अर्थशास्त्र आणि विधी या दोन अभ्यासशाखांच्या संयोगातून मांडलेला एक सैद्धांतिक प्रमेय. नोबेल विजेते रोनाल्ड हॅरी कोझ या ब्रिटिश अर्थतज्ज्ञांनी १९९१ मध्ये हा प्रमेय मांडला. त्यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ सोशल कॉस्ट’ या लेखामुळे कायदा आणि अर्थशास्त्र या शाखेचा जन्म झाला. त्यापूर्वी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आर्थर सेसिल पिगू यांचे करविषयक विचार स्वीकारले गेले होते.

दोन किंवा अधिक पक्षांमध्ये संपत्ती किंवा मालमत्ता हक्क संदिग्ध किंवा वादग्रस्त असतो आणि व्यवहारखर्च नसतोच किंवा नगण्य असतो, तेव्हा त्यांच्यातील सौदेबाजीमुळे अधिक कार्यक्षम परिणाम साधला जाऊ शकतो. थोडक्यात, दोन पक्षांमधील वाद कायदेशीर निर्णयापेक्षा परस्परांमधील तडजोडीमुळे अधिक कार्यक्षम पद्धतीने सोडविला जाऊ शकतो, असे कोझ प्रमेयाचे प्रतिपादन आहे. कोझ प्रमेय प्रामुख्याने व्यक्तीगत निवडीचे स्वातंत्र्य आणि व्यवहारखर्चाचा अभाव या दोन तत्त्वांवर अवलंबून आहे. मालमत्तेच्या हक्कांविषयी वादात संपूर्ण मुक्त व्यवहारामुळे सर्वोत्तम आर्थिक कार्यक्षमता साधली जाऊ शकते, हा या प्रमेयाचा प्रमुख अर्थ आहे.

पिगू यांच्या कर प्रस्तावात शासनाकडून प्रदूषण करणाऱ्या कारखान्याला प्रदूषणाची मर्यादा ठरवून दिली जाते. त्यामुळे बाह्यखर्च हे अंतर्गतखर्च बनतात. म्हणजेच, बाह्यतांचे अंतर्गतीकरण होते आणि उत्पादनखर्चात प्रदूषण खर्चाचा समावेश होतो. मग कारखाना मालक प्रदूषण नियंत्रक उपकरणांचा खर्च आणि प्रदूषण कराची तुलना करून लाभखर्चाच्या अनुषंगाने उत्पादन पद्धती आणि पातळी निश्चित करू शकतो. जोपर्यंत बाह्यता अस्तित्वात आहे आणि पिगू कराद्वारे त्यांचे अंतर्गतीकरण होत नाही, तोपर्यंत परिणाम अकार्यक्षम ठरेल. प्रदूषकावर कर लादण्याने अकार्यक्षमता दूर केली जाऊ शकते; मात्र काही वेळा नुकसानीचे मोजमाप करणे कठीण असते. तरीही पिगू करपद्धतीचा वापर करून बाह्यतांच्या अंतर्गतीकरणाद्वारे कार्यक्षम परिणाम मिळविता येऊ शकतो.

अनेक अर्थतज्ज्ञांनी पिगू यांचे मत स्वीकारले; मात्र यात (१) बाह्यतांमुळे नेहमीच अकार्यक्षमता निर्माण होईल असे नाही, (२) पिगू करामुळे साधारणतः कार्यक्षम परिणाम मिळत नाही आणि (३) मूळ समस्या बाह्यतांमध्ये नसून व्यवहार खर्चामध्ये आहे हे तीन प्रकारचे दोष असल्याबाबत पिगू यांनी लक्षात घेतलेले नाही.

कोझ प्रमेय हे आधुनिक शासकीय नियंत्रणाचे विश्लेषण करण्यासाठी, विशेषतः बाह्यतांच्या बाबतीत,  महत्त्वपूर्ण आधार ठरते. अनेक प्रकरणांमध्ये कायदेतज्ज्ञ आणि न्यायाधीशांनी वैधानिक खटले सोडविण्यासाठी या प्रमेयाचा आधार घेतला आहे. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉर्ज जोसेफ स्टिग्लर यांनी आपल्या द थिअरी ऑफ प्राइस (१९६६) या पुस्तकात व्यवहारखर्च शून्य पातळीत असताना खाजगी आणि सामाजिक खर्चाच्या स्पष्टीकरणात बाह्यता समस्येवरील उपायांचा सारांश देताना कोझ प्रमेयाचा वापर करून सर्वप्रथम याला प्रमेय असे संबोधले. कोझ प्रमेयामुळे मोठ्या उद्योगांवर शासकीय, न्यायिक, राजकीय नियंत्रण असू नये आणि प्रदूषणासारख्या इतर आर्थिक समस्या मुक्त बाजारपेठेच्या सुधारक बलांद्वारे सोडवाव्यात, असा विचार प्रसारित झाला. कोझ प्रमेयाचा प्रभाव १९७० ते १९९० या काळादरम्यान अतिशय मोठ्या प्रमाणात होता.

