोम यांनी संबोध निर्मिती व संबोध प्राप्ती यामंध्ये फरक असल्याचे मानून संयोजक संबोध, वियोजक संबोध आणि संबोधात्मक संबोध असे संबोधकाचे तीन प्रकार सांगितले आहेत. त्यांनी संबोध संपादनासाठी विविध कार्यनिती  सांगितल्या असून तिचे पूर्णत्ववादी व खंडवादी असे वर्गीकरण केले आहे. तसेच त्यांनी संबोध संपादनाच्या मूर्त पातळी, परिचय पातळी, रचनात्मक पातळी आणि संबोधाचे निष्कर्षण या श्रेणी सांगितलेल्या आहेत. मानसिक वाढ ही चेतक प्रतिसादातील सहकार्य संबंधांची हळूहळू होणारी वाढ नाही, तर ही एकप्रकारच्या प्रयत्न, विश्रांती यांच्या जिन्याप्रमाणे असते. त्यांनी वास्तव अध्ययनासाठी कृतीयुक्त, प्रतिमात्मक आणि प्रतिकात्मक असे तीन मार्ग सुचविले आहेत. त्यांनी १९९० मध्ये ॲक्ट्स ऑफ मिनिंग हे पुस्तक लिहिले. यामध्ये त्यांनी मनाचा संगणकीय आराखडा सादर केलेला आहे. अर्थनिर्मिती ही माहिती प्रक्रियाकरणासाठी महत्त्वाची संकल्पना कशी आहे, हे स्पष्ट केले आहे. तसेच लोक मानसशास्त्र ही सांस्कृतिक दृष्टीने आकारलेली संकल्पना असून ज्यामध्ये व्यक्तीने स्वतःबद्दल, इतरांबद्दल आणि जगाबद्दलच्या दृष्टिकोणाचे संघटन केले असल्याबद्दलचे विवेचन आढळते.

अवबोध ꞉ अवबोध म्हणजे व्यक्तीची वस्तू निरीक्षणापासून त्या वस्तूच्या किंवा प्रसंगाच्या वर्गीकरणासाठीची निष्कर्षात्मक उडी असते. व्यक्तीचे अवबोधन ही अशी रचनात्मक प्रक्रिया आहे की, ज्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती स्वतःच्या रचनात्मक विश्वाशी संबंधित अशा बाबींवरून परिकल्पना प्रस्थापित करते आणि त्या विशिष्ट प्रसंगाच्या गुणधर्माआधारे तपासून पाहते. अवबोधन प्रक्रियेमध्ये अवबोधक व्यक्ती ही केवळ निष्क्रिय इंद्रियात्मक प्रतिसादक नसते. ती तत्परतेने माहितीची निवड करते, त्यावरून अवबोधात्मक परिकल्पना प्रस्थापित करते आणि उद्दिष्टाप्रत जाण्याचा प्रयत्न करते, असे जेरोम यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

शिक्षणाच्या संस्कृतीची उपपत्ती : जेरोम यानी १९६० मध्ये शिक्षणाची प्रक्रिया नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचे शिक्षण क्षेत्रासाठी फार मोठे योगदान असल्याचे मानले जाते. त्यांनी या पुस्तकामध्ये संबोधाचे विचार प्रक्रियेतील आणि पर्यायाने शिक्षणातील महत्त्व प्रतिपादन केले आहे. अवबोधन होणे म्हणजे तपशिलाचे गट करता येणे; संबोध होणे म्हणजे अवबोधाचे गट करता येणे; शिकणे म्हणजे गट करता येणे; निर्णय घेता येणे म्हणजे गट करता येणे असे त्यांचे मत होते.

गट करतांना साम्य-भेद लक्षात घेणे आवश्यक असते. लोक साम्य-भेदांचा उपयोग करूनच जग समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्यातूनच शिक्षण घडत असते. हे शिक्षण कृती, प्रतिमा आणि भाषा या तीन प्रकारच्या माध्यमांद्वारे होते. यातील भाषेद्वारे होणारा बोधात्मक विकास हा त्यांच्या पुढच्या अभ्यासाचा विषय झाला. बोधात्मक विकासामध्ये सर्वसाधारणपणे हा क्रम पाळला जात असला, तरी पियाजे यांनी म्हटल्याप्रमाणे मुलांच्या ठराविक वयात आढळणाऱ्या या पायऱ्या नव्हेत. तसेच प्रौढही जेव्हा एखादे नव्याप्रकारचे शिक्षण घेतात, तेव्हा तेही याच क्रमाने जाताना आढळतात, असे जेरोम यांचे निरीक्षण होते.

जेरोम यांनी मुलांच्या शिक्षणामध्ये व्यवस्था आणि गती आणण्यासाठी समकेंद्री अभ्यासक्रमाचा पुरस्कार केला; कारण वाढत्या अनुभवांबरोबर पूर्वीच्या संबोधाचा अधिक विकास होत असतो, हे तत्त्व त्यांच्या प्रत्ययास  आले होते. त्यांच्या १९७३ च्या उपपत्तीमध्ये पुढील तत्त्वांचा उल्लेख आढळतो. (१) मुलांच्या अनुभवांशी नाते असणारे अध्ययन असेल, तर मुले शिकायला तयार असतात व सक्षम असतात. (२) अध्ययनाची रचना व्यवस्थित झाली असेल, तर मुलांना विषयाचे आकलन सहज होते. (३) विद्यार्थ्यांना स्वतःची भर घालणे शक्य होईल, असे अध्ययनाचे आयोजन असावे.