कोझ प्रमेय हा असा आर्थिक सिद्धांत आहे, ज्यात पूर्ण स्पर्धात्मक बाजारपेठेत आदान-प्रदानांचा कार्यक्षम संच पर्याप्त वितरण-उत्पादनाच्या आधारे आणि संपत्ती हक्काचे विभाजन लक्षात न घेता निवडला जातो. यातून बाह्यतांच्या उपस्थितीत आर्थिक घटकांची कार्यक्षमता दिसून येते. सिद्धांतानुसार जर बाह्यतांमध्ये व्यापार शक्य असला आणि व्यवहारखर्च नसला, तर सौदेबाजीमुळे संपत्तीचे आरंभीचे वाटप लक्षात न घेता पॅरेटो पर्याप्त निर्णय किंवा परिणाम मिळू शकतो.

कोझ प्रमेयाची अनेक व्यावहारिक उदाहरणे दिली जातात. (अ) ‘’ आणि ‘’ हे दोन जमीनमालक आहेत. ‘’ ची जमीन वरच्या बाजूस, तर ‘’ ची जमीन उतारावर आहे. ‘’ च्या जमिनीतून वाहणाऱ्या पाण्यामुळे ‘’ चे नुकसान होत असेल, तर यातून चार शक्यता दिसतात.

  • (१) समजा ‘’ चे नुकसान १०० डॉलर्स असेल आणि नुकसान टाळण्यासाठी भिंत बांधण्याचा खर्च ५० डॉलर्स असेल, तर ‘’ नुकसान भरपाई देण्यापेक्षा भिंत बांधण्याचा पर्याय निवडेल.
  • (२) समजा ‘’ ला भिंत बांधण्याचा खर्च १०० डॉलर्स येत असेल आणि ‘’ चे नुकसान ५० डॉलर्स होत असेल, तर ‘’ भिंत बांधणार नाही. तेव्हा ‘’ नायालयात जाईल आणि खटला जिंकेल. तेव्हा ‘’ ला ५० डॉलर्स भरपाई देण्यास सांगितले जाईल. ‘’ ला भिंत बांधण्यापेक्षा हे स्वस्त पडेल.
  • (३) समजा नुकसान १०० डॉलर्स आणि भिंत खर्च ५० डॉलर्स असेल, तर भिंत बांधली जाईल. जरी ‘’ ने खटला जिंकला नसला, तरी तो ‘’ ला ५० डॉलर्स देऊन भिंत बांधून घेईल. त्याला नुकसानीपेक्षा हा पर्याय स्वस्त पडेल.
  • (४) नुकसान ५० डॉलर्स आणि भिंत खर्च १०० डॉलर्स असेल, तर भिंत बांधली जाणार नाही आणि ‘’ खटला जिंकणार नाही. येथे भिंत बांधण्याच्या प्रयत्नामध्ये आर्थिक वास्तव आड येईल.

(आ) समजा, एका मासेबाजाराजवळ एक उपहारगृह आहे. माशांच्या वासामुळे उपहारगृहाच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. समजा दर पौंड मासे विक्रीमागे होणारे नुकसान पाच डॉलर्स असेल, तर दोन्ही पक्षांमध्ये न्यायालयात कायदेशीर खटला चालून कसा न्याय देता येईल, हे ठरविले जाईल; मात्र कोझ प्रमेयानुसार यात पुढील शक्यता आहेत.

संभाव्य शक्यता

मासेबाजाराचे पर्याय उपहारगृहाचे पर्याय
१) उपहारगृहाला भरपाई द्यावी (५ डॉलर, प्रती पौंड मासे विक्री). १) दुर्गंधीमुळे होणारे नुकसान सोसावे (५ डॉलर, प्रती पौंड मासे विक्री).
२) दुर्गंधी निर्मूलन यंत्र घ्यावे (८ डॉलर, प्रती पौंड मासे विक्री खर्च). २) मासेबाजाराला दुर्गंधी निर्मूलक यंत्राचे पैसे द्यावे (८ डॉलर, प्रती पौंड मासे विक्री खर्च).
३) मासेबाजार स्थलांतर (१० डॉलर, प्रती पौंड मासे विक्री). ३) मासेबाजाराला स्थलांतरासाठी पैसे द्यावे (१० डॉलर, प्रती पौंड मासे विक्री).
४) उपहारगृहाच्या स्थलांतरासाठी (२० डॉलर, प्रती पौंड मासे विक्री भरपाई द्यावी). ४) उपहारगृहाच्या स्थलांतरासाठी (२० डॉलर, प्रती पौंड मासे विक्री खर्च).