सतत प्रयोग करणे आणि सतत विचारांत बदल करीत राहणे, हे जेरोम यांचे वैशिष्ट्य होते. त्यामुळे १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात ते बालकांच्या नैसर्गिक विकासाचा पुरस्कार करणाऱ्या ‘बोधात्मक क्रांती’कडून ‘शिक्षण संस्कृतीच्या उपपत्ती’कडे वळले. बालकांच्या विकासात भोवतालच्या संस्कृतीचा प्रभाव अनन्यसाधारण असतो, हे त्यांच्या अनुभवास आले होते. यासंबंधात ते म्हणतात की, संस्कृतीचे स्पष्टपणे मांडलेले अथवा अध्याहृत असलेले उद्देशच शिक्षणाचे स्वरूप ठरवीत असतात.

जेरोम यांनी विविध अध्यापन तंत्राशी संबंधित असलेली ‘स्कॅफोल्डिंग’ ही संज्ञा शोधून काढली. स्कॅफोल्डिंग हा प्रभावी अध्यापनाचा एक आवश्यक घटक मानला जातो. त्याद्वारे अध्ययनातील अंतर व कमतरता  शोधले जातात. अध्ययन प्रक्रियेमध्ये विद्यार्थी अधिक स्वावलंबी व्हावा, त्याला अध्ययन विषयाचे सखोल आकलन व्हावे, यासाठी विविध तंत्रांचा वापर केला जातो. यामध्ये विद्यार्थ्यांना आकलनाच्या वरीष्ठपातळीपर्यंत पोहोचण्यासाठी तात्पुरती मदत दिली जाते.

जेरोम यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी व लिंडन जॉन्सन यांच्या कार्यकाळामध्ये राष्ट्राध्यक्षांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या शैक्षणिक पथकाचे सदस्य म्हणून काम केले. त्यांनी १९६४ ते १९९६ या कालावधीत शैक्षणिक प्रणालीसाठी ‘मॅन : अ कोर्स ऑफ स्टडी’ (मॅकोज) हा दहा वर्षांच्या मुलांसाठीचा अभ्यासक्रम तयार केला. याचा मुख्य हेतू इतिहाससापेक्ष सामाजिक शास्त्रांना व तथ्यांऐवजी रचनात्मक संकल्पना व मूल्य यांना चालना देणे हा होता; मात्र काही कारणास्तव याला दिले जाणारे अनुदान बंद करण्यात आल्याने हा प्रकल्प बंद करण्यात आला.

जेरोम यांनी शिक्षणशास्त्राशी निगडित पुढील पुस्तकांचे लेखन केले ꞉ ए स्टडी ऑफ थिंकींग (१९५६), द प्रोसेस ऑफ एज्युकेशन (१९६०), ऑन नोविंग (१९६२), टुवर्ड्स ए थिअरी ऑफ इन्स्ट्रक्शन (१९६६), द रिलेवन्स ऑफ एज्युकेशन (१९७१), बियाँड द इन्फॉर्मेशन गिव्हन (१९७३), चाइल्ड्स टॉक, लर्निंग टू युज लँग्वेज (१९८३), ॲक्च्युअल माईंड्स (१९८६), पॉसिबल वर्ल्ड (१९८६), ॲक्ट्स ऑफ मिनिंग (१९९०), द कल्चर ऑफ एज्युकेशन (१९९६), इन सर्च ऑफ पेडागोजी, भाग-१ व २ (२००६) इत्यादी.

जेरोम यांना येल व कोलंबिया विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले. त्याच बरोबर  आंतरराष्ट्रीय बालझन पारितोषिक (१९८७), प्रतिष्ठित संशोधनासाठीचे सीबा सुवर्णपदक, अमेरिकन मानसशास्त्रीय संघटनेचा प्रतिष्ठित वैज्ञानिक पुरस्कार इत्यादी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.

संदर्भ :

  • करंदीकर, सुरेश, अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र, कोल्हापूर, २००९.
  • गायकवाड, के. डी., संबोध साध्यता प्रतिमान, नाशिक, २००७.
  • जगताप, ह. ना., शैक्षणिक मानसशास्त्र. पुणे, १९९९.
  • बाम, राजश्री; कोलटकर, शीला, संपा., मैत्री ज्ञानसंरचनावादाशी, पुणे, २०१३.
  • Kincheloe, J. L.; Horn, R. A., The Praeger handbook of Education And Psychology Vol. I., New Delhi, 2008.
  • Bruner, J., The Process of Education, Cambridge, 1960.
  • Jha, Arbind Kumar, Constructivist Epistemology and Pedagogy, New Delhi, 2009.

समीक्षक ꞉ ह. ना. जगताप