दोन्ही बाजूंमधील सौदेबाजीनंतर सर्वांत स्वस्त पहिला पर्याय निवडला जाईल; मात्र जर उपहारगृहाचे नुकसान अधिक असेल, तर दुर्गंधी निर्मूलक उपकरण घेणे स्वस्त पडेल. यात मासेबाजार हा न्यूनतम खर्च टाळू शकणारा घटक आहे. अशाच प्रकारे पिकांची नासधूस, पती-पत्नीमधील घटस्फोट, बंदरावरील दीपगृह, जवळच्या अंतरावरील रेडीओ केंद्र (कोझचे स्थिर अनुमान), अपघात, खून इत्यादी उदाहरणांना कोझ प्रमेय लागू पडतो.

डेव्हिड फ्रीडमन यांनी कोझ प्रमेयाचे काही वेळा कशाचाच उपयोग होत नाही, प्रत्येक गोष्टीचा उपयोग होतो आणि परिणाम अनेक गोष्टीवर अवलंबून असतो ही तीन मुद्दे मांडले आहेत. मिल्टन फ्रीडमन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तत्कालीन अनेक प्रख्यात अर्थतज्ज्ञांच्या जाहीर वादविवादानंतर कोझ यांचे विचार सर्वमान्य केले गेले. जेव्हा व्यवहारखर्च उच्च असतात, तेव्हा न्यायालय आणि शासकीय हस्तक्षेपाची आवश्यकता असतेच. कोझ प्रमेयात कायदेशीर वैधानिक लाभापेक्षा आर्थिक लाभाची प्रेरणा अधिक असल्यामुळे प्रमेयात मांडलेले सर्व परिणाम तार्किक मानले जातात. कोझ प्रमेयात शक्य ते सर्व पर्याय विचारात घेतले जातात.

टीका ꞉ कोझ यांनी स्वतःच आपले प्रमेय प्रदूषणाच्या आणि ज्यात नकारात्मक बाह्यता आहे अशा परिस्थितीत, विशेषतः असंख्य लोक सहभागी असणाऱ्या उदाहरणात, लागू होत नाही हे मान्य केले होते. व्यवहारखर्च अधिक असताना हे प्रमेय खरे नसते, ही टीका म्हणता येणार नाही; कारण कोझ यांनी व्यवहारखर्च नसतानाची परिस्थिती लक्षात घेतली आहे. उलट, हे गृहीतक विचारात न घेणे, हे या टीकेवरील टीका म्हणता येऊ शकते; परंतु प्रत्यक्षात व्यवहारखर्च असतोच आणि त्यामुळे हे प्रमेय आर्थिक वास्तवात जवळजवळ अव्यवहार्य आहे, अशी टीका सर्वप्रथम कोझ यांनीच केली असल्याने ते स्वतःच आपल्या प्रमेयाचे पहिले टीकाकार आहेत.

पिगू यांच्या कर प्रस्तावाला कोझ प्रमेयातील सौदेबाजी हा पर्याय मानला जात असला, तरी काही वेळा कोझ प्रमेयात पिगू कराचे समर्थन केलेले आढळते. व्यवहारखर्च हा केवळ लोकांच्या संख्येमुळे वाढतो असे नाही, तर तो सामाजिक खर्चामुळेही वाढतो. एखाद्या घटकाचा मोबदला न देताही तिचा वापर करणे शक्य असते. जोनाथन ग्रूबर यांच्या मते, लोकांना आपले अनुभव किंवा नुकसान पैशांच्या मूल्यात सांगणे सुलभ नसते.

प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड एच. थेलर यांनी कोझ प्रमेयावर वर्तनविषयक टीका केली आहे. जर लोकांना एखादा निर्णय अन्यायकारक वाटला, तर ते कोझप्रणित कार्यक्षम सौदेबाजी स्वीकारत नाहीत, ही टीका प्रत्यक्ष अभ्यासावर आधारित आहे. लोक आपल्याजवळील वस्तूंचे मूल्य अधिक असल्याचे मानतात आणि त्यांचा त्याग करायला तयार नसतात, हे थेलर यांनी सप्रयोग सिद्ध केले आहे.

कोझ प्रमेयावर १९६० च्या दशकानंतर असंख्य विचारवंतांद्वारे टीका केली जात असली, तरी प्रमेयावर प्रचंड स्वरूपाचे लेखन, विविध प्रकारचे पुरावे, प्रतिपादने केले जात आहे. त्यामुळे हे क्षेत्र सातत्याने वृद्धिंगत होत असून मुख्य प्रवाहातील अर्थशास्त्रात समृद्ध अशी भर पडलेली आहे.

समीक्षक : राजस परचुरे